Friday, April 15, 2022

गिलगीट मधील हुंझा खोरे- सर्वात धोकेदायक व्यापारी मार्ग!



झांग क्विआन या चीनी अधिका-याने केलेल्या सर्वेक्षणानंतर चीनची व्यापारी मार्गांकडे पहायची दृष्टी बदलली. चीन ते भारतासहित पर्शिया या विशाल भूप्रदेशाशी व्यापार वाढवण्याची योजना सुरु झाली. यात सर्वात अशक्यप्राय असा प्रदेश म्हणजे मध्य आशियातील तक्लमाकन वाळवंट (तारीम खोरे). येथे असलेली हाडे गोठवणारी थंडी, बेभरवशी हवामान, वाळूची सतत होणारी वादळे, पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष आणि या विस्तीर्ण प्रदेशातील भटक्या रानटी लुटारू टोळ्या यातून मार्ग काढत शिस्तबद्धरीत्या व्यापारी तांड्यांमार्फत आयात व निर्यात करणे हे एक दिव्यच होते. झायन्ग्नू टोळ्यांनी मांडलेल्या उच्छादामुळे हा सर्व प्रदेश त्रस्त होता.

युएझी ही जमातही कमी उपद्रवी नव्हती. पण झायन्ग्नू टोळ्यांनी त्यांनाही पश्चिमेकडे सरकायला भाग पाडले. याचा शेवट  बॅक्ट्रियावर युएझी टोळ्यांची सत्ता प्रस्थापित होण्यात झाला आणि बॅक्ट्रिया हे व्यापारी मार्गांच्या जाळ्याचे मिलनस्थळ असल्याने साहजिकच युएझी लोकांचे व्यापारावर स्वामित्व निर्माण झाले. युएझी जमातीतील कुशाण टोळ्यांनी पुढे भारतावर आक्रमण केले आणि तक्षशिला येथे राजधानी स्थापन केली. हे लक्षात घ्या कि तक्षशीला हे तत्कालीन व्यापाराचे फार मोठे केंद्र होते. पूर्व ते पश्चिम भारत जोडणारा “उत्तरापथ” यावरील पश्चिमेचे ते अखेरचे टोक होते. तेथून सिंधू नदीच्या काठाने उत्तरेकडे पार काश्मीर आणि मध्य आशियापर्यंत पोचणारे मार्ग जसे होता तसाच खैबर खिंडीतून पश्चिम आशियाशी जोडणाराही प्राचीन व्यापारी मार्गही होता. पूर्वेकडे जाणारा उत्तरापथ हा ताम्रलिप्ती बंदरापर्यंत जोडलेला होता. या मार्गावर पाटलीपुत्र-मथुरेसारखी विख्यात व्यापाराने बहरलेली विशाल नगरेही होती. त्यामुळे कुशाणांनी प्रथम तक्षशिलेलाच राजधानी बनवणे स्वाभाविक होते. कनिष्काच्या काळात पुरुषपूर (पेशावर) ही राजधानी बनली आणि तक्षशीलेचे व्यापारी महत्व कमी होत गेले. कुशाणांनी पश्चिमोत्तर व्यापारी मार्गांचा वापर मोठ्या कुशलतेने तर केलाच पण उतरेतून गिलगीट-बाल्टीस्थानमधून जाणा-या अति-दुर्गम मार्गांचाही वापर वाढवला आणि आपली सत्ता मध्य अशीयापर्यंत पोचवत तेथील व्यापारी मार्गांवर नियंत्रण आणले.

तक्षशिलेपासून सिंधु नदीच्या काठाने जो मार्ग पुढे हिमालयातून जाई तो दुर्गम व धोक्याचा होता. पण खरे धोके सुरु होत ते गिलगीट भागातून जातांना. गिलगीट या हिमालयीन रांगात वसलेल्या भागाचे प्राचीन नाव दरद कारण येथे दरद जमातीच्या लोकांची वसती होती. चीनी साहित्यात या प्रांताला मोठे बोलूर (गिलगीट) आणि छोटे बोलूर (बाल्टीस्थान) असे उल्लेखिले गेले आहे कारण या दोन्ही स्वतंत्र शाही सत्ता होत्या आणि दोन्ही सत्तांचे चीनशी कधी प्रेमाचे तर कधी संघर्षाचे संबंध होते.  आपसातही ते अनेकदा संघर्ष करत असत. त्यांचे काश्मीरशीही वैर होते. कल्हणाने आपल्या राजतरंगिणीत पर्वती भागातील दरद लोकांच्या काश्मीरवर सतत होणा-या आक्रमणांचे अनेक उल्लेख केले आहेत.

गिलगीट-बाल्टीस्थानाचे महत्व वाढण्याचे कारण म्हणजे दोन्ही प्रदेशांतून मध्य आशियातील प्रमुख् रेशीममार्गाला भिडणारे रस्ते येथून जात होते. पहिला म्हणजे तक्षशिलेवरून गिलगीटमधून जाणारा व्यापारी मार्ग तर दुसरा मार्ग उत्तर अफगाणिस्तानमधून येत होता. दोन्ही मार्ग हुंझा खो-यात एकत्र येत पुढची वाटचाल सुरु होत असे. ही वाटचाल मिन्टक खिंड किंवा त्यापासूनच तीस किलोमीटर दूर असलेल्या किलिक खिंडीतून होत असे. मिन्टक खिंड हिमनदीने व्यापल्यानंतर किलिक खिंडीचा वापर वाढला. हा मार्ग मध्य आशियातील चालाचीगु खोरे, काश्गर किंवा पामीर पठारावरून पश्चिमेकडे वळणा-या रेशीममार्गाला मिळत.

हा मार्ग अतिदुर्गम असला तरी मध्य आशियाला पोचणारा हा मार्ग तुलनेने कमी लांबीचा होता. त्यामुळे लवकर पोचता येई हे खरे पण जगले वाचले तरच कारण हुंझा भागातील लोक हिंस्त्र लुटारू होते. शिवाय मार्ग एवढा दुर्गम कि माल वाहतुकीसाठी केवळ माणसांचाच उपयोग केला जाऊ शकत असे. याचे मुख्य कारण म्हणजे हुंझा नदीचे खोल दरीतून वेगवान पाण्याने काठोकाठ भरून वाहणारे पात्र. मग व्यापा-यांनी काढलेला मार्ग असा कि पाठीवर ओझे घेतलेले (गुलाम किंवा मजूर) नदीच्या काठावरील उंच कड्यांमध्ये ठिसूळ डबरात ठोकलेल्या खुंट्याना दोर बांधून त्यावरच्या फळकुट्या किंवा कड्यात खोचलेल्या फांद्यांवरून तोल सावरत पुढे सरकत असत. थोडे जरी घसरले तर खाली वेगवान वाहणा-या हुंझा नदीत पडून जीव जाणे क्रमप्राप्त असे. शिवाय दोर ज्या खुंट्याना बांधलेले असत तेही निसटण्याची सतत भीती असे. अक्षरश: जीव मुठीत धरून हा प्रवास होत असणार.

पण ओलावलेले तळपाय व हात निसटू नये म्हणून तळपायांवर “तुंबर उना” चूर्ण लावत असत अशी माहिती आपल्याला “वासुदेवहिंडी” या जैन महाकाव्यात मिळते. यात कवीने केलेले या मार्गाचे भीषण वर्णन पाहता या काव्याचा कर्ता किंवा त्याला माहिती देणारा प्रवासी स्वत: त्या मार्गाने गेला असावा याची खात्री पटते. कारण सर ऑरेल स्टीन हे प्रसिद्ध पुरातत्वविद या मार्गाने मध्य आशियात गेले होते. त्यांनी या मार्गाचे “सर्वात धोकेदायक मार्ग” असे वर्णन करून ठेवलेले आहे. असेच या मार्गाचे अंगावर काटे आणणारे भीतीदायक वर्णन एडवर्ड नाईट आणि जेनेट मिर्स्की या प्रवाशांनीही करून ठेवलेले आहे. झुलत्या धोकेदायक मार्गावरून वळावे लागते तेथे नदी ओलांडणे भागच होते. नदीचे प्रवाह एवढे वेगवान रोंरावते कि नदी ओलांडनेही अशक्य व्हावे. मग व्यापा-यांनी लढवलेली शक्कल म्हणजे या नदीवर दोर आणि फळ्यांनी पूल बनवला व त्यावरून नदी ओलांडली जायची.

या झुलत्या दोर-वाटांना “रफिक” असे स्थानिक भाषेत म्हटले जाते. चीनी साहित्यात या झुलत्या धोकेदायक मार्गाला क्झीयांडू असे म्हटले गेले आहे व हा झुलता मार्ग संपतो तेथे भारताची (कुशाणांची) सीमा सुरु होते असे उल्लेख उपलब्ध आहेत.

हा मार्ग अशक्यप्राय असला तरी हजारो व्यापारी शतकानुशतके त्याचा वापर करताच राहिले. मध्य आशियात बौद्ध धर्म पोचवण्यासाठी भिक्षुही या मार्गाचा वापर करत असत. तसे अनेक पुरावे खुद्द हुंझा येथे कोरलेल्या असंख्य प्रस्तरलेखांत व चित्रांवरून मिळतात. सुमारे चाळीस हजारांपेक्षा जास्त असलेली ही चित्रे आणि लिखित माहिती तत्कालीन संपूर्ण आशियातून तेथे आलेल्या मानवी समाजांची फार आगळी-वेगळी माहिती पुरवते. व्यापारी व धर्मप्रचारक कोणत्या संकटांना तोंड देत होते हे तर समजतेच पण त्याहीपेक्षा फावल्या वेळात ते नेमके काय करत असत याचीही माहिती मिळते.

गिलगीट-बाल्टीस्थान काश्मीरच्या अधिपत्याखाली प्रथम आणला असेल तर तो ललितादित्य महान या काश्मीरच्या सम्राटाने. व्यापारी मार्गांचे महत्व समजून त्याने तेथील शाही सत्तांचा अंत केला. व्यापारी मार्गांचे महत्व त्याला माहित होते. दुर्दैव असे कि हा भाग आता भारताच्या अधिपत्याखाली नाही. चीनने काराकोरम मार्ग या भागाच्या जवळूनच बांधला आहे. हुंझाचे ऐतिहासिक महत्व संपले आहे. पण किमान सहा हजार वर्ष हुंझावरून जाणारा बिकट मार्ग आजही तत्कालीन व्यापारी, प्रवासी आणि धर्म-प्रचारकांच्या साहसी जीवनाची साक्ष देतो आहे आणि त्याचे पुरावे तत्कालीन लोकांनी तेथेच खडकांवर लिहून अथवा चित्रित करून ठेवले आहेत. त्याविषयी पुढील लेखात.

-संजय सोनवणी

No comments:

Post a Comment

Linguistic Theories

The entire world's conceptions and myths about the creation of language show that humans are curious about their language skills and str...