Saturday, June 18, 2022

विद्रोहाची संकल्पना का फसली?

 विद्रोहाची संकल्पना फसली कारण विद्रोह नेमका कोणाविरुद्ध, एखाद्या जातीविरुद्ध कि व्यवस्थेतील अन्याय्य विषमतामुलक तत्वज्ञानाविरुद्ध याचे भानच उरले नाही. जातींविरुद्धचा संघर्ष एका जातीविरुद्ध एकवटण्याचा द्वेषमुलक प्रयत्न सुरु झाला येथेच विद्रोहाच्या नाशाची बीजे होती. ब्राह्मण आणि हिंदू देवतांना शिव्या देणे म्हणजे पुरोगामीपणा अशी काहीतरी विचित्र पुरोगामीपणाची संकल्पना हिरीरीने स्वीकारली गेली. असे करत असतांना आपण आपल्याही जातीच्या बेड्या घट्ट करत चाललो आहोत याचेही भान राहिले नाही.

विद्रोह हा आवश्यकच असतो...पण तो विषमतामुलक तत्वज्ञानांना तिलांजली देण्यासाठी...मग ही विषमता जातीय असो कि आर्थिक-सांस्कृतिक!
आमचे विद्वान समतेबद्दल नेहमीच हिरिरीने बोलत असतात. पण त्यांना नेमकी कोणती समता अपेक्षित असते? उच्च वर्णीय, निम्न वर्णीय हे शब्द सातत्याने वापरत असतांना समतेचे अधिष्ठाण कसे येईल याचा कसा विसर पडला? वर्ण शब्द वापरतांना आपण वैदिक विषमतेची वर्णव्यवस्था स्विकारतो आहोत, म्हणजे समतेच्या मुलतत्वालाच सुरूग लावतो आहोत याचे भान कसे सुटले?
मी अंबेजोगाई येथे एका भाषणात म्हणालो होतो, बहुजनांना ज्ञानात्मक, आर्थिक आणि सांस्कृतिक उत्थान करून घ्यायचे असेल तर सर्वप्रथम ब्राह्मणातील "ब्र" काढणेही बंद करावे. त्यांना शिव्या देवून तुमची पोटे भरणार नाहीत. ते जातीसंस्थेचे निर्माते नाहीत. पुरोहित या नात्याने त्यांनी शोषण केले असेल तर त्यांना पुरोहित म्हणून बोलवणे थांबवा...स्वत:च सारी कर्मकांडे करा...शिव्या देत बसून काय साधणार आहे? त्यापेक्षा आपले ज्ञान, अर्थ आणि आजच्या जगाशी सुसंगत अशी सुसंवादी संस्कृतीचे नवनिर्माण कसे करता येईल यासाठी उभे ठाका!
अर्थात विद्रोही म्हणवणा-या चळवळीने झटपट प्रसिद्धी मिळते, टाळ्यांचे गजर होतात म्हणून शिवीसत्राला बांध घालणे सोडले नाही. जातींत स्वत:च कोंबून टाकलेले महापुरुष आपल्या चळवळीचे प्रतीक निवडले, पण जातीपार असलेले महात्मा गांधी यांना स्विकारणे तर दुरच, पण त्यांनाही शिव्या घालत बसण्याचा मार्ग निवडला.
विद्रोही चळवळीने नवे सामाजिक ज्ञान व भान निर्माण केले नाही. सामाजिक ऐक्याची संकल्पना पुढे रेटण्याऐवजी विभक्तीकरणालाच ते कारणीभूत झाले. पुरोगामी म्हणवणारा महाराष्ट्र कधी प्रतिगामी झाला हे समजलेच नाही. जातीय विद्वेषाचे विष उतरलेच नाही...उलट वाढत गेले.
आज समाजव्यवस्था मोठ्या संक्रमणातून जात आहे. जागतिकीकरण आणि त्यामुळे निर्माण होत असलेली नवी मुल्ये, वाढत्या आशा-आकांक्षा, नव्य जीवनशैलीचे अनिवार आकर्षण आणि त्याच वेळीस उपलब्ध अत्यल्प साधनस्त्रोत या कचाट्यात सर्वच सापडले आहेत. व्यवस्थेचा फायदा अत्यल्प लोकांना होत आहे तर बहुसंख्य लोक वंचित होत चालले आहेत. आरक्षण हवेच यासाठी जसे नवनवे समाजघटक आक्रमकपणे पुढे येत आहेत तसेच यांना आरक्षण का असे जोमाने विचारणारेही पुढे येत आहेत. आरक्षणाची आवश्यकता भासणे म्हणजे अजुनही आम्ही आर्थिक दृष्ट्या मुर्दाड आहोत, आमची मानसिकता ज्ञानात्मक होत प्रगती साधण्याकडे नाही हेच सिद्ध करते. आणि जातीय संघर्षाला आरक्षण हेही एक महत्वाचे कारण आहे याचे भान पुरोगाम्यांना आले नाही. सर्वांत गोड रहायचे, सर्वप्रिय (किमान आपल्या जातगटात तरी) व्हायचे अशी खाज लागलेल्यांकडून परखड बोलीची अपेक्षा तरी कशी करायची?
साधनसंपत्तीचे नुसते फेरवाटप करून काही होत नसते. मुळात उपलब्ध साधनसंपत्तीचा विनियोग कसा करायचा याचीच अक्कल नसेल तर आहे तीही साधनसामग्री वाया जानार. उदा. भारतात आजही ३०% शेतमाल वाया जातो. शेतमालावर प्रक्रिया होण्याचे प्रमाण २% पेक्षाही कमी आहे. म्हणजे आपण त्यावर प्रक्रिया करणारे लघुउद्योग सर्वत्र सुरु करत शकलो नसू, वाया जाना-या साधनसंपत्तीचा विनियोग करु शकलो नसू तर आपण मागास म्हनवण्याच्याच योग्यतेचे नव्हेत काय?
आहे त्या आर्थिक, ज्ञानात्मक व सांस्कृतिकतेकडून जो पुढे जात राहतो, गुणात्मक प्रगती साधत असतो, त्याला पुरोगामी म्हणतात. प्रस्थापितांना शिवीगाळ करत बसलेल्यांना नाही याची नोंद घ्यायला हवी.

No comments:

Post a Comment

वंचितांचे अर्थशास्त्र आणि आपली मानसिकता

  वंचितांची व्याख्या बव्हंशी आर्थिक आधारावर केली जाते. सरकारला आपली धोरणे ठरवण्यासाठी ही व्याख्या पुरेशी ठरत असली तरी वंचिततेचे सामाजिक नि...