Friday, November 11, 2022

समरकंद: व्यापारी मार्गावरील पुरातन शहर!

 


मध्य आशियात रेशीम मार्गावर असल्याने भरभराटीला आलेली अनेक प्राचीन शहरे आहेत. सध्या उझबेकीस्थानात असलेले समरकंद हे शहर त्यातीलच एक. व्यापाराचे मुख्य केंद्र बनल्याने ते अत्यंत भरभराटीला आलेले होते. इसवी सनपूर्व सातव्या शतकापासून सलग रीत्या मानवी वसाहत राहिलेलेही हे मध्य आशियातील एकमेव नगर. हे शहर व्यापाराचे एक प्रमुख केंद्र होतेच पण येथे अनेक वस्तूंचे उत्पादनही मोठ्या प्रमाणावर होत असून त्या पूर्वेला चीन ते पश्चिमेला युरोपपर्यंत वितरीत होत. या नगराला प्राचीन काळापासून असंख्य परकीय हल्लेही सोसावे लागले. तेराव्या शतकातील चेंगीझखानाने तर हे नगर पूर्ण उध्वस्त करून टाकले होते. त्यामुळे येथील ऐतिहासिक वास्तुरचनेचे महत्वाचे नमुने अवशेषग्रस्तही झाले होते. पण तरीही हे शहर लवकरच राखेतून भरारी घेत उभे झाले आणि प्रतिष्ठेच्या जुन्या शिखरावर पोहोचवले.

मध्य आशिया तसा प्राचीन काळापासून भटक्या टोळ्यांनी व्यापलेला विस्तीर्ण प्रदेश. कोठे स्थायिक होणे येथील जमातींच्या रक्तातच नव्हते. पण जसा मध्य आशियातून व्यापारी मार्गाने युरोप आणि चीनमधील विस्तेर्ण प्रदेशात व्यापार सुरु झाला तसे काही लोक बदलत्या काळाची चाहूल घेत स्थिर झाले. आपापली कौशल्ये वापरत व्यापार आणि उत्पादनात पडू लागले. ताजिकी जमातीचे लोक येथील स्थानिक लोक असले तरी समरकंद शहर सांस्कृतिक समन्वयाचे आणि वैचारिक घुसळनीचेही महत्वाचे केंद्र बनले. येथे मिळालेल्या लिखित व पुरातत्वीय पुराव्यांनुसार तिथे हिंदू, बौद्ध, मुस्लीम, पारशी, ज्यू, ख्रिस्ती इत्यादी अनेक धर्म तेथे एकत्र सुखनैव नांदत होते. तेथे मिळालेल्या भित्तीचित्रावर हिंदू पुराणकथांचा मोठा प्रभाव आहे. तेथे मिळालेली म्युरल्स आणि अन्य वस्तूंवरून तत्कालीन समाजजीवनाचेही दर्शन घडते. विवाहाच्या मिरवणुकी कशा असत, राजदूत कशा भेटी अर्पण करत, राजनैतिक समारंभ कसे होत, चीनी राजकन्येला नौकेतून कसे नेले जाई इत्यादी सामाजिक/राजकीय घटनांचे चित्रण या मध्ययुगीन म्युरल्समध्ये आढळते. त्यावरून येथील समाज हा बहुढंगी संस्कृतींचे कसे मिश्रण होता याचा आपल्याला अंदाज येतो. ठीकठीकानचे व्यापारी तेथे येत असल्याने हे सांस्कृतिक संमिलन होणेही तेवढेच स्वाभाविक होते. अर्थात वैभावाहे माहेरघर असल्याने अनु सत्ताधा-यांचेही ते लक्ष्य बनले हेही तेवढेच खरे.

समरकंद हे कालौघात अनेक सत्तांच्या अंमलाखाली होते. प्रारंभ काळी हे शहर एकीमेनीद या पर्शियन साम्राज्याचा भाग होते. सोग्दियान संस्कृतीचा भाग असलेल्या या महत्वाच्या शहरावर अलेक्झांडरने सनपूर्व ३२९ मध्ये हल्ला केला आणि आपल्या सत्तेखाली आणले. अलेक्झांडरच्या हल्ल्यात या शहराला मोठी क्षती पोचली असली तरी झपाट्याने हे शहर सावरले. पण आता या शहरावर ग्रीक शैलीचा अपरिहार्यपणे प्रभाव पडला. स्थानिक उत्पादकांच्या उत्पादन शैलीतही लक्षणीय फरक पडला. मध्य आशियाला ग्रीक शैली माहित झाली ती या आक्रमणामुळे असे मानले जाते. भारतातील वायव्य प्रांतामध्येहे त्याचे आक्रमण झालेले असल्याने तिकडेही हे शैली प्रचारात आली. अलेक्झांडरच्या मृत्युनंतर काही काळ त्याने नेमलेल्या छत्रपांनी राज्य केले खरे पण नंतर आली कुशाणांची सत्ता. पण याही सत्तेचा इसवी सनाच्या तिस-या शतकात अस्त झाल्यावर दोनेक शतके हे शहर तर राहिले पण त्याचे वैभव हरपले. मध्य आशियातील भटकी जमात श्वेत हुणांच्या आक्रमणाने स्थिती अजून बिकट केली खरी पण संरक्षणासाठी समरकंद भोवती चार पदरी दगडी तटबंदी उभारायलाही सुरुवात झाली. नगरात प्रवेश करायला फक्त चार दरवाजे ठेवण्यात आले. व्यापारी अजूनही जीवावरचे धोके पत्करत, प्रसंगी आक्रमकांना खंडण्या देत का होईना पण व्यापार करतच राहिले.

आठव्या शतकात काश्मीरचा सम्राट ललितादित्याने हे नगर अरबांच्या अधिपत्याखालून सोडवले आणि व्यापार मुक्त करण्याचा प्रयत्न केला. अर्थात हे फार काळ त्याच्या सत्तेखाली राहिले नाही. चीन-अरबांची युद्धे सुरु झाली आणि व्यापारी मार्गावर स्वामित्व कोणाचे याचा निर्णय युद्धातूनच घ्यायची पुन्हा सुरुवात झाली. पण या शहराच्या अस्तित्वाला सर्वात मोठा धक्का बसला तो चेंगीझखानाच्या स्वारीचा. त्याच्या अंमलदारांनी येथे प्रचंड लुट केली आणि सैन्याचे पगार भागवले. येथले किमान तीस हजार उद्यमी गुलाम केले. पण सन १२२७मध्ये या जगज्जेत्या पण क्रूरकर्म्याचा मृत्यू झाला. आशिया खान्दावाराचेच संकट तात्पुरते का होईना निवळले. समरकंदने पुन्हा भरारी घेतली. तेराव्या शतकाच्या उत्तरकाळात जगप्रसिद्ध प्रवासी मार्को पोलोने या शहराला भेट दिली होती. त्याने “भव्य व सुंदर शहर” असे या शहराचे वर्णन केले. चौदाव्या शतकात येथे आलेल्या इब्न बतुतानेही “जगातील उत्कृष्ठ शहर. पानचक्क्यांनी या शहरातील उद्यानांना कसे पाणी पुरवले जात असे याचेही वर्णन त्याने करून ठेवले आहे. थोडक्यात विध्वन्सामागून पुन्हा नव्याने उभे राहण्याची मानवी चिवट प्रवृत्ती येथेही जिवंत दिसते ती मुख्यता: आर्थिक प्रेरणांतून!

इसवी सन १३७० मध्ये बंद करून सत्तेवर आलेल्या तैमुरलंगने मात्र हे शहर आपली राजधानी बनवले. पुढच्या ३५ वर्षांच्या काळात त्याने समरकंद शहराची अविरत नवी बांधकामे व पुनर्रचना करून त्याचे वैभव वाढवले. स्थानिक अर्थव्यावास्थाहे त्यामुळे सुधारली. शत्रूशी क्रूर असलेला तैमुरलंग मात्र कलाकार, कास्तकार आणि वास्तुरचनाकारांबद्दल तसेच व्यापा-यांबद्दल उदार होता. आपापली कौशल्ये वाढवावीत यासाठी तो उत्तेजन देत असे कारण व्यापार व उत्पादनातून येणारे वैभव त्याला अर्थात मोह घालत होते.  त्याने व्यापाराला उत्तेजन देत अनेक सवलतीही बहाल केल्या. रस्त्यांच्या दुरुस्त्या केल्या. व्यापारी जेथे थांबे घेत तेथे तेथे त्याने सराया बांधल्या. देशोदेशीच्या विद्वानांनाही तेथे निमंत्रण देत समरकंद ज्ञान-विद्न्यानाचेही केंद्र कसे होईल हे आवर्जून पाहिले.

सन १५०० मध्ये बुखारा येथे खानात स्थापन करणा-या उझबेकी मुहम्मद शायबानी खान याने समरकंद जिंकून घेतले आणि बुखा-याच्या स्वामित्वाखाली आणले. बुखारा हेही महत्वाचे व्यापारी शहर असल्याने व त्याची ती राजधानी असल्याने समरकंदचे महत्व कमी होऊ लागले. अठराव्या शतकानंतर तर समरकंद जवळ जवळ ओस पडले असे म्हटले तरी चालेल. हे शहर काही काळ रशियन अम्मलाखालीही गेले होते. नंतर ते सोव्हिएत रशियाचा भाग बनले आणि त्याच्या विघटनानंतर स्वतंत्र झालेल्या उझबेकिस्तान देशात आले. १८८८ मध्ये रेल्वेने जेंव्हा हे शहर जोडले गेले तेंव्हाच पुन्हा एकदा या प्राचीन व्यापारी नगरात जीव भरला जावू लागला. आताही समरकंद हे रेशीम व रेशीमवस्त्राच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे.

व्यापारी मार्गावरच्या या पुरातन शहराचा इतिहास रोचक आहे. या शहराचे अनेकदा सत्ता जशा बदलल्या तसे उत्थान पतन होत राहिले. रानटी हल्ले हे नेहमीच सुव्यवस्थेला व अर्थव्यवस्थेला मारक असतात. अडीच हजार वर्षांचा सलग इतिहास या शहराला आहे कारण व्यापारी मार्ग नेहमीच साहसी व्यापा-यांनी भरलेला असे. व्यापाराकडे पाहायची उदार दृष्टी ज्या सत्ताधा-यांकडे असते त्यांच्याच काळात अर्थव्यवस्थेला गती येते. स्थैर्य लाभते. उत्पादन व कला-कौशल्य आणि ज्ञान-विद्न्यानही नवी शिखरे गाठते. समरकंद जेंव्हाही असे उदार दृष्टिकोनाचे सत्ताधारे होते तेंव्हा तेंव्हा या सर्वच क्षेत्रात आघाडी घेताना दिसते. तसा मध्य आशीया हा शेतीसाठी फारसा उपयुक्त नव्हता. पशुपालन करणा-या आपापसात अविरत  झगडना-या टोळ्यांचा हा प्रदेश. पण साहसी व्यापारी या भागातून प्रतिकूल हवामानाच्या प्रदेशातून जेंव्हापासून व्यापारासाठी सुदूर मार्गक्रमण करू लागले तसे तसे स्थानिक लोकही आपले दृष्टीकोन बदलू लागले. त्यांनीही विविध संस्कृत्यापासून शिकत आपली संस्कृती बदलवली, वैशिष्ट्यपूर्ण केली. जागतिक व्यापाराचे हे मोठे योगदान आहे!

 

-संजय सोनवणी

  


No comments:

Post a Comment

सिंधू संस्कृतीची मालकी!

  सिंधू संस्कृतीची लिपी वाचता आलेली नसल्याने कोणीही उठतो आणि सिंधू संस्कृतीवर मालकी सांगतो. द्रविडांनी हे काम आधी सुरु केले पण त्याला आर्य आ...