Saturday, October 22, 2022

ज्ञानवादी समाजाच्या दिशेने आपण जाणार?


 


आजचे जग संगणकाचे आहे. मानवी बुद्धीशी स्पर्धा करणारे आधुनिक कृत्रिम बुद्धिमत्तेचे तंत्रज्ञान मानवी विश्व कवेत घेत मानवालाच बेरोजगार करत चालले आहे. मनुष्याचा मेंदू व संगणक यांच्यात संकर करून अतिबुद्धिमान मानव निर्माण करण्याचे प्रयत्न होत आहेत. त्याही पुढचे भविष्य हे सुक्ष्मयामिकी संगणकांचे असणार आहे. संशोधन वेगाने त्या दिशेने पुढे चालले आहे. त्यावेळेस जगाचा चेहरा किती झपाट्याने बदलेल याचा अंदाजही आपण बांधू शकत नाही. एकंदरीत आधुनिक तंत्रज्ञान आपले पारंपारिक जग बदलवत आहे आणि तो वेग कोणालाही भोवळ वाटेल असा आहे. मानवी बुद्धीमत्ता परिसीमा गाठण्याच्या अनिवार बेतात आहे. कदाचित ती आज अज्ञात असलेलीही क्षितिजे शोधून त्याही दिशेने वाटचाल करेल ही संभाव्य शक्यता आहेच. माणसाला हे सतत धावण्याचे वेड निसर्गानेच बहाल केलेले आहे आणि त्याबद्दल त्याचे कौतुक वाटणे स्वाभाविक आहे.

एकीकडे मानवी बुद्धीमत्तेचा नित्यनवा आविष्कार होत असताना, जगणे अधिक सोपे करण्याचा प्रयत्न होत असताना दुसरीकडे मानवी जगाच्या सामुहिक बुद्धिमत्तेत –हास होत चालले असल्याचेही विदारक दर्शन घडते आहे. ज्ञान आणि माहितीच्या वारेमाप संसाधनांची आणि माहिती-विश्लेषणाची कृत्रिम हत्यारे हातात असतानाही जागतिक मानवी समुदायाचे सामुहिक शहाणपण मात्र -हास पावत असल्याची चिंता व्यक्त होते आहे. तसे चित्रही दिसते आहे. माहितीच्या वर्षावात आणि संपर्क-साधनांच्या विस्फोटाच्या काळात माणूस मात्र एकाकी होत चालला आहे. असंख्य मानसिक विकारांच्या समस्यांनी युवा पिढी ग्रासलेली दिसू लागली आहे. मनुष्य व्यक्तीकेंद्री असावा कि समाज केंद्री या प्रश्नाच्या आज चर्चाही होत नाहीत कारण व्यक्तीस्वातंत्र्याच्या अतिरेकी कल्पना आणि मनुष्य सामाजिक व्हावा यासाठी परंपरेने आखून दिलेल्या संस्कारात्मक चौकटी आज निरुपयोगी ठरत असल्याने समाजच गोंधळला असल्याचे विदारक चित्र दिसू लागले आहे. आधुनिकतेच्या जगात राहत असताना जुनाट कालबाह्य झालेले सांस्कृतिक ओझे वाहत त्यानुसार राजकीय व सामाजिक भूमिका घेत आभासी जगातून त्याचा प्रचार-प्रसार करणारे आज कमी नाहीत. नव्याचा वापर करून जुनाटपंथाकडे जायचा हा अट्टाहास आज जगभरच्या प्रगत राष्ट्रांतही दिसून येतो. भारत त्याला अपवाद नाही. आज जगभर उजव्या विचारसरनीचा उद्रेक होण्यामागे आधुनिक तंत्रज्ञानावर स्वार झालेले हेच युवक आहेत. तंत्रज्ञान विकसित झाले म्हणजे सामाजिक बुद्धीचा आणि शहाणपणाचा स्तर उंचावतोच असे नाही हे आपल्या सहज लक्षात येईल. भावना एवढ्या नाजूक होत आहेत कि आशावादात थोडे जरी अडसर आले तरी त्याचे परिणती आपण फसवलो गेलो आहोत या भावनेतून संताप आणि द्वेषात होते. संयम, तर्क आणि विवेकबुद्धीला दिला गेलेला हा घटस्फोटच आहे. यातून व्यक्तीच्या कौटुंबिक जीवनापासून दुष्परिणाम दिसू लागतात. खरे तर “कुटुंब” हा शब्दच येत्या काही काळात नामशेष होण्याची शक्यता दिसते आहे.

कुटुंबव्यवस्था काही कायम टिकावी म्हणून जन्माला आलेली नाही. एक व्यवस्था जावून दुसरी व्यवस्था येणे स्वाभाविक आहे. पण हा बदल होत असताना बदलात सामील झालेले घटक किती जाणतेपणे हा बदल स्वीकारतात आणि किती परिस्थितीशरण पद्धतीने स्वीकारतात हे पाहणेही महत्वाचे आहे. सोयीस्कर प्रेम-सहानुभूती, सोयीस्कर व्यक्तीद्वेष, एखाद्या समाजाचा द्वेष, लिंगभावातील अचानक होत असणारे तीव्र संघर्षमय बदल, अशा अनेक परस्परविरोधी संघर्षांतून आजचा समाज घडतो आहे. आणि त्याला कोणताही वर्ग अपवाद आहे असे म्हणता येणार नाही.

याचा अर्थ समाज प्रगल्भ होण्याऐवजी उथळ होत चालला आहे कि काय? समाजमाध्यमांतील चर्चा पाहिल्या तर हे विधान सत्य असल्याची जाणीव होईल. पण प्रत्यक्ष जीवनात तरी वेगळे काय घडते आहे? ज्ञानाची साधने एका टीचकीवर आलेली असताना शिकलेले लोकही एवढी खोटी अज्ञानमूलक विधाने एवढ्या जोमात करून मोकळे होतात कि “ज्ञान” या संकल्पनेबद्दलच शंका निर्माण व्हावी. अगदी आयआयटीमधील तद्न्य म्हणवून घेणारेही रामसेतू किंवा वैदिक विमाने याबद्दल जेंव्हा अक्कल पाजळतात तेंव्हा अशी शंका निर्माण होणे स्वाभाविक आहे.

याला व्यक्तिगत व्यक्तित्व आणि अशा व्यक्तीत्वान्चा समूह असलेला समाज कारणीभूत आहे काय? अठराव्या शतकापूर्वी असे मानले जात होते कि व्यक्तित्व हे लिंग, ज्या घरात जन्म घेतला त्याचे सामाजिक व आर्थिक स्थान, धर्म, भूगोल इ. बाबींच्या सामुहिक हातभारातून आकाराला येते. १८५० नंतर मात्र हे बाह्य घटक नाकारत व्यक्तीवादाने जन्म घेतला. त्यानुसार कोणीही आपले व्यक्तिमत्व स्वत:ला रुचेल अशा शैलीत विकसित करू शकते. हा बाह्य प्रभावांपासून मुक्त असा स्वतन्त्रतावाद होता. याचा पगडा जगभरच्या आधुनिक पिढ्यांवर आहे. पण आपल्याला जे “वाटते” ते वाटणेही सर्वस्वी “स्वतंत्र” नसते तर बाह्य घटकांच्या प्रभावातून हे “वाटणे” आलेले असते याचे भान मात्र सुटले. व्यक्तित्व हे केवळ बाह्य घटक ठरवू शकत नाहीत तर व्यक्तीच्या उपजत प्रेरणाही घडवत असतात. या दोन्हीचा तात्विक समन्वय घडवणारे पर्यायी तत्वज्ञांनाच प्रभावी नसल्याने व्यक्ती आणि समाज यातील संघर्ष वेगळ्या अर्थाने टोकदार होत कायमच राहिला. या संघर्षाला विचारी विवेकाचा पाया नसल्याने हा संघर्ष उथळच होणार होता आणि तसे झालेही. आणि याचे एकुणातील सामाजिक परिणाम गंभीर तर आहेतच पण या सा-यात व्यक्तींचे “व्यक्तित्वच” हरवत चालले आहे. आज आपल्या सर्वांची अवस्था अतिप्रगत पण व्यक्तित्व नसलेला समाज अशी झाली असेल तर आपण वेळीच सावध व्हायला हवे.

उथळपणाचा उद्रेक जर होत असेल, समाज अधिकाधिक असहिष्णू बनत असेल, आपल्या जाणीवा व्यापक, वैश्विक न बनवता अधिकाधिक संकुचित करत नेत असेल तर विज्ञानाच्या अचाट प्रगतीचा आपल्याला अभिमान वाटायचे काहीएक कारण नाही. उलट या विज्ञानाच्या प्रगतीतून अजून वेगळे आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक प्रश्न कसे उभे राहणार आहेत व त्याला तोंड देण्यासाठी आम्ही कोणती नीती आखणार आहोत याची जाणीवपूर्वक रचना करावी लागणार आहे. अन्यथा आम्ही भविष्यात तर पुरते भरकटून जावू. कारण संभाव्य बदलांना पचवण्याची, तोंड देत स्वीकारण्याची मनोवस्था प्राप्त करण्यासाठी जी तत्वप्रणाली विकसित करायला हवी तिचाच अभाव असेल. उदा. जागतिकीकरण पचवन्यासाठी भारतीय मानसिकता बनलेलीच नसतांना जागतिकीकरण आले. फोफावले. त्याचे भले-बुरे लाभही झाले. पण ज्ञानात्मक फोफाव मात्र झाला नाही. नवे तत्वज्ञान व समाजशास्त्र आकाराला आले नाही. आमचे प्रश्नही जुने आणि उत्तरेही जुनीच पण जगणे मात्र आधुनिकतेत तिचा फायदा उचलण्याच्या प्रयत्नात राहिले. गतकाळातील तथाकथित वैभवाचा आणि संस्कृती श्रेष्ठत्वाचा पगडा कमी होण्याऐवजी वाढतच गेला. आम्हे धड व्यक्तिवादी राहिलो नाही कि समाजकेंद्री. एकाकी मात्र नक्कीच झालो. आमच्या सामाजिक मानसिक कुन्ठेचे हे एक मोठे कारण आहे.

जग नेहमीच बदलत आलेले आहे. ज्ञान-विज्ञान आपला मार्ग क्रमित राहिलेले आहे. आम्ही बदल स्वीकारले नाही तर आम्ही इतिहासजमा होऊ. बदलांवर स्वार व्हायचे असेल तर तशी व्यक्तिगत व सामाजिक तत्वप्रणालीत सुसंगत व सुसह्य असे बदल करावे लागतील. आम्ही आजच यात खूप मागे पडलो आहोत. भरकटलो आहोत. एखादा केंद्रीय मंत्री उथळ व हास्यास्पद विधान करतो म्हणून त्याला ट्रोल करण्यापेक्षा ही सामाजिक उथळता कशातून जन्माला आलेली आहे व तिला डोक्यावर घेणारे कोण आहेत याचे चिंतन जास्त गरजेचे आहे. प्रतिक्रियावादी होण्यापेक्षा ज्ञानवादी  होणे कधीही श्रेयस्कर हे लक्षात घ्यावे लागणार आहे.

-संजय सोनवणी

 

No comments:

Post a Comment

महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी

    महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी -संजय सोनवणी   आम्ही मराठी माणसे इतिहासात फार रमतो. बरे, ज्याही इतिहासात आम्ही रमतो तेवढ्या ...