Saturday, November 19, 2022

श्रद्धा-आरुषी-नैना हत्याकांडे आणि समाजभान!

 

जगभरातच क्रूर हत्याकांडांची प्रकरणे अत्यंत गाजलेली आहेत. मानवाचे हिंस्त्र चेहरे अशा हत्याकांडांतून सामोरे येत असले आणि ते समाजमन हादरवून सोडत असले तरी प्राथमिक हाद-यातून समाज मुक्त होतो न होतो तोच दुसरी एखादी घटना कोठेतरी घडते आणि पुन्हा सामाजिक चर्चांना उधान येते. भारतासारख्या देशात अनेकदा जाती-पातीचे संदर्भ चिकटवून अशा घटनांकडे पाहिले जाते, पण मुख्य प्रश्न मानवी क्रौर्यभावनेचा असतो त्याकडे मात्र सहसा दुर्लक्ष होते.

अलीकडेच दिल्ली येथे मुळच्या पालघर येथील सव्हीस वर्षीय श्रद्धा वालकर हत्या प्रकरण घडले. या प्रकरणातही क्रौर्याने परिसीमा गाठली. श्रद्धाचा लिव्ह-इन पार्टनर आफताब पूनावालाने गळा आवळून तिची हत्या केली आणि तिच्या देहाचे ३५ तुकडे केले. हे तुकडे करायला त्याला दहा तास लागले. मृतदेहाचे तुकडे ठेवण्यासाठी त्याने तीनशे लिटर क्षमतेचा एक फ्रीजही विकत घेतला आणि त्यात हे तुकडे ठेवले. पुढील तीन आठवडे रोज पहाटे तो रोज एक-दोन तुकडे काळ्या प्लास्टिकच्या थैलीत घालून महरौली, गुरूग्राम इ. जंगलामध्ये फेकून त्याची विल्हेवाट लावत होता. अगदी देहरादूनमध्येही त्याने काही तुकडे फेकले अशी माहिती मिळते. तिचे मस्तक मात्र त्याने फ्रीजमध्येच ठेवले होते आणि तो रोज तिचा चेहरा पाहत असे. खुनाची घटना घडली ती १८ मे २०२२ रोजी. म्हणजे तब्बल पाच  महिने या घटनेचा कोणालाही तपास लागला नाही.

श्रद्धाच्या कुटुंबीयानी ती बेपत्ता असल्याची तक्रार माणिकनगर पोलीस स्टेशनला दिली होती. आफताबला चौकशीसाठी दोनदा बोलावन्यातही आले होते पण त्याने आपण आता एकत्र राहत नसल्याचे त्याने पोलिसांना सांगितले होते. पण शेवटी पोलिसांनी त्याच्यावरच तपास केंद्रित केला आणि शेवटी त्याने आपणच श्रद्धाचा खून केल्याचे कबुल केले. केस सबल करता यावी यासाठी पोलिसांनी नार्को टेस्टचे मागणी केलेली आहे.

या प्रकरणात रोज धक्कादायक माहिती उजेडात येत आहे. हे दोघे गेली चार वर्ष संपर्कात होते आणि हत्येआधी गेली दोन वर्ष लिव्ह-इन नात्यात राहत होते. आफताबने तिला विवाहाचे आमिष दाखवले होते असेही सांगण्यात येते. हा खून अत्यंत थंड डोक्याने करण्यात आला हे उघड आहे. या खुनामुळे लिव्ह-इन रिलेशनशिप मधील धोक्यांची चर्चाही जोरात सुरु झालेली आहे.

या हत्याकांडामुळे अमेरिकेतील जेफ्री दाह्मेर नामक सिरीयल किलरने केलेल्या निघृण हत्यांची व त्याने प्रेतांचे तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवून ते चक्क खाल्ल्याच्या प्रकरनही चर्चेत आले. या सिरीयल किलरने किमान १७ हत्या थंड रक्ताने, अगदी शौक असल्याप्रमाणे केल्या होत्या. त्याला पकडले गेले पण त्याला त्याच्याच एका सहकैद्याने तशाच थंड रक्ताने मारहाण करून ठार मारले. हा दैवगत न्याय झाला असला तरी दाह्मेर असा का वागला यावर मानसशास्त्रद्न्य त्याच्या बालपणातील घटनांपासून वेध घेत आहेत.

या प्रकरणामुळे भारतात मागे घडलेल्या अशा प्रकरणांचीही चर्चा सुरु होणे स्वाभाविक होते. 2008 मध्ये झालेली आरुषी-हेमराज या दुहेरी रहस्यमय हत्याकांडाने देशात खळबळ उडवली होती. या घटनेतील आरोपी कोण या प्रश्नाने सारेच चक्रावले होते. शेवटी आरुषीचे माता-पिता नुपूर आणि राजेश तलवार यांनीच ही हत्या केली असा सीबीआय न्यायालयाने निष्कर्ष काढून दोघा आरोपीना आजन्म कैदेची शिक्षा सुनावली. नंतर अलाहाबाद उच्च न्यायालयाने २०१७ मध्ये संशयाचा लाभ देत दोघांना मुक्त केले. आजही आरुषी-हेमराज हत्याकांड हा रहस्यमय विषय राहिला आहे आणि त्यावर “तलवार” नावाचा चित्रपटही आला होता. आजही आरुषी आणि हेमराजचे खरे हत्यारे कोण हा प्रश्न सुटलेला आहे असे म्हणता येणार नाही. पण याही हत्याकांडात थंड रक्ताने हे खून केले होते हे स्पष्ट आहे.

यही प्रकरणाआधीचे अशाच कोल्ड ब्लडेड मर्डरचे उदाहरण म्हणजे नैना साहनी प्रकरण. १९९५ मध्ये दिल्लीमध्ये राहणा-या सुशील शर्मा नामक इसमाने आपली पत्नी नैना साहनीची गोळी मारून हत्या केली आणि प्रेताचे तुकडे करून तंदूर भट्टीत जाळून प्रेताची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. ही निघृण हत्या सुशील शर्माने केली कारण म्हणे त्याचा पत्नीच्या...म्हणजे नैनाच्या चारित्र्यावर संशय होता. आरोपी पुढे पकडला गेला आणि त्याला आधी फाशीची शिक्षा झाली जी नंतर जन्मठेपेत बदलण्यात आली.

भारतात अशा निघृण आणि थंड रक्ताने केलेल्या हत्यांच्या अनेक घटना घडलेल्या आहेत. वरील तीनही प्रकरणे पाहिली तर स्त्री-पुरुष संबंध आणि त्यातून निर्माण झालेल्या समस्या या प्रकरणामागे असल्या व त्यातून अनेक हत्या झाल्या असल्या तरी खुन्यांनी खून करताना व प्रेताची विल्हेवाट लावताना जे थंड-रक्ती वर्तन केले आहे त्यात समान धागा दिसून येतो. लिव्ह-इन रिलेशनशिप आधुनिक जगाची गरज आहे काय? ते नैतिक आहे काय? हा समाजशास्त्रीय प्रश्न असून त्याची वेगळी साधक-बाधक चर्चा होऊ शकते. न्यायालयाने आधुनिक समाजरचनेची आवश्यकता पाहून लिव्ह-इन ला कायदेशीर स्वरूप दिलेले आहे. श्रद्धा खून प्रकरण झाले म्हणजे लिव्ह-इन वाईटच असा निष्कर्ष काढता येणार नाही. कारण नैना साहनी प्रकरण तर विवाहबंधनाने जोडलेल्या पती-पत्नीत घडले होते. विवाह केला होता म्हणून नैना साहनीची हत्या थांबली नाही.

आरुषीची हत्या निर्विवादपणे कोणी केली हे जरी आजही एक रहस्यच बनून बसले असले तरी आरुषी-हेमराजमधील संबंधांचा राग येऊन कोणी निकटवर्तीयाने ती केली होती हा निष्कर्ष आपण काढू शकतो. श्रद्धा-आणि आफताब लिव्ह इन मध्ये राहत असले तरी त्यांची भांडणेही विकोपाला गेली होती असे काही साक्षीदार सांगतात. पण हे काही हत्या करण्याचे कारण होऊ शकत नाही. पण तरीही असे क्रौर्य वारंवार उफाळून येताना आपल्याला दिसते.

आंतरजातीय विवाह केला म्हणून ऑनर किलिंग होण्याचे प्रकार तर आपल्याकडे खूप आहेत. 2015मधील ठळक घटना म्हणजे कोल्हापुरात अत्यंत निर्दयपणे मारले गेलेले प्रेमविवाहित दांपत्य इंद्रजित कुलकर्णी व मेघा पाटील. दांपत्याची हत्याही दोघांचे गळे चिरून थंड रक्ताने निर्घृणपणे केली गेली. हत्या करणारे मेघाचे सख्खे भाऊ होते.

मुळात नातेसंबंधातच अलीकडच्या जागतिकीकरणाच्या काळात अंतराय आला आहे हे आपण पाहतो. लोक समाजाभिमुख न होता झपाट्याने व्यक्तिवादी व स्वकेंद्रित होत चालले आहेत. अगदी पती-पत्नी-मुले यांच्यातील सुसंवादही कोठेतरी थांबल्यासारखा झालेला आहे. तसे पाहिले तर प्रत्येकाच्या आत एक अंधारी कोपरा असतो. तो हिंसक असतो,...तो विकृत असतो. कोणाचा कमी कोणाचा जास्त. शक्यतो लोक तो दिसू न देण्यासाठी सभ्यतेचे बुरखे घालतात. सामाजिक असण्याचा फायदा हा कि मनुष्य जरातरी दुस-यांबद्दल सोशिक होतो आणि कृत्रिम का होईना पण सौजन्याने वागतो. पण कधीतरी अशी वेळ येतेच कि त्यांचा कालांधार उजेडावर मात करायला धावून येतो. यालाच आदिम रानटी अवशेष आपल्यात शेष आहेत याचे पुरावे म्हणता येतात. आणि आजच्या स्थितीत विस्कळीत मानसिकतेच्या लोकांमधील सैतान जागे होण्याचा अपार संधी आहेत. त्या प्रत्यक्ष कृत्यातच बदलतात असे नाही. पण मग अन्य मार्गाने का होईना त्याची अभिव्यक्ती सुरु असतेच. अशा स्थितीत काही स्त्री-पुरुष कोणत्या ना कोणत्या उद्रेकी स्थितीत आपल्यावरील सारे सुसंस्कृतपणाचे ओढलेले मुखवटे ओरबाडून क्रूर होतात. मग अशा क्रूर घटना घडतात. आपणच सारे मिळून सामाजिक वातावरणच नितळ कसे बनवता येईल हे पाहिले पाहिजे.

-संजय सोनवणी


No comments:

Post a Comment

सिंधू संस्कृतीची मालकी!

  सिंधू संस्कृतीची लिपी वाचता आलेली नसल्याने कोणीही उठतो आणि सिंधू संस्कृतीवर मालकी सांगतो. द्रविडांनी हे काम आधी सुरु केले पण त्याला आर्य आ...