Friday, July 8, 2022

दुष्काळ: त्यांचा आणि आपला

 

दुष्काळांचे सत्र जगभरात कोठे ना कोठे सुरूच असते. प्रश्न असतो एवढाच कि त्या स्थितीला तेथील लोक आणि सरकारे कशा पद्धतीने हाताळतात हा. भारताला दुष्काळ नवे नाहीत. ओलेआणि सुके सत्र आलटून पालटून येते हा अनुभवही नवा नाही. सिंधू संस्कृतीच्या परिसरात, म्हणजे 252 लाख चौरस किलोमीटर क्षेत्रात सलग दुष्काळामुळे बारमाही वाहणाऱ्या नद्या फक्त मौसमी नद्या बनल्या आणि एका प्रगत संस्कृतीचा ऱ्हास सुरू झाला. महाराष्ट्रात इसवी सनाच्या दहाव्या शतकानंतर दुष्काळांची रांगच लागली. १०२२ साली फार मोठा दुष्काळ पडला. १३९६ ते १४०८ या काळात सलग पडलेल्या दुष्काळाला अतिभीषण मानले जाते. तो दुष्काळ इतिहासात दुर्गाडीचा दुष्काळ म्हणून प्रसिद्ध आहे. या दुष्काळात स्थिती एवढी भिषण होती कि गांवेचा गांवे ओस पडली. लाखो जनावरे, माणसे अन्न-पाण्याअभावी या दुष्काळात मरण पावली. लोक झाडांच्या साली, म्रुत जनावरे खावु लागली. शेवटी वेळ अशी आली कि माणसे मृत माणसांनाही खावु लागली.  १५९६ सालीही असाच भिषण दुष्काळ भारतभर पडला होता. अबुल फजल लिहितो कि "माणुस माणसाला खात होता आणि लहान मोठे रस्ते प्रेतांनी बंद केले होते."  त्यानंतरही १७व्या शतकात पडलेल्या लहान-मोठ्या बारा दुष्काळांचे वर्णन मोरल्यंड या संशोधकाने केले आहे. त्यात सर्वात मोठा दुश्काळ होता १६३० सालचा. हा त्यंत उग्र स्वरुपाचा असुन या दुष्काळाबद्दल व्ह्यन ट्विस्ट हा डच व्यापारी लिहितो:


 "
पाउस इतका अल्प पडला कि पेरणी केलेले बी वाया तर गेलेच, पण गवतही उगवले नाही. गुरे ढोरे मेली. शहरांतुन आणि खेड्यांतुन, शेतात आणि रस्त्यांवर प्रेतांच्या राशी पडल्याने इतकी दुर्गंधी सुटली रस्त्यावरुन जाणे भयावह होते. गवत नसल्याने गुरे-ढोरेही प्रेतेच खावु लागली. माणसे प्राण्यांची प्रेते खायला येवु लागली. दुष्काळाची तीव्रता वाढु लागली तशी माणसे शहरे व खेडी सोडुन निराशेने दाही दिशा भटकु लागली....जेथे जावे तेथे प्रेतांशिवाय आम्हाला काहीच दिसत नव्हते..."पुरुष बायका-मुलांना टाकुन जात होते. स्त्रिया स्वत:ला गुलाम म्हणुन विकुन घेत, आया बालकांची विक्री करत. काही कुटुंबांनी विष प्राशन करुन एकत्रीत म्रुत्युला कवटाळले....माणसांचे मांस उघडपणे बाजारात विकले जात होते..." आताही दुष्काळांचे चक्र असतेच. शेतीचे जे काही नुकसान व्हायचे ते होतेच. पण आपण त्यापासून काही शिकलो आहोत असे दिसत नाही.

 

गेले एक दशक कॅलिफोर्निया या अमेरिकेतील राज्यात भिषण दुष्काळ पडलेला आहे. जानेवारी २०१५ मद्ध्येच कॅलिफोर्नियाच्या गव्हर्नरांना दुष्काळी आणिबाणी जाहीर करावी. मधली दोनेक बरी वर्ष सोडली तर आताही दुष्काळ आहे. ओसंडुन वाहणा-या नद्या प्रचंड आक्रसलेल्या आहेत. धरणांतील जलसाठेही सुकले आहेत. भूजलपातळी खालावल्याने खाजगी विहिरींनीही तळ गाठलेला आहे. खरे म्हणजे कॅलिफोर्निया हे अमेरिकेतीलच नव्हे तर जगातील महत्वाचे शेतमाल-फळफळावळ उत्पादक राज्य आहे. आपणही कोकणचा कॅलिफोर्निया करु अशी स्वप्न पाहत होतो हे आठवत असेलच. आज तोच कॅलिफोर्निया भकास-ओसाड झाला आहे. प्यायच्या पाण्याचेही दुर्भिक्ष आहे. वन्य जीवनावरही या दुष्काळाने भयानक परिणाम केलेला आहे. कॅलिफोर्नियातील हा गेल्या चारशे वर्षातील सर्वात जीवघेणा दुष्काळ आहे असे तज्ञ म्हणतात. यंदाही दुष्काळ संपेलच याची आशा हवामानतज्ञांना नाही. पण कॅलिफोर्निया सरकारने जे उपक्रम राबवले त्यामुळे दुष्काळ किमान सुसह्य तरी झाला आहे. ते उपक्रम असे-

 
१) सांडपाण्यावर पुनर्प्रक्रिया करून ते शेतीयोग्य बनवणे. कॅलिफोर्नियात मोठ्या प्रमाणावर सांडपाणी प्रक्रिया करुन समुद्रात सोडण्यात येत होते, ते आता समुद्रात सोडून न देता शेतीकडे वळवण्यात येत आहे. आम्ही मुळात सांडपाण्यावर प्रक्रियाच करत नाही किंवा केली तरी ती तोंडदेखली असते. शेतीसाठी त्याचा वापर तर दूरची गोष्ट झाली. आपल्याला नदी-नाल्यांत सोडले जाणा-या सांडपाण्याचे शुद्धीकरण करावेच लागणार आहे.

२) पीकपद्धतीत बदल : कोणत्या प्रकारच्या पीकांना किती पाणी लागते याचा अभ्यास करून पाणीपिऊ पीके बंद करण्याचा अथवा क्षेत्रबंदीचा निर्णय. ज्यांना ही पीके घ्यायचीच आहेत त्यांच्यावर अवाढव्य जलकर लावण्यात आला आहे. कॅलिफोर्निया राज्य हे बदामांचे मोठे उत्पादक आहे. ही झाडे कॅलिफोर्नियातील उपलब्ध पाण्यापैकी १०% पाणी पितात. अशी काही इतर अनेक पीके आहेत. सर्वच पीकांचे नीट नियोजन करणे, काही पीके घेणे बंद करत पर्यायी पीकांकडे जाण्याचे त्यांनी नियोजन केले आहे. नागरिकांनीही आपल्या खाद्य सवयीही बदलाव्यात यासाठी प्रबोधन केले जात आहे. आपल्याकडे. ७०% पाणी पिणा-या उसाबाबतच आमची भुमिका धड नाही. उसाला पर्याय असुनही ते वापरले जात नाहीत. द्राक्षे, मोसंबी ईत्यदिबद्दल तर भुमिकाच नाही. आम्हाला प्रत्येक विभाग, त्यातील पाण्याची एकंदरीत उपलब्धता याचा शास्त्रीय अंदाज घेतच पीकनियोजन करावे लागणार आहे.

३) बाटलीबंद पाणी देणा-या कंपन्यांविरुद्ध कठोर उपाययोजना. नेस्लेसारखी कॅलिफोर्नियातील सर्वात अवाढव्य कंपनी आहे व तिच्या अनिर्बंध पाणीवापरावर (म्हणजेच पाणीचोरीवर) कोणी पुर्वी लक्ष देत नव्हते. आता मात्र कायद्याचा बडगा कठोर करण्यात आला आहे. बाटलीबंद पाण्यावरच निर्बंध आणले गेले आहेत. विशेष म्हणजे नेस्लेनेही या निर्बंधांचे स्वागतच केले असून आम्ही मर्यादेत राहून आमच्या प्लांट्समद्धे पाण्याचे वाया जाण्याचे प्रमाण किमान मर्यादेत करू असे लेखी अभिवचन सरकारला दिलेले आहे. असे असले तरी नेस्लेचे राज्यातील सर्व प्लांट बंद करावेत यासाठी जनमताचा रेटा वाढत आहे. आपल्याकडेही अशा निर्बंधांची तातडीने गरज आहे.


४)  घरगुती व घरबागेसाठी पाण्याच्या वापरावर निर्बंध, प्रतिमाणसी किती ग्यलन पाणी पुरवले जाईल याचा निश्चित आराखडा व त्याप्रमाणेच पुरवठा. कॅलिफोर्निया वॉटर बोर्डाचा सर्वात महत्वाचा नागरिकांना आदेश म्हणजे थेब थेंब पाणी वाचवा. पाण्याबाबतची आपली जीवनशैली प्रत्येकाने बदलावी यासाठी विशेष अभियान राबवले जात आहे. या सा-या प्रयत्नांमुळे ३२.९% पाणी वाचवता आले जे एक कोटी नागरिकांना वर्षभर पुरू शकते.

अमेरिका हे जगातील सर्वात तंत्रप्रगत राष्ट्र आहे तरीही दुष्काळावर मात करण्याचे मार्ग म्हणजे उपलब्ध पाणी काटकसरीने वापरणे, सांडपाणी पुन्हा वापरात आणने हेच उपाय त्यांनाही महत्वाचे वाटतात. पाणी कृत्रीमरित्या तयार करता येत नाही. बर्फवृष्टी अथवा पर्जन्य आपल्या हातात नाही. कॅलिफोर्नियासारख्या शेतीप्रगत राज्याला पाणी काटकसरीने वापरायची बुद्धी फार लवकर झाली. आमच्याकडे आजवर दुष्काळाच्या एवढ्या रांगा लागून गेल्यात पण आम्हाला पाण्याचे महत्व अजुनही समजलेले नाही. दुष्काळ आमच्या पाचवीला पुजलेला असुनही आमचे डोळे अद्यापही उघडलेले नाहीत. कॅलिफोर्नियासारखा सलग दहा वर्षाचा दुष्काळ आमच्या वाट्याला आला तर महाराष्ट्र ओस पडेल यात शंका नाही. स्वत: पाणी नियंत्रणात तर वापरावेच पण व्यापक जलधोरण असलेच पाहिजे व ते पाणीमाफिया, उसमाफियांच्या कचाट्यात जाणार नाही याची काळजी घ्यावी. आम्हाला स्वप्रतिभेने उपाय शोधता येत नसतील तर किमान दुस-यांचे आदर्श तरी घेतले पाहिजेत.
 
यंदाचा मान्सून चांगला जाईल या आशेवर बसणे मुर्खपणाचे आहे. पावसाळा चांगला जाओ कि वाईट...आम्हाला जणू दुष्काळच आहे असे समजत पाण्याचे नियोजन करावे लागेत तरच दुष्काळी वर्षेही आम्ही धडपणे निभाऊन नेवू.

 

-संजय सोनवणी 


(Published in Navshakti)

No comments:

Post a Comment

वंचितांचे अर्थशास्त्र आणि आपली मानसिकता

  वंचितांची व्याख्या बव्हंशी आर्थिक आधारावर केली जाते. सरकारला आपली धोरणे ठरवण्यासाठी ही व्याख्या पुरेशी ठरत असली तरी वंचिततेचे सामाजिक नि...