"धर्म: क्षमा , सहनशीलता व सहिष्णुता" या परिसंवादात आज (२२ मार्च २०१६) मी मांडलेले मुद्दे-
१)
धर्म न समजणारेच धर्मांध होतात.
या धर्मांधांनी जगतल्या सर्व धर्मांचे मुलभूत सौंदर्य विकृत करुन टाकले आहे.
२)
सर्व धर्मातील धर्म समजलेल्या
विचारी लोकांनी एकत्र येवून या धर्मांधांविरुद्ध आघाडी उघडण्याची गरज आहे.
३)
समाजाची धारणा ज्या उदात्त
नीतिमुल्यांवर होते व जी काळानुसार बदलती असतात त्यालाच धर्म म्हणतात. कोणत्याही
धर्मात पंथ-उपपंथ निघतात म्हणजेच ती परिवर्तनशीलता असतेच. पण ती व्यापक व्हायला
हवी.
४)
जीवनातील अनिश्चितता, असुरक्षितता
यातुन माणसाला देवा धर्माचे गरज भासली. ही अनिश्चितता जोवर आम्हीच दूर करत नाही
तोवर तिची गरज तीव्रच राहणार. मनुष्यप्राणी व अन्य जीवसृष्टी असलेला हा आपला एकच
ग्रह. आम्हाला त्याचे मोल नसेल किंवा महावीर, बुद्ध प्रभू येशु, पैगंबरांची दया, करुणा, क्षमा
अद्यापही समजली नसेल तर त्या धर्माचे असणे म्हनावाने निरर्थक आहे. जीवनाची उदात्त
मुल्ये जपल्यखेरीज आम्ही कोणत्याही धर्माचे होऊ शकत नाही.
५)
वर्चस्वतावादासाठी धर्म हत्यार
म्हणून वापरला जातो. आज जे सरकार स्वत:ला धार्मिक समजते त्याएवढे अधर्मी सरकार
कोणतेही झाले नसेल. आमच्या राष्ट्रवादाचा पाया घटनात्मक आहे. कोणत्याही एका धर्माच्या
प्रभावाखालील राष्ट्रवाद आम्ही सर्वांनी नाकारला पाहिजे. धार्मिक राष्ट्रवाद
राष्ट्राला विनाशाकडे घेऊन जातो.
६) शोषित-वंचितांचे कल्याण हाच आमचा धर्म आहे.
तुकोबा म्हणाले तसे,
जे का रंजले गांजले...त्याशी म्हणे जो आपुले...या
स्नेहभावी करुणेतच धर्म आहे. येशुने वधस्तंभावर जातांनाही क्षमेचा आणि करुणेचा
आदर्श घालुन दिला. बुद्ध-महावीरांनीही हीच उदात्त मुल्ये उद्घोषित केली.
७) ज्ञानेश्वरांनी पसायदानात "दुरितांचे
तिमिर जाओ" अशी आर्त प्रार्थना केली. ‘आता विश्वात्मके देवे’ म्हणत आम्हाला
वैश्विक नागरिक बनत संपुर्ण मानवजात, धर्म
वेगळे असले तरी,
एकाच समान धाग्यात बांधली जावू शकते व ती मुल्ये
म्हणजे- क्षमा,
सहनशीलता व सहीष्णुता. ही मुल्ये सर्वच धर्मात
वेगवेगळ्या प्रकारांनी,
वेगवेगळ्या परिप्रेक्षात सांगितली आहेत. ती
समजावून घेत समान मानवी अनुबंध शोधत त्याला व्यापक केले पाहिजे.
No comments:
Post a Comment