अंदाजे किमान साडेचार ते अधिकाधिक सहा अब्ज वर्षांपूर्वी आपल्या पृथ्वीची निर्मिती झाली असे आधुनिक विज्ञान मानते. आधी आगीचा गोळा असलेली ही धरती सावकाश थंड होत धातूमिश्रीत रसाचा गोळा बनत गेली. या प्रक्रियेत वायू मुक्त होऊन गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वीभोवती स्थिरावत वायूमंडळ बनले. असे असले तरी सुरुवातीची स्थिती अत्यंत उद्रेकी होती. अगणित ज्वालामुखी उद्रेकत पृथ्वीच्या कवचास वारंवार बदलत राहिले. यातून हवेत सातत्याने विविध प्रकारचे धातूबाष्प जात रसायनी बाष्पाचे ढग बनत पृथ्वीवर रसायनी वर्षा करू लागले. खोलगट भाग अशा पाण्याने भरत गेले व समुद्र बनले. समुद्राचे तळ विस्तारत जात महासागरही बनले तर उचलली गेलेली भूपृष्ठे पर्वतरांगा. तरीही पृथ्वी स्थिर नव्हती. जीवाचे आगमन व्हायला अजून अवकाश होता. वातावरण क्रमाक्रमाने साखळीसारखे बदलत होते. या उद्रेकी काळातही पृथ्वीवर आद्य जीव अवतरले. त्यांना जगण्यासाठी ऑक्सिजनची गरज नव्हती. पण अडीच अब्ज वर्षापूर्वी पुन्हा वातावरण बदलत गेल्याने तत्कालीन सूक्ष्म जीवांचा मोठ्या प्रमाणावर (८०%) विनाश झाला. त्यानंतर ऑक्सिडेशन प्रक्रियेमुळे वेगळ्या प्रकारच्या जैव प्रजाती निर्माण होऊ लागल्या. त्यात भूचरही होते व यांचे अवयव विकसित झाल्याने ते आकाराने मोठेही होते. ही उत्क्रांती व्हायला जवळपास एक अब्ज वर्ष खर्ची पडली. त्यानंतर वातावरण आजच्या सारखे होऊ लागल्यानंतर आले महाकाय प्राण्यांचे युग. पण सहासष्ट कोटी वर्षांपूर्वी हेही युग संपुष्टात आले. अशा रीतीने सजीव निर्मितीपासून ते आजपर्यंत पाच वेळा पृथ्वीवर महासंहार झालेला आहे असे विज्ञान मानते. या काळात पृथ्वी आणि वातावरण हेही क्रमश: बदलत राहिले.
मनुष्य या धरतीवर आद्य स्वरूपात अवतरला तो चिम्पान्झी किंवा बोनोबो या प्राणी-प्रशाखेतील एक घटक म्हणून. सत्तर कोटी वर्षांपूर्वी ही प्रशाखा पृथ्वीवर अवतरली असे साधारणपणे मानले जाते. तत्कालीन मानवसदृश्य प्राण्यात आणि त्या प्रकारच्या अन्य जीव शाखांत विशेष फरक होता असे नाही. पण या मानवसदृश्य जीवाचेही अनेक प्रकार असून त्यात उत्क्रांती होत गेली. आजच्या होमो सेपियन प्रजातीच्या आधी निएन्दरथल ही प्रजाती अस्तित्वात होती आणि तीही प्रगत होती. त्याच्या राहण्याच्या जागा, दगडी हत्यारे, अलंकार इत्यादी गोष्टी त्याचे पुरावे आहेत. त्याचे स्वरयंत्र विकसित असल्याने त्याचीही काहीतरी भाषा असावी. त्याच्या उपलब्ध असल्याचा आजपर्यंत सापडलेला सर्वात जुना पुरावा साडेचार लाख वर्ष इतका जुना आहे. त्याहीपूर्वी तो अस्तित्वात असू शकेल. आजपासून चाळीस हजार वर्ष पूर्वीपर्यंत या मानव प्रजातीने पृथ्वी व्यापली होती. पण त्याच्या उत्कर्षकाळात साधारणपणे दीड लाख वर्षांपूर्वी होमो सेपियन या प्रजातीचा उदय झाला. पण निएन्दरथल मानव या नव्या स्पर्धक प्रजातीशी स्पर्धा न करता आल्याने कालौघात नामशेष झाला, कि त्याचा आणि आजच्या मानवाच्या पुर्वजांचा संकर झाला कि काही अन्य प्राकृतिक कारणांमुळे तो समूळ नष्ट झाला या बाबत अनेक सिद्धांत असले तरी आजच्या मानवात अल्पांश का होईना निएन्दरथल मानवाची जनुके सापडली असल्याने संकर झाला होता पण ते त्याच्या नष्ट होण्याचे कारण नसावे असे मानले जाते. होमो सेपियन हा अधिक प्रगत असल्याने त्याने पृथ्वीवर अवतरल्यापासून स्वत:चे विश्व तर बनवलेच पण अनेक शोध लावत जगण्याच्या दिशा बदलल्या. पण जीव नष्ट होण्याची प्रक्रिया याही काळात सुरूच राहिली. शेवटच्या हिमयुगानंतर काही प्रजातीबरोबरच महाकाय केसाळ हत्ती पूर्णतया नष्ट झाले. मनुष्य मात्र स्थलांतरे करून का होईना या स्थितीवर मात करू शकला. शेवटचे हिमयुग वीस हजार वर्षांपूर्वी संपले. यानंतर होमो सेपियनने अवघ्या दहा हजार वर्षात शेतीचा शोध लावला. आपली समाजव्यवस्था बनवली. धर्म अस्तित्वात आले तसे तत्वद्न्यानही. ही उत्क्रांती होती कि या माणसाच्या मेंदूतच अचानक रसायनी बदल झाल्याने झालेला तो बुद्धीचा उद्रेक होता याबद्दल सांगता येणे अशक्य आहे.
पण जगभरच्या मनुष्याच्या मनात बसलेली एक साधारण संकल्पना म्हणजे जगबुडीची संकल्पना. प्रत्येक जमातीत, धर्मात (अपवाद जैन धर्म) सृष्टीच्या निर्मितीच्या जशा अद्भुतरम्य संकल्पना आहेत तशाच जगाच्या किंवा मनुष्य जातीच्या अंताबाबतही आहेत. वैद्न्यानिकही त्याला अपवाद नाहीत. विश्व महास्फोटातून निर्माण झाले आणि महाआकुंचनाने नष्ट होणार आहे हा आजच्या जगातील लोकप्रिय सिद्धांत आहे. स्टिफन हॉकिंग्ज या विश्वविख्यात शास्त्रज्ञाने येत्या शंभर वर्षात एकतर मानवजातीला परग्रहावर रहायला जावे लागेल किंवा मानवजातच नष्ट होईल असे भाकीत वर्तवले होते. त्यांच्या भाकितामुळे जगभर खळबळ उडणे स्वाभाविक होते.
खरे तर कधी ना कधी मानवजात नष्ट होणार आहे ही कल्पना अगदी अनेक धर्मशास्त्रांतही प्राचीन काळापासून येत आलेली आहे. जलप्रलय ही सर्वात जुनी कल्पना. पृथ्वीतलावर पाप वाढले की जलप्रलय येतो व मनुष्य व अन्य प्राणीजात नष्ट होऊ लागते. पण प्रभुच्या कृपेने मनू किंवा नोहाची नौका काही भाग्यवंतांना वाचवते व जीवनाचे रहाटगाडगे पृथ्वीवर पुन्हा सुरू राहते अशी ती कल्पना आहे. "कयामत का दिन..." अमूक अमूक आहे अशा घोषणा अधून मधून होतच असतात. काही वर्षांपूर्वी माया कॅलेंडरचा आधार घेत पृथ्वी निबिरु नामक एका ग्रहाला धडकणार असून त्यात प्रचंड सुनामी येत मानवजात नष्ट होईल असे भाकीत वर्तवण्यात आले होते. ही घटना २१ डिसेंबर २०१२ रोजी घडणार असेही ठामपणे सांगण्यात आले होते. याचा परिणाम म्हणे असा झाला की चीनमधील एका माणसाने आधुनिक नोहाची नौकाच बनवली. अर्थात असे काही न घडल्याने हा आधुनिक नोहा निराश होण्यापलीकडे काही झाले नाही. अशा अनेक भविष्यवाण्या झाल्या आहेत, लोक घाबरलेले आहेत आणि काही तर "आता मरणारच आहोत तर आहे ते विकून मौजमजा करून घ्या!" म्हणत जीवनाला नसले तरी सर्वस्वाला मुकले आहेत. आपल्याकडेही १९७९ मध्ये अमेरिकेची अवकाशातील स्कायलॅब कोसळण्याने सर्वच नष्ट होणार या बातमीने हाहा:कार उडवला होता हे अनेकांच्या स्मरणात असेल. अनेकांना असे भय पसरवण्यात कदाचित विकृत आनंद होत असेल. कडव्या धार्मिक लोकांचा यात सर्वात मोठा वाटा असला तरी जीवसृष्टीचे नष्ट होणे ही निव्वळ कवीकल्पना नाही हे आपण पृथ्वीच्या निर्मितीपासून जे जीवसृष्टीचे महासंहार खरेच होऊन गेले आहेत यावरून पाहिले आहे.
मानवाच्याच अनेक पूर्वज शाखा नष्ट झालेल्या आहेत तेंव्हा आताचा होमो सेपियन अमरपट्टा घेऊन विकसित झाला आहे असे काही मानण्याचे कारण नाही. आताच पृथ्वीतलावरील अनेक प्रजाती मानवी चुकांमुळे किंवा नैसर्गिक कारणामुळे नष्ट होण्याची प्रक्रिया सुरूच आहे. जगबुडी येईल किंवा महाआकुंचन होऊन सारे विश्वच नष्ट होत मुळ शून्यावस्थेत जाईल या तर फार दूरच्या कल्पना आहेत. मुख्य बाब अशी कि आजच्या मानवापेक्षा एखाद्या प्रगत मानव प्रजातीचे अवतरण पृथ्वीवर होऊ शकते आणि आजचा मानव विश्वाआधीच नामशेष होऊ शकतो ही शक्यता नाकारण्याच्या कोटीतील नाही. त्यामुळे मानवी गर्व, अहंकार व निसर्गाकडे पहायच्या बेफिकीर प्रवृत्तीवर आळा घालता आला पाहिजे. परमेश्वर आहे कि नाही या प्रश्नाचे उत्तर शोधत बसण्यापेक्षा प्रकृती मात्र आहे व ती अनुभवगम्य आहे याचे भान ठेवले पाहिजे. प्रकृतीची निर्माती कोणतीतरी अचिंत्य शक्ती आहे आणि ती आपल्याला वाचवेल या भ्रामक कल्पनांत अर्थ नाही.
-संजय सोनवणी
No comments:
Post a Comment