Friday, March 4, 2022

अफगाणिस्तान: व्यापारी मार्गांचे जंक्शन!

 

अफगाणिस्तान: व्यापारी मार्गांचे जंक्शन!

 भारतीय ऊपखंडाचा बाह्य जगाशी ज्या व्यापारी मार्गांनी संपर्क येत होता त्या प्रदेशांतील एकूण परिस्थिती पहावी लागते. आपला पश्चीमोत्तर भारताचा शेजारी म्हणजे अफगाणिस्तान. मोहंमदशहा अब्दालीने १७४७ मध्ये हा विस्तृत प्रदेश एकाच राजकीय सत्तेच्या अधीन आणून त्याचे स्थापना केली. तत्पूर्वी हा देश इतिहासकाळापासून बल्ख, अरिया, अराकोशिया इत्यादी प्रांतांत वाटला गेला होता आणि इराणी, पर्शियन शक, हूण आणि मंगोलांच्या अधीन राहिला. अफगाणिस्तान प्रागैतिहासिक काळापासून संस्कृती संगमांची भूमी राहिली आहे हे सिद्ध झाले जेंव्हा ऑक्सस  नदीच्या खो-यात १९७० नंतर उत्खनने सुरु झाली. ऑक्सस नदीच्या खो-यात प्रथम सापडल्याने या संस्कृतीला ऑक्सस संस्कृती असे नाव दिले गेले असले तरी पुढे तिची व्याप्ती प्रचंड असल्याचे लक्षात आले तेंव्हा त्या संस्कृतीचे नव्याने Bactria-Margiana Archaeological Complex असे केले गेले. सनपूर्व २२५० ते सनपूर्व १२०० हा या संस्कृतीचा काळ मानला जातो. ही संस्कृती उदयाला आली कारण याच काळात या संस्कृतीचे सांस्कृतिक व व्यापारी संबंध सिंधू संस्कृती, मध्य आशिया ते पश्चिम आशीयाशीही स्थापीत झाल्याचे आढळून आले. किंबहुना सिंधू संस्कृतीच्या लोकांना पूर्व आणि पश्चिम आशिया ते सुदूर इजिप्तपर्यंत व्यापार नियंत्रित करण्यासाठी या वसाहतीन्चा खूप उपयोग झाला. इजिप्तच्या फराओन्च्या दफनात सिंधू संस्कृतीतील नील-मण्यांचे व चीनच्या रेशिम वस्त्राचे पुरावे मिळालेले आहेत. इराण व मध्य आशियातून या भागात प्रक्रिया केलेले तांबे आयात केले जाई. हे स्थान मध्य आशियातून, दक्षिण आशियातून आणि पश्चिम तसेच उत्तर आशियातून येणा-या व्यापारी मार्गांचे हे मिलनस्थळ बनल्याने शक्य झाले. त्यामुळे व्यापार व संस्कृतीचा उत्कर्ष झाला.

या संस्कृतीचे लोक सिंधू संस्कृतीप्रमाणेच तटबंद्या असलेल्या शहरांत राहत. आताच्या ताजिकीस्तान, तुर्कस्थानपर्यंत या संस्कृतीचा फैलाव होता. या प्रदेशात दोनचाकी बैलगाड्यांचा प्रवेश इसपू ३००० मध्ये सिंधू संस्कृतीच्या व्यापा-यांमुळेच झाला असावा असा तर्क करता येतो कारण सिंधू संस्कृतीतील बैलगाडीचा सगळ्यात जुना पुरावा इसपू ३२०० मधील आहे. तांत्रिक प्रसार व्हायलाही व्यापारी संपर्क कारण झाला.

विविध संस्कृतीशी संपर्क येत असल्याने येथे सापडलेल्या कलात्मक वस्तूंवरून या संस्कृतीचे लोक कलासक्त तर होतेच पण धातूकाम आणि वास्तुरचना शास्त्रातही त्यांनी चांगली प्रगती साधल्याचे आढळून येते. प्रतिकूल हवामानातील असूनही या संस्कृतीची तुलना ताम्रयुगीन जागतिक नागरी संस्कृतींशी केली जाते.

दक्षिण अफगाणिस्तानमध्येही शहर-इ- सोख्ता येथे १५० एकरमध्ये पसरलेली एवढीच प्राचीन वसाहतही मिळाली. हिंदूकुश पर्वतरांगेतील खडतर व्यापारी मार्गांनी हे दोन्ही प्रदेश जोडले गेले होते. इसपु २२०० पासून शहर-इ-सोख्ता व मुन्दिगाक ही शहरे हास पावू लागली. याच काळात सिंधू तसेच इतर अन्य जागतिक संस्कृतींना  पर्यावरण बदलाचे जसे फटके बसले व व्यापार थांबला तसेच येथेही बसल्यामुळे नागरी संस्कृती लयाला गेली असावी असे अनुमान आहे. बदलत्या हवामानाचा फटका तत्कालीन जागतिक संस्कृतींना कसा बसला याचा हा पुरावा आहे.

पण तत्पूर्वी व्यापारामुळे शहरांची भरभराट हो राहिली. शहर-इ-सोख्ता (जळालेले शहर) तर जगातील प्राचीन काळातील महानगरांप्रमानेच आकाराने मोठे आहे. येथील दफनभूमीत जवळपास चाळीस हजार दफने आढळून आलेली आहेत. हे शहर पुरातत्वीय पुराव्यांनुसार अज्ञात कारणांनी तीन वेळा जाळले गेले.  या नगरावर व्यापारी समृद्धीमुळे आक्रमकांच्या धाडी पडत गेल्या आणि हे शहर अनेकदा भस्मसात झाले याचा अंदाज आपण बांधू शकतो.

पण एकोणीसाव्या शतकात बळावलेला आर्य आक्रमण/स्थलांतर सिद्धांताने संपूर्ण युरेशियात एक सांस्कृतिक उलथापालथ घडवून आणली. भारत, अफगाणिस्तान, इराणच्या इतिहासाची मांडणी हा सिद्धांत केंद्रस्थानी धरून केली जाऊ लागल्याने या विशाल प्रदेशाला संस्कृती देणारे तेथिल मुळचे लोक नव्हे तर इसपू २००० च्या आसपास पोंटीयाक स्टेपेमधून स्थलांतरीत झालेले आर्य होत व त्यांनीच वेद-अवेस्ता या साहित्याची निर्मिती केली असे हा सिद्धांत सांगू लागला. हे येथेच थांबले नाही तर याच लोकांनी भारत ते युरोपपर्यंत विस्थापित होत आपली भाषाही पसरवली असेही हा सिद्धांत प्रतिपादित करू लागला. पण हे सर्वस्वी चूक आहे. भाषांचे संक्रमण हे शेकडो वर्ष व्यापारी साहचर्याने झाले. या सोबतच मिथककथा, तांत्रिक बाबी, वस्तू, खनिजे, व वैशिष्ट्यपूर्ण प्राणी हे आशियाभर पसरले असे मानण्यास वाव आहे. याचा अर्थ स्थलांतरे झालीच नाहीत असाही नाही. पण मुळचे लोक संख्येने प्रबळच राहिले. ऋग्वेदातील पख्त, भलानस, तुर्वसा, पर्शू या जमाती त्याचा पुरावा आहेत. आर्यांच्या वास्तव्यामुळे ऐर्यान (इराण) हे देशनाम तर परशु लोकांमुळे पर्शिया हेही देश/साम्राज्यनाम पडल्याचे आपल्याला दिसून येते. हेच लोक काही मंगोल-किरगीझ-शक-हुणादी टोळ्यांचा अपवाद वगळता कोठून बाहेरून आलेले नसून वेद-अवेस्तापूर्व काळापासून तेथे वास्तव्यास होते आणि नंतरही तेथेच राहिले पण धर्मप्रसारासाठी काही लोक बाहेर पडले असे मानने भाग आहे.

अफगानिस्तानची ऐतिहासिक माहिती मिळायला सुरुवात होते ती अकेमेनिड साम्राज्याच्या काळापासून, म्हणजे इसपू ५५० पासून. प्राचीन इराणमधील हे पहिले ऐतिहासिक साम्राज्य मानले जाते. सायरस द ग्रेट या साम्राज्याचा संस्थापक होय. या साम्राज्याचा विस्तार अफाट होता. या साम्राज्याची व्याप्ती अफगानिस्तानाच्या कंदाहार प्रांतापासून ते इजिप्तपर्यंत पसरली होती. त्याने या विस्तृत भागावर व्यापारावर नियंत्रण आणले.  सायरसने जिंकलेल्या प्रांतांवर सुनियोजित शासन करण्यासाठी सत्रपी (गव्हर्नर) नेमले. दारियस (पहिला) याने सर्वप्रथम बल्ख, अरिया, अराकोशिया (आजच्या अफगाणिस्तानातील प्रांत) जिंकून आपल्या साम्राज्याला जोडले आणि प्रत्येक प्रांतावर सत्रपाची नियुक्ती केली. बहुतेक सत्रप राजघराण्याशी संबंधित असत. या काळात स्थिर राजसत्तेमुळे व्यापाराची वृद्धीही झाली. पण हे साम्राज्य राजवंशातील सत्तासंघर्षाने दुबळे होत गेले आणि शेवटी इसपू ३३४ मध्ये अलेक्झांडर द ग्रेटने या साम्राज्याचा अस्त केला.

अलेक्झांडरचे अफगाणिस्तानात इसपू ३३० मध्ये आगमन झाले. दारियसच्या बल्ख, अरिया, अराकोशिया या आजच्या अफगाणिस्तानातील प्रांतांच्या सत्रपांच्या नेतृत्वाखाली तेथील स्थानिक लढाऊ टोळ्यांनी दग्दभू धोरण वापरून त्याच्या सैन्याला प्रचंड त्रस्त केले. त्याच्या सैन्यातही बंडाळीची समस्या उद्भवली. अलेक्झांडरच्या हत्येचा प्रयत्नही येथेच झाला. स्थिती हाताबाहेर जायला येथेच सुरुवात झाली. त्यामुळे अलेक्झांडर अफगाणिस्तानच्या बिकट प्रदेश आणि लढाऊ लोकांबाबत म्हनतो कि, “ ...हा प्रदेश आत शिरायला सोपा पण त्यातून बाहेर पडणे अवघड...

यानंतर येतो तो चंद्रगुप्त मौर्य. भारतातून जाणा-या मालावर कठोर कर आकारात होते म्हणून ग्रीकांशी त्याचा पुन्हा संघर्ष झाला.  यातूनच सेल्युसीद-मौर्य युद्धाची सुरुवात झाली व मौर्य जिंकले. सेल्युकस निकेटर (पहिला) हा सेल्युसीद साम्राज्याचा अधिपती होता. त्यावेळी झालेल्या तहात चंद्रगुप्ताने सिंध प्रांत तर आपल्या हाती घेतलाच पण हिंदुकुश पर्वतासहित दक्षिण अफगनिस्तानचा मोठा प्रदेश  मिळवला. पुढे सम्राट अशोकाने साम्राज्याचा विस्तार करत उत्तर अफगानिस्तानावाराही वर्चस्व मिळवत बल्ख प्रांतही आपल्या साम्राज्यात आणला. दक्षिण व उत्तर भागातील व्यापार यामुळे ताब्यात आला. या विस्ताराचा हेतू व्यापार हा होता. धर्म, भाषा आणि कला त्या निमित्ताने पसरल्या. 

पुढे तक्षशिलेसारखे व्यापारी केंद्र कब्जात असावे यासाठी मेनांदर (पहिला ) याने सिंध आपल्या राज्याला जोडला आणि तो प्रांत अफगाणीस्तानचा भाग बनला. पुढेही अफगाणिस्तानातून जाणा-या व्यापारी मार्गांवर स्वामित्वासाठी सत्ता बदलत राहिल्या. बल्ख हे व्यापारी रस्त्यांचे मिलनस्थळ युद्धांचे सर्वाधिक शिकार झाले. अफगाणिस्तान हा दुर्गम व अविकसित प्रदेश जागतिक सत्तांसाठी एवढा महत्वाचा ठरला कारण आशियाई मार्ग येथूनच जात! भारतीय उपखंडाशी व्यापारी संबंध ठेवण्यासाठी याच मार्गे येणे अत्यावश्यक होते. त्यासाठी सत्ता आवश्यक होती आणि त्यासाठीच अफगाणिस्तान हा प्रदीर्घ काळ युद्धांनी ग्रस्त राहिला.

-संजय सोनवणी

No comments:

Post a Comment

ऐतिहासिक तथ्यांची तोडमोड

  ऐतिहासिक तथ्यांची तोडमोड करणे आणि लोकांची दिशाभूल करणे हा भाजपाचा पूर्वीपासून उद्योग राहिलेला आहे. परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी नुकतेच नेह...