Saturday, August 27, 2022

धर्म आणि भयाची बाजारपेठ

  


 धर्म हा आजही कळीचा मुद्दा बनलेला आहे. जगभरचे संघर्ष, युद्धे, वैचारिक वादळे ही सारी अंतत: धर्म या मुलभूत मुद्द्याशी येऊन भिडताना दिसतात. धर्माचा इतिहास अतिप्राचीन आहे. किंबहुना मनुष्य प्राणी या भूतलावर अवतरला तेंव्हापासून जगभर धर्मकल्पनांची बीजे रोवली गेली. पुरातन मानवाने आपली बुद्धी पणाला लावत शिकारीसाठी जशी दगडां-गारगोट्यापासून हत्यारे बनवायला सुरुवात केली, खाद्यक्रिया सोपी व्हावी व जंगली प्राण्यांना दूरही ठेवता यावे यासाठी अग्नी शोधला. पुरातन मानव आजच्या मानवाएवढाच प्रतिभाशाली होता. सारे शोध गरजेतून लागत असतात आणि प्रत्येक काळातील माणसांची मानसिक गरज वेगळी असल्याने शोधही त्या वृत्तीला अनुरूप असेच लागत गेले. या शोधांची व्याप्ती वाढत वाढत आजवरच्या आधुनिक तंत्रयुगातील जीवन सुसह्य करू शकणा-या साधनांपर्यंत वाढत गेली आहे. हे शोध म्हणजे मानवाच्या ऐहिक व मानसिक गरजा होत्या. ऐहिक शोध हे बाह्य जीवन सुसह्य करण्यासाठी होते. सुरक्षेसाठी व सहज सोप्या जीवनयापनासाठी त्याला या शोधांची निकड भासली. पण केवळ तेवढ्याने भागणारे नव्हते. मानसिक गरजा याही अंगभूत प्रेरणांमधून जन्म घेतात.  आणि माणसाची ही प्रेरणा होती त्याला वाटणारी व अनुभवालाही येणारी जीवनातील असुरक्षितता, अनिश्चितता, आणि मृत्यू. तो या भयांनी गजबजलेला असतानाच टोळीचे सातत्य व संख्या वाढवण्यासाठी अधिकाधिक संतती ही त्याची गरज जशी होते तसेच जननक्रियेबद्दल गुढात्मक कुतूहलही होते. त्यावर कल्पना लढवत त्याने जेजे प्रेयस आहे व जेजे भयदायक आहे त्याला दैवतप्रतिष्ठा द्यायला सुरुवात केलीये. स्त्री अपत्य देते या जाणीवेतून मातृपुजेचा (योनीपुजेचा) आरंभ झाला. मृत्यूच्या अपार भयातून मृतांचे दफनविधी होऊ लागले. मृत्योत्तर जीवन असले पाहिजे ही कल्पना करून मृतासोबत ऐपतीप्रमाणे मृताला मरणोत्तर जीवनात कामाला येतील अशा त्याच्या प्रिय वस्तू व प्राणीही दफन केले जाऊ लागले. अशी पुरातन अनेक दफने जगभर मिळालेली आहेत.  दैनंदिन जीवन शत्रू, नैसर्गिक आपत्ती व हिंस्त्र प्राण्यांपासून सुरक्षित राहता यावे व खाद्य प्राण्यांची मात्र मुबलक शिकार मिळावी यासाठी त्याने शस्त्र जशी शोधली तशाच संरक्षक व अन्नदात्या देवतांच्या मूर्त किंवा अमूर्त प्रतीकांच्या कल्पना करून त्यांचीही पूजा सुरु केली. मनुष्य नेहमीच कल्पक होता. पुढे मृतांची दफनस्थळे भव्य वास्तूसमान बनू लागली. सामान्य टोळीवाले भव्य शिलावर्तुळांचा वापर दफनासाठी करू लागले. इजिप्तचे पि-यामिड ही दफनस्थानेच आहेत. काही दफनस्थळांच्या रचना तर आजही कोड्यात टाकणा-या आहेत. मृत्यूचे अनावर भय आणि मृत्योत्तर जीवनाची आशा हे आद्य धर्माचे कारण बनले. आजही धर्म असो कि मुलभूत विज्ञान, त्याचा मुख्य हेतू कोणत्या ना कोणत्या भयावर अथवा असुरक्षिततेवर मात करणे हाच राहिला आहे. शासनसंस्था, कायदेसंस्था, समाजसंस्था इत्यादी बाबींची निर्मितीही किमान सुरक्षितता मिळावी हाच राहिला आहे.

 

पण प्राचीन काळी लोकांनी देवतांचा व मृत्योत्तर जीवनाचा शोध लावला कारण ती त्यांची प्राथमिक मानसिक गरज होती. सनातन भयावर तो एक उतारा होता. माणसाच्या प्रतीभेचीही ती परिणती होती. त्यातूनच पुढे आपण अजरामर नसलो तरी आपल्या देवता अमर आहेत किंवा प्रचंड दीर्घायू आहेत हे कल्पना आली व शेवटी आपणच देवतांच्या आराधनेने अति-दीर्घायू किंवा अमर बनू शकतो ही कल्पना जन्मली. भारतात तपाच्या सहाय्याने हजारो वर्ष जगलेल्या साधूंच्या कथा जशा प्रेषित झाल्या तशाच सप्तचिरंजीवांच्या कथाही जन्माला आल्या. आजही हिमालयात शेकडो वर्ष जगणारे साधू हा चर्चेचा विषय असतोच. कोणीतरी पुण्यवान अमर झाला हे एक मानसिक समाधान तर होतेच पण स्वत:लाही तो एक प्रेरक घटक होता. पुण्य कसे मिळेल हा त्याचा प्रश्न त्यानेच सोडवला. चांगले वागणे म्हणजे पुण्य व वाईट-समाजविघातक वागणे म्हणजे पाप यातूनच देवतांना संतुष्ट करणे म्हणजे पुण्य व देवतांचा कोप ओढवून घेईल असे अवमानास्पद कृत्य म्हणजे पाप. या कल्पना समांतर विकसित होत गेल्या व आद्य धर्मांनी आपापल्या नैतिक धारणा ठरवल्या. यामागेही “भय” हा घटक कार्यरत राहिला असे आपण पाहू शकतो. जगातील सर्व तत्वद्न्यानेही या विश्वाचा, या जगण्याचा हेतू काय, ईश्वराचे स्वरूप काय याभोवती फिरत राहिलेली आहेत.

 

भयाच्या आत्यंतिक कल्पनेतून प्रतिक्रियात्मक मानसिक क्रिया होणे क्रमप्राप्तच होते. कोणाचे देव श्रेष्ठ हे ठरवण्यासाठी झालेल्या युद्धांचा इतिहासही पुरातन आहे. भयाची परिणती अनेकदा उन्मादी भावनेत होते. भयावर मात करण्यासाठी शोधलेला आपला धर्मच इतरेजनांत भय निर्माण करण्यासाठी वापरला जातो. वर्चस्वाची कल्पना भयभीत लोकांतच आधी जन्माला येते. राजसत्तेपासून या वर्चस्ववादाची सुरुवात होते. जगात नंतर धर्म बदलले, आदिम देवता तर अनेकवेळा बदलल्या, विस्मरणातही गेल्या. खरे तर अगणित देवतांचा मानवी इतिहासात मृत्यू होऊन गेला आहे. वैदिक धर्मात एकट्या ऋग्वेदातच पाचशेच्या वर देवता आहेत. आज त्यातील एखाद-दुसरी सोडली तर बाकी कोणाच्या लक्षातही नाही. भारतात आदिम काळापासून अनेक देवतांचा उदय झाला आणि त्याही नष्ट झाल्या. कुशाणकाळातच पूजनीय असलेल्या असुर-असुरकन्या, विशाख, राक्षस-राक्षसी, अनाहिता, ऐरोदतीसारख्या अनेक देवता आज हिंदू धर्मात मृतवत झालेल्या आहेत. ग्रीक-रोमन देवतांचेही तेच झाले. देवतांनाही मृत्यू असतो हे इतिहासानेच सिद्ध केले आहे. या देवता आता पुराकथांमध्ये स्थान ठेवून असल्या तरी त्यांना कोणी वाईट म्हटले तर जगातील कोणाच्याही भावना दुखावत नाहीत. पण या देवतांमुळे अनेक युद्धेही झालेली आहेत एवढा अहंकार आपापल्या इष्ट देवतांबद्दल होता. आजही तेच अहंकार कायम आहेत फक्त दैवते बदलली आहेत. जी टिकली त्यांची मूळ चरित्रे एवढी बदलली गेली आहेत कि मूळ रूपाचा अंदाजही लागू नये. हाही देवतांचा मृत्यूच कि!

 

पण धर्मांचा उपयोग भयावर मात करण्यासाठी होतच राहिला आहे. दुस-यांत भय निर्माण करणे हाही स्वाभाविक हेतू त्यांचा बनलेला आहे. धर्माच्या नावावर जेवढी हिंसा झाली, जेवढे शोषण झाले त्याला इतिहासात तोड नाही. भयावर मात करण्यासाठी निर्माण केला गेलेला धर्म हाच भयाचे कारण झाला. आमचेच तत्वज्ञान व संस्कृती कशी श्रेष्ठ आणि पुरातन आहे हे सांगण्याची स्पर्धा तर जगभरचीच.

 

पण मुख्य हेतू होता भयावर मात करणे हा. ते शक्य झाले आहे काय या प्रश्नाचे उत्तर आजही “नाही” असेच आहे. अलीकडच्याच कोरोनाच्या जागतिक साथीच्या दरम्यान या भयाचा उद्रेक किती चहुअंगाने झाला होता हे आपण अनुभवले आहे. जीवनातील असुरक्षितता, मृत्यू कधीही आणि कसाही येऊ शकतो या जाणीवेने मनुष्य आजही ग्रासलेला आहे. शास्त्रज्ञही माणसाला अमर बनवता आले नाही तरी त्याला दीर्घायू कसे करता येईल या संशोधनांमध्ये व्यस्त आहेत.  बुवा-बापूचे पीक आले आहे. मन:शांती कशी साधता येईल, अधिकाधिक यश कसे मिळवता येईल, सुखाची प्राप्ती कशी होईल आजारांवर कशी मात करता येईल इत्यादि बाबींवर प्रवचने झोडणारे, सत्संग चालवणारे, योगाभ्यासाचे अनभ्यासी धडे देणारे आज उदंड झाले आहेत. भयाची बाजारपेठ अवाढव्य होती व आहे. आता या भयातून उत्पन्न झालेल्या भयाचे काय करायचे हा प्रश्नच आहे!

-संजय सोनवणी

No comments:

Post a Comment

वंचितांचे अर्थशास्त्र आणि आपली मानसिकता

  वंचितांची व्याख्या बव्हंशी आर्थिक आधारावर केली जाते. सरकारला आपली धोरणे ठरवण्यासाठी ही व्याख्या पुरेशी ठरत असली तरी वंचिततेचे सामाजिक नि...