Friday, May 27, 2022

लेह ते यारकंद- गोठलेली मृतांची नदी श्योकवरून प्रवास!



 लदाख हा भारतातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला तर सर्वात मोठा प्रशासकीय भाग आहे. आता हा प्रदेश जम्मू-काश्मीर राज्याचे विभाजन झाल्यापासून स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश बनलेला आहे. मर्युल हे प्राचीन नाव असलेल्या लदाखचा इतिहास पुराश्मकाळाइतका प्राचीन आहे. हा प्रदेश प्राचीन काळी तिबेटी सत्तेचा भाग होते. पण सन ९०० मध्ये तिबेटचा राजा लाग्दार्माच्या हत्येनंतर तिबेटची सत्ता विस्कळीत झाली. त्याचा नातू निमांगोम याने लदाख आपल्या अधिपत्याखाली आणला. पुढे लदाखचेही त्याच्या मुलांमध्ये वाटप होऊन लदाखचे तीन भाग पडले. पुढे सन ७५०च्या आसपास काश्मीरचा सम्राट ललीतादित्य याने गिलगीट-बाल्टीस्तान आपल्या कब्जात घेत लदाखही आपल्या स्वामित्वाखाली आणून काश्मीर राज्याला हे प्रांत जोडले. जोझीला या मुख्य पण दुर्गम खिंडीतून काश्मीरचा मध्य आशियाशी चालणारा व्यापार त्यामुळे सुलभ झाला. पण लदाखने ललितादित्याच्या मृत्यूनंतर पुन्हा स्वातंत्र्य मिळवले. हे स्वातंत्र्य एकोणीसाव्या शतकापर्यंत टिकले. सन १८३४ मध्ये जम्मूचा राजा गुलाबसिंगाचा सेनापती जोरावरसिंग याने लदाख पादाक्रांत करून तेथील नामग्याल घराण्याची सत्ता संपुष्टात आणलीत्यानेच गिलगीट- बाल्टीस्तानही जिंकून घेऊन काश्मीर राज्याला जोडले. दोन्ही बाजूचे व्यापारी मार्ग आपल्या स्वामित्वाखाली येऊन व्यापारावर स्वामित्व प्रस्थापित करणे हाच या आक्रमणांचा मुख्य हेतू होता.

जोझीला खिंडीच्या माथ्यावर कारगील हे प्राचीन व्यापारी शहर असून त्यापासून जवळच सिंधू नदीच्या काठाने बाल्टीस्तानमधील स्कार्डू मार्गे गिलगीटला जाणारा व्यापारी मार्ग होता. आता हा मार्ग वाहतुकीसाठी बंद आहे. अनेक व्यापारी तेथेच आपले सौदे उरकत असल्याने तेथील कारगिल गावही वैभवाच्या शिखरावर पोहोचलेले होते. जोझीला खिंडीतून येणारा मार्ग कारगिलहून सरळ पुढे गेले कि लेह या मुख्य व्यापारी केंद्राशी जाऊन भिडत होता. कारगील येथील सुरु नदीच्या खो-यातूनही एक व्यापारी मार्ग जात असे जो शेवटी लेहलाच मिळे. लेह येथून यारकंद, खोतान या तारीम खो-यातील मुख्य रेशीममार्गावरील शहरांशी जोडणारे मार्ग होते. ल्हासाला जाणारा मार्गही येथूनच जात असे. येथून खनिज मीठ, काश्मिरी केशर, लोकर, शाली, मसाले, अफू, कापूस, नीळ, प्रवाळरत्ने आदी बहुमोल वस्तूंचा व्यापार या मालाची मध्य आशिया आणि ल्हासा येथे वाहतूक होत असे. येथे पश्चिम आशिया, मध्य पूर्व आशिया आणि भारतातून असंख्य व्यापारी येत. त्यामुळे साडेतेरा हजार फुट उंचीवरचे लेह हे सांस्कृतिक सम्मीलनाचेही एक केंद्र बनले होते. पश्चिम आशियातून व्यापारी दोन मदार असलेले उंट वाहतुकीसाठी घेऊन येत. आजही या उंटांचे वंशज नुब्रा खो-यात पहायला मिळतात.

लेह ते यारकंद हे अंतर जवळपास साडेआठशे किमीचे असले तरी मार्ग मात्र अत्यंत कठीण होता. कैलास ते काराकोरम पर्वतराजीतून कोठे कोठे सतरा-अठरा हजार फुट उंचीवरून, हिमनद्यांनी व्यापलेल्या क्षेत्रातून जात असे. काही भाग तर अन्न-पाणी आणि गवताचे दुर्भिक्ष असणा-या भागांतून जात. सध्या चीनच्या कब्जात असलेला सोळा हजार फुट उंचीवरचा अक्साई चीन (हा मुळचा मध्य आशियातील उघूर भाषेतील शब्द, अर्थ होतो पांढरे वाळवंट) हा त्यातलाच एक भाग. लोकवस्तीचा पूर्ण अभाव हाही एक अडथळा होताच. तरीही वर्षाला साधारणपने दोन हजार व्यापारी तांडे या मार्गावरून व्यापार करत असत.

लेह येथे या व्यापा-यांच्या राहण्यासाठी सराया होत्या. घोडे, याक, उंट असे प्राणी येथे उपलब्ध तर असतच पण मालवाहू ह्मालही उपलब्ध असत. त्यामुळे लेह शहर गजबजलेले असायचे. लदाखच्या पठारावर मुळात ऑक्सिजनची कमतरता. मार्गात उंची असलेल्या खिंडी लागल्या कि ही कमतरता असह्य होईल अशी. त्यात कडाक्याची थंडी. हिवाळ्यात तर नद्या-तळीही गोठत. अशा प्रतिकूल हवामानात या अशक्यप्राय दुर्गम मार्गांनी व्यापार करणे हे खरेच एक साहसी कार्य होते यात शंका नाही.

लेह ते यारकंद हा मार्ग काराकोरम पर्वतराजीतून खाली उतरायचा. हे मार्ग तसे दोन होते...म्हणजे एक उन्हाळी मार्ग तर एक हिवाळी मार्ग. हे दोन्ही मार्ग काराकोरम खिंडीच्या अलीकडच्या दौलत बेग ओल्डी या स्थानाशी येऊन मिळत. हिवाळी मार्ग हा गोठलेल्या नद्यांच्या पृष्ठभागावरून चालत पार पाडला जात असे. हिवाळी मार्गाला झामिस्तानी मार्ग असे म्हटले जाई. या मार्गावर दिगार-ला  खिंड, सासेर-ला खिंड, (समुद्र सपाटीपासून १८ हजार फुट उंच) कामदेन हिमनदीचा पायथा असे अतिदुर्गम भाग ओलांडले कि दौलत बेग ओल्डी येत असे. या हिवाळी मार्गावर रिमो हिमनदीत उगम पावणारी डावीकडे तिरकस “V” आकार घेत वाहणारी श्योक नदी आहे. हिवाळ्यात गोठलेल्या या नदीवरून बराचसा प्रवास करावा लागायचा. “श्योकया शब्दाचा अर्थ आहेमृतांची नदी”. या नावावरूनच या नदीतील प्रवासाची भयावहता लक्षात यावी. श्योक नदी पार केली कि नुब्रा (सियाचीन) नदीच्या खो-यातून प्रवास सुरु होत असे.

पण या मार्गाचा वापर किते पुरातन असावा? अलीकडेच सासेर-ला खिंडीजवळ डॉ. प्रमोद जोगळेकर यांच्या मार्गदर्शनासाठी उत्खनन झाले. येथे साडेदहा हजार वर्षांपूर्वीच्या भटक्या प्रवासी तान्ड्यांचे तात्पुरते निवास सापडले आहेत.

हिवाळी मार्ग उन्हाळ्यात वापरण्यातील मोठी अडचण म्हणजे या काळात नद्यांतील बर्फ वितळून अति-वेगवान प्रवाह निर्माण होत. ते ओलांडणे सुद्धा अशक्य असायचे. अरुंद -यांमुळे काठाने चालणेही अशक्य. त्यामुळे उन्हाळ्यात मार्ग बदलने भाग पडायचे. या उन्हाळी मार्गाला ताबिस्तानी मार्ग असे नाव होते. हा मार्ग खार्दुंग-ला खिंडीतून पुढे अनेक खिंडी पार करत देस्पांग पठारावरून दौलत बेग ओल्डी येथे मिळत असे. हा मार्ग हिवाळ्यात चुकुनही वापरला जात नसे कारण येथे असलेली हाडे गोठवणारी थंडी. देस्पांग पठार आता चीनच्या कब्जात आहे.

या मार्गावरून घोडे जाऊ शकत नसल्याने याक किंवा मानवी श्रमाचाच उपयोग मालवाहतूक करण्यासाठी केला जात असे. तरीही दिवसाला शेकडो व्यक्तींचा एक तांडा असे किमान चार तांडे या मार्गावरून वाहतूक करत असत.

दौलत बेग ओल्डी येथे हिवाळी आणि उन्हाळी मार्ग एकत्र येत. येथून काराकोरम खिंड उतरावी लागे शाहीदुल्ला या व्यापारी थांब्यापर्यंत यावे लागे. येथून यारकंद किंवा खोतानला जाणारे मार्ग फुटत त्यामुळे हे स्थान महत्वाचे होते. एकोनिसाव्या शतकात जोरावरसिंगने येथवर काश्मीरच्या सीमा विस्तारल्या होत्या. यारकंद येथे पोहोचेपर्यंत अजून कूनलुन पर्वतातील संजू खिंडीसारख्या अनेक खिंडी आणि नद्या ओलांडाव्या लागत.

दौलत बेग ओल्डी हे नाव कसे प्राप्त झाले याचा इतिहासही खूप मनोरंजक आणि उद्बोधक आहे. सध्या येथे भारतीय सैन्याचा मोठा तळ तर आहेच पण जगातील सर्वात उंचीवरची धावपट्टीही येथे आहे. याबद्दल अधिक माहिती आपण पुढील लेखात घेऊ.

या मार्गावर गेल्या हजारो वर्षांत असंख्य माणसे प्राणी प्रतिकूल हवामानात ओझ्याने म्हणा कि ऑक्सीजनची कमतरता म्हणा, मेल्याने या रस्त्यावर आजही त्यांचे सांगाडे विखुरलेले दिसतात. या मार्गावर धाडसी पर्वतारोहीन्नी या अनाम मृत जीवांना अत्यंत आगळ्या पद्धतीने त्यांच्या अपार साहस आणि धैर्यासाठी आदरांजली म्हणून काराकोरम खिंडीजवळ एक छोटे स्मारक उभे केले आहे. हे स्मारक म्हणजे याक आणि मानवी कवट्या हाडे एकत्र करून अस्थायी स्वरूपाचा स्मृतीस्तंभ आहे!

-संजय सोनवणी

 

No comments:

Post a Comment

ऐतिहासिक तथ्यांची तोडमोड

  ऐतिहासिक तथ्यांची तोडमोड करणे आणि लोकांची दिशाभूल करणे हा भाजपाचा पूर्वीपासून उद्योग राहिलेला आहे. परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी नुकतेच नेह...