Friday, April 15, 2022

जाती-धर्मवादात कला गुरफटू लागते तेंव्हा….

 


जयंती, झुंड, काश्मीर फाईल्स, पावनखिंड, मी वसंतराव हे चित्रपट त्यातील आशयापेक्षा जास्त गाजले ते धर्म आणि जातीय परीप्रेक्षांना महत्व आल्यामुळे. अभिजनीय (सदाशिव पेठी) बहुजनीय, दलित, आदिवासी यासारखे सामाजिक भेद ठळक करणारे साहित्यप्रकार रूढ होऊन तर बराच काळ झाला. साहित्य-संमेलनेही जाती-वर्ग आधारित भरतात. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन तर उच्चवर्णीयांचा आखाडा आहे हा आरोप नवा नाही. अजूनही वाचक लेखकाचे आडनाव बघून त्याचे पुस्तक वाचायचे कि नाही हे ठरवतो तेंव्हा आपल्या साहित्यिक जाणीवा केवढ्या संकुचित झाल्या आहेत हे लक्षात येते. चित्रपटांचेही तेच होऊ लागले आहे.

कोणतीही कला मानवी जीवनाचे व्यापक दर्शन घडवत वाचक/श्रोता/प्रेक्षकांना जीवनाकडे पहायचा प्रगल्भ दृष्टीकोन देण्यासाठी असते असे सामान्यतया मानले जाते. समाजातील कोणत्याही वर्गाचे जीवनदर्शन असो, ते सर्वांन आपले वाटेल, त्यातील आनंद, व्यथा-वेदनांशी नाळ जोडली जात कलेशी तादात्म्य साधता येईल असेच चित्रण करणे हे लेखक, दिग्दर्शक व चित्रकारांचे कार्य आहे. ते केल्याखेरीज वरची गोष्ट घडणे असंभाव्य आहे हे ओघाने आलेच. म्हणजे कलाकृती निर्माण करणा-यावरची कलात्मक जबाबदारी ही अधिक असते. आपण ज्या समाजात राहतो आहोत तो विचार व भावनात्मक दृष्टीने अधिक प्रगल्भ व्हावा यासाठी कलाकाराची सामाजिक  जबाबदारीही मोठी असते. “कलेसाठी कला कि जीवनासाठी कला” हा घन विवाद मराठीत होऊन आता अनेक दशके उलटली. नंतर सहसा असे साहित्य-वैचारिक वाद झाल्याचे आपल्याला आध्गळून येणार नाही. पण कलेसाठी कला असो कि जीवनासाठी कला, कलाकाराचा दृष्टीकोनच  जर निकोप नसेल तर त्याचे कला ही पोटार्थी अथवा राजकीय स्वार्थासाठीची कला आहे असे म्हणावे लागेल.

आणि आजकाल साहित्य असो कि चित्रपट यात अशा पोटार्थी (किंवा राजकीय स्वार्थी) कलाकारांची भरमार वाढली आहे हे आपल्या सहज लक्षात येईल. आपला चित्रपट गल्लाभरू व्हावा किंवा विशिष्ट वर्गाने तरी आपले पुस्तक विकत घ्यावे यासाठी अनेक तडजोडी केल्या जातात. विषयही स्वयंप्रेरणेने नव्हे तर अशाच गल्लाभरू विचारांना बळी पडून ठरवले जातात. तसेच लेखन अथवा चित्रण केले जाते. ते जेंव्हा समाजासमोर प्रदर्शित होते तेंव्हा त्याकडे लोकही जातीय/धार्मिक/वर्गीय चष्म्यातून पाहू लागतात. समाजमाध्यमांवर अथवा वाहिन्यांवरील चर्चांमध्ये त्याचे प्रतिबिंब उमटते. समाज हा आपापसात विभागला गेल्याचे विदारक चित्र त्यामुळे उभे राहते आणि हा काही कलेचा उद्देश आहे असे म्हणता येणार नाही. किंबहुना “कला” या संकल्पनेचाच तो घोर अनादर होत असतो.

गॉर्कीच्या “आई” या कादंबरीने रशियन राज्यक्रांतीला बळ दिले. बंकिमचंद्रांच्या “आनंदमठ” कादंबरीतील वंदे मातरम गीताने भारतीय स्वातंत्र्य लढ्याला प्रेरणा दिली. महाकवी रवीन्द्रनाथ टागोरांनी देशाला नुसते राष्ट्रगीत दिले नाही तर मानवी संवेदनांना कोमल मनाने स्पर्श करत व्यापक जीवनदृष्टी दिली.  शरतचंद्र असोत कि अमृता प्रीतम वा प्रेमचंद, महाराष्ट्रातील अण्णा भाऊ साठे असोत कि वि.स. खांडेकर, दक्षिणेतील एस. एल. भैरप्पा असोत कि गिरीश कर्नाडांसारखे अनेक थोर लेखक, कवी व नाटककार यांनी वाचकाला एक सखोल जीवनदृष्टी दिली. साहित्याने जगभरच्या मानवसमाजाला भविष्याकडे जाण्याची सहृदय प्रेरणा देण्याचे काम अशा अनेक साहित्यिकानी केले. इब्सेन सारख्या नाटककाराने समग्र नाट्यकलाशास्त्र बदलवून टाकले. पुढे चित्रपट कला आली. भारतात आरंभीच्या काळात अमीर-गरीब संघर्ष किंवा हिंदू-मुस्लीम त्नावाताही त्यांची मैत्री हा अनेक चित्रपटाचा मुख्य गाभा राहिला. “गर्म हवा” हा असाच एक चित्रपट. राष्ट्र स्वतंत्र झाल्यानंतर नव्या भारताचे स्वप्न घेऊन राष्ट्रनिर्मानाचे कार्य एकोप्याने हाती घ्यावे असा संदेश देणारेही अनेक चित्रपट आले. “प्रेम” या विषयाचे अनेकविध पैलू दाखवणा-या चित्रपटांची तर रांगच लागली. पण १९७० नंतर ही दिशा बदलली. प्रेमाकडून हिंसेकडे नकळत प्रवास सुरु झाला. गेल्या दहा वर्षात तर राजकीय (म्हणजेच धार्मिक अथवा जातीय) मुलभूत उद्देश डोळ्यासमोर ठेवून अनेक चित्रपट येऊ लागले. या चित्रपटांची निर्मिती करतांनाच मुळात आधीच हेतू स्पष्ट असल्याने समाजात कधी नव्हे असे दुभंगमय वातावरण निर्माण होऊ लागले.

“आमचा आणि तुमचा” ही वाटणी समाजशास्त्रात नेहमीच विघातक मानली जाते. कलेतही जेंव्हा निर्मात्यापासून ते प्रेक्षकापर्यंत हे लोण पसरते आणि संघर्ष सुरु होतो तेंव्हा कलेच्या उद्दिष्टांबद्दलच मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित होते. “द काश्मीर फाईल्स” चा परिणाम तर खूपच विघातक झाला. मुळात दिग्दर्शकाने विशिष्ट विचारसरणीच्या लोकांच्या भावना भडकाव्यात, सत्यदर्शन मात्र तीळमात्र घडू नये, फक्त संघप्रणीत विशिष्ट धर्माचीच सहानुभूती मिळावी अशा “उदात्त” हेतूने चित्रपट बनवला. प्रदर्शित झाला. हा विशिष्ट वर्ग त्याचे नुसते समर्थान करून थांबला नाही तर मुस्लीम द्वेषाने अंध झाला. १९९० साली घडलेल्या दुर्दैवी घटनेची तार्किक छाननी न करता “हा चित्रपट म्हणजेच सत्य” असे वातावरण बनवले गेले. या चित्रपटामुळे सत्य कळाले असे जेंव्हा सांगितले जाऊ लागले तेंव्हा प्रश्न असा आहे कि गेली बत्तीस वर्ष मग हे स्वत:ला “जागरूक” म्हणवणारे काय करत होते? मुळात खुद्द काश्मिरी पंडितांना हा चित्रपट मान्य आहे काय? म्हणजे, कलेचीच हत्या कशी केली जाते आणि कलेचा उपयोग केवळ राजकीय हेतू साध्य करण्यासाठी कसा केला जातो हे “काश्मीर फाईल्स” चित्रपट हे अत्यंत दुर्दैवी उदाहरण आहे. दहशतवाद केवळ बंदुकीचा नसतो. “कलेचा दहशतवाद” ही सज्ञा या चित्रपटाने दुर्दैवाने सार्थ ठरवली असेच आपल्याला म्हणावे लागेल.

“झुंड” बाबतही तेच झाले. अमिताभ बच्चन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला वंदन करतो याचेच काही समाजघटकांना एवढे अप्रूप वाटले कि ते त्याच्याच गवगव्यात चित्रपटाचा मुख्य गाभाच विसरून गेले. “एका उच्चवर्णीयाला मग कशाला चित्रपटात घेतले?” असे उद्दाम प्रतीप्रश्नही विचारले गेले. अभिनेता आणि दिग्दर्शक यांची जातही जेंव्हा काढली जाते तेंव्हा सामाजिक अनर्थकारी स्थिती उद्भवते. थोडक्यात हाही चित्रपट “कला” न राहता दुहीचे कारण बनला.

सध्या साहित्यही याला अपवाद राहिलेले नाही. कथा-कादंब-या-इतिहास आणि कविताही विशिष्ट जात किंवा धर्माचे लांगुलचालन करण्यासाठी बेतून लिहिल्या जातात. बाबासाहेब पुरंदरेसारख्यांनी लिहिलेल्या इतिहासाला नाकारण्यासाठी तेवढीच धादांत खोट्याने भरलेली प्रति-इतिहासाची पुस्तके लिहिली जातात. धमासान चर्चा होते, वाद होतात. साहित्य हे साहित्य आणि इतिहास हा इतिहास राहिलेले नाही हे आपण गेल्या दोन-तीन दशकांचा इतिहास पाहिला तरी सहज लक्षात येईल. कलेने समाज-राजकीय ढोंगाचे आवरण  चढवले आहे. “सोयीचा इतिहास हाच खरा इतिहास” असे लिहिणारे ठरवतात तसेच वाचणारेही. कलेसोबत इतिहासाचाच मृत्यू झाला आहे.

तरीही अशा गोंधळलेल्या वातावरणात काही माणुसकीचे कलात्मक हुंकार जिवंत आहेत. जाती-धर्म-प्रांत यापार जाऊन सामान्यांनीही कलेकडे निव्वळ कला म्हणून पाहिले पाहिजे आणि तिचे सार्थ मूल्यमापन केले पाहिजे. कला ही कोणत्याही जाती-धर्म-प्रांताची दासी नाही हे सत्य समजावून घ्यावे लागेल. जीवनाशी हात सुटला कि साहित्य संपते. इतिहासही होता तसा स्वीकारण्याचे धैर्य नसले कि खोटे इतिहास जन्माला येतात. साहित्य अथवा इतिहासही कोणत्याही जातीय-धार्मिक अभिनिवेशातून अथवा द्वेषातून आलेला नसला पाहिजे. असे जर होऊ शकले तरच आम्ही प्रगल्भ कलासक्त नागरिक बनण्याच्या दिशेने वाटचाल करू. देश असेच नागरिक घडवतात!

-संजय सोनवणी

No comments:

Post a Comment

सिंधू संस्कृतीची मालकी!

  सिंधू संस्कृतीची लिपी वाचता आलेली नसल्याने कोणीही उठतो आणि सिंधू संस्कृतीवर मालकी सांगतो. द्रविडांनी हे काम आधी सुरु केले पण त्याला आर्य आ...