Friday, October 28, 2022

रेशीम मार्ग: रोगांच्या साथी आणि विज्ञानाचाही प्रसार



प्राचीन व्यापारी मार्गांनी दूरच्या संस्कृतींना नुसते जोडले नाही तर परस्परावलंबी बनवण्याताही मोठा हातभार लावला. एका ठिकाणच्या माहित नसलेल्या वस्तू, शोध, संकल्पना दुस-या ठिकाणी पसरू लागल्या. सांस्कृतिक व सामाजिक जीवनमान त्यामुळे प्रभावित होणे स्वाभाविक होते. ही नुसती व्यापार व त्यामुळे आर्थिक समृद्धीत होणारी भरभराट नव्हती तर प्रादेशिक जाणीवा अधिक व्यापक होण्यात हातभार लावणारी घटना होती. ज्ञान, विज्ञान, पुराकथा, नवे शोध यांचा प्रसार व्यापारी संपर्कामुळे सहज शक्य झाला. राजा-महाराजा अथवा धर्म-संस्थापकांनी संस्कृती पसरवण्यात जेवढा हातभार लावला नसेल तेवढा हातभार व्यापा-यांनी लावला असे म्हणावे लागते ते केवळ त्यामुळेच! आर्थिक प्रेरणा या नेहमीच जगण्याच्या अन्य प्रेरणांवर मात करत असतात आणि जगभर ते घडल्याने आजचे आधुनिक जग अस्तित्वात आले आहे.

व्यापारी मार्गांमुळे एरवी अपरिचित वृक्ष, फुलझाडे, खाद्य वनस्पती व पिकांचाही मोठ्या प्रमाणावर प्रसार होऊ लागला. उदाहणार्थ भाताची उत्पत्ती प्रथम दक्षिण भारतात होऊन, खाद्यान्न म्हणून वापरात येऊन ते पुढे उत्तर भारतमार्गे आधी पश्चिमेकडे इराण व पूर्वेकडे चीनमध्ये पसरले ते केवळ व्यापारी संपर्कामुळे. आज भात हे जगातील निम्म्यापेक्षा अधिक लोकांचे प्रमुख अन्न आहे. मुळचा अमेरिकेतील पेरू देशातील बटाटा भारतात आला तो पोर्तुगीज व्यापा-यांच्या माध्यमातून. अशी फार मोठी खाद्यान्नांचीही देवघेव झालेली आहे. रेशीम भारतातून चीनमध्ये गेले कि चीनमधून भारतात आले हा वाद असला तरी मुळात रेशमाने चीनला आर्थिक दृष्ट्या समृद्ध बनवण्यात मोठा वाटा उचलला. युरोप-इजिप्तपर्यंत रेशमी वस्त्रे वापरणे ही फ्याशन बनली. तसेच अलंकारांचेही झाले. वनस्पतीविस्तार  कधी जाणीवपूर्वक घडला तर कधी माल वाहतुकीसाठी जे पशु वापरले जात त्यांच्या माध्यामातुनही असे प्रसार घडले. सुदूर पश्चिम ते पूर्वेकडील चीनपर्यंतचे जग कवेत घेणा-या रेशीम मार्ग म्हणून ख्याती मिळवलेले सारेच व्यापारी मार्ग हे जगाची जीवनवाहिनी बनले.

 पण रेशीम मार्ग हे फक्त समृद्धीचे मार्ग नव्हते. या मार्गांवरून अवांछित किटाणू, सुक्ष्मजीवही प्रसार पावत राहिले. त्यातून अनेक पशु व मानवांना  होणारे आजारही पसरले.  हे आजार जेथे पसरले तेथे ते नवीनच असल्याने त्यावरचे उपायही लोकांना माहित नसत त्यामुळे मृत्यूदरातही वाढ होत असे. शेवटी औषधेही आयात करूनच अशा आजारांवर नियंत्रण आणायचे प्रयत्न होत. या सर्वात भयंकर होती ती आशियाभर पसरलेली प्लेगची साथ.  मानवी इतिहासात आजवर तीन मोठ्या प्लेगच्या साथी पसरल्याचे नोंद आहे. संपूर्ण युरेशियात सन १३४३ ते १३५१ या काळातील साथ एवढी महाभयंकर होती कि त्यात जवळपास दीड कोटी नागरिक मरण पावले. “काळा मृत्यू” या नावाने कुप्रसिद्ध ठरलेली ही साथ सर्वत्र पसरायला कारण झाले ते व्यापारी मार्ग व त्यावरूनच झालेला रोगवहन करणा-या उंदरांचा झालेला प्रसार.  

चवदाव्या शतकातील आजपेक्षा लोकसंख्या खूप कमी व विखुरलेली होती. लोक शक्यतो आरोग्यदायी जीवन जगात असत. स्थानिक साथी आटोक्यात ठेवण्याच्या उपचारपद्धती त्यांनी अनुभवातून विकसित केलेल्या होत्या. पण या प्लेगच्या अकस्मात व अपरिचित साथीने एवढ्या झपाट्याने फैलाव केला कि प्लेग म्हणजे मृत्यू हे समीकरण फिट झाले. या रोगाचे कारणच माहित नसल्याने उपचारांचा प्रश्नच उपस्थित होत नव्हता. जे थातूर-मातुर उपचार केले जात त्याचा उपयोगही होत नसे. ही साथ कधी एकदाची जाईल याची वाट पाहणे एवढेच सर्व युरोप व आशीया खंडात राहणा-या लोकांच्या हाती राहिले. पण या साथीने एक क्रांती केली व ती म्हणजे सार्वजनिक आरोग्याचा प्रश्न सर्व सत्तांसाठी ऐरणीवर आला. तरीही साथी येतच राहिल्या. मग जहाजातून अथवा व्यापारी मार्गांवरून येणा-या परकी तांड्यांमधील लोकांना किमान ४० दिवस विलगीकरण सक्तीचे करण्यात आले. त्याशिवाय कोणालाही नगरात प्रवेश दिला जात नसे. या साथीने व्यापारावरही विपरीत परिणाम झाला. पण या मार्गांचा उपयोग वैद्यकीय शास्त्र सर्वत्र पसरन्यातही झाला. मध्य आशियातील बौद्ध मठांनी भारतीय वैद्यक शास्त्र मोठ्या जोमाने या काळात पसरवले. यामुळे प्लेगवर उपाय सापडले नसले तरी नव्या संशोधनाच्या दिशा ठरू लागल्या.

प्लेगच्या साथीनंतर व्यापारी मार्गांमुळे संपूर्ण युरेशियात पसरलेली दुसरी साथ म्हणजे देवीची साथ. देवीचा विषाणूजण्य रोग आधी कोठे जन्माला आला याचे निश्चित पुरावे उपलब्ध नसले तरी इसपूच्या तिस-या शतकात हा रोग अस्तित्वात होता याचे मात्र पुरावे मिळालेले आहेत. व्यापारामुळे या रोगाचा प्रसार व्हायला मोठा हातभार लागला. सहाव्या शतकानंतर जसा रेशीम मार्गांवर व्यापार वाढू लागला तसा हा रोग पसरण्याचे प्रमाण वाढले. आठव्या शतकापर्यंत हा रोग पार जपानमध्येही पसरला. सातव्या शतकापर्यंतच या रोगाला कोविडप्रमाणेच जागतिक साथीचे रूप लाभले. व्यापारी मार्गांनी असे काही रोग पसरवण्याचे दुष्परिणाम घडवले तसेच वैद्यकीय विज्ञान प्रगत करण्याचेही मार्ग उघडले. ही साथ ऐन भरात असताना आजच्या लशीची पूर्वज म्हणता येईल अशी प्राथमिक लस निघाली जिला “टिका” म्हणत.  ही लस भारतीयांनी विकसित केली व रेशीम मार्गावरून प्रवास करणा-या व्यापा-यानी ती जगभर नेली. मुस्लीम संशोधक व व्यापा-यांनीही अशाच पद्धतीच्या काही लसी शोधल्या पण त्या एवढ्या प्रभावी नव्हत्या. अठराव्या शतकात एडवर्ड जेन्नर यांनी पहिली शास्त्रशुद्ध लस बनवली त्याला अर्थात विज्ञानाचे ही परंपरा कारण ठरली. आज जगात देवीचा रुग्ण मिळणे दुरापास्त आहे.

व्यापारी मार्गांमुळे साथी पसरल्या तशी वैद्यकीय ज्ञानाची दालनेही उघडली. पारंपारिक वनौषधीचा शास्त्रशुद्ध अभ्यास करण्याची सुरुवात अरबांनी मध्ययुगातच सुरुवात केली. संपूर्ण युरेशियातून प्रादेशिक ज्ञान जमा करत प्रयोग करण्याचे श्रेय त्यांना जाते. किमयागार (पा-यापासून सोने बनवणे) नावाची एक अत्यंत शोधक पण लालची असणारी मानवी प्रजातीही त्या काळात फोफावत होती. बगदाद व कैरो अशा प्रयोगांचे केंद्रस्थान बनले. हे लोण रेशीममार्गानेच सर्वत्र पसरले. किमयागार प्रत्यक्ष सोने कधीही बनवू शकले नाहीत पण औषधी व रसायनशास्त्रातले अनेक शोध त्यातूनच लागत गेले. अरबांनी ग्रीको-रोमन ते चीनी व भारतीय वनस्पती विज्ञानाला एकत्र करत औषधी शास्त्रात प्रगती केली. वनस्पती व तीचे औषधी उपयोग यावरील संशोधन वाढले. विविध औषधी वनस्पतींचा रेशीम मार्गांवरून होणारा प्रसारही त्यामुळे वाढला. रेशीम मार्गावरील बुखारा, मर्व, गुंदीशापूर, गझनी यासारखी शहरे ज्ञानाची केंद्रे बनत गेली. तत्कालीन वैद्य राझी, बहु-शाखीय विद्वान इब्न बतुता, वनौषधीतद्न्य इब्न अल-बैतर यासारख्या विद्वानानी ग्रंथ लेखनही केले. राझीचे ”औषधांवरील ग्रंथ” (किताब अल-हावी) हा तर कोशात्मक आहे. चीनी औषधीज्ञानही याच काळात युरोपपर्यंत पसरले. भारतीय वैद्यक ज्ञानही या काळात परम्परावादीच राहिले असले तरी त्याचाही उपयोग झाला. रेशीम मार्गावरील सत्ताधारी विद्वानांचा आदर करीत. त्यासाठी अशा विद्वानांना आर्थिक सहाय्यही देत. यामुळे वनस्पतीमधील औषधे घटक अलग करत त्यांना मानावे आरोग्यासाठी वापरण्याची एक रीत प्रस्थापित व्हायला मदत झाली. सर्वच विद्वानांनी आजची मानवी संस्कृती घडवन्याला व प्रगल्भ करण्याला मोठा हातभार लावला. आजचे औषधी विज्ञान हे या आशिया-युरोपभरच्या शास्त्रज्ञानी अविरत केलेल्या ज्ञानकेंद्री प्रयत्नांच्या पायावर उभे आहे. आजचे रसायन शास्त्र हे किमयागारांनी केलेल्या अगणित प्रयोगांचे व निष्कर्षांचे आधार घेताच विकसित झालेले आहे. व्यापारी मार्ग आपत्तीचे कारण जसे बनले तसेच ज्ञान-विज्ञानाच्या प्रगतीचेही ते असे.

 

-संजय सोनवणी

No comments:

Post a Comment

गझनीचा मोहम्मद आणि मोहम्मद घोरी

    ललितादित्य मुक्तापिडाने अरबांना भारत व अफगाणिस्तानातून हुसकावून लावल्यानंतर जवळपास तीनशे वर्ष भारतावर कोणतेही नवे आक्रमण झाले नाही. अरब ...