Friday, May 13, 2022

स्कार्डू ते यारकंद: मुश्ताघ खिंडीतील पुरातन व्यापारी मार्ग

 

 

 

गीलगीट आणि लडाखच्या मध्ये बाल्टीस्तान हा भाग येतो. सध्या हे दोन्ही भाग पाकिस्तानच्या ताब्यात आहेत. गीलगीटहून जसा एक निकटचा पण अतिदुर्गम व्यापारी मार्ग काश्गरला  भारताशी जोडत होता तसाच बाल्टीस्तानमधूनही एक व्यापारी मार्ग यारकंदशी जोडला गेलेला होता. हा मार्गही अवघड असला तरी यारकंद या तत्कालीन मुख्य व्यापारी मार्गावरील  भरभराटीला आलेल्या शहरापर्यंत जाणारा तुलनेने अगदी जवळचा मार्ग होता. हुंझा खो-यातून मिन्ताका खिंडमार्गे गेल्यास काश्गरपासून उलटे यावे लागत असे आणि ते टाळण्यासाठी या मार्गाचा वापर व्यापारी मंडळी मोठ्या प्रमाणावर करत असत. आणि हा मार्ग जाई तो स्कार्डूहून काराकोरम पर्वतरांगेतील मुश्ताघ खिंडीतून.

 

बाल्तीस्तानचा इतिहासही प्राचीन आहे. येथे राहणारे लोक वांशिक दृष्ट्या दार्दिक, मध्य आशियायी आणि लडाखी लोकांशी नाते सांगतात. लडाखी संस्कृती व रितीरिवाजांमध्येही बरेच साम्य आहे. तिबेटच्या स्वामित्वाखाली गेल्यानंतर येथील लोकांनी तिबेटी बौद्ध धर्म स्वीकारला.  या भागात बाराव्या शतकाच्या आसपास इब्राहीम शाहने सत्ता स्थापन केल्यानंतर बौद्ध धर्माचा या पूर्वापार पगडा कमी कमी होत गेला. चौदाव्या शतकानंतर बुर्झील खिंडीमार्गे अनेक सुफी मुस्लीम विद्वान या भागात आले आणि त्यांनी समन्वयकारी सुफी परंपरा येथे कायम केली. पुढे जवळपास सातशे वर्ष इब्राहीम शाहच्या मक्पोन घराण्याने येथे सत्ता गाजवली. 

 

चीनी साहित्यात बाल्टीस्तानचा उल्लेख छोटे बोलूर असा केला गेलेला असून ते आठव्या शतकापर्यंत बव्हंशी काळ तिबेटच्या अधीन राहिले. नंतर ते काश्मीरचा सम्राट ललितादित्याने अरबांचा पराभव करत अफगाणिस्तानमार्गे आपली तुर्कस्तानपर्यंतची मोहीम पूर्ण करून परत येताना गीलगीट, बाल्टीस्तान आणि लदाखही जिंकून घेतले आणि व्यापारी मार्गांवर नियंत्रण आणले. चीनचेही लक्ष या तशा दुर्गम भागावर व्यापारी कारणांमुळेच असल्याने त्यांनीही या भागावर नियंत्रण मिळवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. तिबेटने या भागावर वर्चस्व गाजवू नये म्हणून सन ७२२ मध्ये काश्मीरच्या कर्कोटक घराण्यातील तारापीड या सम्राटाने चीन दरबारी वकील पाठवून चीनच्या सैन्याला वूलर तळ्याजवळ तळ ठोकण्यास अनुमती तर दिली होतीच पण त्या सैन्याला लागणारी शिधासामग्री पुरवन्याचेही आश्वासन दिले होते. पण आठव्या-नवव्या शतकाच्या काळात तिबेट ही एक महासत्ता झालेली असल्याने तुलनेने दुर्बल चीनने तेथे तळ उभारण्याचे धाडस केले नाही. तरीही तारापीडाने देऊ केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानण्यासाठी तांग सम्राटाने एक शिष्टमंडळ गिलगीटमार्गे काश्मीरला पाठवले होते. पण तिबेटचा उपद्रव फारच वाढतो आहे आणि आपले व्यापारी मार्गांवरील प्रभुत्व संपुष्टात येत आहे हे लक्षात आल्यावर मात्र  चीनने राजकीय हालचाली सुरु केल्या. यामुळे सावध झालेल्या तिबेटच्या राजाने सन ७३७ मध्ये आपल्या ख्रीमालोद या राजकन्येचा विवाह सुशीलोझी नावाच्या गिलगीटच्या तत्कालीन राजाशी लावून दिला आणि संबंध बळकट करण्याचा प्रयत्न केला. बाल्टीस्तान लदाखला लागुनच असल्याने त्यावर आपले लष्करी वर्चस्व ठेवता येईल असा तिबेटचा अंदाज होता. यामुळे चीन बिथरला आणि गावो झियांझी या आपल्या सेनानीला गिलगीटवर चाल करण्यासाठी पाठवले. गावो झियांझी हा पामीर पठारावरून मिन्ताका खिंडीमार्गे, हुंझा नदीच्या अरुंद खो-यातील झुलत्या पुलांवरून गिलगीटमध्ये आपले सैन्य घेऊन घुसला आणि त्याचा पाडाव केला. तसाच तो पुढे बाल्टीस्तानमध्ये येत स्कार्डूवर कब्जा करत तेथून जाणारा व्यापारी मार्गही चीनच्या स्वामित्वाखाली आणला. हे एका प्रकारचे तत्कालीन व्यापारयुद्धच होते आणि पुढेही सातत्याने सुरु राहिली. काश्मीरने कधी स्वामित्व गाजवले तर कधी सहकार्याची भूमिका ठेवली, पण काश्मीरचे धोरण हे त्या काळात बलाढ्य सत्ता असलेल्या तिबेटच्या विरोधातच राहिले.

 

तक्लमाकन शीत-वाळवंटातील मुख्य व्यापारी शहर यारकंदला जाणारा मार्ग स्कार्डूहून निघत होता. स्कार्डू हे लेह, काश्मीर, गीलगीट आणि मध्य आशियातील यारकंदशी जोडणारे एक महत्वाचे व्यापारी जंक्शन होते. त्यामुळे येथेही चारी दिशांनी व्यापारी येत असत. मुश्ताघ खिंड ही समुद्रसपाटीपासून साडेपाच हजार मीटर उंच. ही खिंड नेहमीच बर्फाने आच्छादित असायची. पुढे या मार्गावर चिरिंग हिमनदीने अतिक्रमण केल्यानंतर या खिंडमार्गाचा वापर थांबला आणि व्यापा-यांनी या खिंडीपासून १६ किलोमीटर अंतरावरील नवी मुश्ताघ खिंड शोधली. हा घाट मार्ग जरा जास्त उंचीचा होता, पण साहसी व्यापारी आपल्या अर्थार्जनाच्या मार्गात येणा-या सर्व विपत्तींवर तोडगा काढतात तसेच हे नव्या मुश्ताघ खिंडीबाबत झाले.

 

या हिमालयीन मार्गांनी व्यापा-यांप्रमाणे अनेक चीनी शिष्टमंडळेही येत असत. भारतात आलेले अनेक प्रसिद्ध चीनी प्रवासीही याच मार्गांनी आले. चे-मोंग हा सन ४०४ मध्ये भारतात आलेला पहिला ज्ञात भिक्षु. तो काश्गर-गीलगीट मार्गेच आला होता. सन ४२० मध्ये आलेला फाहीयान हा भिक्शुही याच मार्गाने काश्मीरमध्ये आला. पुढे हिएचो नामक काश्मीरला आलेल्या कोरियन भिक्षूने सन ७२० मध्ये या भागाला भेट दिल्याचा वृत्तांत उपलब्ध आहे.

 

व्यापाराचे एक मुख्य हिमालयीन केंद्र बनल्याने स्कार्डू हे एक महत्वाचे व्यापारी केंद्र बनले. येथे काश्मीरमधील मूल्यवान उत्पादने येथे व गिलगीटपर्यंत पोचत ते बुर्झील खिंडीतून. काश्मीरच्या वूलर तलावाच्या उत्तर भागातून ही खिंड जाते आणि साडेतेरा हजार फुट उंचीवर असलेल्या देवराई पठारापर्यंत पोचल्यानंतर तेथे दोन फाटे फुटतात. एक मार्ग गीलगीट तर दुसरा मार्ग स्कार्डूकडे जातो. बुर्झील घाट हा बर्फाछादित असल्याने येथे वनस्पतीजीवन जवळपास नाहीच. त्यामुळे हा घाट पार करणे हे महाकठीण कर्म असायचे. ओझेवाहू प्राण्यांसाठी गवतही सोबत न्यावे लागायचे. घोडे अथवा खेचरे यासारख्या प्राण्यांचाच वापर याही घाटात करावा लागे. विसाव्या शतकाच्या आरंभापर्यंत येथे घाटावर एक चौकी होती. तेथून भारत-चीनमधील पत्रव्यवहाराची देवानघेवाण केली जात असे. सध्या हा घाटमाथा पाकिस्तानने व्यापलेला असल्याने या घाटातून होणारा व्यापार पाकिस्तानने पूर्ण बंद केला आहे. 

 

खुंजेराब खिंडीतून काराकोरम हायवे बनण्यापूर्वी मुश्ताघ आणि मिन्ताका खिंडीतून जाणारे मार्ग अधिक वापरात होते. १९४९ साली चीनने मध्य आशियातील झिन्झीयांग भागावर आपली सत्ता कायम केल्यानंतर मध्य आशियातून येणारे बहुतेक व्यापारी मार्ग बंद केले त्यामुळे स्कार्डू, गीलगीट, काश्मीर आणि लेह येथील आर्थिक स्थिती ढासळत गेली. पुढे १९६२ चे भारत-चीन युद्ध झाले तेही व्यापारी मार्ग ताब्यात घेऊन त्याचे पुनरुज्जीवन करण्याच्या चीनी उपद्व्यापामुळे. काराकोरम हायवे तर चक्क पाकव्याप्त काश्मीरमधून जातो. आता स्कार्डू-यारकंदला जोडणारा सर्वात जवळचा मार्ग म्हणून मुश्ताघ खिंडीचा वापर केला जाणे व नवा महामार्ग बनवणे प्रस्तावित आहे. असे झाले तर बुर्झील खिंडीचा घाटमाथा असलेल्या अस्तोर खो-यापर्यंत चीन आपल्या अगदी निकट आलेला असेल. सध्या आपल्याकडे खुश्कीच्या मार्गाने मध्य आशियाशी थेट संपर्क करण्यासाठी आपल्या भूमीतून कोणताही मार्ग उरलेला नाही. पाकिस्तानने व्याप्त काश्मीरमधूनच मार्ग जाऊ देण्याची भूमीका घेतल्याने भारत सुरुवातीपासूनच निषेध नोंदवत आला असला तरी या मार्गांचे काम थांबलेले नाही. हे मार्ग फक्त व्यापारीच नव्हे तर भू-राजकीय आणि सामरिक कारणांसाठी आधीच संवेदनशील आहेत. भारत मध्य आशियातील राष्ट्रांशी संबंध दृढ करण्याच्या प्रयत्नात असले तरी खुश्कीचे मार्ग नसणे ही फार मोठी समस्या बनलेली आहे. आपण यातून कसा मार्ग काढू यावर आपले आर्थिक आणि सामरिक भविष्य अवलंबून असेल.

 

 

-संजय सोनवणी

      

No comments:

Post a Comment

Linguistic Theories

The entire world's conceptions and myths about the creation of language show that humans are curious about their language skills and str...