Friday, February 4, 2022

अफगाणिस्तान-सुमेरमध्ये भारतीय व्यापार वसाहती!


  


नौकानयनाने सागरी व्यापार सुरु होण्याच्या फार पूर्वीपासून खुश्कीच्या मार्गाने दीर्घ पल्ल्याचा व्यापार होत होता. आज प्रदीर्घ लांबीचा रेशीम मार्ग सर्वात प्राचीन म्हणून ओळखला जात असला तरी तो इसपु पहिल्या शतकापासून वापरात येऊ लागला. हा रेशीम मार्ग चीन ते सिरीया एवढा प्रदीर्घ लांबीचा होता. या मार्गाने जागतिक संस्कृतीत उत्थान व पतन या दोन्ही अर्थाने मोठा हातभार लावलेला आहे. पण आज उपलब्ध झालेल्या माहितीनुसार जगातील सर्वात प्राचीन व्यापारी मार्ग सिंधू संस्कृतीच्या लोकांनी शोधला. इसपू सात हजार हा त्याचा काळ आहे.

 

सिंधू संस्कृतीचा व्यापार पश्चिम आशियाशी सुरु झाला तो जेन मेकिंटोष या पुरात्वविदाच्या मते आजपासून नउ हजार वर्षांपूर्वी. भारतातील माल पश्चिम आशिया (इराण) मध्ये पाठवला जायचा तर मौल्यवान खनिजे तिकडून आयात केली जायची. उत्तर अफगाणिस्तानातून लापिझ लाझुली (नीलस्फटिक) आयात केले जायचे. त्याचा कच्चा माल म्हणून उपयोग करून त्यापासून शोभिवंत दागिने बनवले जायचे.  हे दागीने संपूर्ण आशियात प्रसिद्ध होते. सुमेरपर्यंत भारतातून जाणा-या मौल्यवान वस्तूंत नीलस्फातीकापासून केलेल्या दागिन्यांचाही समावेश होता. या मालाच्या आयातीचा आणि निर्यातीचा प्राचीन मार्ग  काची मैदान, बोलन खिंड ते क्वेटा-मुन्दिगाक (कंदाहार विभाग) आणि नंतर तेथून हिंदूकुश पर्वतातील खिंडीतून बाल्ख येथवर जात होता. बाल्ख प्रांतातील आमु दरिया (ऑक्सस) नदीजवळ लापिझ लाझुलीच्या खाणी होत्या. आधे तेथून कच्चा माल आणला जायचा. पण पुढे या दागिन्यांचे मागणी वाढली तशी सिंधू संस्कृतीच्या लोकांनी या भागातच आपली वसाहत स्थापन केली. १९७५ साली झालेल्या उत्खननात ऑक्सस नदीकाठावरील शोर्तुगाई येथे ही वसाहत सापडली. तेथील बांधकामात वापरलेल्या विटा, सिंधू संस्कृतीच्या मुद्रा आणि अन्य सिंधू संस्कृतीची वैशिष्ट्ये जतन करणा-या असंख्य वस्तू तेथे सापडल्याने ही व्यापारी वसाहत सिंधू संस्कृतीच्याच लोकांनी वसवली होती हे निश्चित झाले. या वसाहतीचा काळ इसपू २२०० असा ठरवण्यात आला आहे. सिंधू संस्कृतीचे लोक या नीलस्फटिकावर प्रक्रिया करून शोभिवंत अलंकार बनवायचे आणि ते पुन्हा पश्चिम आशियात, सुदूर मेसोपोटेमियापर्यंत निर्यात करायचे. भारतीय संस्कृतीच्या प्राचीन खुणा या प्रदेशांत झालेल्या उत्खननांमध्ये सापडल्यात. 

 

कच्च्या मालाच्या पुरवठ्याच्या सुलभतेसाठी तेथेच वसाहती स्थापन करण्याची सुरुवात प्राचीन भारतीयांनी केली असे म्हणता येते. कारण अशीच आणि तेवढीच प्राचीन सिंधूजनांची एखाद्या नगरासारखी अवाढव्य वसाहत  मुन्दिगाक (कंदाहार विभाग) येथे उत्खननात सापडली. हे मुख्यत्वे व्यापाराचे केंद्र होते.

भारतीय व्यापार पार सुमेर पर्यंत चालायचा हे आपण पाहिले आहे. हा मार्ग बाल्खहून पश्चिमेकडे फुटायचा आणि थेट सुमेर, अक्काड, इलम (आजचा इराक) पर्यंत जायचा. पुढे समुद्रमार्गानेही सिंधू संस्कृतीच्या लोकांनी इजिप्त सहित या प्रदेशाशी व्यापार काही हजार वर्ष चालू ठेवला. येथेही भारतीयांनी आपल्या व्यापारी वसाहती वसवल्याचे पुरावे लिखित स्वरूपात उपलब्ध आहेत. सुमेरियन दस्तावेजांनुसार मागन, दिल्मून या देशांप्रमाणेच मेलुहा हा त्यांचा मोठा व्यापारी भागीदार देश होता. मागन म्हणजे आताचा अरब अमिरात आणि ओमान हे देश होत. दिल्मून म्हणजे इराणचा काही भाग. मेलुहा येथून सागवानी लाकूड, मौल्यवान खनिजे, शोभिवंत दगड, गोमेद, नीलमणी व त्यापासून केलेले अलंकार, हस्तिदंत, सोने, मोती यासारख्या मौल्यवान वस्तूंबरोबरच मोर, कोंबड्या, कुत्रे आदी प्राणी-पक्षीही मेलुहातून तेथे निर्यात केले जात असत. सिंधू संस्कृतीच्या अनेक मुद्राही तेथे सापडलेल्या आहेत. हा व्यापार समुद्रमार्गे तसेच खुश्कीच्या मार्गानेही होत असे.

दक्षिण सुमेरमध्ये मेलुहाच्या व्यापा-यांनी अनेक वसाहती वसवलेल्या असल्याचेही उल्लेख उपलब्ध आहेत. दक्षिण सुमेरमधील  गिर्सू या नगराराज्यातील गुआब्बा शहर हेच या वसाहतीचे एक स्थान होते असे मानले जाते. अक्काडीयन साम्राज्याच्या काळात सम्राट रीमुश याने इलम विभागात मेलुहाच्या सैन्याशी युद्ध केल्याची नोंदही उपलब्ध आहे. अक्काडचा एक सम्राट सार्गोनचा नातू नारम-सीन (इसपू २२५४-२२१८) यानेही आपले मेलुहाच्या सैन्याशी युद्ध झाल्याचे नोंदवून ठेवले आहे.

मेलुहा हे भारताचेच नाव होते हे बहुसंख्य विद्वानांनी मेलुहाहून आयात केल्या जाणा-या वस्तूंवरून निश्चित केले आहे. दुसरे असे कि व्यापारावरून होणारी युद्धे तसेच व्यापा-यांचा आपल्याला हवा तसा अनुकूल धोरणे ठरवणारा सत्ताधीश असावा यासाठी असणारा आग्रह एवढ्या जुन्या काळातही होता आणि भारतीयही त्याला अपवाद नव्हते एवढेच.

भारताने पश्चिम आशिया प्रमाणेच मध्य आणि पूर्व आशीयाशीही मोठा व्यापार प्राचीन काळापासूनच सुरु ठेवला होता. त्याबद्दल आपण पुढे चर्चा करूच. अलंघ्य पर्वतांतून मानवाने जायचे मार्ग कसे शोधले हा एक कोड्यात टाकणारा प्रश्न आहे. पण आधीच म्हटल्याप्रमाणे बहुतेक प्राचीन मार्ग हे नदीकाठाने जायचे. खिंडीही मानवाने शोधल्या त्या नदी प्रवाहांमुळे निर्माण केलेल्या नैसर्गिक उतारांच्या मार्गांमुळे. आणि हे शोध घेणारे आद्य लोक होते पशुपालक (विशेषता: मेंढपाळ) महाराष्ट्रातीलही बहुतेक खिंडी धनगरांनीच शोधल्याचा इतिहास आपण वाचत असतो. जगभर अगदी असेच घडले. अफगाणिस्तानात हिंदुकुश ओलांडून जायचे तर आज खैबर, कुर्रम, टोची, गुमल व बोलन या खिंडी आहेत आणि या खिंडी काबूल नदीप्रमाणेच कुर्रम, टोची, गुमल, बोलन या नद्या पूर्वेकडे वाहत जाऊन पर्वत ओलांडत पाकिस्तानात सिंधूला मिळतात त्या नद्यांच्या प्रवाहांनी बनवलेल्या आहेत. भटक्या पशुपालकांनी सर्वप्रथम या मार्गांचा वापर केल्याने त्या खिंडी शोधाचेही श्रेय त्यांना देण्यात येते.

या खिंडी जशा व्यापार वृद्धीला सहायक झाल्या तशाच सांस्कृतिक देवान-घेवाणीलाही. आशिया खंडात भारतीय उत्पादने, पुराकथा, बैलगाडीचा शोध, मोजमापाची साधने व संज्ञा, शोभिवंत वस्तू ते सागासारखी मजबूत लाकडे ते पार मोर-हत्ती-कुत्रे पसरले ते या संपर्कामुळे. अफगाणिस्तानमार्गे गुलामांचा व्यापारही पुरातन असल्याचे पुरावे आता समोर येत आहेत. भाषिक देवानघेवानही स्वाभाविकपणेच झाली. आपणही असंख्य वस्तू तिकडून आयात केल्या. भारतातही (आज पुरावे उपलब्ध नसले तरी) मेसोपोटेमियाच्या व्यापा-यांच्या वसाहती येथेही असणे शक्य आहे. या व्यापारी मार्गांवरून आशिया खंडात भारतीय धर्मही पसरले. भारतात अनेक भटक्या जमाती येऊन स्थायिक झाल्या त्याही याच मार्गांनी. आक्रमणेही त्याला अपवाद नाहीत. पण व्यापारी मार्गांनी भारताचे हितच जास्त केले आहे असे प्राचीन इतिहास पाहता लक्षात येते. जोवर हा व्यापार होता तोवर भारत समृद्ध होता. भारतावरील अनेक आक्रमणे ही केवळ व्यापारी मार्गांवर स्वामित्व असावे यासाठी झाली. भारतीय व्यापा-यांनी सुदूर सुमेरमध्ये युद्धे केली तीही व्यापारी सवलतींसाठी. किंबहुना जागतिक युद्धांचा इतिहास आणि व्यापारी मार्गांचा इतिहास हातात हात घालून जातो कारण अर्थसत्ता ही नेहमीच महत्वाची असते. पश्चिमोत्तर भागातून जाणारे व्यापारी मार्ग ऐतिहासिक दृष्ट्या समजावून घेणे महत्वाचे आहे ते यासाठीच!

-संजय सोनवणी 

No comments:

Post a Comment

ऐतिहासिक तथ्यांची तोडमोड

  ऐतिहासिक तथ्यांची तोडमोड करणे आणि लोकांची दिशाभूल करणे हा भाजपाचा पूर्वीपासून उद्योग राहिलेला आहे. परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी नुकतेच नेह...