Tuesday, November 8, 2022

नष्ट झालेल्या जाती!

 भारतात अनेक नव्या जाती जन्माला आल्या असल्या तरी नष्ट झालेल्या जातीही खुप आहेत. याचा अर्थ त्या जातीयांचा उच्छेद झाला असा नसुन त्यांना आपले उद्योग अस्तित्वच गमावून बसल्याने पोटार्थी अन्य उद्योग शोधावे लागल्याने त्यांच्या जाती नष्ट झाल्या. तर नवे व्यवसाय/उद्योग वाढल्याने नव्या जाती निर्माण झाल्या.

 

मी जरी आजकाल विद्यमान जातींचा (म्हणजेच व्यवसायांचा.) इतिहास सागण्याचा प्रयत्न करत असलो तरी नष्ट झालेल्या जातींविषयकही विवेचन तेवढेच महत्वाचे आहे. याचा अर्थ असा होतो कि जाती अपरिवर्तनीय आहेत, होत्या, हे विधान पुरेपुर खोटे ठरते. आणि त्यासाठी अनेक पुरावे उपलब्ध आहेतच. काही जाती नष्ट होणे, नव्या जाती निर्माण होणे, जातींतुन पोटजाती निर्मण होणे आणि काही पोटजातीही नष्ट होणे. उदा. रथकार ही सुतार समाजातील पोटजात आज अस्तित्वात नाही. फार कशाला, सातवाहन काळातील कोरीव लेखांत उल्लेखलेल्या हलिक (नांगरे), ओदयांत्रिक ई. जातीही आज अस्तित्वात नाहीत. स्मृतींतील धिग्वन, आयोगव, पारशव, पुल्कस इत्यादि वैदिक धर्मातील जातीही आज अस्तित्वात नाहीत. उलट महार, मराठा, कायस्थ, शिंपी, रंगारी ई. जाती दहाव्या शतकापुर्वी अस्तित्वात असल्याचे उल्लेख मिळत नाहीत...याचाच अर्थ असा होतो कि जातीव्यवस्था अपरिवर्तनीय आहे व होती हा सिद्धांत मुळातच बाद होतो.

 

मग जर जाती मुळात अपरिवर्तनीय होत्या हा सिद्धांतच पुराव्यांवर टिकत नसेल तर मग आपण आज जाती अपरिवर्तनीय आहेत असे मानत आपली सामाजिक व्युहरचना का करतो? का आपण जातीअभिमानात गुरफटतो?

 

आज जी आपली जात आहे ती पुर्वी नव्हती. त्याआधी आपण अजुन कोणत्यातरी अन्य जातीचे असू. दहाव्या शतकापर्यंत जे स्थितीस्थापकत्व नव्हते ते मात्र आम्ही आज निर्माण केले आहे. म्हणुनच जातीय संघर्ष पेटलेला आहे. आणि आजची कोणतीही जात अन्य पर्यायच उपलब्ध नसला तरच जातीचे परंपरागत व्यवसाय करते.

 

याचाच मतितार्थ असा कि जाती परिवर्तनीय होत्या व आहेत.

आणि जाती परिवर्तनीय असतील तर मग त्यांची गरजच काय?

 

आम्ही हजारो वर्षांपासुन अमुकच जातींचे होतो हा भ्रम कोणत्याही जातीला पाळता येत नाही. जाती मुळात अपरिवर्तनीय नव्हत्या. एका जातीचे (व्यवसायाचे) लोक स्वेच्छेने अन्य जातींत जात होते. कोणतीही जात आभाळातून पडलेली नाही. नष्ट झालेल्या जातींचे लोकही नष्ट झालेले नाहीत तर ते अन्य व्यवसायांत (जातींत) प्रवेशलेले आहेत. हे आतंर-सम्मिश्रण एवढे मोठ्या प्रमानावर झालेले आहे कि पाच हजार वर्षांपासून एका जातीचे पुर्वज आजच्याच जातीत होते असे मुळात मानणे अशास्त्रीय आणि अवैज्ञानिक आहे.

 

येथे सांगायची बाब अशी कि जात्युभिमान निरर्थक आहे कारण तुम्ही आज कोणत्याही जातीचे असा...इतिहासात कायमस्वरुपी तुम्ही याच जातीचे होता असा दुराभिमान वा हीनगंडात्मक विचार मुळात करण्याचे काहीएक कारण नाही.जगात मानवजातीला प्रत्येक व्यवसायाची जगण्यासाठी गरज होती, ती सर्वांनीच आपापल्या परीने भागवलेली आहे, त्यामुळे जातींचा दुराभिमान अथवा न्य़ुनगंड बाळगणे मुर्खपणाचे आहे.

 

जर इतिहासात असंख्य जाती नष्ट झालेल्याच आहेत तर त्या आता नष्ट होणार नाहीत असे समजणे हेही अज्ञानाचे लक्षण आहे.

 

 

इतिहास काळात व्यवसायच संपल्याने नष्ट झालेल्या जाती...हलिक भोगिक, ओदयांत्रिक, तेसकार, धम्निक, मिठीक, सुत, रथकार इत्यादी अशा अनेक.

इतिहासकाळात नष्ट झालेल्या आंतरवर्णीय विवाहातून निर्माण झालेल्या वैदिक संकर जाती- आयोगव, धीग्वन, अम्बष्ठ, उग्र, करण, छत्ता, बंदी इत्यादी.

इतिहासकाळात वैदिक साहित्याच्या दृष्टीने नष्ट झालेले वर्ण- क्षत्रीय आणि वैश्य. वैदिक धर्मातील यांची गरज संपल्याने वा त्यांनीच धर्म बदलल्याने नष्ट झालेले वर्ण. (वर्ण आणि जाती एक नव्हेत. वैदिक धर्मात वर्ण फक्त जन्माने प्राप्त होतो.)

गेल्या चार हजार वर्षात नव्याने निर्माण झालेल्या जाती- तांबट (तांब्याचा शोध) लोहार (लोखंडांचा शोध) विणकर व तत्संबंधी जाती (विणकामाचा शोध), इत्यादी, नवे शोध लागले वा सेवा निर्माण झाल्या तसे नव्या व्यावसायिक जाती निर्माण झाल्या. ज्या जातींचे उल्लेख वा तत्सम व्यवसायांचेही प्र्वीचे उल्लेख मिळत नाही अशा अनेक काही जाती दहाव्या शतकानन्तरही निर्माण होतांना दिसतात.

हे नवजातीनिर्माण होत असतांना त्यात प्रवेशणारे लोक आधी कोणत्या ना कोणत्या व्यावसायात म्हणजे जातीत होते. याचाच अर्थ जातीबदल/व्यवसायबदल होत होता. नवीन व्यवसाय जन्माला आला कि नव्या व्यावसायिक जाती बनणे आणि व्यवसाय नष्ट झाला तर जातीही नष्ट होणे हा क्रम पूर्वांपार होता.

अशा स्थितीत जाती अपरिवर्तनीय आहेत आणि अनादी अजरामर आहेत असे मानण्यात काय अर्थ आहे?

थोडक्यात जात विसरा!



No comments:

Post a Comment

सिंधू संस्कृतीची मालकी!

  सिंधू संस्कृतीची लिपी वाचता आलेली नसल्याने कोणीही उठतो आणि सिंधू संस्कृतीवर मालकी सांगतो. द्रविडांनी हे काम आधी सुरु केले पण त्याला आर्य आ...