Friday, July 22, 2022

आम्ही इतिहास-साक्षर कधी होणार?




इतिहासाचे दृश्य आणि अदृश्य रूप आणि त्यातून निर्माण होणारे विचित्र ताण हा सर्वच जागतिक समाजासमोरील एक गहन प्रश्न आहे. त्याची व्याप्ती प्रत्येक नागरिकाच्या मानसिकतेशी जावून भिडते आणि हीच मानसिकता वर्तमान आणि भविष्यातील समाजजीवन आणि स्वाभाविकपणेच त्या त्या राष्ट्राचे भविष्य सुनिश्चित करत असल्याने तर इतिहास हा तसा निरुपद्रवी वाटणारा घटक अण्वस्त्रांच्या विस्फोटांपेक्षा गंभीर रूप धारण करत असतो. इतिहासाला कलाटणी मिळण्याचे अनेक प्रसंग त्या त्या राष्ट्रांच्या अथवा समाजांच्या इतिहासातूनच निर्माण होत असतात. आज मनाला सुखद अभिमानास्पद संवेदना देणारा इतिहास वर्तमान सुसह्य करत असला तरी इतिहास हा आपल्याला शिकवला गेला त्यापेक्षा विपरीत होता हे सत्य सामोरे येते तेंव्हा जी समाजमानसिक पडझड होते ती अन्य कोणत्याही विनाशक गोष्टींपेक्षा भयंकर असते. थोडक्यात इतिहास हा अत्यंत काळजीपूर्वक हाताळण्याची आणि समजावून घेण्याची बाब आहे.

भारत स्वतंत्र होऊन आता सात दशके उलटून गेली असली तरी भारताचा इतिहासलिहिला गेलेला आहे असे दुर्दैवाने म्हणता येत नाही. आपला बहुतेक इतिहास मिथके, दंतकथा आणि आत्मप्रौढी किंवा न्युनगंडात्मक आणि बचावात्मक पद्धतीने लिहिला गेला असल्याने आपल्या इतिहासाचे सर्वांगीण तथ्यात्मक दर्शन घडेल आणि त्याच पद्धतीने आकलन करून घेतले जाईल अशी स्थिती नाही. आपला अगदी मध्ययुगीन इतिहाससुद्धा सत्याचे केवळ धूसर दर्शन घडवतो तर मग प्राचीन इतिहासाची बाबच वेगळी. मिथकांना काटेकोरपने वगळत अथवा त्यांची नि:पक्ष चिकित्सा करत तटस्थ इतिहास मांडायची आपल्या इतिहासकारांना मुळात सवयच नाही. दरबारी भाटांनी लिहिलेल्या प्रशस्ती, त्यातील अतिशयोक्ती किंवा पुराणामधील पक्षपाती अतिरंजित वर्णने हीच आपल्या इतिहासाचे मुख्य साधने मानली गेली आहेत. उत्खनीत इतिहासाची आकलने इतिहासकार कोणत्या स्कूलचा आहे त्यावर अवलंबून असल्याने राजकीय अथवा धार्मिक अहंभावातून केली जाणारी वर्चास्वतावादी आकलने खरे तर इतिहासाचा भाग बनू शकत नसली तरी आपले हे दुर्दैव आहे कि नेमकी तीच पक्षपाती आकलने आमच्या इतिहासाचा भाग बनतात. लबाड्या-खोटेपणा हा दुर्गुणही अनेक इतिहासकारांनी दाखवला आहे हे वेगळेच.

शिवाय आपला जोही काही इतिहास लिहिला गेलेला आहे तो प्रामुख्याने राजकिय (राजा-महाराजांचा) आणि धार्मिक (आणि तोही एकांगी) स्वरूपाचा आहे. त्यातही समन्यायी धोरण नसल्याने सोमनाथाचा प्रथम जीर्णोद्धार करणारा व नंतर जैन झालेला कुमारपाल जसा सर्वांना माहित नाही किंवा अरब स्वा-यांना निरस्त करत मध्य आशिया व अफगाणिस्तान पादाक्रांत कसणारा काश्मीरचा सम्राट ललितादित्यही माहित नाही.  इतिहासातील अनेक व्यक्ती आजही प्रकाशात यायची वाट पाहत तिष्ठत राहिल्या आहेत. सामाजिक इतिहासही शुद्ध स्वरूपात लिहिला गेला असता तर अहिल्याबाई होळकर केवळ एका धार्मिक महिलेच्या रुपात पुढे केली गेली नसती. सातवाहन ते राष्ट्रकुट काळातही समाज वैदिक धर्मशास्त्रांनुसारच चालत होता अशी ते सामाजिक वास्तव नसतानाही बेताल संदर्भहीन विधाने केली गेली नसती. राजांसाठी भाटांनी लिहून ठेवलेली काव्ये आणि स्वत:चा वृथा गौरव करून घेणा-या प्रशस्तीन्ना इतिहासाचे महत्वाचे साधन मानली गेली नसती. आज केवळ संस्कृत साधनांनाच तेवढे महत्व देत प्राकृत-द्रविड साधनांना दुय्यम व दुर्लक्षनीय मानले जाते. हिंदू-जैन-आजीवक व बौद्धांचाही वास्तव इतिहास कारण नसतांना वैदिक भ्रामक इतिहासाशी जोडला जातो.  वैदिक काळात असे होते तसे होते...सामाजिक व्यवस्था अशी होती तशी होती अशी वर्णने एकजात सर्व वैदिक विद्वान करतात पण ते कधीही वैदिक काळ नेमका कधी होता? किती शतके होता? होता तर त्या काळाचे कसलेही भौतिक पुरावे का मिळत नाहीत आणि असले तर ते नेमके काय आहेत याबाबत ते मौन असतात, पण वर्णनेच एवढ्या श्रद्धाभावाने करतात कि इतिहास लेखनात श्रद्धेला स्थान नसते, पुरावे लागतात हे मात्र साफ विसरून गेलेले असतात. त्यामुळे वैदिक धर्मीय आणि हिंदु धर्मियांसहित भारतीय धर्मांचा इतिहास तटस्थ व वास्तवदर्शी नाही आणि सामाजिक व आर्थिक इतिहास लिहिलाच जात नसल्याने त्याही पातळीवर गोंधळच आहे. अनेक समाजांना तर जसा इतिहासच नाही असे इतिहासकारांचे वर्तन असते. त्यामुळे भारतीय मानस आपल्याच गतकाळाबाबत गोंधळयुक्त आहे. जो पुनरुज्जीवनवादी इतिहास लिहिण्याचा अपार खटाटोप गेली दोनेकशे वर्ष सुरु आहे त्याचा हा परिपाक आहे. आता तर त्याने कळस गाठायचा चंग बांधलेला आहे.

त्यामुळेच कि काय वैदिक धर्मीय इतिहासकार आजही आपली पाळेमुळे शोधत आहेत. वैदिक आर्य हे मुळचे आर्क्टिक प्रदेशातील या प्रतीपादनापासून वैदिक आर्य भारतातीलच हरियानातील अशी वाटचाल करत शेवटी सिंधू संस्कृतीचे निर्माते वैदिक आर्यच होते हे ठसवण्यासाठी इतिहासाचे शासकीय पातळीवरही पुनर्लेखन केले जात आहे. त्यासाठी अगदी जनुकीय शास्त्राचे निर्वाळेही धुडकावून लावत शास्त्राचाही दुरुपयोग केला जात आहे. वैदिक इतिहासकारांचा सर्वस्वी भर असतो तो प्रत्येक काळात सर्व समाज वैदिक स्मृत्यांनुसार आचरण करत होता हे सांगण्याचा मग प्रत्यक्षातील समाजजीवन कितीही विपरीत का असेना. यातून वैदिक प्रभुसत्ता प्रत्येक काळात होती हे अनैतिहासिक विधान वारंवार सांगत तीच काल्पनिक का होईना प्रभुसत्ता आजही निर्माण करण्याचा प्रयत्न होतो. हिंदुंचा (ज्यांना वैदिक धर्मी शुद्र म्हणतात ते) इतिहास तर आजही दुर्लक्षित आहे.

याविरुद्ध बहुजनवादी म्हणवणारे इतिहासकार द्वेषात्मक भूमिका घेत पुरेसा अभ्यास न करता इतिहासाचे विकृत अन्वयार्थ काढत थयथयाट करत आपला इतिहास सांगण्याचा प्रयत्न करतात तेही इतिहासाचे मुडदे पाडणारे ठरते. त्याच वेळी दाक्षिणात्य इतिहासकार सिंधू संस्कृतीचे निर्माते द्रविडच आणि आक्रमक आर्यांमुळे त्यांचे विस्थापन दक्षिणेत झाले.असे प्रतिपादन हिरीरीने तर करतातच पण सिंधू मुद्रांमध्ये प्राचीन तमिळ भाषा शोधतात.  थोडक्यात द्रविड अस्मितेला चेतवन्याचा त्यांचा प्रयत्न असतो. सामाजिक दुभंग निमाण होण्यापलीकडे त्यातून काही साध्य होत नाही हे उभय पक्षांनी लक्षात घेतले पाहिजे.

आपण जेंव्हा राष्ट्र म्हणतो तेंव्हा राष्ट्राचे अविभाज्य असणारे काश्मीर, उत्तर-पूर्वेतील राज्ये यांचाही समग्र इतिहास असावा आणि तो राष्ट्रभावना वाढण्यासाठी आणि एकमेकांना समजावून घेण्यासाठी देशभर पसरवावा ही भावना तर नाहीच. तसे व्यापक प्रयत्नही नाहीत. त्याचे राष्ट्र-सामाजिक दुष्परिणाम आपल्या डोळ्यांसमोर आहेत. 

भारतातील बव्हंशी सामाजिक संघर्षांचे मुळ कारण इतिहासच आहे. आपल्याला फार शौर्याचा इतिहास आहे वा आपला इतिहास पराजितांचा आहे असे अज्ञानाने मानणारे समाज आणि आपल्याला इतिहासात कसलेही स्थानच नव्हते की काय असे आक्रोशत विचारणारा बहुसंख्य समाज यातील संघर्ष कोणत्या ना कोणत्या रूपाने व्यक्त होत सामाजिक विभाजनाला हातभार लावत जातो हे वास्तव एक विदारक चित्र उभे करते. खरे तर इतिहास नाही असा कोणताही समाज नाही. सर्वांचाच इतिहास सतत उज्वल असेल असेही नाही. उतार-चढाव येतच असतात. पण अवनतीचे दर्शन कोणाला नको असते. खोटी असली तरी अस्मिता मात्र हवी असते. अस्मितांच्या दलदलीत देश रुतला आहे. तो कसा त्यातून बाहेर निघेल आणि वास्तव इतिहास, तोही समग्रपणे कसा लिहिला जाईल आणि लोकांनाही तो तसाच इतिहाससाक्षर होत वाचायची सवय लावली जाईल यासाठी व्यापक प्रयत्नांची गरज आहे.

-संजय सोनवणी

 

No comments:

Post a Comment

सिंधू संस्कृतीची मालकी!

  सिंधू संस्कृतीची लिपी वाचता आलेली नसल्याने कोणीही उठतो आणि सिंधू संस्कृतीवर मालकी सांगतो. द्रविडांनी हे काम आधी सुरु केले पण त्याला आर्य आ...