Wednesday, March 23, 2022

“रान सोबती”

 मी महारुद्र मंगनाळे यांचा मनस्वी चाहता आहे. आसुसून जीवन जगणारा, भावूक आणि तरीही तटस्थ अशा त्यांच्या रानमौजी असोशीने जगण्याचा मी नुसता चाहता नाही तर अशी विलक्षण व्यक्ती आपल्या काळात असू शकते यावरच विश्वास बसत नाही. मी त्यांना भेटलो आहे पण ती घटनाही स्वप्नवत वाटते. अत्यंत साधे भाबडे आणि संवेदनशिल मन असलेला हा निखळ माणूस फेसबुकवर कित्तेक वर्ष लिहितो आहे. फेसबुकवरील अजरामर साहित्य लिहिणारा हा यच्चयावत जगातील एकमेव माणूस असावा. आणि असे असूनही त्याचा बडेजाव नाही. किंबहुना ते स्वत:ला साहित्यिकच मानत नाहीत. आणि त्यांचे असे वाटणे स्वत:ला थोर समजणा-या साहित्यिकांच्या मुखात वाजवलेली सणसणीत चपराक आहे. हा साहित्य जगणारा साहित्यिक आहे. जीवनाचा हात धरून लिहिलेले साहित्यच अजरामर होत असते.

“रान सोबती” हे त्यांचे नुकतेच प्रकाशित झालेले पुस्तक कालच हाती पडले. रात्रीच वाचायला सुरुवात केली. हा खरे तर पुन:प्रत्ययाचा आनंद कारण फेसबुकवर मी हे लेखन वाचलेलेच होते. पण रुद्राहट आणि तिचा परिसर, शेतक-याचे जगणे, निसर्गाशी साधलेली तादात्म्यता पुन्हा एकदा जिवंत होऊन सलग फेर धरू लागली. प्राणी, वृक्ष आणि माणसे, मंगनाळे यांच्या निखळ आवडी-निवडी, भ्रमंती आणि सर्वात महत्वाचा म्हणजे कोविड साथीचा थरकाप उडवणारा काळ सलग प्रवाहात प्रत्ययकारी भाषेत सामोरा आला. या ४४८ पानांच्या प्रवाही पुस्तकात रुद्राहटचे आणि रुद्राचे एक समग्र विश्व सामावले आहे. ते विस्मयकारी आहे. थोरोच्या वाल्डेनच्या आठवणींनाही धूसर करणारे आहे. जगणा-यांना जगणे शिकवणारे आहे. आणि त्यात कसलाही आव नाही. आपण काही विलक्षण जगतो आहोत असा भावही नाही. अत्यंत प्रांजळ आणि तरीही हृदयालाच नव्हे तर मानवी आत्म्याला स्पर्शून जाणारे हे लेखन आहे. मंगनाळे हे साहित्यिकांचे साहित्यिक ठरतात ते यामुळेच!
हे पुस्तक मुळातूनच वाचावे असा आग्रह मी धरेन. मुक्तरंग प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचे मूल्य रु. ८००/- एवढे आहे. जगण्याचा अर्थ समजावून घेऊ पाहणा-या प्रत्येकासाठी हे पुस्तक वाचणे महत्वाचे आहे.
-संजय सोनवणी
May be an image of 1 person, outdoors and text that says "रान सोबती महारुद्र मंगनाळे"

No comments:

Post a Comment

पांडुरंग बलकवडॆ एवढ्या खालच्या थराला गेले कसे?

  पांडुरंग बलकवडॆ एवढ्या खालच्या थराला गेले कसे? Sanjay Sonawani    ·  Pune    ·  Shared with Public 10 janewari 2013 पांडुरंग बलकवडे यांच्य...