काही अब्ज वर्षापूर्वी भारतीय प्रस्तर हा
पुरातन काळातील गोंडवना या महाकाय खंडाचा एक भाग होता. मुळ खंडापासून तुटून सावकाश
सरकत हा प्रस्तर साडेपाच कोटी वर्षांपूर्वी आस्ट्रेलियन प्रस्तराशी (प्लेट) जाऊन
टेकला आणि हिंद-आस्ट्रेलिया हा एक प्रस्तर बनला. यातील भारतीय प्रस्तर पुन्हा विलग
होऊन उत्तरेकडे सरकत गेला आणि सरासरी पाच कोटी वर्षांपूर्वी हा प्रस्तर युरेशियन
प्रस्तराला वर्षाला १५ सेंटीमीटर या गतीने धडकला. या धडकेमुळे समुद्रभाग उंच उचलला
जाऊन हिमालयाची निर्मिती झाली असे आजचे विज्ञान सांगते. भारतीय उपखंड आशियाशी
जोडला गेला खरा पण हिमालयामुळे भौगोलिक दृष्ट्या उर्वरीत आशियासाठी तो दुर्गमच
राहिला. पण ही दुर्गमता असली तरी साहसी मानवाने त्यातूनही मार्ग शोधलेच. त्यासाठी
मदतीला आले नद्यांचे प्रवाह आणि त्यामुळे बनलेल्या खिंडी.
पूर्वोत्तर भारतातील ब्रह्मपुत्रा असो,
उत्तरेतील नुब्रा, झांस्कर, श्योक, सिंधू असो कि पश्चिमोत्तर भागातील सिंधू नदीला
मिळणा-या पण अफगाणिस्तानातून वाहत येणा-या काबुल, खैबर, कुर्रम, टोची, बोलन, गुमलसारख्या
सिंधू नदीला जाऊन मिळणा-या नद्या असोत, त्यांनी तयार केलेल्या खिंडींतून भारतीय
द्वीपकल्पात उतरणे अवघड असले तरी अशक्य नव्हते. शिवाय महत्वाच्या वस्त्या व
राजधान्याही याच नद्यांच्या काठांवर वसलेल्या होत्या. भारताचा पश्चीमोतर भारताशी
संपर्क होऊ लागला तो प्रामुख्याने खैबर आणि बोलन खिंडीतून. शेतीच्या शोधानंतर इसपू
दहा हजार वर्षापूर्वीच या खिंडी अधिक वापरात यायला लागल्या. आपला पश्चिम आशियाशी
व्यापार स्थिर झाला तो याच मार्गांनी.
पण आपला हिमालयाच्या उत्तरेला
असलेल्या मध्य आशियाशी पहिला संपर्क कसा आणि कोणत्या खिंडीतून झाला हा प्रश्न येथे
महत्वाचा आहे. मुळात उत्तरेतील हिमालयीन पर्वतरांगा अत्यंत उंच आणि दुर्गम आहेत. शिवाय
तिबेटचे थंड आणि प्राणवायुच्या कमतरतेने दुर्गम असलेले पठारही तेथे आहे. अक्साई
चीनसारख्या प्रदेशात तर प्यायला पाणीही नाही कि प्राण्यांना गवतही नाही अशी विपरीत
स्थिती आहे. हिमालयापार पुन्हा किन-लुन पर्वतरांगा तर आहेतच पण तारीम नदीच्या खो-यातले जगातले सर्वात मोठे तक्लमाकनसारखे
तीन लाख वीस हजार चौरस किमी क्षेत्राचे अवाढव्य थंड वाळवंट आहे. प्राचीन काळी या
प्रदेशात मानवी वस्ती अत्यंत कमी व रानटी टोळ्यांनी व्यापलेली होती. आता हा प्रदेश
चीनच्या झुन्झुआंग-तिबेट स्वायत्त प्रांतात तसेच कझाकिस्तान,
किर्गीझस्थान,उझबेकस्थान या प्रांतांत/देशांत वाटला गेला आहे. आज येथील यारकंद, होतान,
अक्सू आणि केरीया नद्या वाहत्या असल्या तरी अनेक नद्या वाळवंटात कधीच अदृश्य
झाल्या आहेत. उर्वरीत तारीम नदीच्या खो-यात जलाशयांजवळ तेवढ्या वस्त्या होत्या.
प्राचीन व्यापारी मार्ग याच वस्त्यांवरून जात असल्याने खोतान, यारकंद, समरकंद,
काश्गर इत्यादी शहरे भरभराटीला आली. पण हिमालयाच्या शेकडो मैल पार असलेल्या भारतीय
उपखंडाची ओळख तरी त्या जमातींना होती काय हा प्रश्न आहे. पण त्याचे उत्तर आपल्याला
अलीकडेच मिळाले आहे.
मध्य आशिया आणि काश्मीर,
गीलगीट-बाल्टीस्तान तसेच लदाखशीही मध्य आशियाचे मानवी संपर्क प्रस्थापीत झाले होते व तेही अति-प्राचीन काळी याचा पुरावा
लडाखमध्ये झालेल्या उत्खननात आता मिळाला आहे. नुब्रा नदीच्या खो-यातील सासेर-ला
खिंडीजवळ इसपू ८५०० वर्षांपूर्वीचे स्थलांतरे करणा-या लोकांचे तात्पुरते वसतीस्थान
(थांबा) सापडले आहे. ही अत्युंच खिंड खारदुंग-ला आणि काराकोरम खिंडीच्या मध्ये आहे.
हे स्थान प्राचीन व्यापारी/प्रवासी मार्गावर वसलेले असल्याने प्राचीन काळापासूनच मानवी
वाहतूक याच मार्गाने होत असल्याचे सबळ संकेत मिळतात. म्हणजेच मार्ग कितीही दुर्गम
असला तरी काश्मीर-लदाखचा मध्य आशियाशी संपर्क होता. उदा. सासेर-ला खिंड ही जगातील
सर्वाधिक दुर्गम खिंड मानली जाते व ती समुद्रसपाटीपासून १७७५३ फुट उंच आहे.
सियाचीन हिमनदी या खिंडीपासून फक्त ३७ किमी दूर आहे यावरून या खिंडीच्या
दुर्गमतेची आणि तेथील बिकट अवस्थेची कल्पना करता येईल. हिमालयातून जाणारे असे
किमान सहा मार्ग आपल्याला आज माहित झालेले आहेत.
भारतीय लिखित साहित्यात नीलमत
पुराणामध्ये सांगितले आहे कि काश्मीर खो-यामध्ये प्राचीन काळी नाग लोक राहत होते.
तेथे हवामान अनुकूल झाले कि हिमालयापारच्या वाळवंटी भागातून ‘पिशाच्च’ म्हणून
ओळखली जाणारी जमात इकडे स्थलांतरे करत असे. हे लोक म्हणजे मध्य आशीयातील पामीरमधील
किरगीझ किंवा कझाक जमात असू शकेल अशी मते व्यक्त होतात. इकडे थंडी पडायला सुरुवात
झाली कि ते लोक परत जात. पुढे नाग आणि पिशाच्च या लोकांत अधिक निकटचा संपर्क आला
असेही नीलमतपुराण सांगते.
काश्मीरमधील बुर्झाहोम या साडेपाच
हजार वर्षांपूर्वीच्या पुरातत्वीय स्थळावर मध्य आशियातील बनावटीच्या अनेक वस्तू
मिळाल्या आहेत. हा सांस्कृतिक प्रभाव पडण्यामागे या दुर्गम भागातील मार्गांवरून
होणारी प्रवासी वाहतूक कारण ठरली असावी. लद्दाखमध्ये झालेल्या उत्खननांनीही या मताला
दुजोरा दिला आहे. नंतरचा राजकीय इतिहासही मध्य आशियाच्या इतिहासाशी समान धागे
ठेवतो. ऐतिहासिक पुराव्यांनुसार कुशाण (युएझी) जमात भारतावर आक्रमण करती झाली जी
मध्य आशीयातूनच आली होती. हे लोक जसे अफगानिस्तानातून खैबर खिंडीमार्गे भारतात आले
तसेच गिलगीट-बाल्टीस्तानमधून येणा-या पण तुलनेने अत्यंत दुर्गम मार्गांद्वारेही
आले.
पण त्याही खूप पूर्वी कुरु
(किरगीझ) जमात नुसती भारतात आली नाही तर येथे सत्ताही स्थापन करून बसली असे
आपल्याला दिसते. भारतीय साहित्यात, विशेषता: महाभारतात कुरु आणि उत्तर-कुरु हे नाव
सातत्याने येते. उत्तर-कुरु हे हिमालयाच्या पलीकडे आहे अशी माहिती शतपथ ब्राह्मण
ते महाभारतात जतन करून ठेवलेली आहे. रामायणातील उत्तर-कुरुची माहिती तेथे आजही
उपलब्ध असलेल्या साधनांवरून जुळते. ती कसे हे आपण पुढे पाहूच. पण हे कुरु म्हणजे
किरगीझ लोक असावेत असा अंदाज केला जातो हे मी येथे नोंदवून ठेवतो. भारतात परके लोक
केवळ खैबर खिंडीतूनच आले नाहीत तर हिमालयीन खिंडीच्या मार्गानेही आले होते हे
लक्षात घेणे येथे महत्वाचे आहे.
पुढे काश्मीर आणि खोतान यांचे
इसपूच्या पहिल्या शतकात बराच काळ संयुक्त राज्य होते अशीही माहिती आपल्याला मिळते.
हे राज्य-संस्थापक उघूर (तुर्क) किंवा शक असू शकतील असाही अंदाज व्यक्त केला जातो.
पुढे चिन्यांनी खोतान तर कनिष्काने काश्मीर आपल्या साम्राज्याला जोडून घेतले व ही
संयुक्त सत्ता संपुष्टात आली. असे असले तरी मध्य आशियाशी भारताचे राजकीय संबंध
संपले तर नाहीतच पण सांस्कृतिक संबंधही उत्तरोत्तर वाढतच गेले. मध्य आशियातील
बौद्ध धर्माचा विस्तार हा उत्तरेकडील मार्गांनीच झाला. दुर्गम पर्वतराजीतून जाणारे
व्यापारी मार्ग व त्यासोबत होणारे राजकीय/धार्मिक व सांस्कृतिक दळणवळण त्याला
कारणीभूत ठरले.
मध्य आशियाशी आज आपला खुश्कीच्या
मार्गाने संपर्क राहिलेला नाही कारण तो भाग चीनने व्यापलेला अथवा बळकावलेला आहे.
तिबेटला जाणारा व्यापारी मार्गही आता बंद केला गेलेला आहे. असे असले तरी भारत आणि
मध्य आशियाचा व्यापारी आणि सांस्कृतिक संबंध हा अत्यंत रोचक आणि हजारो वर्ष जुना आहे.
हे संबंध पुन्हा कसे जीवित करता येतील हा भारत सरकारसमोरील एक यक्षप्रश्न आहे!
-संजय सोनवणी
No comments:
Post a Comment