Thursday, June 23, 2022

आम्हाला इतिहास आहे?

 खोटा गौरव निर्माण करणारा इतिहास लिहित बसण्यापेक्षा आहे तोच इतिहास नि:पक्षपणे लिहिला असता तर जास्त गौरवशाली गोष्टी सहज सापडल्या असत्या. सोमनाथाचा प्रथम जीर्णोद्धार करणारा व नंतर जैन झालेला कुमारपाल जसा सर्वांना माहित झाला असता तसा काश्मीरचा सम्राट ललितादित्यही. इतिहासातील अनेक व्यक्ती आजही प्रकाशात यायची वाट पाहत तिष्ठत राहिल्या नसत्या. सामाजिक इतिहासही शुद्ध स्वरूपात लिहिला गेला असता. अहिल्याबाई होळकर केवळ एका धार्मिक महिलेच्या रुपात पुढे केली गेली नसती. सातवाहन ते राष्ट्रकुट काळातही समाज वैदिक धर्मशास्त्रांनुसारच चालत होता अशी ते सामाजिक वास्तव नसतानाही बेताल संदर्भहीन विधाने केली गेली नसती. राजांसाठी भाटांनी लिहून ठेवलेली काव्ये आणि स्वत:चा गौरव करून घेणा-या प्रशस्तीन्ना इतिहासाचे महत्वाचे साधन मानले गेले नसते. केवळ संस्कृत साधनांनाच तेवढे महत्व देत प्राकृत-द्रविड साधनांना दुय्यम व दुर्लक्षनीय मानले नसते. जैन-आजीवक व बौद्धान्चाही वास्तव इतिहास कारण नसतांना वैदिक भ्रामक इतिहासाशी जोडला गेला नसता. भारतीय मानस आपल्याच गतकाळाबाबत गोंधळयुक्त आहे कारण जो पुनरुज्जीवनवादी इतिहास लिहिण्याचा अपार खटाटोप गेली दोनेकशे वर्ष सुरु आहे त्याचा हा परिपाक आहे. आता तर त्याने कळस गाठायचा चंग बांधलेला आहे. कारण या इतिहासाचा पायाच ऐतिहासिक आहे तेही तथ्य विकृत करत जाणे हा आहे.

वैदिक काळात असे होते तसे होते...सामाजिक व्यवस्था अशी होती तशी होती अशी वर्णने एकजात सर्व वैदिक विद्वान करतात पण ते कधीही वैदिक काळ नेमका कधी होता? किती शतके होता? होता तर त्या काळाचे कसलेही भौतिक पुरावे का मिळत नाहीत आणि असले तर ते नेमके काय आहेत याबाबत ते मौन असतात, पण वर्णनेच एवढ्या श्रद्धाभावाने करतात कि इतिहास लेखनात श्रद्धेला स्थान नसते, पुरावे लागतात हे मात्र साफ विसरून गेलेले असतात. प्रतिपक्ष मुळात अनाभ्यासी असल्याने त्यांचे फारच जास्त फावते हेही खरे. पण अडाण्याला अधिक अडाणी करणे हा विद्वानाचा जीवनहेतू नसतो तर लोकांना शहाणे आणि विचारी करणे हा असतो याचे भान भारतीय इतिहासकारांना कधीच आलेले नाही. पण महाराष्ट्र ग्याझेटीयर (इतिहास-प्राचीन काळ) सारख्या सरकारद्वारा प्रकाशित ग्रंथातही अशा त्रुटी केवळ वृथाभिमानाच्या भावनेपोटी आणि इतिहासाच्या खुनासाठी आणल्या जातात तेंव्हा काळजी वाटली पाहिजे.
यामुळे आपला सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, आणि राजकीय इतिहास विकृत झालेला आहे. बरे, खोटे वर्चस्व प्रस्थापित करण्यापलीकडे त्याचा विशेष उपयोगही नाही. यात “इतिहास” मात्र झाकोळला गेलेला आहे. खूप इतिहास तर अंधारात ठेवला गेलेला आहे. गैरसोयीच्या इतिहासाला झाकून टाकल्याने अथवा अंधारात ठेवल्याने आपल्या राष्ट्रीय व्यक्तिमत्वाच्या बाजू उजळून निघतील ही भ्रामक कल्पना आहे.
अस्मितांचा सोस हवाहवासा वाटला तरी तो घातक असतो हे सर्वच भारतीय समाजाला समजायला हवे व तथ्यात्मक सर्वांगीण इतिहासाकडे सर्वांनी वळायला हवे. इतिहासात राहून गेलेली कृष्णविवरे, मग ती कटू असोत कि गौरवास्पद, उजेडात आणायला पाहिजेत.
इतिहास आम्हाला गतकाळाकडे पहायची व्यापक दृष्टी जेंव्हा देतो तेंव्हाच आपला भविष्यकाळ उज्ज्वल असतो.
भारताला आज तरी ख-या अर्थाने लिहिला गेलेलेला इतिहासच नाही मग भविष्य काय असणार हा प्रश्न निर्माण झाला तर तो दोष कोणाचा?

No comments:

Post a Comment

अमेरिकन शेतीचे भविष्य आणि आपण!

  २०५० पर्यंत ,  वाढत्या जागतिक लोकसंख्येला पोसण्यासाठी शेतीत व शेतीउत्पादनपद्धतीत काय बदल करावे लागतील यावर जगभरच्या प्रगत राष्ट्रांत नुसते...