Thursday, July 21, 2022

निया येथील प्राकृत भाषेतील पाट्या


मध्य आशियात भारतीय संस्कृती जायची सुरुवात प्राचीन काळीच सुरु झाली असली तरी तिला वेग आला तो इसवी सन पूर्व तिस-या शतकानंतर. तेथील भाषांवरही त्यामुळे स्वाभाविकपणेच प्रभावही पडला. गांधारी प्राकृत भाषेचा प्रभाव तर एवढा होता कि इसवी सनाचे पहिले शतक ते तिसरे शतक या काळात हीच भाषा राजभाषाही बनली. बौद्ध धर्म या विस्तृत भागाचा राजधर्मही बनला. अर्थात कालौघात हा इतिहास विस्मरणात गेला होता. तो उजेडात आणण्याचे महान कार्य केले ते सर ऑरेल स्टीन या मुळच्या हंगेरियन पुरातत्ववेत्त्याने. खरे तर त्याला अलेक्झांडरच्या इराण आणि भारतावरील मोहिमांचा अभ्यास करायचा होता. त्यासाठी त्याने ब्रिटीशांची नोकरी पत्करली आणि भारतात आला. सुरुवातीला गांधार प्रांतातील शिल्पकलांचा अभ्यास केल्यानंतर त्याने अंदाज बांधला कि ही शैली बौद्ध धर्माच्या प्रचारामुळे मध्य आशियातील रेशीम मार्गांपर्यंतही पोचली असणार. त्यात त्याच्या वाचनात सहाव्या शतकातील चीनी प्रवासी ह्यु-एन-त्संग याचे प्रवासवर्णन वाचण्यात आले. त्यात मध्य आशियातील तारीम खो-याच्या उत्तर व दक्षिण बाजूने जाणा-या व्यापारी मार्गाची व त्या मार्गावरील जलस्थळांच्या काठावरील व्यापाराने समृद्ध नगरांची वर्णने होती. झिन्झीयांग प्रांतातील खोतान नगराचा प्राचीन इतिहासही दिला होता व तेथील तत्कालीन राजकीय घडामोडीही त्याने वर्णीत केलेल्या होत्या. खोतान हे बहुमुल्य रत्न जेड व सुवर्णभूकटीच्या खाणीसाठीही प्रसिद्ध होते असेही त्याने नमूद कलेले होते.

ह्यु-एन-त्संगने दिलेल्या माहितीनुसार तक्षशिलेहून स्थलांतरित झालेल्या भारतियांनी खोतानमध्ये प्रथम वास्तव्य केले व आपली सत्ता स्थापन केली. ब-याच काळाने भारतीय वंशाच्या खोतानच्या राजाचे चीनशी त्या भागात वर्चस्व कोणाचे यावरून युद्ध झाले.  सन २६९ मध्ये चीनच्या वू-दी या राजाशी झालेल्या युद्धात त्याचा पराजय झाला व नंतर या भागात भारतीय व चीनी वंशाचे लोक वेगवेगळ्या वस्त्यांमध्ये राहू लागले. खोतानवर प्रभुत्व स्थापन करणारा हा भारतीय राजा कोण या प्रश्नाने स्टीनला भेडसावून सोडले. शिवाय हा व्यापारी मार्ग प्राचीन काळापासून जसाच्या तसा राहिल्याने आपल्याला तेथे प्राचीन वस्तूंचाही शोध घेता येईल असे त्याला वाटले. अनावर जिज्ञासेने त्याला स्वस्थ बसू दिले नाही. याच अपार जिज्ञासेतून त्याने एकोणीसाव्या शतकाच्या आरंभापासून तीन मोहिमा काढल्या व एक अज्ञात इतिहास उजेडात आणला.

पाहिल्यांदाच्या मोहिमेची सुरुवात त्याने केली ती २९ मे १९०० रोजी श्रीनगरहून. गिलगीट-हुंझा मार्गाने, हुंझा नदीच्या वेगवान प्रवाहाच्या काठच्या पर्वतसुळक्यांतून जाणा-या झुलत्या अरुंद लाकडी फळ्यांवरून चालत जात जीव धोक्यात घालत तो शेवटी पोचला आधी काश्गर येथे. तेथून तो यारकंद आणि मग खोतान (आजचे होतान) येथे पोचला. खोतान जलस्थळाजवळील उत्खननांमध्ये त्याला अनेक प्राचीन वस्तू मिळाल्या. केरीया या मृतप्राय नदीच्या काठी उत्खनन करत असताना त्याला बातमी मिळाली कि केरीया नदीच्या पूर्वेला असलेल्या निया नदीच्या काठाने एका मजारच्या पुढे वाळूत अर्धवट गाडले गेलेले एक गाव आहे. ही बातमी मिळताच स्टीन यांनी तिकडे मोहरा वळवला. नियाला पोचल्यावर स्टीन यांना आपण ह्यु एन त्संगने वर्णन केलेल्या ऐतिहासिक मार्गावर आणि त्याने नोंदलेल्या दलदलीच्या भागातील निजांग गावी पोचल्याचा अपार आनंद झाला. या गावानंतर पुढे फक्त अफाट पसरलेले वाळवंट होते. गावात वाळूत अर्धवट गाडली गेलेली दोन उध्वस्त घरे आणि तसाच उध्वस्त एक स्तूप याखेरीज काही नव्हते. स्टीन यांनी तेथेच मुक्काम ठोकला आणि निरीक्षणे सुरु केली. येथे आपल्याला अपार महत्वाचा ठेवा सापडणार आहे याची त्यांनी तेंव्हा कल्पनाही केलेली नव्हती.

स्टीन यांना तेथे आधी काही मजकूर लिहिलेल्या तीन पाट्या सापडल्या. त्यांनी ते वाळूत गाडले गेलेले गाव उजेडात आणण्यासाठी कडाक्याच्या थंडीत उत्खनन सुरु केले. त्यांना इसवी सनाचे दुसरे ते चवथे शतक या काळातील दोनशेहून अधिक लाकडी पाट्या सापडत गेल्या. त्यांनी त्या वाचायचा प्रयत्न केल्यावर त्यांच्या लक्षात आले कि या खरोष्टी  लिपीत लिहिलेला व प्राकृत भाषांपैकीच एक असलेल्या एखाद्या भाषेत लिहिलेला लाकडी पाट्यांवरील मजकूर म्हणजे खोतानचा राजदरबार आणि येथील स्थानिक प्रमुख यांच्यातील राजकीय पत्रव्यवहार आहे. प्रत्येक पत्राची सुरुवात “महानुवा महाराया लिहती...” अशी आहे. आजच्याही मराठीशी साधर्म्य सांगेल असे अनेक शब्द या पाट्यांवर आहेत. तत्कालीन व्यक्तीनावे भारतीय वळणाची  कशी होती हे समजायला अंगस, सुवयलीन फुमसेन, पितेय, सामघिल, समजक, सोमजक, वगैरे नावे पुरेशी आहेत. याचा अर्थ या भागात भारतीय लोकांचे आधिपत्य तर होतेच पण राजभाषाही प्राकृत होती आणि वापरातील लिपीही खरोष्टी  होती. बौद्ध धर्माच्या प्रचारामुळे या भागात भारतीय भाषा पसरल्या हे मत त्यांनी फेटाळून लावले व तक्षशीला येथील नागरिकच बौद्ध धर्माचा प्रसार होण्याआधी काही कारणास्तव खोतान येथे स्थलांतरित झाले आणि त्यांनी तेथे आपली सत्ता स्थापन केली हे ह्यु एन त्संगचे मत ग्राह्य धरले.

अनेक विद्वानांनी असे मानले आहे कि कुशाणांनीच या भागावर वर्चस्व मिळवले असावे कारण ते मुळचे मध्य आशियातील रहिवासी होते. त्याच काळात तिकडे भारतीय भाषा व लिपीचा प्रसार झाला असावा. पुढे कुशाण साम्राज्याचा अस्त झाल्यानंतर तेथे नेमलेले प्रशासक स्वतंत्र झाले असावेत. हेही मत तर्कावर पटणारे नाही. याउलट स्टीन यांनी पुढे आपल्या पुस्तकात दुसर्‍या एका शक्यतेचाही विचार केला आहे. त्याप्रमाणे खोतानचे रहिवासी व कश्मिरी लोक यांच्यात खूपच साम्य दिसून येते. त्यामुळे कश्मिरी स्थलांतरितांनीच खोतान राज्याची स्थापना केलेली असावी अशीही शक्यता आहे. कल्हणाच्या राजतरंगिणीनुसारही किरगीझ लोक नंतर का होईना काश्मीरच्या रहिवाशांत जसे मिसळून गेले तसेच अनेक काश्मीरीही मध्य आशियात गेले व स्थायिक झाले असावेत. खोतान आणि काश्मीरचे सख्य पुरातन काळापासून राहिलेले आहे हे पाहता खोतानवर बौद्ध धर्मीय काश्मिरी लोकांनी सत्ता स्थापन केली असावी हे मत ग्राह्य धरायला काहीच हरकत नसावी. मुख्य व्यापारी मार्गावरचे स्थान असल्याने या सत्ता निर्माण करायला कारणीभूत झाल्या. पण चीनचा सम्राट वू-डीने भारतीय राजवटीचा अस्त घडवून आणला नाही असा तर्क करता येतो कारण निया येथे सापडलेल्या पाट्या त्या नंतरच्याही काळातील आहेत. व्यापारात काश्मीरचे स्थान अबाधित राहिले कारण तेथून निर्यात केल्या जाणा-या बहुमुल्य काश्मीरी वस्तू. एकोणीसाव्या शतकापर्यंत काश्मीरची राजकीय सीमा ही खोतानपर्यंत भिडत होती हे आपण मागील लेखांत पाहिलेच आहे.

खोतान, काश्गर, यारकंद इत्यादी व्यापारी मार्गावरील मुख्य स्थाने भारताशी जोडली गेलेली होती. यारकंदी लोकर विणना-यांना कुशलतेने वस्त्रे कशी विणावित याचे प्रशिक्षण काश्मिरी व लेह-लद्दाखच्या कारागीरांनी दिले असे इतिहासात नोंदवलेले आहे. याच प्रकारे इतरही बहुमुल्य वस्तू बनवण्याच्या कलांची देवानघेवाण झालेली असणार आहे. सर ऑरेल स्टीन यांनी काश्मीरच्या इतिहासावरही प्रचंड संशोधन केले. तसे संशोधक आम्हा भारतीयांनाही तयार करावे लागणार आहेत तर अधिकची माहिती उजेडात येऊन प्राचीन काळ जिवंत व्हायला मदत होऊ शकते. निया येथील पाट्यांनी इतिहासातील एका अज्ञात कालखंडावर प्रकाश टाकला हे स्टीन यांचे कर्तुत्व अविस्मरणीय तर आहेच पण त्यांचे अनावर कुतूहल आणि ते शमवण्यासाठी उपसलेले अपार कष्टही प्रेरक आहेत.

-संजय सोनवणी




 

No comments:

Post a Comment

सिंधू संस्कृतीची मालकी!

  सिंधू संस्कृतीची लिपी वाचता आलेली नसल्याने कोणीही उठतो आणि सिंधू संस्कृतीवर मालकी सांगतो. द्रविडांनी हे काम आधी सुरु केले पण त्याला आर्य आ...