Friday, March 11, 2022

संजय क्षीरसागर कोण आहे?

 संजय क्षीरसागर कोण आहे? तो एक वेडा मुलगा आहे. अशी वेडी मुले जगात असावीत या तत्वावर माझी पक्की श्रद्धा बसावी एवढा ठार वेडा मीही आहे. हा आताच्या महाराष्ट्राच्या काळाच्या चौकटीत न बसणारा इतिहासकार आहे. कारण त्याला मोडी येत नाही नि मोडी आल्याखेरीज इतिहासकार बनता येत नाही असा दिव्य श्रद्ध्येय विचार सध्या प्रचलित करणारे अनेक आहेत. आता हे सिद्धांत मांडणा-यांना पोर्तुगीझ येत नाही, फ्रेंच येत नाही नि सोळाव्या शतकातील इंग्रजीही समजत नाही. शिवाय त्यांन क्युनेफार्म, अरेबिक लिपी वाचता येत नाही आणि सेमेटिक भाषाही येत नाही हे अलाहिदा. पण ते इतिहासकार जर होऊ शकतात तर संजय क्षीरसागर का नाहीत? अर्थात ते झालेच असल्याने हा प्रश्न तसा निरर्थकच आहे.पण कोणाच्याही लायकीवर अलायक प्रश्न निर्माण करणे हेच ज्यांना महत्वाचे वाटते त्यांच्याच लायकीवर तेवढाच अलायक प्रश्न मी केला आहे.

संजय हा माझ्या दृष्टीने मुलगाच आहे कारण तो तसाच मला आहे. माझा सक्खा मुलगा माझ्यावर चिडत नसेल तेवढा हा चिडायला हरक्षणी तयारच असतो. बरे मी एवढे मोठे पाप केलेय कि मला त्याचे चिडणे सहन केल्याखेरीज गत्यंतर नाही. माझे हात अवलक्षणे असतांनाही त्याच्या वधुला त्यच्या घरापर्यंत आणण्याचे ते त्याच्या विवाहाचा साक्षीदार बनण्याचे महत्पुर्ण (?) अकार्य मी केले. आबा नि आक्कांचा रोष मोठा. चांगले चुंगले खायची संधी मीच स्वहस्ते गमावली. ते असो, पण या संजयाला शेवटी नको त्या वेळी नि काळी विभक्तावस्थेचा शाप मिळाला. त्याचे सजा त्यो बहुद रोज देखण्या नट्यांचे फोटू टाकुन् सर्वांना देत असे हे चाणाक्ष वाचकांच्या स्मरणात असेलच.
असो. हे संजय क्षीरसागरांच्या व्यक्तिगत दु:खाचा इतिहास सांगण्याचे स्थान नाही, पण मला त्यातील माझा सहभाग दर्शवण्यापुरते सांगुन याबाबत थांबतो.
तर इतिहासकार क्षीरसागर कसा आहे? खरे तर प्रत्येक बाबीकडे एवढ्या निर्मळपणे पाहण्याचे सामर्थ्य त्याच्याकडे आहे. तो कोणाचाही द्वेष्ट नाही. जातीय अभिमान/दुराभिमान त्याला कधीही शिवलेले नाहीत. त्यामुळे, इतरांने कोणी लिहिले असते तर महाराष्ट्र पेटवून काढला गेला असता असे, भीमा-कोरेगाव युद्धाबाबतच्या त्याच्या निष्कर्षांना कोणी आव्हानही दिले नाही कि सहमतीही दर्शवली नाही. हेही महाराष्ट्री इतिहासकाराचे दुर्दैव. पानिपत बाबत खरे तर त्याचे लेखन हे कोणाही अभ्यासकाला आव्हान देणारे, तटस्थ आणि प्रामाणिक लेखन....दुर्लक्षीत राहिले. दुर्लक्षाचा शाप महाराष्ट्राला आहेच. त्यात हा माणूस इतिहासकार वाटावा एवढा म्हातारा नाही, पीएचडीचा कचरा त्याच्या माथी नाही, पोरी-सोरींचे फोटो टाकल्याने जिंदादिली दाखवली असली म्हणून त्याला सिरियसली कोणी घेत नाही. म्हणजे इतिहासकार दफनभुमीतुन आत्ताच उकरुन काढलेल्या अवशेषासारखा दिसला तरच तो इतिहासकार या व्याख्येला त्याने बगल दिल्याने सारेच त्यालाही बगल देऊन मोकळे होतात.
हा माझ्याशी भांडतो. रुसतो. धमक्या देतो. उपयोग नही हे माहित असुनही. कारण त्याचा माझ्यावर नितांत जीव आहे हेही मला माहित आहे. माझा त्याच्यावर तेवढाच जीव आहे काय? मला माहित नाही. पण याच्यामुळे एक लवंगी कार्टा (वाया गेलेला) माझ्या आयुष्यात आला हे मात्र खरे.
आजकाल तो कथा लिहू लागलाय. कधी कधी, विशेषत: आजकाल गंभीर पोस्टही लिहायला लागलाय...हे परिवर्तनही विस्मयकारक आहे. मधेच ’हा बदलला कि काय?’ असे वाटते ना वाटते तोवर हा नट्यांचे फोटोही टाकुन मोकळा होतो. यातुन कोठे थोडा वेळ मिळतो ना मिळतो, माझ्याही अब्रुची लक्तरे वेशीवर टांगुन मोकळा होतो. मला मौज वाटते. राग कधीच आला नाही. माझी गंमत/खिल्ली माझे आपले सोडून कोण उडवणार? (तसे माझे आपले एका हाताच्या बोटावर मोजता येतील एवढेच आहेत!)
हा जिंदादिल आहे. म्हणून तो खरा इतिहासकार आहे. इतिहासातील मेली मढी उकरत असता मेला चेहरा न करता प्रसन्न राहणारा हा इतिहासावरील एक सत्यान्वेषी प्रसन्न शिडकावा आहे.
असेच इतिहासकार आम्हाला हवे आहेत!
(संजय क्षीरसागर तुम्हाला बदलायची गरज नाही, इतिहासाकडे पहणा-यांची दृष्टी बदलली पाहिजे!)

1 comment:

  1. खरे तर तुम्ही दोघेही अवलिया आहात. आजपर्यंत लिहिल्या गेलेल्या इतिहासाची उलथापालथ करणारे लिखाण करून, त्यात लपलेल्या (लपवलेल्या) सत्याचे काही अंश वाचकापर्यंत पोहचवणे हे फारच मोठे काम. इतिहास तुमच्या कष्टाची नोंद सुवर्ण अक्षरांनी ठेवेल.

    ReplyDelete

गझनीचा मोहम्मद आणि मोहम्मद घोरी

    ललितादित्य मुक्तापिडाने अरबांना भारत व अफगाणिस्तानातून हुसकावून लावल्यानंतर जवळपास तीनशे वर्ष भारतावर कोणतेही नवे आक्रमण झाले नाही. अरब ...