Friday, September 2, 2022

जोरावरसिंगाची तिबेट स्वारी!


तिबेटशी भारताचे संबंध पुरातन आहेत. भारतातील अनेक महत्वाच्या नद्याही तिबेटमध्येच उगम पावतात तर मानसरोवर हे गोड पाण्याचे तर राक्षसताल हे खा-या पाण्याचे विशाल सरोवर आणि कैलास पर्वत ही हिंदूंची पूज्य स्थाने तिबेटमध्येच आहेत. कैलास पर्वत अष्टापाद म्हणूनही ओळखला जातो. जैन धर्माचे संस्थापक ऋषभनाथ यांचे महानिर्वाण याच ठिकाणी झाले अशी जैन धर्मीयांची श्रद्धा आहे. भारत देशाचे नाव ज्याच्यावरून पडले ते ऋषभनाथांचे पुत्र भरत यांनीही हा प्रदेश जिंकला होता व ७२ जिनालये स्थापन केली होती अशी माहिती जैन पुराणांमध्ये मिळते. महाभारत काळापासून या प्रदेशाशी राजकीय व सांस्कृतिक संबंध असल्याचे उल्लेख आपल्याला मिळतात. साधारणपणे आठव्या शतकात येथे काश्मीरमधून बौद्ध धर्म गेला. तिबेट तत्कालीन महासत्ता असल्याने व्यापारी मार्गावर त्याचे स्वामित्व होते. पण काश्मीरचा सम्राट ललितादित्य मुक्तापीडाने आठव्या शतकात तिबेटचा भाग असलेला लदाख काश्मीरला जोडून घेतला, पण हा ताबा फार काळ राहू शकला नाही. नंतर लदाख अनेक सत्तांमध्ये विभाजित असले तरी स्वतंत्र झाले.   

तिबेटने आपल्या वर्चस्व काळात नेपाळवरही अनेकदा स्वामित्व मिळवले व तेथून भारतात जाणा-या व्यापारी मार्गांवर अधिसत्ता निर्माण केली. नेपाळ मधील अनेक व्यापारी व कारागीर ल्हासा येथे स्थायिक झाले व तेथे आपल्या वसाहती वसवल्या. या लोकांना आता ‘ल्हासा नेवा’ असे म्हणतात. लोककथेनुसार संघ सार्थ अजू हा पहिला नेपाळी व्यापारी होता जो ल्हासाला पोहोचून व्यापार सुरु केला. हे व्यापारी नेपाळ, बंगाल आणि तिबेटमध्ये पुरातन व्यापारी मार्गांनी माल वाहतूक करत व्यापार करत. मोगल काळातही तिबेटशी भारताचे व्यापारी संबंध होते. ल्हासा आणि दिल्लीमध्ये अनेक व्यापारी करारही झाले. तिबेटशी व्यापारी हितसंबंध असणे आसपासच्या सर्व सत्तांना महत्वाचे वाटत होते.

लदाख अनेक शतके स्वतंत्र राहिल्यानंतर १८३८ मध्ये डोग्रा सेनापती जोरावरसिंगने सुरु दरीतून ऐन हिवाळ्यात लदाखवर हल्ला करून लदाख जिंकून घेतले. लेह येथे राजवाडाही बांधला व तेथे संरक्षणाची व्यवस्थाही केली. काश्मीरच्या राजा गुलाबसिंगांच्या ताब्यात अशा रीतीने लदाख आला व तेथून मध्य आशिया व ल्हासाला जाणारे व्यापारी मार्गही कब्जात आल्याने तो व्यापारही जम्मू-काश्मीरच्या नियंत्रणाखाली आला. तिबेटच्या मयुम खिंडीपर्यंतचा भाग लदाखचाच हिस्सा आहे असे नामग्याल राजाने सांगितले. ती खिंड व्यापारी मार्गावरील महत्वाची जागा असल्याने तिबेट लडाखची व्यापारात अनेकदा कोंडी करतो हे वास्तवही विषद केले. हे ऐकल्यावर जोरावरसिंगाने तिबेटवर धावा बोलून जायचे ठरवले.

जोरावरसिंगचा जन्म सप्टेंबर १७८४ चा. तो मुळचा हिमाचल प्रदेशातील पण त्याचा परिवार जम्मूला स्थलांतरीत झाला होता. पराक्रमी असल्याने हा पुढे महाराजा रणजीतसिंघ या पंजाबच्या आणि गुलाबसिंग या जम्मूच्या राजाचा सेनापती बनला. लदाख, गिलगीट-बाल्तीस्तान जिंकून काश्मीरच्या सीमांचा विस्तार करून सारे महत्वाचे व्यापारी मार्ग अधिपत्याखाली आणल्याने त्याची प्रतिष्ठा खूप वाढलेली होती. तिबेटवर स्वारी करणे आणि तीही अलंघ्य प्रदेशातून लदाखपेक्षा अधिक उंचावर असलेल्या भागात अत्यंत विपरीत वातावरणात हे फार मोठे साहसाचे काम असणार होते. पण साहसी जोरावरसिंगाने ती कामगिरी पार पाडायचे ठरवले.

पण ही स्वारी करायची तर तशीच तगडी व्यूहरचना आखायला हवी होती. जोरावरसिंगाने आपल्या सेनेचे तीन भाग केले. १८४१ साली लदाखचा राजपुत्र नोनो सुन्ग्नाम याच्या नेतृत्वाखालील फौज त्याने सिंधू नदीच्या काठाने पाठवायचे ठरवले. गुलाम खान या सेनानीच्या नेतृत्वाखालील फौज कैलास पर्वतराजीच्या बाजूने (सिंधू नदीच्या दक्षिण बाजूने) पाठवायचे ठरवून स्वत: पेंगोंग तळ्याच्या बाजूने तिबेटमध्ये घुसायचे ठरवले. तिबेटी सैनिकी चौक्या कोठे आहेत याची त्याने आधीच माहिती काढली असल्याने ही व्यूहरचना केली गेली. तीनही बाजूंनी वाटेत असलेल्या तिबेटी चौक्यांना उध्वस्त करत तीनही सेना गारटोक या व्यापारी केंद्राजवळ जमा झाल्या आणि तेथील सैन्याचाही मिळून पराभव केला. तेथील तिबेटी सेनानी पळून गेला तो थेट तक्लकोट येथील किल्ल्यात जाऊन लपला.

जोरावरसिंग वादळी वेगाने सैन्यासह तक्लकोट किल्ल्याजवळ पोहोचला. हा किल्ला नेपाळपासून फक्त पंधरा मैल इतका जवळ आहे. आपल्यावरही स्वारी होईल कि काय या भीतीने नेपाळी सेनाही मागे सरकली. ६ सप्टेंबर १८४१ रोजी जोरावरसिंगने त्या किल्ल्यावर हल्ला सुरु केला. या युद्धात तक्लकोट किल्ला उध्वस्त झाला. जोरावरसिंगाचा विजय झाला. या विजयाचा वृत्तांत चीनी कागदपत्रातही आढळतो. ल्हासा येथे असलेला चीनी प्रतिनिधी लिहितो कि “एक हजार तिबेटी सैन्य तक्लकोट किल्ल्याच्या वाटा अडवायला जवळच्याच खिंडीजवळ ठेवण्यात आले होते. पण ते डोग्रा सैन्यापुढे टिकू शकले नाही. ते घाबरून पळून गेले. तेथील सैन्याच्या भेकडपणामुळे किल्ल्यातील तिबेटी सैन्यही पळून  गेले असून आता वाचले ते मयुम खिंडीच्या पायथ्याला आलेले आहेत. या क्रूर हिंसक आक्रमकाला (जोरावरसिंगला) तोंड द्यायचे असेल तर अजून बरेच सैन्य लागेल.”

जिंकलेल्या भागात प्रशासनाची व्यवस्था लावून जोरावरसिंगाने मानसरोवर व कैलास पर्वताचे दर्शन घेतले. रसदीचा पुरवठा सुरळीत चालू राहील याची तर व्यवस्था केलीच पण ठिकठिकाणी किल्ले उभारून रक्षणाची आणि रसदीच्या साठ्याचीही सोय केली. तक्लकोटच्या उध्वस्त किल्ल्याजवळच चीत्तांग येथे भव्य किल्ला बांधला. तेथे मेहता बस्तीरामच्या नेतृत्वाखाली निवडक सैन्य तर ठेवलेच पण तोफाही ठेवल्या. आता तो तिबेटवर पुढील आक्रमण करण्यास सिद्ध होत होता. पण याच दरम्यान तिबेटने तक्रारी केल्याने ब्रिटीश अस्वस्थ झाले व त्यांनी लाहोर दरबारावर जोरावरसिंगला तिबेट सोडून माघारी फिरायचा आदेश देण्यासाठी दबाव टाकायला सुरुवात केली. हिवाळा संपल्यावरच मी परत येईल असा उलटा निरोप जोरावरसिंगने पाठवला.

तोवर तिबेटी आणि चीनी सैन्य प्रतिहल्ला करायला सज्ज झालेले होते. तिबेटच्या पठारावरील हिवाळा जीवघेणा असतो. खिंडीचे मार्ग बर्फाने बंद झाल्याने रसद मिळवायची व्यवस्था केलेली असूनही ती मिळणे अशक्य झाले. त्या बिकट स्थितीतही जोरावरसिंगाचे सैन्य टोयो येथवर लढत पोचले. भयानक थंडी, हिमपात आणि पाउस याने सैन्याचे भयंकर हाल सुरु झालेलाच होते. हिमदंशाने असंख्य सैनिकांनी आपल्या हाता-पायाची बोटे गमावली. उष्णता मिळवायला लाकूड-फाटा मिळणेही अशक्य झाले तर सैनिकांनी बंदुकांचे लाकडी दस्ते पेटवून शेकोट्या केल्या. तयारीत असलेले चीनी आणि तिबेटी सैन्य पुन्हा एकत्र आले आणि जोरावरसिंगांच्या तळावर चाल केली. १२ डिसेंबर १८४१ रोजी युद्ध सुरु झाले. जोरावरसिंग आणि त्याचे सैन्य त्याही स्थितीत प्रतिकार करत होते पण शत्रूची एक गोळी जोरावरसिंगाच्या खांद्यात घुसली. तरीही डाव्या हातात तलवार घेऊन जोरावरसिंग त्वेषाने शत्रूला भिडला. तिबेटी घोडेस्वारांच्या एका पथकाने हल्ला सुरु करताच जोरावरसिंग जखमी अवस्थेत लढतच तिकडे वळाला पण एका सैनिकाचा भाला त्याच्या छातीत घुसला. जोरावरसिंगासाराखा महावीर धारातीर्थी पडला. तो जेथे पडला तेथे म्हणजे तक्लकोट व मानसरोवराजवळ आजही त्याची समाधी आहे.

तिबेटी सैन्य जोरावरसिंगांच्या सैन्याचा पाठलाग करत लदाखमध्ये घुसले खरे पण तेथे त्यांचा भीषण पराजय करून बदला घेतला गेला. तिबेटवर आक्रमण करणारा हा इतिहासातील पहिलाच योद्धा. त्याचा पराजय करायला तिबेटला चीनी सैन्याचे मदत घ्यावी लागली. पण जोरावरसिंगाचा पराभव त्या तिबेटी-चिन्यांनी नाही तर तेथील कडाक्याच्या जीवघेण्या हिवाळ्याने केला. एक इतिहास अपुराच राहिला!

-संजय सोनवणी

 

No comments:

Post a Comment

सिंधू संस्कृतीची मालकी!

  सिंधू संस्कृतीची लिपी वाचता आलेली नसल्याने कोणीही उठतो आणि सिंधू संस्कृतीवर मालकी सांगतो. द्रविडांनी हे काम आधी सुरु केले पण त्याला आर्य आ...