प्राचीन व्यापारी मार्ग हे लोकवस्तीचा भाग सोडला तर अत्यंत प्राथमिक दर्जाचे होते. राजसत्तांना अजून व्यापाराचे महत्व न समजल्याने सुनियोजित, व्यवस्थित वाहतुकीस सोपे जावे असे रस्ते सत्तांनी त्यामुळेच बनवले नाहीत. काही तर अक्षरश: पायवाटा होत्या. त्यांची देखभाल व्यापारीच करत, पण तीही आपल्या सोयीपुरती. खिंडीतले रस्ते तर अत्यंत प्राथमिक आणि धोकेदायक होते. हिमालयातून मध्य आशियात जाणारे मार्ग तर जीवघेण्या संकटांनी भरलेले. शिवाय दिशादर्शक खुणांची सोय नसल्याने वाटाड्यांच्या मदतीशिवाय वांछित ठिकाणी पोचता येणे अशक्य व्हायचे. त्यामुळे “वाटाडे” हा व्यवसाय उदयाला आला. दुरचा प्रवास हा त्यांची सोबत घेऊनच व्हायचा. त्यामुळे या व्यवसायाला लवकरच बरकतही आली. अर्थात हा व्यवसायही कमी धोक्याचा नव्हता.
व्यापा-यांची दुसरी गरज होती
ती रक्षणाची. व्यापारी तांडे लुटणे हाही काही भागांतील जमातींचा एक उद्योगाच बनून
बसला. येथेही सुरुवातीला राजसत्तांनी आधी दुर्लक्षच केले. मग व्यापा-यांनी त्यातूनही मार्ग काढला. त्यांनी
स्वत:चीच रक्षकदले उभारायला सुरुवात केली. व्यापारी स्वत:ही लढवैय्ये असत.
त्यामुळे लुटारू जमातींना तोंड देणे काही प्रमाणात का होईना शक्य होऊ लागले.
व्यापारी तांड्यांवर झालेले हल्ले आणि त्यातून झालेली मनुष्यहानी हा राजकीय
युद्धांपेक्षा रोमहर्षक इतिहास आहे. त्यात पश्चिम आशियात जायचे तर अफगाणिस्तान हा
दुर्गम पर्वतरागानी भरलेला प्रदेश ओलांडावा लागायचा. हा प्रदेश प्रतिकूल
हवामानामुळे तसा अविकसित होता. पशुपालन हाच मुख्य व्यवसाय. या टोळ्या व्यापा-यांवर
अचानक हल्ले करून त्यांना लुटत. ऋग्वेदात पणी (व्यापारी) जमातीचा आपल्याला जो
तिरस्कार दिसतो तो एक ऐतिहासिक उदाहरण म्हणून घेतला पाहिजे कारण व्यापारी धनाढ्य
होते आणि हे पशुपालक, तुलनेने खूपच गरीब वैदिक टोळ्याही दक्षिण अफगानिस्तानातच
स्थायिक होत्या. असाच प्रकार आपल्याला उत्तरेच्या हिमालयातून जाणा-या व्यापारी
मार्गांबाबत दिसतो. तिकडे हुंझा परिसरात राहणा-या टोळ्या तर फक्त वाटमारीसाठी
कुप्रसिद्ध होत्या.
त्यात अनेक भागांत युद्धाची
अथवा युद्धजन्य स्थिती असे. मध्य आणि पश्चिम आशियात दीडेकशे तरी वेगवेगळ्या मानवी
टोळ्या होत्या. संस्कृती आकार घेत असली तरी राजकीय आणि वर्चास्वतावाद यातून
त्यांच्यात रक्तरंजित युद्धाची रेलचेल असे. त्यामुळे प्रवास अशक्यप्राय होऊन जाई.
व्यापाराची (आणि कलांचीही) वृद्धी शांततेच्या काळात होते. युद्धांत आपल्या भागातून
जाणारा प्रत्येक परकीय हा शत्रू मानला जाई. त्यांची कत्तल अनिवार्य होऊन जायची.
स्थिती शांत होईपर्यंत व्यापार स्थगित करणे भाग पडायचे. चीन ते युरोपपर्यंत
जाणा-या रेशीममार्गाची चेंगीझखानाच्या काळात व अन्य काही वेळा अशी स्थिती आलेली होती.
भारत ते इराक (मेसोपोटेमिया) या मार्गावरही अनेकदा अशे स्थिती आलेली आहे. इसपू
१८०० मध्ये मेसोपोटेमियात प्रचंड युद्धे सुरु झाल्याने त्यांच्याशी होणारा सिंधू
संस्कृतीचा व्यापारच दीर्घ काळ ठप्प झाला होता हे सर्वात जुने उदाहरण आहे. मी
माझ्या “फराओचा संदेश” या कादंबरीत इसपू २२०० मधील भारतातून असिरीयात जाणा-या
व्यापारी तांड्यांची , त्यांच्यावर कोसळलेल्या संकटांची आणि एकंदरीतच त्यांचे
प्रवासातले हलाखीचे जीवन यावर वास्तवपूर्ण प्रकाश टाकला आहे.
पण एवढी प्राकृतिक आणि
मानवनिर्मित संकटे असतांनाही, आपण परत येऊ कि नाही याची खात्री नसतांना
व्यापा-यांनी आपले तांडे नेणे, व्यापार करणे थांबवले नाही. पुढे राजकीय व्यवस्था
जरा स्थिर होऊ लागल्यानंतर राजांना व्यापाराचे महत्व समजले. व्यापारी हे त्यांच्या
दृष्टीने माहितीचा खजिना तर होतेच पण कधी न पाहिलेल्या, आपल्या भागात न होणा-या
वस्तू पाहून तेहे अचंबित होऊ लागले. व्यापारामुळे आपल्या प्रजेचेही आर्थिक हित
होते हेही त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे राजसत्तांनी व्यापार वाढावा यासाठी
सुविधा निर्माण करायचे धोरण हळूहळू का होईना सुरु केले. त्यात रस्त्यांची देखभाल
आणि सैनिकी सुरक्षा या महत्वाच्या होत्या. त्यामुळे व्यापा-यांनीही त्यांना कर
देणे सुरु केले. त्यातून राजांच्या खाजीन्याताही भर पडू लागली.
इसापू २००० पर्यंत
पूर्वीपेक्षा बरी व्यवस्था आल्याने आशियातली व्यापारी मार्गांवरची अनेक शहरे
समृद्धीला पोचली. समरकंद, यारकंद, बल्ख, तक्षशिला, बनारस, दामिश्क, काश्गर, बुखारा
इत्यादी शहरांचा प्रचंड विकास होऊ शकला तो केवळ व्यापारामुळे. एव्हाना सागरी
मार्गानेही व्यापार सुरु झाला असल्याने बंदरांची शहरेही प्रसिद्धीच्या शिखरावर
पोहोचली. लोथल हे अतिप्राचीन बंदर तसेच चेऊल, भडोच, देबल, भडोच, कल्याणसारखी बंदरे
जेथे होते तेथे व्यापाराने कळस गाठला. दहाव्या शतकात आलेला अल मसुदी नावाचा अरब
प्रवासी आपल्या प्रवासवर्णनात म्हणतो कि चेउल (चौल) बंदरावर शेकडो जहाजे येत. दहा
हजार बैलांवर लादून आणलेला माल त्याने तेथे पाहिला आणि भारताच्या वैभवाबद्दल तो
अचंबित झाला. पुढे मग तो इतर बंदरावरही गेला.
संपत्तीसोबत लुटारुही पैदा
होतात. समुद्री व्यापार त्याला अपवाद राहिला नाही. समुद्री चाचे जगभर पैदा होऊ लागले. भर समुद्रात
व्यापारी जहाजे गाठून त्यांना लुटणे हा एक मोठा धंदा झाला. अनेकदा राजसत्ताही
शत्रूचे आर्थिक कंबरडे मोडावे यासाठी शत्रूराष्ट्रातील व्यापारी जहाजे लुटण्यासाठी
या चाच्यांना नेमत हाही इतिहास आपण इंग्लंड-स्पेन बाबत पाहू शकतो.
व्यापारामुळे राज्याचे हितच
होते हे लक्षात आल्यानंतर सुरु झाला एक काळा अध्याय. व्यापारी मार्गांवर कब्जा
असणे म्हणजे जगाची अर्थव्यवस्था नियंत्रित करणे हा एक नवाच सिद्धांत जन्माला आला.
साम्राज्यवाद हा राजकीय वा धार्मिक सत्तेसाठी उदयाला आलेला नाही तर आर्थिक सत्ता
निर्माण करण्यासाठी आला हे जगाच्या युद्धांच्या इतिहासातील एक वास्तव आहे.
व्यापारी मार्गांवरील स्वामित्वासाठी झालेली युद्धे इसपु पाचव्या शतकापासून नोंदली
गेलेली आहेत. अलेक्झांडर भारतावर चालून आला तो तेथवर येणा-या मार्गांवर आणि येथील
सुबत्तेवर कब्जा करण्यासाठी. चीनने इसपू दुस-या शतकापासून मध्य आशियातून जाणा-या
व्यापारी मार्गांवर स्वामित्व मिळवण्यासाठी अगणित युद्धे केली. चंद्रगुप्त
मौर्याने बल्खवर ताबा मिळवला तो व्यापारी मार्गांवर स्वामित्व मिळवण्यासाठीच. पुढे
कनिश्क आणि आठव्या शतकातील लालीतादित्याने मध्य आशियावर स्वा-या केल्या तेही
व्यापारी मार्ग ताब्यात घेऊन जागतिक व्यापारावर नियंत्रण आणण्यासाठीच. किंबहुना
भारत चीन युद्ध झाले ते अक्साई चीनमधून जाणारा व्यापारी मार्गावरत चीनने कब्जा
केल्यामुळेच. पूर्वोत्तर भागातून (आसाम, मेघालय इ) जाणारे व्यापारी मार्गही
युद्धाचे कारण बनले. व्यापारी मार्गामुळेच सैन्याची वेगवान हालचाल करता येणे शक्य
झालेले होते हेही विशेष. थोडक्यात इतिहास हा व्यापार केंद्रे व मार्ग आपल्या
कब्जात ठेवण्यासाठी झाली. ज्या मार्गांनी
संस्कृतीवर्धनाला हातभार लावला तेच मार्ग हिंसेचेही कारण झाले हा मानवी इतिहासातील
एक दुर्दैवाचा भाग होय.
-संजय सोनवणी
No comments:
Post a Comment