Friday, November 11, 2022

इतिहास?

 आजच्या सामाजिक संघर्षांना गतकाळावर लादत उन्माद करणे हे समंजस समाजाचे लक्षण नाही. अफजलखान हत्येचे चित्र मिरवणारे एकीकडे आणि कृष्णाजी भास्कर कुलकर्णीच्या हत्येचे चित्र मिरवणारे दुसरीकडे आपापले राजकीय/धार्मिक हिशोब चुकते करत असतील पण यात अफजलखान आणि त्याचे असतील त्या धर्माचे सहकारी/नोकर लोक हे स्वराज्याचे शत्रू होते आणि ते केवळ शत्रू होते म्हणून त्यांना ठार केले गेले हे विसरले जाते.

स्वराज्याचे शत्रू केवळ मुस्लीम नव्हते. अनेक हिंदू आणि वैदिकही त्यात सामाविष्ट होते. मित्रांमध्येही याच सर्व धर्माचे लोक होते. तो त्या काळातील सत्ता संघर्ष होता आणि त्यात असे घडणेही स्वाभाविक होते. त्याला निखळ धार्मिक परिमाण असू शकत नव्हते आणि तसे नसतेही आणि हे शिवाजी महाराजांनी ओळखले होते म्हणून ते कालजेयी झाले. ज्यांनी धार्मिक परिमाण महत्वाचे मानले त्यांना आज इतिहासात कसलेही महत्व नाही.
शिवाजी महाराजांचे निरपेक्ष विश्लेषण आजच्या वातावरणात अशक्य असल्याने अनेक नव्या दृष्टीचे इतिहासकार त्या इतिहासाला हात लावू इच्छित नाहीत कारण आजचा उन्माद. अक्कलशून्य कादंबरीकार, लेखक, दिग्दर्शक, इतिहासकारांची आज सद्दी आहे. जातीय/धार्मिक कलहातून सामाजिक वादळ उठवण्याचा प्रयत्न करत राजकीय पोळी भाजून घेणा-या विधीनिषेधशून्य राजकारण्यांना आपली अक्कल पाजळायची ही नामी संधी आहे. हे काही शिवरायांपासून काही शिकणे नव्हे तर त्या शिकवणुकीची पायमल्ली आहे आणि यात इतिहास मात्र शेवटचे आचके देत आहे हे कोठेतरी आता समजायला पाहिजे.
स्वराज्याच्या एका शत्रूचा आज बिमोड केला गेला ही घटना शिवरायांची महत्ता शिरोधार्य घेण्यासाठी पुरेशी आहे. त्यात जातीय/धार्मिक उन्माद करण्यासारखे काही नाही. यापासून शिकायचेच असेल तर शिवरायांचे मुत्सद्दीपण. नियोजनातील काटेकोरता, अंतिम उद्दिष्टावर असलेली अथांग श्रद्धा आणि अंमलबजावणी आणि त्याचाच उत्सव साजरे करत न बसता पुढील ध्येयाकडे मार्गक्रमण.
आम्ही मात्र जातीय द्वेषाचेच उत्सव बनवत शिवाजी महाराजांचा एका प्रकारे अवमान करत आहोत हे भान आम्हाला यायला हवे!
-संजय सोनवणी

No comments:

Post a Comment

पांडुरंग बलकवडॆ एवढ्या खालच्या थराला गेले कसे?

  पांडुरंग बलकवडॆ एवढ्या खालच्या थराला गेले कसे? Sanjay Sonawani    ·  Pune    ·  Shared with Public 10 janewari 2013 पांडुरंग बलकवडे यांच्य...