Wednesday, July 27, 2022

संत मुक्ताई

 मध्ययुगातील धार्मिक संकल्पनांचा इतिहास हा काहीसा धार्मिक सुसंगती आणू पाहणारा तर बराचसा विसंगतीन्नी भरलेला आहे. शैव-वैष्णवांमधील तीव्र संघर्ष या काळात हरी-हर ऐक्याच्या दिशेने जात असलेला जसा दिसतो तसेच वैदिक आणि वेदविरोधी धर्मांतल्या विसंगती नजरेआड टाकून त्यातही समन्वय साधायची प्रवृत्ती दिसते. हे प्रयत्न जरी अत्यंत कौतुकास्पद असले तरी ही सांगड घालतांना अनेक विसंगतीही निर्माण झाल्याचे आपल्या आज लक्षात येते. शिवाय धर्मेतीहास समजावून घेताना आपल्याला तत्कालीन संत-योगी-सिद्ध यांच्या रचनांखेरीज पर्यायी समकालीन समांतर सामुग्री उपलब्ध नसल्याने आपल्याला त्या रचनांवरच बव्हंशी अवलंबून राहावे लागते. त्यात एकाच नावाच्या अनेक इतिहासप्रसिद्ध व्यक्ती होऊन गेलेल्या असल्याने नंतरच्या काळात कोणती रचना नेमक्या कोणाची आणि कधीची असा गोंधळही निर्माण झालेला तर आहेच पण अनेकांनी आपल्या रचना प्रसिद्ध व्यक्तींच्या/संतांच्या नावावर खपवून प्रक्षेप केला असल्याने या गोंधळात भरच पडली असल्याचे आपल्याला दिसते.

शिवाय अध्यात्मीक क्षेत्रातील श्रेष्ठांभोवती मिथकांचे जाळे विनण्याची एक विलक्षण प्रवृत्ती असते. भारतीय या तत्वाला अपवाद नाहीत. आपापले इष्ट दैवत अथवा साधू-संत यांचे महत्ता वाढवण्यासाठी अनेक चमत्कृतीजनी कथा रचल्या गेल्या आहेत. त्यात अनेकदा काळ व स्थलविपर्यास होत असला तरी भाविकांची या कथांवर अपरंपार श्रद्धा असते. या कथांच्या जाळ्यातून वाट काढत तथ्यांपर्यंत पोचण्यासाठी मोठे कसरत करावी लागते.

हा गोंधळ दूर करण्यासाठी अनेक विद्वान संशोधकांनी कष्टपूर्वक प्रयत्न करून ज्याचे श्रेय त्याला देण्याचे जानीएवपूर्वक प्रयत्न केले आहेत. प्रक्षिप्त अभंग/लिखाण शोधत कालविपर्यास करणारे लेखनही त्या-त्या संताच्या नावावर असलेल्या अभंग/लेखनाला वगळून शुद्ध आवृत्त्या तयार करण्याचे मोलाचे कार्यही झालेले आहे. अर्थात हे कार्य सर्वमान्य झालेले आहे असे मात्र नाही. भाबड्या अनुयायांना प्रक्षिप्तीकरण मान्य होत नाही. श्रद्धा ही नेहमीच तर्कनिष्ठा किंवा बुद्धीप्रामान्यावर मात करते. भारतासारख्या देशात ते स्वाभाविकही मानता येईल.

वारकरी संप्रदायाचा पाया संत ज्ञानेश्वरांनी घातला अशी मान्यता आहे. हे सत्य मानले तरी श्रीविठ्ठल माहात्म्य तत्पूर्वीच अनेक शतके आधी प्रस्थापित झालेले होते असे आपल्याला दिसते. ध्वाचार्यांनी (इ.स. ११९९-१२७८) या ज्ञानेश्वरपूर्व काळातच आपल्या आठ बालयतींपैकी तिघांना विठ्ठलाची मूर्ती पुजेसाठी दिली होती, असे श्री. द. रा. बेंद्रे सांगतात. त्याहीपूर्वी सहाव्या शतकातील एका ताम्रपटात ' जयद्विठ्ठ ' नामक ब्राह्मणाला गावाचे दान दिले आहे अशी नोंद आहे. हा ब्राह्मण पंढरपूरचाच होता. विठ्ठल हे नाव व्यक्तीनामही बनावे एवढा विठ्ठल महिमा सहाव्या शतकातच वाढलेला होता. प्रत्यक्षात आधी विठ्ठलाची मूर्ती उघड्यावर होती व सन ११७९ (शके ११११) मध्ये विठ्ठलदेव नायक या देवगिरीच्या स्थानिक सामंताने तेथे छोटे मंदिर बनवले असा शिलालेखही उपलब्ध आहे. विठ्ठलाचे स्थान हे पूर्वी शैव होते आणि नंतर त्याचे वैष्णवीकरण झाले असे माणिक धनपलवार आणि डॉ. रा. चिं. ढेरे यांनी सिद्ध केले आहे. हरी-हर ऐक्याच्या अवाढव्य प्रयत्नांतून असे परिवर्तन घडले व ते समाजमान्यही झाले असे मानण्याची एक प्रथा आहे.

संत ज्ञानेश्वर व त्यांची भावंडे ही नाथ परंपरेतील. ही शैव योगाची परंपरा. समतेची परंपरा. ज्ञानेश्वरांच्या समकालीन असलेला राजा रामदेवराय हा नाथपंथात अनुग्रहित आल्याचा उल्लेख सत्यामलनाथांच्या “नवरत्नमला” या ग्रंथात सापडतो अशी माहिती डॉ. भिंगारकर आपल्या “नाथसंप्रदाय आणि ज्ञानेश्वर” या ग्रंथात (पृ. १८५) देतात. तत्कालीन नाथसंप्रदाय हा समाजात प्रतिष्ठित होता. निवृत्तीनाथांनीही गहिनीनाथांकडून नाथ पंथाची दीक्षा घेतलेली होती. निवृत्तीनाथ हे ज्ञानेश्वरांचे गुरु होते. नाथपंथी शैव असूनही ज्ञानेश्वरांनी विठ्ठलाच्या रूपाने विष्णूची भक्ती का केली असावी हा एक प्रश्नच आहे. कुरुंदकरांनीही लिहिलेय कि, “सर्व शैवांना त्या काळात (तेराव्या शतकात) वैष्णव होणे सोयीचे का वाटावे हाही प्रश्न एकदा तपशीलाने चर्चावा लागेल.” (प्रस्तावना, चक्रपाणी)

नाथसंप्रदाय हा अवैदिक परंपरेतील. या संप्रदायात जातीभेदाला स्थान नव्हते. वैदिक वर्णाश्रम सामाजिक रचनेचा स्पष्ट  निषेध होता. सर्वांना समान रुपात पाहत उदार आश्रय देणे हा या संप्रदायाचा उद्देश. पण ज्ञानेश्वरांचा वर्णव्यवस्थेचा निषेध हा भाक्तीमार्गापुराता सीमित होता, प्रत्यक्ष समाजव्यवहाराबाबत नव्हे याकडेही लक्ष द्यावे लागते. 

 पण तो प्रश्न तात्पुरता तरी तत्कालीन समन्वयवादी चळवळीच्या वातावरणाकडे आणि संतांच्या मनोभूमिकेकडे पाहून सोडून द्यावा लागतो.

वारकरी संप्रदायाची सुरुवात होण्याच्या काळात भारतात अनेक वैदिक वर्णाश्रम धर्मविरोधी प्रतिक्रियावादी हिंदू पंथ-संप्रदायांची स्थापना झालेली होती. सिद्ध, नाथ, लिंगायत, वीरशैव, महानुभाव आणि इतर असंख्य तांत्रिक पंथ नव्या स्वरूपात समन्वयवादी पण समतेचे तत्वज्ञान सांगत सामाजिक विषमतेवर हल्ले चढवत होते. नाथ संप्रदाय हा उत्तर-दक्षिण भारतात फार विस्तारलेला होता. या संप्रदायात गोरक्षनाथ ही असामान्य व्यक्ती होऊन गेली. शिवोपासक व योगमार्गी गोरखनाथांचे कार्य व्यापक व विविध प्रकारचे आहे. कुल, जात, वर्ण, धर्म इत्यादींच्या पलीकडे ईश्वरतत्त्व आहे, असे त्यांनी प्रतिपादन केले. प्रखर वैराग्य, विशुद्ध चारित्र्य, सदाचार व ब्रह्मचर्य यांना स्वतःच्या  आचरणाने महत्त्व देऊन तत्कालीन समाजातील अनैतिक, अविवेकी व अनाचारी वृत्तींना पायबंद घातला. ते महान संघटक होते. त्यांनी भारतीय आध्यात्मिक साधनेचे शुद्धीकरण केले आणि नंतरच्या अनेक महापुरुषांना कार्याची प्रेरणी दिली. त्यांनी योगमार्गाला सुसंघटित रूप देऊन योगसाधनांचे व्यवस्थापन केले. स्त्रिया व शुद्रांच्याही उद्धाराचा मार्ग त्याने मोकळा करून दिला. हिंदू-मुस्लिम ऐक्याचा पायाही प्रथम त्यांनी घातला. त्यामुळे रावल शाखेत आजही मुसलमानांचा भरणा विशेष आहे. ते होता. त्याचे मठ व अनुयायी भारतात सर्वत्र तसेच नेपाळ आणि श्रीलंकेतही आढळतात. त्याचा प्रभाव नंतरच्या सर्व निर्गुणपंथी अनुयायांवर पडला. कबीरावरही त्याचा प्रभाव आहे. ज्ञानेश्वरांनीही त्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. आद्य शंकराचार्यांनंतर अखिल भारतीय जनमताला प्रभावित करणारा एवढा मोठा आचार्य मध्ययुगात झाले नाही, असे हजारीप्रसाद द्विवेदी यांनी म्हटले आहे.

 

असे असले तरी आद्य शंकराचार्यांचा काल नेमका कोणता हे जसे अनिश्चित आहे तसेच गोरखनाथांचेही आहे. इ.स. च्या आठव्या शतकापासून ते चौदाव्या शतकापर्यंत त्यांचा काळ सांगितला जातो. पण आता ही कालनिश्चिती अगदी अचूक नसली तरी सत्याच्या जवळपास जाणारे आहे असे दिसून येते. संत ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठलपंत, आजोबा गोविंदपंत आणि पणजोबा त्र्यंबक येथवर आपल्याला पूर्वजांची माहिती मिळते. निवृत्तीनाथ व त्यांचे आजोबा गोविंदपंत हे गहिनीनाथांचे शिष्य तर पणजोबा त्र्यंबकपंत हे गोरखनाथांचे शिष्य होते. डॉ. कृ. ज्ञा. भिंगारकर यांनी त्र्यंबकपंतांची बीड जिल्ह्याच्या प्रमुखपदी नेमणूक झाल्याची एक सनद प्रकाशित केलेली आहे. ही सनद शके ११२९ (इ.स. १२०७) सालची आहे. त्यांनी गोरखनाथांकडून दीक्षा नेमकी कोणत्या वर्षी घेतली हे स्पष्ट नसले तरी गोरखनाथ हे त्यांचे समकालीन अथवा ज्येष्ठ असणे शक्य आहे. गोरखनाथ हे त्यांचे आध्यात्मिक गुरु असल्याची माहिती “आदि” च्या संत नामदेवकृत अभंगावरून काही विद्वानांनी दिलेली आहे. आदिचे अभंग नामदेवांचे नाहीत हे आता स्पष्ट असले तरी ज्याही कोणा कथित नामदेवाने हे अभंग लिहिले त्याच्याकडे परंपरेतून ही माहिती आली असणे शक्य आहे. त्यामुळे ही माहिती दुर्लक्षित करावी अशी नाही. वरील विवेचन पाहता गोरखनाथांचा काळ सरासरी इ.स. ११०० येतो. कल्याणी मलिक यांनी गोरखनाथांचा काल इ.स. १०७५ व मत्स्येंद्रनाथ यांचा काळ  इ.स. ९७५ असा येतो अशी माहिती डॉ. सुधाकर देशमुख देतात. (मध्ययुगीन धर्मकल्पनांचा विकास: तंत्र, योग आणि भक्ती, पद्मगंधा प्रकाशन, पृ. १६४) यात नामसाधर्म्याचा गोंधळ नसेल तर गोरक्षनाथांचा काळ अकरा ते बारावे शतक असा होता असे मानता येईल. मराठी विश्वकोशाने मात्र हा काळ नववे ते दहावे शतक असा मानलेला आहे हेही येथे नोंदवून ठेवतो.

संत ज्ञानेश्वरांना ज्येष्ठ बंधू निवृत्तीनाथांनी दीक्षा दिली तर निवृत्तीनाथांना गहिनीनाथांनी हे आपण वर पाहिले. सोपान व धाकटी बहिण मुक्ताबाइलाही निवृत्तीनाथांनीच दीक्षा दिली असे वारकरी संप्रदाय मानतो. खुद्द मुक्ताबाईही हे मान्य करतात. मुक्ताई व ज्ञानेश्वर यांच्या जीवनात चांगा वटेश्वर (योगी चांगदेव) हे महत्वाचे व्यक्तिमत्व मानले जाते. चांगदेव हे महाराष्ट्रातील नाथपंथी कवी, संत होते आणि योगमार्गातील अधिकारी पुरुष होते. योगसामर्थ्याने ते चौदाशे वर्षे जगले अशी मान्यता आहे. यात चमत्कृतीपूर्ण वर्णन करण्याचा हव्यास दिसत असून डॉ. रा. चिं. ढेरे यांच्या मताप्रमाणे चांगदेव योगसामर्थ्यावर तो १,४०० वर्षे जगला, अशी दंतकथा आहे तथापि चांगदेवपरंपरेतील एक ग्रंथकार रत्नाकर याने आपल्या दीपरत्नाकर”  ह्या ग्रंथात चांगदेवाने चौदाव्या वर्षी वयस्तंभन केले, असे म्हटले आहे. ह्या वस्तुस्थितीचीच अतिशयोक्ती व विपर्यास वरील दंतकथेत झाला असावा.  यांच्या गुरूचे नाव वटेश्वर म्हणून यांना चांगावटेश्वर असेही म्हणतात. काहींच्या मते वटेश्वर म्हणजे चांगदेवांच्या अंतरंगात प्रकाशणारे ईश्वराचे रूप. तापी-पूर्णा नदीच्या तीरावर चांगदेव या गावाजवळच्या वनात डोळे बंद करून तपश्चर्या करीतच हे योगी झाले होते. एकदा त्‍यांच्या कानावर संत ज्ञानेश्वराची कीर्ती पडली तेव्हा त्यांना ज्ञानेश्वरांच्या भेटीची उत्कंठा लागली, भेटण्यापूर्वी पत्र पाठवावे असा विचार करून त्यांनी पत्र लिहिण्यास घेतले पण मायना काय लिहावा या संभ्रमातून त्यांनी कोरेच पत्र पाठविले. योगी असूनही चांगदेवांमध्ये आत्मज्ञानाची आणि गुरुकृपेची कमतरता आहे असे निवृत्तीनाथांच्या लक्षात आले. त्यांनी ज्ञानेश्वरांना पत्राचे उत्तर लिहिण्यास सांगितले. त्याप्रमाणे ज्ञानेश्वरांनी जे उत्तर लिहिले ते चांगदेव पासष्टी या नावाने प्रसिद्ध झाले. त्यानंतर चांगदेवनिवृत्तीनाथज्ञानेश्वरमुक्ताबाई  सोपान यांची भेट झाली. पुढे चांगदेवांनी मुक्ताबाईंना गुरू मानले असे परंपरा सांगते व वारक-यांची या कथेवर श्रद्धा आहे.

असे असूनही मुक्ताबाइच्या परंपरेतील (विशेषता: नाथपंथातील) मान्यता मात्र मुक्ताबाई या गोरखनाथ यांचीच शिष्या आहेत अशी आहे. गोरखनाथ तर ज्ञानेश्वर भगिनी मुक्ताबाई यांच्या जन्मापूर्वी काही शतके तरी आधी होऊन गेले. ज्ञानेश्वर-निवृत्तीनाथ हे अधिकारी बंधू असतांना त्यांना डावलून मुक्ताबाई गोरखनाथ यांना आपले गुरु का करतील? कि त्या दोन वेगळ्या मुक्ताबाई आहेत या प्रश्नातून एक शोध सुरु झाला. मुक्ताबाई एक कि दोन कि अनेक असा तो प्रश्न. या प्रश्नाच्या कोंडीतून वाट काढण्यासाठी अनेक क्लुप्त्या लढवल्या गेल्या.

नाथपंथी परंपरेतील एक संत कवी शिवदिनकेसरी यांनी आपल्या “ज्ञानप्रदीप” या ग्रंथात हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला होता. “पूर्वजन्मी मुक्ताईस गोरक्षकृपेचा सौरस” लाभला होता असे त्यांचे म्हणणे. म्हणजेच गोरक्षशिष्या मुक्ताबाई या निवृत्तीशिष्या मुक्ताबाइचा पूर्वावतार होय असे केतकी मोडक आपल्या “पूर्वजन्मी मुक्ताईस गोरक्षकृपेचा सौरस” या लेखात सांगतात. यातील अवतार संकल्पना श्रद्धेच्या पातळीवर सोडून दिली तरी दोन मुक्ताबाई वेगळ्या आहेत (पण नाथ सम्प्रदायातीलाच आहेत) असा त्याचा अभिप्राय होतो. त्या दोघीना एक मानण्याचे संयुक्तिक कारण नाही.

याचे अजून एक घडलेले कारण म्हणजे ज्ञानेश्वर कालीन विसोबा खेचर लिखित शडूस्छळी (षट्‌स्थळ) ग्रंथाच्या हस्तलिखिताचा शोध डॉ. रा. चि. ढेरे यांना सासवड येथील सोपानदेव समाधी मंदिरातील कागदपत्रांच्या एका गाठोड्यात १९६९ मध्ये लागला. या ग्रंथात विसोबा खेचरांची गुरूपरंपरा आदिनाथ मत्येंद्रनाथ गोरक्षनाथ मुक्ताई चांगा वटेश्र्वर कृष्णनाथ (रामकृष्णनाथ) खेचर विसा अशी आलेली आहे. यातूनच इतिहासात प्रसिद्ध अशा दोन मुक्ताबाई झाल्या असाव्यात या संशयास बळकटी मिळाली. डॉ. रा. चिं. ढेरे यांनी याबाबत सविस्तर असे लेखनही केले आहे.

गोरखशिष्या मुक्ताई आणि निवृत्तीशिष्या मुक्ताई या सर्वस्वी वेगळ्या काळात व स्थळावर झालेल्या दोन स्वतंत्र योगिनी आहेत याचेही काही पुरावे सामोरे येऊ लागले. खुद्द चांगदेवांच्या “तत्वसार” या तृटीत स्वरूपात उपलब्ध असलेल्या ग्रंथात सिद्धपंथातील महनीयांची यादी देताना त्यांनी,

“श्रीमुक्तादेवी योगिनीI जे समस्तसिद्धशिरोमणीI तिये प्रसादे चक्रपाणिI ज्ञानसिद्धूII” (चक्रपाणि हे चांगदेवांचेच एक नाव आहे.) असा उल्लेख गोरक्षनाथांच्या पाठोपाठ केला आहे. म्हणजेच चांगदेवांच्या गुरु असलेल्या योगिनी मुक्ताबाई या गोरक्षनाथांच्या प्रत्यक्ष शिष्या होत्या हे उघड दिसते. जर चांगदेवांचा काळ बारावे-तेरावे शतक हा मानला (मृत्युवर्ष १३२५, जन्मवर्ष निश्चित नाही) व गोरखनाथांचा काळ अकरावे ते बारावे शतक मानला तर ही योगिनी मुक्ताबाई बाराव्या शतकात होऊन गेली असणे शक्य आहे. ज्ञानेश्वरभगिनी मुक्ताबाईचा जन्म तेराव्या शतकाच्या उत्तरार्धात, म्हणजे १२७७ किंवा १२७९ साली झाला अशी मान्यता आहे. त्यामुळे दोन मुक्ताबाई असल्याचे चित्र मान्य करावे लागते. अर्थात कालनिश्चितीची साधने नसणे ही एक महत्वाची त्रुटी राहतेच.

 

महानुभाव पंथाचे संस्थापक चक्रधर यांची भेट पर्वतावर मुक्ताबाई या योगीनीशी झाली होती. याचे उल्लेख लीळाचरित्रात आलेले आहेत. या भेटीत मुक्ताबाईने चक्रधरांचे अगत्याने स्वागत केले, या दर्शनाने मुक्ताबाईला संचारी आनंद मिळाला आणि तिने आपण एवढे तप केले त्याचे फळ आज मिळाले असे उद्गार काढले. तिची नखे एवढी वाढली होती कि त्यांच्या चुंभळी वळाल्या होत्या व केसांच्या जटा झालेल्या होत्या. ही वयोवृद्ध ही मुक्ताबाई ज्ञानेश्वर भगिनी मुक्ताई नाही हे उघड आहे.  ही मुक्ताबाई म्हणजे भर्तृहरीची नातलग व गोरखनाथांची शिष्या होय असे अनुमान भिंगारकरांनी केले आहे.

 

यातही मेख अशी आहे कि आपल्याला किमान दोन ऐतिहासिक भर्तृहरी माहित आहेत. एक म्हणजे वाक्पदीयचा व्याकरणकार लेखक तर दुसरा म्हणजे शतकत्रय लिहिणारा भर्तृहरी. यातील पहिला भर्तृहरी चीनी प्रवासी इत्सिंगच्या मते सन ६५१ मध्ये मृत्यू पावलेला होता. दुसरा भर्तृहरी शृंगारशतकनीतिशतक आणि वैराग्यशतक या शतकांचा कर्त्ता सातव्या शतकातील असावा असा अंदाज केला जातो. हाच नाथपंथी असावा किंवा नाथपंथी भर्तृहरी कोणे वेगळाच होता या संदर्भातही संभ्रम आहेत. याचे कारण म्हणजे आपल्याला मुक्ताबाईसंबंधीच्या कथांतील भर्तृहरी हा एवढा जुना असू शकत नाही.

लीळाचरित्रातील अप्रकाशित भागात यासंबंधी आलेली एक वेगळीच कथा काय आहे हे आपण आधी पाहूयात. म. बाळकृष्णशास्त्री महानुभाव यांच्या एका लेखात आलेल्या या लीळा डॉ. ढेरे यांनी”शिवयोगिनी मुक्ताई” मध्ये प्रसिद्ध केलेल्या आहेत.

 

मुक्ताबाई ही महाराष्टीय असून अळजपूर (एलीचपूर) येथील राजाचे कन्या होती. परचक्र आल्याने त्या धामधुमीत देशोधडीला लागून ती शेवटी वेश्येच्या आश्रयाला जाऊन स्वत:ही तो व्यवसाय करू लागली. तरीही ती व्रतस्थ राहिली. एके दिवशी त्या नगरात विक्रमादित्य राजा आला. त्याने तिला अकारण मारहाण केली पण तिने “राजा, तुझे हात मला एवढे मारून दुखू लागले असतील” असे म्हटल्याने ती खरेच ऐकले तशी व्रतस्थ स्त्री आहे हे त्याच्या लक्षात आले. त्याने तिच्याशी विधीवत विवाह केला. भर्तृहरीची या योगी पुरुषाची भावजय बनली. ती त्याला नित्यनियमाने भिक्षा देत असे. एके दिवशी त्याला उशीर झाल्याने ती अंघोळीस गेली. तेवढ्यात भर्तृहरीचा “भिक्षा” असा शब्द ऐकून ती विवस्त्रच बाहेर पडली. दारावर असलेल्याने जेवढे काही हवा वारण्यासाठी साधन असते ते तिचे आच्छादन झाले. मग ते दोघे भर्तृहरीच्या गुरूच्या उपदेशाने एकविध अवस्थेस प्राप्त झाले. तेथून ती पर्वतास (श्रीशैल) गेली. कर्दळी बनात तिने तप केले. एवढी तापस की नखांची चुम्भळी झाली. जटा एवढ्या वाढल्या कि त्या भुईला झाडत. मग महदाईने विचारले कि त्या तपास किती वर्ष झाले जी? त्यावर चक्रधरस्वामींनी उत्तर दिले कि तेराशे वर्ष आणि येथे बारा वर्ष. अशी मुक्ताबाई कर्दळी वनात राहते. येथे एवढी अधिकची माहिती आहे आणि पुढे एवढे तप आज फळाला आले असे मुक्ताबाई म्हणते इत्यादी भाग लीळाचरित्रात आला आहे तसाच आहे. हा अप्रकाशित भाग नेमक्या कोणत्या कारणास्तव अप्रसिद्ध ठेवण्यात आला हाही एक प्रश्न आहेच.

 

या कथेत लीळाचरित्रातील अधिकचा भाग आला असला तरी या मुक्ताबाईची तेराशे वर्षाची तपश्चर्या आणि चांगदेव चौदाशे वर्षांचा होता हा भाग सांप्रदायिक अतिशायोक्तीत टाकून देता येतो. दुसरे बाब अशी कि हा विरक्त योगी भर्तृहरी आणि मुक्ताबाइचा पती विक्रमादित्य नेमके कोणते होते? आपल्याला किमान दोन भर्तृहरी माहित आहेत. या कथेत आलेला भर्तृहरी त्या दोघांपैकी असणे शक्य दिसत नाही. शृंगारशतक ते वैराग्यशतक ही प्रतिभा गाठणारा भर्तृहरी म्हणजे या कथेतील अभिप्रेत असलेला भर्तृहरी असू शकेल असे वाटण्याचा संभव आहेच. पण मग या भर्तृहरीचा मान्य काळ मागे खेचावा लागेल हे उघड आहे. शिवाय भर्तृहरी कोणत्या विक्रमादित्य राजाचा भाऊ होता हेही निश्चित सांगता येणे शक्य नाही कारण या नावाचे पदवी घेणारे इतिहासात अनेक विक्रमादित्य हौउन गेलेले आहेत. असेही असू शकते कि दंतकथा बनवणा-या कल्पक लोकांनी एका योगिनीभोवती गुंफलेली ही अद्भुतरम्य कथा आहे आणि तिला ऐतिहासिक मूल्य मात्र नाही असे एकंदरीत दिसते.

हे काहीही असले तरी मुक्ताबाई नावाची अजून एक योगिनी पदाला पोचलेली अजून एक स्त्री होती आणि ती नाथपंथातील गुरुपद प्राप्त करुन बसली होती हे विसोबा खेचर यांनी दिलेल्या गुरुपरंपरेवरून दिसते.  हीच मुक्ताबाई चांगदेवांची गुरु होती, ज्ञानेश्वर भगिनी मुक्ताबाई नव्हे असे आपण कालानुक्रमानानुसारही ठरवू शकतो.

 

पण दोन्ही मुक्ताबाईंची सांगड घालण्याच्या नादात केतकी मोदक यांनी शिवदिनकेसरी यांच्या ज्ञानप्रदीप ग्रंथातील “पूर्वजन्मी मुक्ताईस-गोरक्षकृपेचा सौरस” या विधानाला वेठीस धरून ज्ञानजन्म आणि पूर्वजन्म या आध्यात्मिक सद्न्या वापरत दोघींत सामरस्य असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. तो तसा टिकणार नाही हे स्पष्ट आहे.

पण घोळ येथेच संपत नाही. महानुभावांची व अनेक विद्वानांची मान्यता आहे कि या लीळेमध्ये उल्लेखलेला “पर्वत” म्हणजे विदर्भातील सालबर्डी (ता. मोर्शी, जि. अमरावती) येथील पर्वत. पण हे वास्तव नसून “पर्वत” नावाने एकच पर्वत निर्देशिला जात होता व तो म्हणजे श्री पर्वत. (श्रीशैलम हे पर्यायी द्राविड नाव). हा पर्वत संपूर्ण देशभरात प्रसिद्ध होता कारण येथे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक मल्लिकार्जुन हे प्रसिद्ध पीठ असून तीर्थस्थान आहे. येथे पुरातनकाळापासून शाक्त, कापालिक, कालामुख, सिद्ध इत्यादिन्च्या तंत्रसाधना होत आलेली आहे. श्रीशैलम् हे मध्ययुगात वेदविरोधी तांत्रिक धर्माचे प्रमुख केंद्र होते. मंत्रयान व वज्रयान या बौद्ध संप्रदायांचाही उगम येथेच झाला अशी मान्यता आहे. या पर्वताशेजारीच साधकांमध्ये प्रसिद्ध असणारे कदळीबन आहे हेही विख्यात आहे. भर्तृहरीची भावजय कदळीबनात साधनेसाठी गेली हे मत आपण वर पाहिलेच आहे. गोरक्षनाथांची शिष्या त्या बनात जाऊन साधना करते म्हणजे ही कोणतीतरी गुह्य तांत्रिक साधना होती हे आपण अन्दाजू शकतो. कारण मुळात श्रीशैलम हे शैव तांत्रीकांचे मुख्य साधनास्थान होते हे निश्चित आहे. त्यामुळे केतकी मोडक म्हणतात त्याप्रमाणे नवनाथ भक्तिसार किंवा नाथलीलामृत या ग्रंथात उल्लेखलेल्या भर्तृहरीची पत्नी पिंगला ही जशी श्रेष्ठ होती तशी विक्रमादित्याची पत्नी सत्यवती नव्हती त्यामुळे नंतर जीवन्मुक्त म्हणून मुक्ताबाई या नामास चढलेली योगिनी विक्रमादित्याची नसून भर्तृहरीची पत्नी असू शकेल असे संकेत दिलेले आहेत. पण हे मत ग्राह्य धरता येत नाही. विक्रमादित्य आणि उज्जैनी याचे समरसत्व भारतीय दंतकथांत एवढे काही झालेले आहे कि साधू-संत-योग्यांनीही आपल्या वास्तव जगतात वावरतांनाही या मिथकांना मोठे स्थान दिले आहे. त्यामुळे विसोबा खेचरांनी “हे उजयिनीस वितले...” हे जरी विधान केले असले तरी या विधानाकडे तथ्यात्मक दृष्टीने पाहता येत नाही. बाराव्या शतकात किंवा त्याच्या आसपास आगेमागे उज्जैनीहून कोणी बलाढ्य राजा जो विक्रमादित्य ही पदवी धारण करत होता असा इतिहास किमान आज तरी अप्राप्य आहे.

शिवाय डॉ. ढेरेंना नाथपंथ गुरुपरंपरा हे चांगा वटेश्वरकृत चौदा कडव्यांचे प्रकरण उपलब्ध झाले होते. त्यात दिलेली गुरुपरंपराही गोरक्ष-मुक्ताबाई-चांगा अशी आहे. यात गहिनी-निवृत्ती हा उल्लेख नाही. त्यामुळे केतकी मोडक यांनी दिलेल्या चांगदेवांच्या अभंगातील ज्ञानेश्वर भगिनी मुक्ताबाईबद्दलचे उल्लेख हे पारखूनच घ्यावे लागतात. चांगदेव आणि ज्ञानेश्वराडी भावंडे भेटली होती. “चांगदेव पासष्टी” हे त्याचे प्रमाण आहे. पण हा दोन योग्यांमधील आत्मसंवाद आहे. शंकराचार्य यांने मांडलेल्या अद्वैत तत्त्वज्ञानाची मांडणी त्यात केलेली आहे. चांगदेव व ज्ञानेश्वर ह्यांचा संबंध म्हणजे हठयोग व राजयोग ह्यांचा संबंध होय असे मत प्रा. रा.द. रानडे ह्यांनी व्यक्त केले आहे. ज्ञानेश्वर भगिनी मुक्ताबाईबद्दल त्यांना आदर असणे स्वाभाविक आहे, पण तिला आपले गुरु बनवले असे दिसून येत नाही.

शिवाय संत नामदेव निगुरा असल्याने त्याला गुरुपदेश घेण्यासाठी ज्ञानदेवांनी त्यांना वीरशैव पंथातील योगी असलेल्या विसोबा खेचरांकडे का पाठवले हा प्रश  आहेच. विसोबांचा संबंध आळंदीशी कधी आला असल्याचा प्रश्न नाही. विसोबा खेचर हे चांगा वटेश्वराच्या गुरु परंपरेतील. आता “चांगा कोराच राहिला”  असे म्हणनारी मुक्ताबाई आणि ज्ञानदेव नामदेवांना चांगदेवांच्याच शिष्यपरंपरेतील विसोबाकडे कसे पाठवतील हा प्रश्न निर्माण होतो शिवाय विसोबा हे चांगदेवांचे नव्हे तर त्यांचे शिष्य असलेल्या कृष्णनाथांचे शिष्य होते.म्हणजे चांगा वटेश्वर व विसोबांत सरळ गुरु-शिष्य संबंध नव्हता हेही येथे लक्षात घेतले पाहिजे. शिवाय श्री नामदेव महाराज गाथामध्ये विसोबांचे दोन अभंग आढळतात. विसोबा- नामदेवांचे नाते गुरुशिष्यापेक्षा सख्यत्वाचे / मित्रत्वाचे अधिक असल्याचे जाणवते. जरी नामदेवांनी विसोबांचा काही अभंगात आदरपूर्वक गुरू म्हणून उल्लेख केला असला, तरी त्यांनी विसोबांचा योगमार्ग स्वीकारलेला नाही. त्यामुळे ज्ञानेश्वरांनी नामदेवांना विसोबांकडे जायला सांगितले ही कथा विपर्यस्त असण्याचीच अधिक शक्यता आहे. मुळात विसोबा हे वेगळ्या शैव परंपरेमधील होते तर ज्ञानेश्वर हे जरी शैव नाथपंथी असले तरी  नव्यानेच उदयाला आलेल्या कृष्ण-विष्णू संप्रदायातील भक्ती तत्वाकडेही आकर्षित झालेले होते. या संदर्भात डॉ. सुधाकर जोशी (मध्ययुगीन धर्मकल्पनांचा विकास: तंत्र, योग आणि भक्ती, पद्मगंधा प्रकाशन, पृ. २९८-२९९) म्हणतात कि महानुभाव पंथाचे चांगदेव राउळ पाशुपत शैव असूनही श्रीकृष्णाचे उपासक होते. गहिनीनाथांनाही श्रीकृष्ण संकीर्तन करावे वाटले. अनेक शैव पंडितही कृष्णपूजक बनलेले होते. त्यामुळे महाराष्ट्रातील धर्मसाधनेत कृष्ण उपासनेची लाट आली. गोरक्षनाथांनी भक्तीला अभावानेच स्थान दिले असले तरी गहिनीनाथांनी त्या काळाच्या प्रभावात हठयोगाबरोबरच पांचरात्र तत्वाद्न्यानातून निर्माण झालेल्या भागवत संप्रदायातील श्रीकृष्ण उपासना व भक्तीमार्गाचा अवलंब केला असावा. ज्ञानेश्वर व त्यांच्या भावंडांनाही तोच मार्ग प्रेय वाटला एवढाच काय तो निष्कर्ष आपल्याला काढता येतो. पण गोरक्षशिष्या मुक्ताबाई मात्र सरळ सरळ योगीनी असल्याचे व चक्रधरांची भेट झाली तेंव्हा वयोवृद्ध असल्याचे अगदी दंतकथांच्या जाळ्याला बाजूला ठेवले तरी स्पष्ट दिसते. त्यामुळे ती मुक्ताबाई आणि ज्ञानेश्वरभगिनी मुक्ताबाई या वेगळ्याच समजणे  योग्य राहील.

या स्थितीत आपल्याला निवृत्तीशिष्या आणि त्यांचा भगिनी मुक्ताबाइंचा विचार केला पाहिजे. मुक्ताबाई ही धाकटी बहिण. तिने लिहिलेले ताटीचे अभंग वैश्विक साहित्यात नोंद घेतले जावी या तोलामोलाचे. नामदेवांनी तिच्याविषयी लहानशी मुक्ताबाई जैसी सणकांडी । केले देशोधडी महान संत असे उद्‌गार काढले. पण नवल असे कि  तिच्या स्वतःच्या भावंडांनी तिच्या संबंधात कोठे अवाक्षरही काढलेले नाही. असे का व्हावे? की ती निवृत्ति-ज्ञानदेवांच्या जीवनाशी इतकी एकरूप झाली होती, की तिचा वेगळा निर्देश करण्याची आवश्यकताच त्यांना वाटली नाही हे त्याचे कारण असू शकेल?  या चार भावंडांत ती वयाने सर्वांत लहान असली, तरी तिने समाधी घेतली ती निवृत्तीनाथांच्या पूर्वी. अवघे वीस वर्षांचे आयुष्य तिला लाभले. तिचे समाधिस्थान खानदेशात तापीच्या काठचे मेहुण हे गाव होय असे नामदेवांच्या म्हटल्या जाणाऱ्या काही आत्मचरित्रपर अभंगांवरून मानले जाते. वारकरी पंथ शके १२१९, वैशाख वद्य १२, ही तिची समाधितिथी मानतो. पण मुळात हे नामदेवांचे अभंग प्रक्षिप्त मानले गेल्याने ते उत्तरकालीन स्थानमाहात्म्य वाढवणारी कथा आहे कि काय याचा अंदाज येत नाही. ते काहीही असले तरी तिच्या उपलब्ध साहित्यावरून आणि मान्य होऊ शकतील अशा चरित्रावरून आपण मुक्ताबाईचे अंतरंग समजून घेऊ शकतो. मुक्ताबाइन्च्या साहित्यावरुनही तिची जीवनदृष्टी, तत्वदृष्टी आणि आध्यात्मिक अधिकार याचाही सखोल वेध घेऊ शकतो.

मुक्ताबाईचे जे साहित्य उपलब्ध आहे त्यात ताटीचे अभंग ही महत्वाची रचना आहे. मुक्ताईचे एकूण अभंग ७५ च्या आसपास जातील. हे अभंग मुख्यता: भक्तीचा महिमा सांगणारे असले तरी योगमार्गाच्या खुणांनीही ते युक्त आहेत. मुक्ताईला बव्हंशी ज्ञान हे निवृत्ती-ज्ञानेश्वरांकडून लाभले. तिची योगसाधनाही आपल्या बंधुन्च्याच मार्गदर्शनाखाली झाली. शं. गो. तुळपुळे म्हणतात, मुक्ताईच्या काव्यात तिच्या जीवनाचे व प्रतिभेचे अनेक पैलू उठून दिसतात. अंधपणामुळे वाया जात असलेल्या या मुक्ताईला निवृत्तिराजाने सावध केले व त्यामुळे मुक्तपणे मुक्त । मुक्ताई पैं रत । हरिनाम स्मरत । सर्वकाळ ।अशी आपली अवस्था होऊन गेल्याचे ती सांगते. तिच्या अभंगात योगाच्या खुणा आहेत, अध्यात्माची उंची आहे, साक्षात्काराचे पडसाद आहेत, हे सर्व खरे पण त्याबरोबरच त्यांत हृदयाचे मार्दव आणि भावनेची हळुवारताही आहे. तसे पाहिल्यास तिचा स्वभाव सोपानदेवाप्रमाणे थोडा परखड दिसतो. पण ताटीच्या अभंगात तिच्या या स्पष्टवक्तेपणाने थोडे निराळे वळण घेतले आहे. एक दिवस ज्ञानदेवांना पाहून कोणा टवाळाने त्यांना संन्याशाचा पोर म्हणून हिणवले तेव्हा ज्ञानदेव मनात खिन्न होऊन झोपडीत जाऊन बसले व काही केल्या ताटीचे दार उघडीनात. त्या वेळी मुक्ताईने त्यांच्या ज्या विनवण्या केल्या त्या ताटीचे अभंगम्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांत जसा वडील भावावर रुसलेल्या धाकट्या बहिणीचा लडिवाळपणा आहे, तसाच परिणत प्रौढत्वाला साजेल असा समंजसपणाही आहे. मुंगी उडाली आकाशी । तिने गिळिले सूर्यासी ।  असे तिचे एक वचन आहे. हे तिला स्वतःलाही लागू पडते.

मुक्ताबाईनेही नाथ पंथाची दीक्षा घेतलेली असली तरी तिची विठ्ठलभक्तीही असाधारण होती.

प्रकृति निर्गुण प्रकृति सगुण । दीपें दीप पूर्ण एका तत्त्वें ॥ १ ॥
देखिलेंगे माये पंढरिपाटणीं । पुंडलिका आंगणी विठ्ठलराज ॥ २ ॥
विज्ञानेंसी तेज सज्ञानेसी निज । निर्गुणेंसी चोज केलें सयें ॥ ३ ॥
मुक्ताई तारक सम्यक विठ्ठल । निवृत्तीनें चोखाळ दाखविलें ॥ ४ ॥

या अभंगातून विठ्ठलभक्ती तर दिसतेच पण मुक्ताबाई आपल्या गुरुपदी ज्येष्ठ बंधू निवृत्ती यांना देत होत्या हेही स्पष्ट दिसते. चांगया फावलें फावोनी घेतलें । निवृत्तीनें दिधलें आमुच्या करीं ॥ २ ॥ या मुक्ताईच्या एका अभंगातील ओळीवरून चांगदेव , मुक्ताबाई आणि निवृत्तीनाथांच्या वास्तव संबंधांवर प्रकाश पडतो. मुक्ताई संजीवन तत्त्वता निर्गुण । आकार सगुण प्रपंचींचा ॥ ३ ॥ हा आणि अशा अनेक अभंगांतून सगुण-निर्गुण, द्वैत-अद्वैत यासारख्या गहन तत्वद्न्यानातील तिचे अधिकारी स्वरूप प्रकट होते. प्रतिभेची उत्कटता आणि कधी कधी वैचित्र्यपूर्ण पण सखोल जीवनदर्शन घडवणा-या प्रतिमांचा वापर हे मुक्ताईचे अत्युच्च प्रातिभ लेणेच होय. आपल्या थोरल्या बंधूवर, ज्ञानेश्वरांवर तिचे किती अनिवार प्रेम होते हे ताटीच्या अभंगांतून व्यक्त होते. यातील तात्विक उपदेश नुसता कोरडा होत नाही तर त्यात विलक्षण जिव्हाळा आणि लडिवाळपणा आलेला आहे. नाथ संप्रदायातील प्रतिमा क्वचितच तिच्या अभंगांमध्ये येतात. विठ्ठलभक्तीने नाथपरंपरेला कोठेतरी मागे सारल्याचा आभास तिच्या लेखनातून मिळतो. हे तत्कालीन धर्मकल्पनांच्या प्रभावात व व्यक्तिगत अनुभूतीचा परिपाक आहे हे सहज समजावून घेता येते.

गोरक्षशिष्या मुक्ताई मात्र नाथयोगिनी आहे. तिचे पूर्वजीवन आख्याइकानी झाकोळले असले तरी ती श्रीशैल या तंत्रसाधनेच्या मुख्य केंद्री साधना करत होती हे स्पष्ट आहे. तिने काही लेखन केल्याचे संकेत मिळत नाहीत. चांगदेव तिचा शिष्य होता हे स्पष्ट आहे. याच चांगदेवाची भेट पुढे ज्ञानेश्वरभगिनी मुक्ताबाईशी झाली. या मुक्ताबाईचे गुरु निवृत्तीनाथ होते. चांगदेवांनीही कधी ती आपली गुरु आहे असे उल्लेखलेले नाही. त्यांना प्रसंगी मुक्ताबाईने उपदेश केलेला दिसतो हेही खरे, पण गुरु असलेल्या मुक्ताबाईमध्ये आणि या मुक्तांबाईमध्ये तत्वविचारांमध्ये व साधनापद्धतीमध्ये फरक होता. अशा स्थितीत गोंधळलेल्या चांगदेवाला नवीन उपदेश करणे मुक्ताबैला भाग होते. ज्ञानदेवांनी ते कार्य चांगदेव पासष्टीमधून केले तर मुक्ताईने आपल्या काही अभंगातून.

शिवाय त्यांची तसेच विसोबा खेचर यांचीही स्वत: दिलेली गुरुपरंपरा वर दिलेलीच आहे, त्यावरून एवढे स्पष्ट होते कि या दोन भिन्न मुक्ताबाई होत्या.

निवूत्ती-ज्ञाना-सोपानासारखे उत्तुंग आणि स्वतंत्र व्यक्तिमत्वाचे बंधु असतांनाही मुक्ताबाईने स्वत:चे स्वतंत्र अस्तित्व लोप पावू दिले नाही. सुशीला कुप्पुस्वामी म्हणतात, मुक्ताबाई हे एक प्रगल्भ आणि आत्मविश्वासाने भरलेले स्वतंत्र व्यक्तिमत्व होते. स्त्री असुनही दीनवाना स्त्रीभाव तिच्या एकाही अभंगात आढळुन येत नाही. सगुण भक्तीपेक्षा निर्गुणाच्या प्रतीतीला तिने महत्व दिले आणि हाच तिच्या योगिनी असल्याचा महत्वाचा पुरावा आहे. चांगा वटेश्वरासारख्या तत्कालीन महान योग्यालाही ज्ञानोपदेश करनारी मुक्ताबाई ही यादवकाळातील एक अत्युच्च स्त्रीवैभव आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. वारकरी परंपरेत सर्वमान्य असलेल्या संतत्वाचा पहिला उच्चार मुक्ताबाईने केला आहे. हेच संतत्व पुढे ज्ञानदेवांनी आपल्या ज्ञानेश्वरीतून शब्दात व्यक्त केले आणि जीवनात प्रत्यक्ष जागून दाखवले.” असे डॉ. सदानंद मोरे आपल्या “ताटीचे अभंगएक विवेचन” या पुस्तिकेत केले आहे आणि ते सार्थच आहे.

"
नाही सुख दु:ख...पापपुण्य नाही
नाही कर्म धर्म...कल्पना नाही
नाही मोक्ष...ना भावबंध नाही
म्हणे वटेश्वरा ब्रह्म नाही...सहजसिद्ध बोले मुक्ताई!

हा प्रबळ आत्मविश्वास मुक्ताईने तत्वज्ञान केवढे पचवलेले होते याचे एक प्रतीक आहे. या भावंडांना सनातनी मंडळीकडुन अविरत छळ सोसावा लागला, पण मुक्ताईने कधी आपला तोल ढळु दिलेला दिसत नाही. ताटीचे अभंग मुक्ताईच्या कारुण्यशील वत्सल भगिनीच्या मनाचा एक आकांत आहेत...पण त्यात शरणागतता नाही. हीनदीन भावना नाही. आहे तो उत्कट आत्मविश्वास आणि सत्यावरील अगाध निष्ठा. आपल्या भावंडांची तिने मातेच्या जबाबदारीने अपरंपार काळजी घेतली. नाथपरंपरेला साजेश्या पद्धतीने एका मागुन एक भावांनी समाध्या घेतल्यानंतर या विरक्त योगिनीला संसार निरर्थक वाटला असल्यास नवल नाही.

वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी मुक्ताईंनी समाधी घेतली. एक तत्वद्न्य योगिनी, कारुण्यसिंधू मुक्ताई भवसागराच्या पाशातुन मुक्त झाली.

 

-संजय सोनवणी

 

1 comment:

  1. एवढया कमी वयात समाधी का घेतली काय समजत नाही, काय स्त्रीयांचे प्रश्न सुटले होते काय, किंवा सामाजिक किमान स्त्री पुरुष समतेसाठीही आयुष्यभर काम करता आले असते. संजय सरांनी समतेचा शोध घेतांना बौध्द परंपरा, तत्वज्ञानाला थोडे दूर करुन इतर साधने चोखाळलीत. हाती काय लागले माहिती नाही. पण आता स्वतंत्र भारतात समतेचा स्वातंत्रयाच inner engeening चा मार्ग बौध्द तत्वज्ञानाचा पुरस्कार करुनच शक्य आहे. जुन्या व्यवसाय धिष्ठित योग्य समर्थन करतांना जन सामान्यांच्या मनातील भीती, श्रध्देतून आश्चर्याचे पाखंड घालविल्याशिवाय जाणीवेने भारलेले सक्षम मनाचे व प्रचलित राजकीय सामाजिक अव्यवस्थेला प्रश्न विचारणारे लोक तयार होणार नाहीत. फार तर परंपरांचे बटिक तयार होऊन मूक गरीब लाचार व संधीसाधू नागरिकांची निर्मिती भारतात होत राहील, जी हजारो वर्षांपूर्वी येथील सामाजिक व्यवहार सिस्टीमची बळी ठरली होती.

    ReplyDelete

सिंधू संस्कृतीची मालकी!

  सिंधू संस्कृतीची लिपी वाचता आलेली नसल्याने कोणीही उठतो आणि सिंधू संस्कृतीवर मालकी सांगतो. द्रविडांनी हे काम आधी सुरु केले पण त्याला आर्य आ...