Saturday, July 16, 2022

प्राचीन भारतीयांचा विश्वाबद्दलचा दृष्टीकोन

  



 

नुकताच जेम्स या महाकाय दुर्बिणीने काढलेला तेरा अब्ज वर्ष जुन्या आपल्या ब्रह्मांडाचे छायाचित्र प्रकाशित केले आहे. म्हणजे विश्व तेंव्हा ब-यापैकी बाल्यावस्थेत होते. खरे म्हणजे आपण अवकाशाकडे पाहत असतो तेंव्हा आपल्या गतकाळाकडेच पाहत असतो कारण प्रकाशवेगाची मर्यादा. जेवढी वर्षे प्रकाश आपल्यापर्यंत पोचायला लागतील तेवढीच वर्षे मागे जाऊन आपण ते तारे-आकाशगंगा-दीर्घिकांचे वर्तमान पाहत असतो. त्यांचे आजचे या क्षणीचे नेमके स्थान काय आहे हे आपल्याला कधीही कळू शकत नाही.  थोडक्यात आपण आजही विश्वाच्या आजच्या स्वरूपाबाबत अज्ञानी आहोत.

पण मनुष्य हा अनिवार जिज्ञासू आहे. प्राचीन काळापासून माणसाने आपण राहतो ती पृथ्वी, तिचा भूगोल आणि नुसत्या डोळ्यांनी दिसणा-या विश्वातील भ्रमणशील खस्थ तारांगणाचे निरीक्षण करत एकूण विश्वाबद्दल आपल्या कल्पना करण्याचा व त्यानुसार गणिते मांडण्याचा प्रयत्न केला आहे. हे प्राचीन प्रयत्नही अद्भुत, रोमांचक आणि प्राचीएन मानवाच्या बुद्धीवैभवाची कल्पना देतात. भारतात या संदर्भात लिहिला गेलेला सर्वात प्राचीन व आद्य ग्रंथ आज उपलब्ध आहे तो म्हणजे “जंबुदीवपन्नती”. हा जैन आगमांमधील महत्वाचा ग्रंथ अर्धमागधी प्राकृत भाषेत इसवी सनपूर्व चवथे ते तिसरे शतक या काळात लिहिला गेला. गणधर गोयमाने भगवान महावीर यांना विचारलेले प्रश्न व त्यांची उत्तरे असे या ग्रंथाचे स्वरूप आहे. हा ग्रंथ लिहिला जाण्यापूर्वी तो श्रवण परंपरेत चालत आलेला असल्याने त्याची पाळेमुळे अजून काही शतके मागे जातात. जैन साहित्याच्या सर्वात प्राचीन ग्रंथांतील सहाव्या उपान्गाचे स्थान या ग्रंथाला दिले गेले आहे. यात पृथ्वी, जम्बूद्वीप वर्णन, प्रथम चक्रवर्ती भरताने पादाक्रांत केलेली भूमी व तेथील लोक, काळ, नक्षत्रे, चंद्र, कुलकर इत्यादी संकल्पना, विस्ताराने आणि महत्वाचे म्हणजे बरीचशी गणिती भाषेत मांडलेली आहेत.

या ग्रंथात पृथ्वी ही सात द्वीपांत विभागली गेली असून खा-या पाण्याने वेढलेले जंबूद्वीप हे मुख्य मानले गेले आहे. त्या काळात जेवढा भूगोल माहित होता त्यांचे सविस्तर वर्णन काहीशा अद्भुतरम्य स्वरूपात या ग्रंथात केले गेले आहे. प्राचीन काळी पृथ्वी सपाट आहे या संकल्पनेवर विश्वास असला तरी या ग्रंथात सर्वप्रथम पृथ्वी सात द्वीपांनी वेढली गेलेली आहे ही संकल्पना प्रथमच व्यक्त करण्यात आली.

जम्बुद्वीपावरील पर्वतरांगांमुळे हे द्वीप अनेक प्रदेशात वाटले गेले होते. त्या प्रदेशांना हिमवत, भरत, ऐरावत क्षेत्रादी नावे दिली गेली. भरत क्षेत्र आणि ऐरावत क्षेत्र वैताध्य पर्वतामुळे वेगळे होतात असे येथे म्हटले गेले आहे. हा पर्वत म्हणजेच आज आपण ज्याला विंध्य पर्वत म्हणतो तोच. याच पर्वतरांगेमुळे उत्तर आणि दक्षिण भारताला विभाजित केलेले आहे. प्राचीन काळी भारतातील व आशिया खंडातील नद्या व पर्वतांची नावे अपवाद वगळता वेगळी असल्याचेही आपल्याला या ग्रंथावरून दिसते. अगदी भारताला ज्याच्या मुळे हे नाव मिळाले तो चक्रवर्ती भरत ‘विनिय’ या नगरीत जन्माला आला. याच विनिय नगरीचे नाव पुढे साकेत आणि नंतर अयोध्या असे झाले असे आपल्याला स्थान इतिहासात दिसून येते. त्यामुळे या ग्रंथात निर्दिष्ट केलेली पर्वताची व नद्यांची नावे पुरेपूर काल्पनिक आहेत असे समजणे अवैद्न्यानिक होईल. कालौघात झालेले नामपरिवर्तन याचे कारण आहे हे समजावून घ्यावे लागेल.

या ग्रंथाच्या सातव्या प्रकरणात खगोलाची व काळ संकल्पनेची गणिती सूत्रमय वर्णने आहेत. बारा महिन्याच्या वर्षाचे पाच प्रकार दिले असून एक वर्ष ३६६ दिवसांचे असते असे नमूद केलेले आहे. नाक्षत्रिक, चांद्र, युग, लक्षण इत्यादी प्रकार दिलेली आहेत व त्यांचे दिनमानही दिलेले आहे. कालमापनाचीही वैशिष्ट्यपूर्ण पद्धती दिलेली आहे जी नंतर प्रस्थापित झालेल्या वैदिक प्रथेपेक्षा अधिक सुसंगत आहे. पृथ्वी गोलाकार पण सपाट आहे असे मुलभूत गृहीतक मान्य असल्याने दोन चंद्र, दोन सूर्य अशी कल्पना करून उदय-अस्त समस्येची सोडवणूक केली गेलेली आहे. सूर्य, चंद्र आणि २७ नक्षत्रांची पृथ्वीपासूनची योजन या तत्कालीन अंतरमापनाच्या पद्धतीनुसार अंतरे तर या ग्रंथात आहेतच पण त्यांच्या गतीचीही मोजमापे यात दिलेली आहेत. अर्थात ही मापे आजच्या प्रगत विज्ञानाच्या कसोटीवर टिकणारी नाहीत, पण तरीही केवळ नजरेने व्यापक निरीक्षणे करून आकाशातील तारे-नक्षत्रे यांची अंतरे व त्यांची परिभ्रमण गती मोजण्याचा प्रयत्न करणे व त्यांना गणिती सिद्धांतात बांधणे ही खचितच कौतुकाची गोष्ट आहे.

विशेष म्हणजे शून्याचा शोध आर्यभटाने पाचव्या शतकात लावला असे मानण्याची प्रथा आहे. पण ते खरे नाही हे हा ग्रंथ वाचला तरी सहज समजून येईल. याच ग्रंथावर आधारीत दुस-या शतकातील बक्शाली हस्तलिखितातही शून्य संकल्पनेचा ठळक उल्लेख आहे. दुसरी बाब मेरू पर्वताची. हा जंबूद्वीपाचा मधोमध आहे अशी कल्पना केली गेलेली आहे. हा पर्वत प्रत्यक्षात अस्तित्वात नाही. आकाशातील तारे-नक्षत्रे दिर्घकाळ निरीक्षण केले तर आकाशात गोलाकार फिरताना दिसतात. आज तशी असंख्य छायाचित्रेतेही उपलब्ध आहेत. त्या फिरण्याच्या वर्तुळाचा मध्यबिंदू म्हणजे मेरू हा काल्पनिक पर्वत मानला गेला असावा हे हा ग्रंथ वाचून लक्षात येते. पुराणांत मेरूभोवती अनेक अद्भुतरम्य कथा गुंफल्या गेल्या.

एवढेच नाहे तर आजवर आपण जपलेल्या अनेक सांस्कृतिक समस्यांची उकल व्हायलाही या ग्रंथाची मोलाची मदत होते. भूगोल-खगोल विद्न्यानावरील सर्वात प्राचीन ग्रंथ एवढेच याचे स्थान नाही तर कोणताही धार्मिक उपदेश नसलेला, केवळ अपार जिद्न्यासेपायी प्रश्नोत्तर स्वरूपात लिहिला गेलेला हा ग्रंथ आहे हे त्याचे मोठे वैशिष्ट्य आहे. तत्कालीन निरीक्षणाच्या साधन- मर्यादा, साधनांचा अभाव या मर्यादा असूनही जैन साधूंनी नुसत्या उघड्या डोळ्यांनी निरीक्षणे करून आणि सतत  भ्रमंती करून भूगोल आणि खागोलाचे द्वारे उघडी करून दिली. जम्बूद्वीप संकल्पना वेदांमध्ये नाही. एवढेच काय ऋग्वेदाचा भूगोलही अफगाणिस्तान आणि सिंधू नदीचा परिसर येथपर्यंतच मर्यादित आहे. पुढे इसविसनपूर्व पहिल्या शतकात लगध नामक व्यक्तीने लिहिलेले ‘ज्यौतिष”  हे एक ४४ श्लोकांचे प्रकरण तेवढे वेदांग ज्योतिषात सामाविष्ट आहे व त्यावर जम्बुद्दीवपन्नतीचा प्रभाव आहे. वैदिक मंडळीचा प्रधान उद्देश्य म्हणजे यज्ञासाठी वेळ ठरवणे आणि तेवढ्यापुरताच विचार त्यांनी केलेला दिसतो.

प्राचीन भारतीय आपण राहतो ते पृथ्वी आणि आकाशस्थ वस्तू याबाबत काय विचार करत होते हे समजण्यासाठी हा ग्रंथ मोलाचा आहे. आजही विश्वाचे गूढ उलगडले आहे असे नाही. काळ अनंत आहे आणि विश्व कोणीही निर्माण केलेले नाही व त्याचा अंतही नाही हे जंबूद्दीवपन्नती ग्रंथ सांगतो आणि आधुनिक स्थिर विश्व सिद्धांतास हे मत अनुसरून आहे. आजही मोठा वैद्न्यानिक वर्ग (त्यात डॉ. फ्रेड हॉयल व डॉ. जयंत नारळीकरही आले) हा सिद्धांत मान्य करतो. भविष्यात महाविस्फोट सिद्धांताप्रमानेच अनेक अभिनव सिद्धांत जन्माला येतील व विश्वाचे गूढ उलगडायचे प्रयत्न सुरूच राहतील. सोळा अब्ज वर्ष हे आज साधारणपणे मान्य असलेले विश्वाचे वयोमान कदाचित अजून मागे जाईल. या शोधाचा प्रारंभ प्राचीन काळी भारतात या ग्रंथाच्या निमित्ताने कसा सुरु झाला होता याचा अंदाज आपल्याला येतो.

 

-संजय सोनवणी

No comments:

Post a Comment

पांडुरंग बलकवडॆ एवढ्या खालच्या थराला गेले कसे?

  पांडुरंग बलकवडॆ एवढ्या खालच्या थराला गेले कसे? Sanjay Sonawani    ·  Pune    ·  Shared with Public 10 janewari 2013 पांडुरंग बलकवडे यांच्य...