Friday, May 27, 2022

प्राचीन कथन-श्रवण परंपरा आधुनिक रुपात पुन्हा अवतरलीय!

  


 

प्राचीन काळात जेंव्हा लिपीचाही शोध लागलेला नव्हता तेंव्हाच कल्पिणे, कथन करणे व सांगणे या कलेचा अभिनव शोध लागला. माणूस हा प्राणी अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. तो इतर प्राण्यांपेक्षा वेगळा ठरतो कारण त्याला बोलता येते. आपले स्वरयंत्र वेगवेगळे आवाज काढू शकते, निसर्गातील विविध आवाजांची नक्कल करता येते हे अगदी प्रारंभीच्या काळात त्याच्या लक्षात आले. या होमो सेपियन प्रजातीची वैशिष्ट्यपूर्ण दफने, कलात्मक वस्तू व हत्यारांच्या निर्मितीकडे पाहता ही प्रजाती आरंभ काळापासून तर्कसंगत विचार करत असावी हे स्पष्ट होते. विचारांशिवाय आणि अभिव्यक्तीच्या अनावर उर्मीशिवाय संस्कृतीचा आणि भाषेचा जन्म  होऊ शकत नाही. विचार करणे आणि अभिव्यक्तीसाठी भाषा असणे हा मानवाचा स्थायीभाव आहे असे म्हणावे लागते. जीवनव्यवहार जसजसे गुंतागुंतीचे होत गेले तशा आरंभीच्या बाळबोध भाषाही प्रगत गुंतागुंतीच्या व व्यामिश्र झाल्या, नेमकेपणासाठी व्याकरणे आली. या पद्धतीने भाषा विकसित होत गेल्या.

 

केवळ ऐहिक जीवनाबद्दल विचार करत होता म्हणून मनुष्याने भाषा स्वयंभू प्रेरणेने निर्माण केली असे म्हणता येत नाही. मनुष्य विचार करतो त्याचबरोबर अनेक अमूर्त कल्पनाही करतो. अतिप्राचीन काळी मनुष्य आपल्या भवतालाकडे अद्भुतरम्य दृष्टीने पाहत असे. त्याने आपल्या कल्पनाशक्ती वापरत दिसणा-या जगापलिकडचे एक अद्भुत जगही निर्माण केले. त्या जगात स्वर्ग होता, पाताळ होतें, देवी-देवता जशा होत्या तसे सैतानही होते. प-या होत्या, अजरामर बनवू शकणारे अमृतही होते, यक्ष होते, गंधर्व होते, उडते सर्प होते, अवाढव्य गरुड जसे होते तसेच भुते-खेतेही होती. दुध-तुपाचे समुद्र होते तसेच मेरू पर्वतासारखे किंवा बाखू, ऑलिम्पस सारखे देवांचे निवासस्थान असलेले पर्वतही होते. मानवी जीवनातील संघर्षाचे अध्यारोपण या काल्पनिक सृष्टीवर करत त्यांनी त्यांचा संघर्ष नुसता कल्पिला नाही तर त्यांच्यावर कथाही बनवल्या. प्रत्येक देव-सैतानाला त्यांनी स्वतंत्र व्यक्तित्व दिले. आद्य पुराकथा अशा निर्माण झाल्या. जगभरात प्रत्येक भागात अशा पुराकथा आहेत. या पुराकथा प्रत्येक प्रांतात वेगळ्या असल्या तरी मुलभूत गाभा मात्र एकच आहे आणि तो म्हणजे संघर्ष!

 

बरे, या कथा ज्याही प्रतिभाशाली मानवाने प्रथम बनवल्या त्या कशा पसरल्या? त्या कथा मौखिक पद्धतीने सांगितल्या जात. शक्यतो या कथा गेय असत कारण त्या सांगणे आणि ऐकणे यात एक आदिम ताल असे. ऐकणारेही सहजपणे ते मुखोद्गत करून आपल्या शैलीत नवीन समुदायासमोर पुन्हा सांगू शकत. कधी कधी सांगणारा त्यात आपल्या प्रतिभेने अधिकची भर घाले आणि मुळ कथा या पद्धतीने बदलत जात विविध प्रांतांत पसरत आणि पिढ्यानुपिढ्या सांगितल्या जात. त्यात प्रांत-कालसापेक्ष पद्धतीने बदलत राहत तरी मुळ गाभा सहसा बदललेला नसे. पण सांगणे आणि ऐकणे, स्मरणात ठेवणे आणि पुन्हा सांगणे हे चक्र अबाधित होते. या काळात पुन्हा नव्या कथांचा जन्म झाला किंवा इतिहासात किंवा वर्तमानात घडलेल्या घटनांना अद्भुतरम्य रूप देत नव्या कथांचा आणि महाकाव्यांचा जन्म झाला. इलियड, ओडीसी, रामायण, महाभारत किंवा गिल्गमेश असो, अशी असंख्य काव्येही याच मानवी प्रेरणांतून निर्माण झाली व पुढे संक्रमीतही झाली.

 

लिपीचा शोध लागल्यानंतर सारे स्मरणात ठेवण्याची गरज नष्ट झाली. स्मृतीतील पुराकथा व पुराकाव्ये शब्दांत लिपीबद्ध केली गेली. त्यासाठी नैसर्गिक साधने वापरली गेली. मग ते इष्टीकावरील लेखन असो की ताडपत्रांवरील. यामुळे सोय झाली खरी पण त्याचा प्रचार करायचा तर पुन्हा प्रती बनवणे आवश्यक झाले. पण कोणत्याही ग्रंथाची अचूक प्रत बनवून घेणे हे अत्यंत खर्चिक होते. त्यामुळे ग्रंथाच्या प्रती सामान्य जनतेला अप्राप्य असत. यातून पुराणिक हा व्यवसाय सुरु झाला. म्हणजे एकच प्रत त्याने वाचायची, निरुपण करायचे आणि इतरांनी ऐकायचे. लोकसाहित्य तर लिखित स्वरूपातही आता-आतापर्यंत उपलब्ध नव्हते. ते तर केवळ मौखिक परंपरेने पिढ्यानुपिढ्या चालत आले. म्हणजेच एकंदरीत कारभार कथन-श्रवण परंपरेचा राहिला. खरे तर मानवी संस्कृती लाखो वर्ष कथन आणि श्रवण या मुलतत्वावरच उभी राहिली. कारण त्यात एक सामुदायिक अनुभूतीही होती.

 

पुढे मुद्रणकलेचा शोध लागला. शिक्षणाने वाचू शकणा-या जनतेचीही वृद्धी होऊ लागली. यातून सर्वात मोठा झटका बसला तो कथन-श्रवण संस्कृतीला. म्हणजे पारायणे, प्रवचने किंवा पोवाडे ही परंपरा अगदी मराठीतही समांतरपणे सुरूच राहिली पण ज्याही लोकांना त्याहीपार जाऊन जीवनदृष्टी देणारे साहित्य हवे होते ते कथन-श्रवण संस्कृतीतून जवळपास हद्दपार झाले. त्याची जागा वाचनसंस्कृतीने घेतली. गेय शैलीची जागा गद्य शैलीने पादाक्रांत केली. लेखनात मग अत्यंत नवे, अद्ययावत प्रयोग सुरु झाले. याने साहित्य जगाला वेगळा वास्तव मानवी चेहरा दिला. मानवी जीवनाचे गहन अंतरंग उलगडले जाईल अशा साहित्याला जन्म मिळाला. लेखन अद्भुतरम्यतेकडून वास्तववादाकडे आले.

 

पण यालाही मर्यादा होत्या आणि आहेत. वाचन करायचे म्हणजे पुस्तक विकत घ्या, किंवा ग्रंथालयातून घ्या, वाचनासाठी वेगळा वेळ काढा आणि त्यासाठी निवांत जागा शोधा. परत सारीच पुस्तके विकत घेता येईल अशी प्रत्येकाची क्षमता नसतेच त्यामुळे गाजलेली अथवा गाजवण्यात आलेली पुस्तके तेवढी विकत घेतली जातात. बव्हंशी लोक मात्र या साहित्यापासून दूरच राहिले. मर्यादित सामुदायासाठे जाहीर कथा किंवा कादंबरीची अभिवाचने होत असली तरी त्यावर मर्यादा होत्या.

 

त्यामुळे वर्तमानात आता एक अभिनव “श्राव्य” क्रांती होते आहे त्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. मोबाईल आजकाल प्रत्येकाच्या हातात असतो. त्याचा उपयोग मोबाईलवर एखाद्या श्राव्य पुस्तके उपलब्ध करून देणा-या कंपनीचे एप डाऊनलोड करून हवे ते पुस्तक निवडून कोठेही एकटे किंवा सामुदायिक पद्धतीने ऐकता येण्यासाठी होतो. अगदी फिरायला निघाले अथवा कार चालवत असले तरी तेंव्हाही श्रवणानंद घेत साहित्याचा आनंद घेता येतो. छापील पुस्तकांची जागा झपाट्याने श्राव्य माध्यम व्यापू लागले आहे. त्यात स्टोरीटेल (storytel) या स्वीडीश कंपनीने आता इतर भाषांबरोबरच हजारो मराठी लोकप्रिय व श्राव्य माध्यमासाठी खास लिहून घेतलेली नवी पुस्तकेही नामवंतांच्या आवाजात ऐकायला उपलब्ध करून दिलेली आहेत. त्यामुळे जगभरच्या वाचकांप्रमाणेच आता मराठी वाचकांचीही श्रोत्यांत बदल व्हायची प्रक्रिया सुरु झालेली आहे. शिवाय एक पुस्तक विकत घ्यायला जेवढा खर्च येतो त्या खर्चात महिनाभर ऐकता येतील तेवढी आणि हवी ती बव्हंशी प्रसिद्ध पुस्तके निवडता येतात. त्याला मिळणारा मराठी साहित्य-श्रोत्यांचा प्रतिसादही अफाट आहे. एकंदरीत कथन-श्रवण संस्कृती आधुनिक रुपात पुन्हा एकदा अवतरलेली आहे. आणि ही संस्कृती पुरातन असल्याने काय सांगावे उद्या कदाचित “पुस्तक वाचले काय?” ऐवजी “पुस्तक ऐकले काय?” या प्रश्नाकडे लोक वळू लागतील. श्रवण हे मानवी मुलभूत प्रेरणांशी अधिक सुसंगत आहे. साहित्याचा खेड्या-पाड्यांपर्यंतही सर्वदूर प्रसार व्हायला श्राव्य माध्यम फार मोठा हातभार लावू शकते.

 

काळाचे चक्र फिरत असते. आधुनिकता नेहमी पुरातनतेचा हात धरून चालत असते. मुलभूत मानवी प्रेरणा कालौघात दिशा बदलत जात असल्या तरी त्या संधी मिळताच पुरातनाचा हात आधुनिक पद्धतीने धरायला पुढे धावतात. त्यामुळे मानवी विश्वात प्राचीन काळी झालेली मानवी जीवनाला चेहरा देणारी “कथन-श्रवण” क्रांती आधुनिक स्वरूपात आता अवतरली आहे आणि तिचा स्वीकार करावा लागेल.

 

-संजय सोनवणी

दै, नवशक्ती

No comments:

Post a Comment

वंचितांचे अर्थशास्त्र आणि आपली मानसिकता

  वंचितांची व्याख्या बव्हंशी आर्थिक आधारावर केली जाते. सरकारला आपली धोरणे ठरवण्यासाठी ही व्याख्या पुरेशी ठरत असली तरी वंचिततेचे सामाजिक नि...