Friday, June 24, 2022

व्यापारी थांबा शाहीदुल्लाची कहानी!



दौलत बेग ओल्डी या लेह-यारकंद मार्गावरील पुरातन थांबा घेऊन व्यापारी काराकोरम खिंड ओलांडत असत. त्यानंतर त्यांना अजून गाठायची असे ती कून-लुन पर्वतराजीतील सांजू खिंड. सांजू खिंडीअगोदर अजून एक अत्यंत महत्वाचे थांब्याचे ठिकाण होते व ते म्हणजे शाहीदुल्ला (झाय्दुल्ला). येथे लदाख, काश्गर, खोतान आणि पामीर येथून येणारे व्यापारी मार्ग मिळत असत. लदाखला जोडणारा चांग-चेन्मो हा मार्गही येथूनच फुटे. त्यामुळे येथे कोणतेही गाव नसले तरी या जागेला एक व्यापारी व राजकीय महत्व आलेले होते. हे ठिकाण अक्साई चीनमध्ये उगम पावना-या काराकाश नदीच्या खो-यात असले तरी या ठिकाणाची उंची समुद्रसपाटीपासून १२ हजार फुट एवढी होती. हा भाग जवळपास निर्मनुष्य होता. उन्हाळ्यात बर्फ वितळले कि येथे तात्पुरते शेती करायला हुंझा (गिलगीट) भागातील कुन्जाईट आणि तुर्कस्तानातील किरगीझ लोक येत असत. त्या लोकांचे शे-दीडशे मोसमी तंबू सोडले तर एकोणीसाव्या शतकाच्या अखेरीपर्यंत या भागात पक्क्या घरांचे अस्तित्व नव्हते.
खोतान राज्यात येणा-या या भागाचा इतिहास पुरातन आहे. अनेक मार्ग एकत्र येण्याचे , तारीम खो-यातून जाणा-या रेशीम मार्गावरचे हे मुख्य स्थान असल्याने याचे राजकीय-लष्करी महत्व पुरातन आहे. तक्षशिला आणि चीनमधून आलेल्या लोकांनी खोतान हे नगर वसवले असे प्राचीन दंतकथा आणि कागदोपत्री पुरावे सांगतात. इसपूच्या पहिल्या शतकात काश्मीर आणि खोतानचे संयुक्त राज्य होते. पुढे काश्मीर कनिश्काच्या अखत्यारीत गेला तर खोतान हे चीनच्या कब्जात गेले. पंधराव्या शतकात मिर्झा अबू बकर दुघ्लत याने मोगल खानातीपासून फुटून स्वत:च्या दुघ्लक घराण्याची सत्ता आणून खोतान व काश्गर भाग आपल्या अखत्यारीत आणले. त्याला सन १५१० मध्ये सुलतान सैद खान याने पदच्युत केले. तो लद्दाखला पळून जात असतांना त्याचा पाठलाग करून त्याला वाटेतच अडवून शाहीदुल्लाजवळ ठार मारण्यात आले. आता त्याची कबर शाहीदुल्लापासून २० मैलांवर आहे.
मध्य आशिया आणि भारतीय बाजूची राज्ये यांचा पुरातन काळापासून निकटचा संबंध आहे. या मार्गांवरून व्यापार तर होत होताच पण राजकीय संपर्कही मोठ्या प्रमाणावर होता. सांस्कृतिक संपर्कही अपरिहार्यपने होत होता. काराकोरम आणि कून-लुन पर्वतराजीमधील विस्तीर्ण प्रदेश दुर्गम होता. यारकंद आणि काराकाश नदीचे खोरे सोडले तर कोठे लोकवस्ती नव्हतीच. कोणत्याही मोठ्या साम्राज्याच्या अंकित नसल्याने येथील स्थानिक सत्ता वारंवार बदलत असत. पण त्यांना व्यापारामुळे येणा-या सुबत्तेची जाणीव होती. यारकंद आणि खोतान सुबत्तेला पोचले ते केवळ या व्यापारामुळे. या भागात इस्लाम येण्याआधी भारतातून आलेला बौद्ध धर्म प्रभावशाली होता. त्यामुळे तुलनात्मक शांतीही होती जे व्यापारवृद्धीसाठी आवश्यक असते. तत्कालीन राजवटी व्यापा-यांना शक्यतो सर्व सुविधा आणि सुरक्षा देण्याचा प्रयत्न करत. त्यामुळे, लदाखला जाणारे अथवा येणारे व्यापारी त्यांचे मालवाहू घोडे अथवा खेचरे मेली तर त्यांच्यावर लादलेला माल आहे तेथेच सोडून देत व पर्यायी व्यवस्था झाल्यानंतर घेऊन जात. या मधल्या काळात आपला माल होता तेथे सुरक्षित राहील याची व्यापा-यांना खात्री असे.
एकोणीसाव्या शतकातील राजकीय घडामोडी फार महत्वाच्या आहेत. शीख साम्राज्याचा अंकित गुलाबसिंगच्या जोरावरसिंग या सेनापतीने १८३४ मध्ये लडाख जिंकून घेतला. तो तेथेच थांबला नाही तर थेट शाहीदुल्ला या स्थानापर्यंत आला. ती महत्वाचे व्यापारी जागा त्याने आपल्या ताब्यात घेउन त्याने तेथे एक किल्लाही बांधला आणि काही सैनिक तेथे रक्षणासाठी ठेवले कारण त्या काळात या भागात व्यापा-यांची लुटमार होण्याचे प्रमाण वाढलेले होते. चीनने या नव्या मालकीहक्काला विरोध केला नाही कारण ते तेंव्हा कून-लुन पर्वतराजीची उत्तर बाजू आपली सीमा मानत होते. आणि खोतानचा राजा काश्मीरचा मित्र असल्याने त्याच्याही आक्षेपाचा प्रश्न नव्हता. पण १८४६ नंतर पुन्हा राजकीय स्थिती पालटली. गुलाबसिंगने काश्मीर विकत घेऊन ब्रिटीशांचे स्वामित्व स्वीकारले. काराकोरम पर्वतराजी हीच काश्मीरची सीमा आहे असे ब्रिटीश मानु लागल्याने शाहीदुल्ला विवादाच्या भोव-यात सापडले. पण गुलाबसिंगच्या दृष्टीने व्यापारातून मिळणारे उत्पन्न महत्वाचे असल्याने त्याने शाहीदुल्लावरील ताबा सोडला नाही. उलट त्याला शाहीदुल्ला भागात चाललेली लुटमार आणि त्यामुळे पसरलेल्या घबराटीवर नियंत्रण आणणे महत्वाचे वाटले. १८६४ मध्ये जेंव्हा तुर्कस्तानच्या लोकांनी याकुब बेगच्या नेतुत्वाखाली त्या भागातील चीनी सत्ता उलथून लावली तेंव्हा लडाख भागातील डोग्रा प्रशासकाने येथे २५ सैनिकांची तुकडी रक्षणासाठी ठेवली होती.

याच दरम्यान १८६५ मध्ये ब्रिटीश सर्व्हेयर डब्ल्यू. एच. जॉन्सन याला लडाखच्या चीनी सीमेपर्यन्तच्या भूभागाचे सर्वेक्षण करण्यासाठी नेमले गेले. त्या वेलीस त्याला खोतानचा राजा हबिबुल्ला याचे निमंत्रण मिळाले. खोतान येथे काही आठवडे घालवल्यानंतर तो शाहीदुल्ला येथेही आला होता. त्याने लडाखाची सीमा शाहीदुल्लाच्या उत्तरेकडे असलेल्या कून-लुन पर्वतराजीतील सांजू खिंडीपर्यंत रेखाटली. यामुळे काराकाश नदीचे खोरेही लडाखमध्ये गृहीत धरले गेले. पण पुढे डग्लस फोरसिथ आणि हेन्री ट्रोटरने केलेल्या सर्वेक्षणात मात्र शाहीदुल्ला लडाखच्या क्षेत्रात गृहीत धरले गेले नाही. असे असले तरी चीनने या शाहीदुल्ला भागावर कसलाच दावा केला नाही. तरीही ब्रिटीशांनी हा भाग रशियन आक्रमणाला निमंत्रण देऊ शकतो हे लक्षात घेऊन हा भाग चीनने ताब्यात घ्यावा असे सुचवत राहिले.
१८६८ साली रॉबर्ट बर्कले याच्या नोंदीनुसार त्याला शाहीदुल्लाच्या किल्ल्यात कैद करून ठेवण्यात आले होते. यारकंदचे लोक शाहीदुल्ला भागात एकत्र आल्याने येथील काश्मीरचे सैन्य काढून घेण्यात आले असे त्याने नमूद केले होते. पुढे त्याचाच पुतण्या यंगहजबंड १८८९ मध्ये शाहीदुल्ला येथे भेट देण्यास आला असता त्याने लिहिले कि “आता या किल्ल्याचे अवशेषच काय ते पहायला मिळतात.” काश्मीरने येथील सैन्य काढून घेतले असले तरी त्यावरील मालकी मात्र सोडलेली नव्हती.
विसाव्या शतकाच्या सुरुवातीस विस्तारवादी बनलेल्या चीनने मात्र आपल्या झिन्झीयांग परगण्यात काराकाश खोरे आणि शाहीदुल्ला ठाणे सामील केले. खरे तर भारत-चीन सीमावादाला तेथेच प्रारंभ झाला असला तरी ब्रिटीश शाहीदुल्लाबाबत मुळात उत्सुक नसल्याने त्याला संघर्षाचे रूप आले नाही. प्राचीन व्यापारी मार्गांचे पुनरुज्जीवन करणे हा चीनचा सुरुवातीपासून प्रधान हेतू असल्याने त्यांनी तारीं खो-यातील येन्चेंग शहर ते ल्हासा येथवर जाणा-या रस्त्याचे काम सुरु केले. हा रस्ता अर्थातच शाहीदुल्ला येथून जातो. हाच रस्ता भारताच्या अधिकृत भूभाग असलेल्या अक्साई चीनमधून तयार करायला सुरुवात झाल्यानंतर भारत-चीन संघर्षाची ठिणगी पडली. हा रस्ता आता पूर्ण झाला आहे तर शाहीदुल्ला हे एक महत्वाचे शहर बनले आहे.
कसलीही लोकवस्तीच नसलेल्या या दुर्गमातीदुर्गम भागातून प्राचीन काळापासून भारत ते मध्य आशिया व्यापार तर होत होताच पण सांस्कृतीक दळण-वळणही होत होते. या भागावर काश्मीर व त्याआधी लडाखच्या नामग्याल राजांची सत्ता होती. शाहीदुल्ला ही आपली सीमा मानून येथे किल्ला बांधला तो काश्मीरच्या राजाने. चीनचे खरे तर मध्य आशियावर कोणतेही वर्चस्व नव्हते. पण एकोणिसावे आणि विसावे शतक मात्र मध्य आशियासाठी विपदाकारक ठरले. चीनने या भागातील स्थानिक सत्ता चिरडून टाकल्या आणि आपल्या झिन्झीयांग परगण्यात विलीन केल्या. तिबेटचेही तसेच झाले. आता डोळा आहे तो उर्वरीत लडाखवर.
-संजय सोनवणी

No comments:

Post a Comment

वंचितांचे अर्थशास्त्र आणि आपली मानसिकता

  वंचितांची व्याख्या बव्हंशी आर्थिक आधारावर केली जाते. सरकारला आपली धोरणे ठरवण्यासाठी ही व्याख्या पुरेशी ठरत असली तरी वंचिततेचे सामाजिक नि...