Friday, July 8, 2022

तणावाचे कारण बनलेला चांग-चेन्मो मार्ग!


हिमालयीन पर्वतराजीने उत्तर आशियातून येणा-या बर्फाळ वा-याला अडवले असले तरी त्यातील दुर्गम असलेल्या खिंडीनी साहसी मानवाला व्यापार व धर्मप्रसारासाठी मात्र मार्ग दिले. गेले हजारो वर्ष या मार्गांचा वापर होत राहिला. त्यात मानवाची शोधक वृत्ती कायम असल्याने तुलनेने सोपे मार्ग कसे शोधता येईल याकडेही त्याने लक्ष दिले. या प्रयत्नांत चांग-चेन्मो आणि चांगथांग हे असे तुलनेने सोपे व जवळचे मार्ग त्याने शोधले असले तरी त्यांचा वापर त्याला मोठ्या प्रमाणावर मात्र करता आला नाही याचे कारण म्हणजे अक्साई चीनचे रुक्ष आणि पांढ-या रसायनी मातीने भरलेले अवाढव्य पठार! अक्साई चीनचा अर्थच होतो तो “पांढरे वाळवंट” असं. येथे सोरा (दारुगोळ्यात वापरला जाणारा स्फोटक पदार्थ) आणि सोडा याचे एकदीड फुट उंचीचे थरच ठार पसरलेले आहेत. त्यामुळे येथे गवताचे पातेही उगवत नाही. येथील तळ्यांमधील पाणीही दुषित असल्याने ते पिण्यायोग्य नाही. एके काळी या परिसरात तीन विशाल तळी होती ती कालौघात आटल्याने या परिसराचे अशी दुर्दशा झाली. आजही त्या प्राचीन तळ्यांच्या खाणाखुणा त्या भागात पाहता येतात.

या मार्गाचा फायदा एकाच होता व तो म्हणजे सासेर आणि खार्दुंग ला सारख्या अति-दुर्गम खिंडी या मार्गावरून ओलांडाव्या लागत नसत. चांग-चेन्मो नदीचे खोरे ओलांडले कि अक्साई चीनचा हा असा रुक्ष परिसर सुरु होई. केवळ मोठे व्यापारी तांडेच या मार्गावरून जाऊ शकत कारण पाणी आणि गवताची सोय सोबतच करावी लागे. लहान  तांड्यांना ते शक्य नसे. असे असले तरी हा मार्ग लष्करी हालचालीसाठी पुरातन काळापासून प्रसिद्ध होता. मध्य आशियातून जाणा-या रेशीम मार्गावर स्वामित्व मिळवण्यासाठी तिबेटने आपले लष्कर याच मार्गाने तारीम खो-यात घुसवले होते. दीर्घ काळ तिबेटचे त्या व्यापारी मार्गावर स्वामित्व होते. त्यासाठी चीन व तिबेटमध्ये अनेक युद्धेही झाली होती. मध्य आशियातील झुंगर खानातीने सन १७१७ मध्ये तिबेटवर हल्ला केला तोही याच मार्गाने. आता हा मार्ग चीनच्या कब्जात आहे आणि त्याचा ताबा मिळवण्यासाठी भारत प्रयत्न करत आहे.

चांग-चेन्मो मार्गावरच अजून एक मार्ग फुटे त्याला चांग-थांग मार्ग असे नाव होते. हा मार्ग सरळ खोतानला जाऊन भिडे, काराकाश नदीच्या काठच्या शाहीदुल्ला या मुख्य थांब्याकडे जायची गरज भासत नसे. या मार्गाला रुदोख मार्ग असेही म्हटले जायचे कारण त्या नावच्या वस्तीपासून हा मार्ग चांग-चेन्मो मार्गापासून वेगळा होत असे. या मार्गावरच लेहपासून अडीचशे किलोमित्तर अंतरावर आता भारताच्या हद्दीत असलेले त्सो मोरीरी नावाचे जगातील अति-उंचावरचे, समुद्र सपाटीपासून १५००० फुट उंचीवरचे एक विशाल तळे आहे. हौशी पर्यटक येथे येत असतात. येथून जाणारा मार्ग काराकोरम पर्वतराजी टाळून कून-लुन पर्वतराजीतील तुलनेने सोप्या असलेल्या घाटातून जातो. त्यामुळे हाही एक पर्यायी आणि सुयोग्य असा मार्ग ब्रिटीशांना वाटला होता.

अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात इंग्रजांनी या भागाची अनेक सर्वेक्षणे केली. काराकोरम पर्वतराजीतून जाणा-या मार्गापेक्षा सोपा आणि गाड्यांतून वाहतूक करता येईल अशा मार्गाच्या शोधात ते होते. त्यांना हा मार्ग पसंत पडला. काश्मीरचे महाराजा रणबीरसिंगांनी ब्रिटीशांच्या विनंतीवरून चांग-चेन्मो खो-यातेल व्यापारी थांबे विश्रांतीस योग्य करण्यासाठी पुढाकारही घेतला. पण पुढील मार्गावर काही सोयी निर्माण करणेच अशक्य झाल्याने या मार्गाचा विचारच थांबला. पण ब्रिटीश सर्वेक्षक हेवार्ड या मार्गाबाबत खूप आशावादी होता. त्याचे म्हणणे होते कि या भागातून पक्के रस्ते बांधले तर गाड्यांतून मालवाहतूक सोपी होईल आणि एकदा का काराकाश नदीच्या खो-यात गेले कि गवताची आणि पाण्याची चणचण भासणार नाही, कारण त्या नदीच्या खो-यात गवत विपुल आहे. फक्त अक्साई चीनच्या प्रदेशात ठिकठिकाणी गवत आणि पाणी उपलब्ध करून ती व्यवस्था करावी लागेल. पण हा अहवाल येउनही काही कारणांनी ब्रिटीश सरकारने अथवा काश्मीरच्या महाराजांनी तिकडे लक्ष पुरवले नाही.

हेवार्डच्या सर्वेक्षणाआधी जॉन्सन याने १८६५ मध्ये याच मार्गाने जात आपले सर्वेक्षण केले होते. तेथील कडाक्याच्या थंडीची त्याने विलक्षण वर्णने केली आहेत. तो म्हणतो कि नकाशा तयार करताना शाई गोठल्यामुळे वापरता येत नाही एवढी भीषण थंडी येथे पडते. तो लिहितो कि या भागात प्राचीन विशाल तळ्यांचे अवशेष म्हणता येतील अशी अनेक छोटी तळी आहेत पण त्यातील पाणी रसायनांनी प्रदूषित झाल्याने काळेकुट्ट असून पिता येत नाही. हिमालयीन पर्वतराजी मुळात समुद्रच वर उचलला गेल्याने निर्माण झाली असल्याने असंख्य समुद्री अवशेष आजही सर्वत्र दिसतात.

याच जॉन्सनने प्रसिद्ध “जॉन्सन रेषा” खेचून भारताची हद्द कून-लुन पर्वतापर्यंत घेतली होती कारण तेथवर काश्मीरचे आधिपत्य प्रस्थापित झाले होते. काश्मीरचा सेनापती जोरावरसिंग याने या भागावर पुन्हा आधिपत्य प्रस्थापित केलेले होते. या रेषेमुळे गलवान खोयात उगम पावना-या काराकाश नदीचे खोरेही भारताच्या हद्दीत आले होते. कुन-लुन पर्वतातील संजू खिंड ते चांग-चेन्मो खोरे भारताच्या हद्दीत दाखवले गेले. तेंव्हा चीनने त्याला आक्षेप घेतला नाही. एवढेच काय १८९३ मध्ये पिटसबर्ग येथील वरिष्ठ चीनी अधिकारी हंग ता चेन याने एक नकाशा बनवला होता तो जॉन्सनने बनवलेल्या नकाशाशी खूप साधर्म्य दाखवत होता. अक्साई चीनचा प्रदेशही अर्थातच भारतीय हद्दीत होता. १९२५ पर्यंत चीनी नकाशांतही अक्साई चीन भारताच्या हद्दीत दाखवला जायचा. हद्दीचा वाद निर्माण झाला तो नंतर आणि तोही व्यापारी मार्गांचा नव्याने जीर्णोदधार करायचे चीनने ठरवले तेंव्हा!

ब्रिटीशांनी या दोन्ही मार्गांचा विकास करण्याचे जवळपास शतकभर आधी ठरवले होते, पण काश्मीरच्या महाराजांनी त्याकडे द्यावे तसे लक्ष दिले नाही. ते काराकोरम खिंडीतून जाणा-या मार्गावरच अधिक लक्ष देत राहिले कारण व्यापारीही तोच मार्ग पसंत करत. पण चांग-चेन्मो आणि चांग-थांग मार्गावर पुरेशा सुविधा उपलब्ध केल्या गेल्या असत्या तर ते मार्ग अधिक वापरले गेले असते आणि चीनला गुप्त हालचाली करून या भागात शिरकाव करता आला नसता. अर्थात इतिहासात जर-तरला फारसा अर्थ नसतो. त्यामुळे जे घडले तेवढे पाहणे एवढेच काय ते महत्वाचे.

चीनने अक्साई चीन तर व्यापलाच पण हॉट स्प्रिंग्ज, गलवान खोरे, पेंगोंग सरोवरावरही अधिकार सांगत घुसखोरी केली आहे. हे सारे भाग प्राचीन व्यापारी मार्गांचे भाग आहेत हे लक्षात घेतले पाहिजे. भारत-चीन तणावाचे हे प्रदेश कारण ठरलेले आहेत हा केवळ योगायोग नाही. भारताने हे प्रदेश वादग्रस्त घोषित केले असून आपला मालकी हक्क अधिकृत रीत्या सोडलेला नाही. याच भागातून लेहपासून ते ल्हासाला (तिबेट) जाणारा व्यापारी मार्ग जात होता. या मार्गानेही अनेक लष्करी हालचाली पाहिलेल्या आहेत. पण आता तोही मार्ग चीनने बंद केला आहे. एकंदरीत भारताचा मध्य आशियाशी होणारा थेट संपर्क बंद झाला आहे. मध्य-आशियाशी व्यापार थांबल्याने देशाकडे मध्य आशियातून वाहता समृद्धीचा ओघही थांबला आहे. सांस्कृतिक दळण-वळणही थांबले आहे. असे असले तरी या व्यापारी मार्गांनी एके काळी मध्य आशियावर जो सांस्कृतिक प्रभाव टाकला होता तोही अमिट असा आहे. त्याचा वेध पुढील लेखात घेऊयात!

-संजय सोनवणी

No comments:

Post a Comment

भारतावरील पर्शियन साम्राज्याचा अस्त!

  पर्शियन सम्राट सायरसने द ग्रेटने इसपू पाचशे पस्तीसमध्येच गांधार व सिंधू नदीचा पश्चिम भाग आपल्या सत्तेखाली आणला होता, परंतू इसपू पाचशेतीसच्...