Tuesday, March 22, 2022

आम्हाला लेखकाचा शोध आहे!


 आम्हाला लेखकाचा शोध आहे!

 

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा असा आग्रह एकीकडे धरला जातोय तर नोबेलच्या दर्जाचे मराठी साहित्य का निर्माण होत नाही असे प्रश्न अनेक विद्वान विचारात असल्याचे चित्र आपल्याला दिसते. मराठी भाषेला अभिजाततेचा दर्जा मिळण्याचे निकष वेगळे आहेत तर नोबेल पारितोषिक मिळण्याचे निकष वेगळे आहेत. इंग्रजी भाषेला आजही अभिजात भाषेचा दर्जा नाही आणि तो मिळण्याची शक्यताही नाही तरीही त्याच भाषेत आधुनिक जगातील श्रेष्ठ ज्ञान, विज्ञान आणि साहित्य का असावे हा प्रश्नही आम्हाला पडत नसेल तर आम्ही कोठेतरी गंभीर चूक करत आहोत. आमच्या विचारांच्या दिशाच कुंठीत झालेल्या असून अशा कुंठेतून नोबेलच्या दर्जाचे सोडा पण जागतिक स्तरावर कीर्ती मिळेल असे साहित्य आमच्या भाषेतून कसे निर्माण होणार हा प्रश्न आम्हाला आधी पडायला हवा.  

 

 

खरे म्हणजे ज्याला अस्सल आणि या मातीचे म्हणता येईल असे उच्च दर्जाचे मराठी साहित्य अजून यायचेच आहे. आजवरचे मराठी साहित्य म्हणजे "जेमतेम साहित्य" आहे असे म्हणण्यास हरकत नसावी. साहित्य म्हणजे समाजमनाचा, त्याच्या वर्तमानाचा, भुतकालीन सावटाचा आणि त्यातून निर्माण होणा-या भविष्यातील आशा-आकांक्षांचा आरसा असेल तर म्हणायचा म्हणून अपवादात्मक भाग सोडला तर मराठीत सार्वकालिक व सर्वस्पर्शी म्हणता येईल असे साहित्य नाही. समाजमन आहे त्यापेक्षा अधिक चांगले घडेल किंवा वर्तमानातील अंधारावर मात करून प्रकाशाकडे समाजाला नेता येईल ही साहित्याची शक्ती असते असे म्हटले तर असे साहित्य मराठीत नेमके कोणते हा प्रश्न उद्भवेल आणि हातात नकारात्मकताच येईल. असे का घडले किंवा घडते आहे याचा शोध घेणे गरजेचे ठरते ते यामुळेच.

 

"मराठी साहित्यिक हा जीवनाला भिडण्यात कमी पडतो, आपले अनुभवविश्व व विचारविश्व विस्तारण्यात कमी पडतो हे मुख्य कारण तर आहेच. यामुळे तो जीवनातील अनेक साम्भावानांना वंचित राहतो आणि ही वंचितता त्याच्या लेखनात सरळ सरळ प्रतिबिंबीत होते. लेखकाचे खुजेपण त्यातून व्यक्त होते. कल्पनेची झेपही सीमित होत त्याचे अंगण विश्वव्यापी होण्याऐवजी आसपासच मर्यादित होते. आणि असे असले तरी सामान्य बाबीही वैश्विक करता येण्याएवढी प्रतिभाही त्याने कमावली नसल्याने मर्यादित अंगण हीच त्याच्या प्रतीभेचीही मर्यादा ठरते. त्यामुळे आपले लेखक अनुभवांच्या स्वनिर्मित मर्यादांच्या चौकटीत अडकवून घेत, ना स्वत:साठी ना वाचकांसाठी लिहित अशी गत करून घेत केवळ प्रसिद्धी आणि पारितोषिके ह्याच त्याच्या साहित्यप्रेरणा बनवतो. प्रसिद्धी मिळवायचे तंत्र माहित असले तर कोणीही प्रसिद्ध होऊ शकतो हे आपल्याला माहीतच आहे आणि राहिले पारितोषिकांचे...त्यासाठी हे थोर थोर साहित्यिक काय काय गणिते जुळवत, वेळ वाया घालवत शेवटी ती पदरात पाडून घेण्यात कशी यशस्वी होतात यातही काही गुपित राहिलेले नाही. आणि हेच लोक वर मराठी साहित्य हे खपत नाही, वाचले जात नाही अशा निरर्थक तक्रारी करत सुटतात आणि आपलेच ‘साहित्यिक’ अपयश लपवतात.

 

समाज हा आपला चेहरा किंवा भविष्य ज्यात दिसेल, हृद्य वाटेल असेच साहित्य वाचत असतो. ज्यात माणूसच नाही ते साहित्य माणसे कसे वाचतील हा प्रश्न आपल्या साहित्यिकांना पडू नये हे मोठे आश्चर्य आहे. तकलादू-कचकड्याचे जीवन जगणारी माणसे आणि तोकड्या कल्पनाशक्तीने सजलेले कथानक ज्यात असेल अशा साहित्याच्या वाट्याला कोण कशाला जाईल?

 

खरे म्हणजे कोणाचेही आणि कोठल्याही प्रांतातील माणसांचे जीवन हे लेखकाला आव्हानदायकच असते. मग ते मागील असो, वर्तमानातील असो अथवा भविष्यातील असो. प्रत्येकाचे आयुष्य हा साहित्यिकांच्या दृष्टीने विराट समाजपट असतो. साहित्यात कथाच असली पाहिजे असे नाही, पण असते ती कथाच. समाजमनाचे विराट चित्रण ही कथा नाही असे कोण म्हणेल? खरे तर महाराष्ट्र हा प्राचीन काळापासून ते आजतागायत विविधांगी धार्मिक, वैचारिक, सामाजीक चळवळींनी गजबजलेला आहे. त्याचे प्रतिबिंब/विश्लेषन अथवा त्या त्या चळवळी व त्या त्या काळचे सामाजिक मानसशास्त्र कोणत्याही मराठी कादंबरीत आले आहे असे ठामपणे म्हणता येत नाही. जे चित्रण आहे ते वरकरणी व वाचकशरण असेच आहे. परंपरावाद्यांनी पुराणकथांतील व इतिहासातील पात्रांचे पुनरुज्जीवनवादी भांडवल केले तर विद्रोहवाद्यांनी त्या पात्रांचे निखळ द्वेषपूर्ण चित्रण केले. यात साहित्यनिष्ठा होती असे म्हणता येत नाही. साहित्याचे राजकारण मात्र अनेक साहित्यिकांनी केले. त्या त्या जातीय/धार्मिक अथवा वैचारिक गटाचे त्यांना समर्थनही मिळाले. पण त्यात साहित्य होते काय या प्रश्नाचे उत्तर “नाही” असेच आहे. कारण या सा-यात जगला तो समाज कोठे होता? काही अभिनिवेशी पात्रे म्हणजे समाज होत नाही. समाज असा नसतो. आणि समाजात न राहणारे लेखक आपल्या साहित्यात समाज कोठून आणणार? आणणार पण ती एखादी जात किंवा धर्म! अशाने ज्याला आपण "निखळ साहित्य" म्हणू ते कोठे राहते?

 

आणि यातून समाजजीवनाला सुदृढ विचारी बनवायची परंपरा निर्माण होते काय? किंवा गेला बाजार “आपण असे आहोत” याचे तरी खरे प्रत्ययकारी दर्शन मिळते काय? याचे उत्तर आहे आम्ही साहित्यातून भरीव असे काहीही देवू शकलो नाही. त्यामुळे अलीकडच्या सर्वच सामाजिक चळवळीही साहित्यबंधापासून पुरत्या अलिप्त आहेत. त्यांना तत्वज्ञान देतील असे बळ साहित्यिकांत नाही. ते नाही तर नाही, त्यांचे यथास्थित चित्रणही साहित्यात होत नाही.

"जातीअंत” हे आदर्श मानले तर खुद्द चळवळीच जातींत विखुरल्या आहेत. छोटे-मोठे नेते जातींतच आपले अस्तित्व शोधत आहेत. पण किमान जातीचे वास्तव तरी शोधण्याची हिम्मत या लोकांकडे आहे काय? तर तेहे नाही. आपल्या वैगुण्यांचे आणि वंचिततेचे खापर कोणा एका बलिष्ठ वा वरिष्ठ गटावर फोडले कि हे कृतकृत्य होतात. आपापल्या गटाचे नायक बनतात खरे पण सर्व समाज यांना कधीही “आपला लेखक” मानु शकत नाही. मग आपल्याच जातीच्या चौकटीत साहित्यिक म्हनून मिरवण्यात जर साहित्यिक धन्यता मानत असतील व इतरांकडे उपहासाने पाहत असतील तर साहित्य आणि साहित्यिकाला अर्थ काय राहिला?

 

"दलित" हा शब्द व्यापक आहे. बाबासाहेबांच्या "Broken Man" सिद्धांताशी जवळ जात दलित या संज्ञेत सर्व पुर्वास्पृष्य, आदिवासी, भटके-विमूक्त व श्रमिक-मजूरही आहेत अशी ती संज्ञा आहे. परंतू ती बरोबर एकाच जातीच्या मर्यादेत साहित्य व तत्वज्ञान म्हणूनही विसावली आहे. त्यामुळे दलित चळवळही भरकटली आहे. नव्या काळाला सुसंगत असे तत्वज्ञान व तसे साहित्य निर्माण करण्यात घोर अपयश आले आहे. खरे तर वैश्विक परिप्रेक्षात “दलितता” सर्वत्र पसरलेली आहे, रुजली आहे अथवा रुजवण्याचा प्रयत्न होतो आहे. पण ही दलितता मराठी दलित साहित्याला स्पर्शुही शकली नसेल तर हे अपयश कोणाचे आहे?

 

तसे पाहिले तर सध्या दिखावू चळवळ्यांपेक्षा समाजाच्या मनातच जी सूप्त चळवळ सतत चालू असते ती कधी लिहिली जात नाही, रस्त्यावर सहसा येत नाही, पण तीच खरे बदल घडवते. ही चळवळ व्यक्तीगत स्तरावर प्रत्येकाचे मन व्यापून असते. प्रश्न विचारात असते व उत्तरे शोधायचीही प्रयत्न करत असते. आणि समस्त समाज हा बाह्य चळवळ्या प्रान्तीदूत म्हणवणा-यांवर अवलंबून नसते तर ज्याची त्याची मानसिकता कशी घडली आहे त्यावर अवलंबून असते. समाज असाच घडत असतो. पण या व्यक्तिगत मानसिकतेची स्पंदने टिपत त्याला तत्वाद्न्यानात्मक अधिष्ठान देणारे साहित्य शोधूनही मिळत नाही. मराठी साहित्यात कथा परत्वे जे अर्धवट भावनिक उद्रेकाने भरलेले वैचारिक तुकडे मिळतात ते कोणाचे समाधान करू शकतील?

 

खरे तर गेली तीन दशके जागतिकीकरणामुळे नातेसंबंधांची फेरआखणी होत आहे. नवे ताणतणाव निर्माण होत आहेत. जातीय विखार कमी होण्याऐवजी टोकाला जातच आहेत. निराधार व वृद्धांसाठी आश्रम वाढत आहेत. पती-पत्नी, भाऊ-बहीण, पिता-माता-पूत्र या नात्यांचे संदर्भ बदलत चालले आहेत. आर्थिक, सामाजिक आणि राजकीय संदर्भही झपाट्याने बदलत गेले आहेत. तंत्रज्ञानाने माणूस व्यापलाय कि माणसाने तंत्रज्ञान हा प्रश्न पडणे ही तर दूरची बाब झाली पण या वातावरणात आमची मनोभूमिका बनवणारे तरी साहित्य आले काय याचे उत्तर “नाही” असेच आहे. त्यामुळे जागतिकीकरण पेलण्याची हिम्मत आमच्यात आलेलीच नाही. त्यामुळे आजचा तरुण “विस्कळीत” मनोवृत्तीचा झाला असेल तर याला जबाबदार कोण? विज्ञानयुगात येऊन तंत्रज्ञानाची फळे चाखत सुखासीन जीवन जगत असताना अवैद्न्यानिक धर्मांध होण्याचा हव्यास याच पिढीला नेमकं का  आहे? याचे कारण आमचा लेखक कोठेतरी हरवला आहे...किंवा तो कधी नव्हताच! आमची मदार शेवटी इंग्रजी साहित्यावरच जाते जे येथल्या मातीला अनुकूल नाही पण जे येथे मिळतच नाही ते वाचक कोठून तरी मिळवणारच की!

आम्हाला आमच्या लेखकाचा शोध आहे.

 

-संजय सोनवणी 

No comments:

Post a Comment

वंचितांचे अर्थशास्त्र आणि आपली मानसिकता

  वंचितांची व्याख्या बव्हंशी आर्थिक आधारावर केली जाते. सरकारला आपली धोरणे ठरवण्यासाठी ही व्याख्या पुरेशी ठरत असली तरी वंचिततेचे सामाजिक नि...