Friday, September 2, 2022

या भविष्याला आम्ही कसे तोंड देणार?





समाज कसा असणार हे समाजात बुद्धीवंत, प्रज्ञावंत किती अहेत व ते कोणत्या दिशेने विचार करतात यावर जेवढे अवलंबुन असते तेवढेच ते राष्ट्रे कोणत्या दिशेने वैदन्यानिक प्रगती करत जातात यावरही अवलंबुन असते. विज्ञानाने आधुनिक जग प्रतिक्षण झपाट्याने बदलत आहे. विद्न्यानापासून तसे दूर असणारे समाजघटक व राष्ट्रेही कळत-नकळत त्या प्रभावात येतात व नुसती त्यांची विचारपद्धती बदलते असे नाही तर समग्र जीवनपद्धतीवर त्याचा अटळ परिणाम होत जातो. संगणक युगाची क्रांती आता अभिनव भविष्यवेधी रूपे घेऊ लागली आहे. आधुनिक अनेक विचारवंतही या वेगाने व नकळत मानवी जीवनात होणा-या बदलांमुले चिंतीत आहेत. कारण बाह्य प्रभावाने मानवी जीवन व विचारपद्धतीची दिशा ठरने अनेकदा अडचणीचे असते. म्हणजे या बदलांचा स्वीकार किंवा अस्वीकार केल्याने होत असलेल्या बदलांना रोखणे कोणाच्याही हातात नसते.

 

कृत्रिम बुद्धीमत्ता, मशीन लर्निंग, रोबोटिक्ससारखे शब्द आज परवलीचे शब्द बनले आहेत व जगभरची कोर्पोरेशंस त्यात अवाढव्य गुंतवणूक करत आहेत. थोडक्यात श्रमांसाठीची मानवी निकड यंत्रांकडून भागवून घेणे आणि गतानुभवातून शिकत, विश्लेषण करत भावी परिस्थितीचे भविष्य वर्तवणे यासारखी कामे संगणक, मशीन अथवा यंत्रमानवाकडून करून घेणे आणि मानवी गरज केवळ निर्णयापुरती ठेवणे हे या नवीन तंत्रज्ञानाचे ध्येय आहे. आजही कृत्रिम बुद्धीमत्ता प्राथमिक स्वरूपात आपल्याला आपला संगणक किंवा मोबाईलवर वापरली जात असल्याचे दिसते. आजच या सा-याने मानवी श्रमिक अथवा कर्मचा-यांची गरज कमी करत नेली आहे किंवा मानवी भरतीची स्थिती शून्यावर आणलेली आहे. रोबोटिक्सचा उपयोग आजच अनेक क्षेत्रांत करायला सुरुवात झाली आहे. उद्या ती लाट सर्वत्र  पसरायला वेळ लागणार नाही. उदाहरणच द्यायचे झाले तर फ़ोक्सकोन (Foxconn) या जगातील अवाढव्य कंत्राटी उत्पादक कंपनीचे घेता येईल. चीनमद्ध्ये २०११ साली या कंपनीचे दहा लाख कर्मचारी होते. याच वर्षी कंपनीने दहा हजार रोबो बसवले व "यंत्रमानवीकरणाची" सुरुवात केली. आता दरवर्षी तीस हजार रोबो बसवले जात आहेत. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी टेरी गौ म्हणतात कि हाच दर ते प्रतिवर्षी एक लाख रोबो एवढा वाढवनार आहेत. याचाच अर्थ दहा लाख कर्मचा-यांची गरजच राहणार नाही. अन्य कंपन्यांचीही हीच दिशा आहे. कृत्रिम बुद्धीमत्तेच्या सहाय्याने असंख्य गुंतागुंतीच्या प्रश्नांवर तत्काळ निर्णय घेत मनुष्य-तास वाचवले जात आहेत. संगणकांकडून अपेक्षा वाढत असून संगणकांनी मनुष्याचीच जागा घ्यावी यासाठी प्रयत्न होत आहेत. यासाठी पुंजयामिकीय संगणकप्रणाली (Quantum mechanics based system) बनवता येईल अशी संकल्पना मी १९९८ साली बेंगलोर येथे एका कार्यशाळेत मांडली होती. हे काम माझ्या हातून झाले नसले तरी आता जगात याही दिशेने प्रयत्न सुरु आहेत व त्याला कधी ना कधी यश मिळेल यातही शंका नाही. शिवाय मानवी मेंदू व संगणकीय चिप्स यांचा संकर करुनही अधिक प्रगत अर्धयंत्रमानव बनवता येईल काय या शक्यतेवर केवळ वैद्न्यानिकच नव्हे तर शास्त्रज्ञही विचार करत आहेत. म्हणजेच माणसाची जागा संगणक घेऊ लागतील अशी शक्यता येत्या २०-२५ वर्षांत नाकारता येत नाही. 

 यामुळे प्रगत राष्ट्रांत सध्या जोरदार चर्चा चालु आहे ती श्रमिकांची व कनिष्ठ कार्यांसाठी लागणा-या कर्मचा-यांची जागा यंत्रमानवांनी घेणे कितपत संयुक्तिक व नैतिक आहे यावर. औषधी उत्पादन, शेतकी ते अनेक रसायनी उद्योगांत अवाढव्य कारखाने यंत्रमानवांच्या वापराला पसंती देतांना दिसून येतात. काहींनी त्यांचा वापर सुरुही केला आहे. निर्णय प्रक्रियेत कृत्रिम बुद्धीमत्तेचा उपयोग आताच सुरु झाला असून भविष्यात मानवी गरजच राहणार नाही अशी स्थिती आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. येथे मानवी मेंदुची जागाच संगणक कसे घेतील याचा प्रयत्न सुरु आहे. संगणक सध्या माहितीचे विश्लेशन करतो पण निर्णय घेत नाही. कल्पना करून स्वयंप्रतिभेने काही शोध लावू शकत नाही कि आवाज ऐकुन त्याचे भावात्मक विश्लेषन करत नाही. वासही घेऊ शकत नाही कि पर्यावरणीय बदलांना प्रतिसादही देत नाही. विचार करणे हे मानवाचे महत्वाचे वैशिष्ट्य. पण सध्याचे संगणक विचार करु शकत नाही. तसा विचार करू लागला तर काय आपत्ती येऊ शकतील यावर अनेक चित्रपट निघाले आहेत. या सध्या कल्पना असल्या तरी त्या सत्यात येणार नाहीत असे नाही.  

 समजा उद्या सर्वच उद्योगांनी यंत्रमानव व प्रगत कृत्रिम बुद्धीमत्ता वापरायला सुरुवात केली व पगारी नोकरांची गरजच संपवली तर काय हाहा:कार उडु शकतो याची आपण कल्पना करु शकतो. कृत्रीम बुद्धीमत्तेच्या मानवसदृष संगणक-मानवाची निर्मिती झालीच तर मग तर मग एकुणातील कार्यपद्धतीत मनुष्याचीच गरज राहणार नाही कि काय अशीही भिती आहेच. सारीच कामे अशी परभारे झाली तर मनुष्य मग काय करेल, कोणते नवे काम निर्माण करेल, कि फक्त आहे त्या संगणक-यंत्रमानवी जगाचे निरीक्षण करणे व त्याच्यात सुधारणा करन्यापल्याड त्याला कामच राहणार नाही? अशा स्थितीत जागतिक लोकसंख्येचे काय होईल? हेही प्रश्न काल्पनिक नाहीत. उद्याच्या सामाजिक समस्या या ज्ञानप्रगतीबरोबरच कशा झपाट्याने बदलणार आहेत याची ही संभावना आहे. या गोष्टींत कायदा महत्वाचा रोल बजावत प्रायोगिक पातळीवर सोडले तर क्लोनिंगबाबत जी बंदी घातली गेली तसे काहीतरी करून ही मानवाच्या जीवन व भावविश्वाला घातक ठरणारे तंत्रज्ञान रोखेल हा आपला आशावाद आहे. प्रत्यक्षात आजच सरकारे ते कोर्पोरेशंस नव्या नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग मानवी जीवनात व निर्णयप्रक्रियेत हस्तक्षेप करण्यासाठी वापरत आहेत असे आपल्याला दिसून येईल.

 याचा अर्थ आम्हा भारतियांना आजच समजावून घ्यावा लागणार आहे. एकीकडे रोजगार कमी होतील हे जेवढे सत्य आहे तसेच दुसरीकडे वेगळ्या क्षेत्रांत मानवी रोजगारही वाढतील  असा आशावाद अनेक अर्थतज्ञ करतात. कोणाचा आशावाद अथवा निराशावाद खरा ठरेल याचे भवितव्य वर्तवता येणे शक्य नसले तरी यंत्रमानव व कृत्रीम बुद्धीमत्ता ही उद्याची आव्हाने आहेत हेही मात्र खरे. वरील बाबतीत नैतिकतेचा सिद्धांत चर्चीला जातो. माणसाची जागा कृत्रिम श्रमकौशल्ये व कृत्रीम बुद्धीमत्तेला घेऊ देणे हे नैतिक होणार नाही कारण त्यामुळे माणसांचीच गरज संपेल  व हे नैतिक व मानवीय होणार नाही असा युक्तिवाद केला जातो. या युक्तिवादात नक्कीच तथ्य आहे. परंतू नैतीकतेचाच इतिहास पाहिला तर माणसाने आपल्या नीतितत्वांतही सोयीनुसार फरक केल्याचे आपल्या लक्षत येइल. नीतिमुल्ये बदलवली जाऊ शकतात तसे कायदेही.

 मुळात माणसाला काही कामच राहिले नाही तर तो उत्पन्न मिळवणार कोठुन? जगणार कसा? खरेदी करायला उत्पन्न म्हणजेच क्रयशक्ती लागते. रोबोंना शारिरिक गरजाच नसल्याने तो काही केल्या "खरेदीदार" होणार नाही. थोडक्यात संपुर्ण अर्थव्यवस्थाच कोलमडून पडेल किंवा सर्व मानवी नागरिकांना फुकट वा अतिस्वस्त जीवनमान उपलब्ध करुन द्यावे लागेल. पण मग उद्योगांच्या नफेखोरीचे काय? या सर्व शक्यतांवर आपल्याला वेळीच सविस्तर विचार करणे भाग आहे कारण पुढील काळातील संभाव्य घडामोडींत आपली भुमिका काय असेल, येणा-या परिस्थितीत आम्ही लाभाचे अधिक वाटेकरू बनत आमची किमान हानी कशी होईल याची रणनीति आम्हाला ठरवावीच लागेल. 

 -संजय सोनवणी 

No comments:

Post a Comment

भारतावरील पर्शियन साम्राज्याचा अस्त!

  पर्शियन सम्राट सायरसने द ग्रेटने इसपू पाचशे पस्तीसमध्येच गांधार व सिंधू नदीचा पश्चिम भाग आपल्या सत्तेखाली आणला होता, परंतू इसपू पाचशेतीसच्...