Saturday, November 12, 2022

ऐतिहासिक चित्रपट: इतिहासाची हत्या!


 

ऐतिहासिक व्यक्ती अथवा ऐतिहासिक पार्श्वभूमीवर काढलेले चित्रपट आपल्याकडे वारंवार वादाचे कारण घडत असताना आपण पाहतो. अलीकडे ही परंपरा पद्मावती चित्रपटापासून सुरु झाली. “हर हर महादेव” वरून रणकंदन सुरु असून “वेडात मराठे वीर दौडले सात” या चित्रपटाच्या निमित्तानेही वाद उठला आहे. भविष्यात असेच वाद वारंवार उसळत राहतील असे दिसते आहे. अशा चित्रपटांमुळे इतिहासाचे विकृतीकरण होते, समाजात दुही निर्माण होते, इतिहासातून चुकीचा संदेश जातो असे आरोप होतात. असे चित्रपट प्रदर्शित होऊ दिले जाणार नाहीत, सिनेमागृहाचे पडदे फाडू असे इशारे दिले जात असतानाच काही संघटना सरळ चित्रपटाच्या सेटवर तोडफोड करतानाही आपण पाहिले आहे. काही निर्माते जाणीवपूर्वक असे वाद निर्माण होतील असे पाहतात कारण यामुळे तरी तसे ‘पडेल’ या सदरात जाऊ शकणारे चित्रपट बॉक्स ऑफिसवर गल्ला भरण्यात यशस्वी होईल अशी आशा त्यांना असते. निर्माते-दिग्दर्शक मात्र “सिनेम्यटीक लिबर्टी” अथवा अभिव्यक्ती स्वातंत्र्य  हा बचावाचा मुद्दा उपस्थित करतात आणि या वादांवर पडदा टाकायचा प्रयत्न करत असतात. “चित्रपटात इतिहास शोधायचा नसतो तर एक कलाकृती म्हणून त्याच्याकडे पाहत कलात्मक गुण-दोषांची चर्चा करायची असते, ऐतिहासिक तथ्यांची नाही” असे म्हणणारेही “तटस्थ” सदरात मोडू पाहणारे लोक असतात. राजकीय व सामाजिक संघटनांचे नेतेही राजकीय व सामाजिक लाभावर नजर ठेवून अशा वादात उडी घेत असतात. एकंदरीत समाज ढवळून निघतो. समाजमाध्यमांवर तर अशा चर्चांना उधाण येते.

आपण आपल्या ऐतिहासिक चित्रपटांच्या निर्मितीच्या एकंदरीत इतिहासाकडे पाहिले तर पूर्वी असे वाद फार क्वचित होत असे दिसते. म्हणजे तेही चित्रपट इतिहासाशी इमान ठेवून बनलेले असत असे नाही. याचा अर्थ तेंव्हाचे लोक जास्त समजूतदार होते असा घ्यायचा काय? तर तसेही नाही. पण त्या वेळेस निर्माते/दिग्दर्शक “वाद निर्माण करणे” या तत्वापासून फटकून राहत. असेल त्या बजेटमध्ये आपल्याला भावलेली ऐतिहासिक कथा सांगायची आहे एवढाच काय तो दृष्टीकोन असायचा. “मोगले आझम” हा काही इतिहासाशी प्रामाणिक चित्रपट नव्हे तर एका दंतकथेवर बेतलेला. पण त्याने कलात्मकतेची परिमाणे ओलांडली. आजही हा चित्रपट रसिकांच्या मनावर राज्य करतो आहे. या चित्रपटाबाबत ऐतिहासिकतेच्या अंगाने कसलाही वाद झाल्याचे कानावर नाही. याउलट “पद्मावत”” चे. हीसुद्धा इतिहासातील एक दंतकथा. पण तिने मात्र शुटिंग सुरु झाल्यापासून वादळ उठवले, ते हिंसकतेकडेही झुकले होते. आता हा चित्रपट अनेकांपैकी एक या सदराखाली गेला आहे.

अलीकडे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे वीर सेनानी नायक बनवत चित्रपट काढण्याची एक लाट आली आहे. शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य आहे. त्यांच्याबद्दल आणि त्यांच्या सहका-यांबद्दल लोकांच्या मनात एक पूज्य भाव आहे. किंबहुना शिवशाहीबद्दल लोकांच्या मनात एक उदात्त प्रतिमा आहे. त्यामुळे शिवशाहीवर चित्रपट निर्माण करायची लाट आली आहे असे म्हटले जात असले तरी असे सारेच चित्रपट यशस्वी झालेत असेही चित्र नाही. अनेक असे चित्रपट अत्यंत बटबटीत, कलाशून्य आणि ऐतिहासिक सत्यांची व तथ्यांची धूळधान उडवणारे आहेत.

इतिहासाकडे पाहण्याचे वेगवेगळे दृष्टीकोन असू शकतात हे मान्य केलेच पाहिजे. कलाकृती निर्माण करताना इतिहासातील अनेक गाळलेल्या जागा कल्पनाशक्तीने व तर्कबुद्धीने भरून काढाव्या लागतात हेही खरे. त्यासाठी काही काल्पनिक पात्रेही निर्माण करावी लागतात. दंतकथा-मिथकांचाही खुबीने उपयोग करून घ्यावा लागतो. पण त्यात एक आंतरिक सुसंगती लागते. ती नसेल तर ऐतिहासिक चित्रपट फसणार हे उघड आहे. कारण चित्रपट म्हणजे डॉक्यूमेंटरीही नव्हे कि मनमानी करत इतिहासाचे विकृत चित्रणही नव्हे. सिनेम्यटीक लिबर्टी चित्रपटाचा विषय/आशय खुलवण्यासाठी, तिला एक कलात्मक उंचीवर पोहोचावण्यासाठी वापरावी अशी अपेक्षा असते. पण तसे होते असे नाही. किंबहुना त्यासाठी जो कलात्मक आणि इतिहासाबद्दलचा कोणता तरी पण प्रगल्भ दृष्टीकोन हवा तोच नसेल तर काय होते हे आपण आजकालच्या ऐतिहासिक चित्रपटातून पाहू शकतो. आपल्या निर्मात्यांचे व दिग्दर्शकांचे कल्पना दारिद्र्य हे पटकथा, संवाद, अभिनय ते कपडेपटापर्यंत सर्रास दिसून येते. लोकेशन्सचेही तेच. मग दिग्दर्शन काय योग्यतेचे असणार याची कल्पना आपण करू शकतो. मुळ लेखनातच एवढ्या ढोबळ चुका ठेवल्या जातात की हे लोक कोणा इतिहासाच्या त्या काळावरील अभ्यासू व्यक्तीचा किमान सल्ला तरी घेतात कि नाही हा प्रश्न पडावा. प्रत्येक काळातील समाजातील विविध घटकांतील लोकांची वेशभूषा साधारणपणे कोणत्या प्रकारची होती किंवा असू शकेल यावरही विचार केला जात नाही. तेच संवादाच्या भाषेचे. टपोरी भाषा वापरली तर “डायलॉग जबरी होतो.” अशा सडकछाप वृत्तीतून लेखक बाहेर आलेले नाहीत. ऐतिहासिक काळ असेल तर त्या काळाची छाया असलेली भाषा वापरायला हवी एवढे भानही संवाद लेखकांना नसते. उदयभानू या राजपूत पण मोगली सरदाराची वेशभूषा फसते आणि टीकेचे कारण होते ती त्यामुळेच. “वेडात दौडले वीर मराठे सात” च्या पोस्टरमधील एक पात्र त्याची वेशभूषा आणि स्त्रैण देहबोलीवरून आताच चर्चेत आले आहे. मराठे किंवा मावळे “असे” होते काय? हा खरा प्रश्न उपस्थित झाला आहे. यामागे जात्युभिमान आहे हेही उघड आहे. पण या आरोपाला विरोध करणारे “हा जेंडर बायस” आहे असा प्रतिवाद करीत आहेत. पण नेमका इतिहास किंवा त्याशी निगडीत दंतकथा काय आहे आणि उपलब्ध पुराव्यांनुसार हे पात्र त्याशी सुसंगत आहे कि नाही या दृष्टीकोनातून मात्र चर्चाच नाही.

शिवाजी महाराजांवर अलीकडे चित्रपट बनवण्याचे कारण म्हणजे त्यांच्या मार्फत हिंदुत्ववादाचे वहन करता येणे सोपे जाते असाही एक आरोप आहे आणि त्यात तथ्य नाही असे म्हणता येणार नाही. कला जेंव्हा सत्ताशरण बनते अथवा एखाद्या विचारसरणीची प्रचारक होते तेंव्हा ती कला राहतच नाही. कलेचा तेथेच मृत्यू होतो. खरे तर मालिका-नाटक-चित्रपट म्हणजे इतिहास नसतो तर इतिहासातील काही घटनांचे अथवा व्यक्तींचे रंजनात्मक कलात्मक दर्शन असे त्याचे स्वरूप असते. पण तोच खरा इतिहास आहे अशी समजूत असलेल्या आपल्या देशात निर्माते-दिग्दर्शकांची जबाबदारी मोठी आहे. प्रेक्षकांचे मनोरंजन करत त्यांना इतिहासातील जीवनदर्शन घडवत त्यांचा दृष्टीकोन व्यापक करणे हा अदृश्य हेतू असला पाहिजे. पण आता तसे होताना दिसत नाही. त्याला हिंदू-मुस्लीम व जातीय परिमाणे हेतुत: चिकटवून इतिहासाचा विचका करण्याच्या उदात्त हेतूने ही मंडळी कार्यरत आहेत कि काय अशी शंका येणे स्वाभाविक आहे. कारण या चित्रपटांनी समाजात जातीय-धार्मिक विभाजनीच्या रेषा रुंद करण्यात हातभार लावला आहे हे तर स्पष्ट दिसते आहे. आणि हा काही केल्या कलेचा हेतू असू शकत नाही.

वाद निर्माण केल्याने चित्रपट चालेल या भ्रमातून आधी बाहेर यायला पाहिजे. तसे होत नाही हाही एक इतिहासच आहे. इतिहास हा एक नाजूक विषय आहे आणि त्याला तशाच कलात्मक कौशल्याने हाताळले पाहिजे. मुळात आपला  अकाडमिक इतिहासच अजून अपूर्ण आहे. इतिहासातील अनेक अनुत्तरीत प्रश्न संशोधकांची वाट पाहत आहेत. इतिहास संशोधन हा काही कलाकारांचा उद्देश नसतो पण आहे त्या इतिहासाशी तरी दुर्हेतुने अवास्तव छेडछाड वा विपर्यास न करता योग्य तेथे अवश्य सिनेम्यटीक लिबर्टी घेतली पाहिजे ती कलाकृतीचे सौंदर्य वाढवण्यासाठी, डागाळण्यासाठी नव्हे याचे भान ठेवले पाहिजे.

-संजय सोनवणी

 

 

No comments:

Post a Comment

सिंधू संस्कृतीची मालकी!

  सिंधू संस्कृतीची लिपी वाचता आलेली नसल्याने कोणीही उठतो आणि सिंधू संस्कृतीवर मालकी सांगतो. द्रविडांनी हे काम आधी सुरु केले पण त्याला आर्य आ...