Sunday, November 20, 2022

सांस्कृतिक श्रेष्ठतावाद: विनाशास निमंत्रण!


 


आमच्या राष्ट्राची संस्कृती श्रेष्ठ आहे असा दावा जगातील सर्वच राष्ट्रे करत असतात. राष्ट्रीयतेच्या भावनेला चेतवण्यासाठी हा असा भावनिक श्रेष्ठतावाद नेहमीच उपयुक्त ठरलेला आहे. जगातील एकही राष्ट्र या श्रेष्ठतावादाला अपवाद नाही. आमची संस्कृती श्रेष्ठ होती म्हणजे नेमके काय असा प्रश्न विचारला तर इतिहासातील महापुरुषांचे, साहित्याचे, महाकाव्ये व मिथ्थकथांच्या पुराणतेचे दाखले सहज दिले जातात. थोडक्यात आमचीच संस्कृती सर्वांत अधिक पुरातन आहे म्हणून ती श्रेष्ठ आहे असे ठसवायचा प्रयत्न होत असतो. राष्ट्रांतर्गत शालेय शिक्षणापासून या श्रेष्ठतेचे, पुरातनतेचे ज्ञान (?) दिले जात असते. पुरातनता म्हणजे श्रेष्ठता असा दावा खरे तर सांस्कृतीक परिप्रेक्षात टिकत नाही, तरीही श्रेष्ठतावाद जपण्यासाठी त्याची गरज असल्याने तो निर्माण केला जातो. पण आजच काय, पुरातन काळीही कोणत्याही राजकीय भूभागाची संस्कृती पूर्णतया स्वतंत्र व बाह्य प्रभावांपासून अलिप्त होती असे दिसत नाही. या सांस्कृतिक श्रेष्ठतावादाने आजचेही अकादमिक क्षेत्रही ग्रासलेले असून त्यांच्या लेखनावर त्याचा प्रभाव स्पष्टपणे दिसतो त्यामुळे त्यांचे संशोधन निकोप आहे असे म्हणता येण्यासारखी स्थिती नाही.

आधुनिक काळात आपल्याला अठराव्या शतकात जन्माला घातल्या गेलेल्या आर्य सिद्धांताने माजवलेल्या श्रेष्ठतावादाची सहज आठवण होते. या सिद्धांताने आधुनिक काळात वेगळाच संस्कृती संघर्ष निर्माण केला. हा संघर्ष “वांशिक” पातळीवर पोचल्याने त्याची भयावहताही वाढली. या सिद्द्धांनुसार ‘आर्य’ नामक इंडो-युरोपियन भाषा बोलणारा एक मानवगट उरल पर्वताच्या प्रदेशात अथवा उत्तर धृवानिकट इसपू २५०० च्या आसपास उदयाला आला आणि काही कारणांनी स्थलांतरित होऊन अन्यत्र विखरत टोळ्या-टोळ्यांनी युरोप ते भारतीय उपखंडात पसरला. पुरा-संस्कृत भाषेचे जन्मदाते हेच ‘आर्य” असून ही भाषाही ते जेथे जेथे गेले तेथे त्यांनी पसरवली. या टोळ्यांनी तेथील अडानी-आदिवासी अन्य वंशीय लोकांना पराजित केले व त्यांना दास-दस्यू बनवले असे या सिद्धांतात मांडले गेले होते. याच टोळ्यांनी पूर्व इराणमध्ये वेद व अवेस्ता तसेच  ग्रीसमधील महाकाव्ये-मिथ्थकथा ते ल्यटिन भाषेला जन्म दिला. या भाषा शेवटी पराजित स्थानिय लोकांना अपभ्रंश करून का होईना स्वीकाराव्या लागल्या असे या सिद्धांतातून सांगितले जाते. आर्य हा यच्चयावत विश्वातील श्रेष्ठ वंश असून अन्य वंश म्हणजे, सेमेटिक, द्राविडीयन, मंगोलाईड, ऑस्ट्रीक इ. हिणकस आहेत हा सिद्धांत सोबतीने चालत गेला हे उघड आहे.

याला अर्थात पार्श्वभूमी होती ती युरोपमधील प्रबोधनयुगाने निर्माण केलेल्या यंत्रयुगाची आणि सोबतच ज्ञानक्षेत्रात झालेल्या आधुनिक विस्फोटाची. त्यामुळे युरोपियनांना आपण श्रेष्ठ असल्याचा साक्षात्कारही झाला आणि आपला इतिहास खूप मागे खेचण्याची स्पर्धा लागली. युरोपियनांना सेमेटिक वंश गटाशीची सांस्कृतीक मुळे तोडायची होती. जर्मनांना जर्मनांच्या सांस्कृतीक एकीकरणासाठी "जर्मननेस" शोधायची गरज होती. डॆव्हीड ह्युमसारख्या अठराव्या शतकातील श्रेष्ठ तत्वज्ञाने "गोरेतर सारेच हीण आहेत" असे स्पष्ट प्रतिपादित केले. काहींची मजल तर काळे हे युरोपियन व एप्सच्या संकरातून निर्माण झालेले निर्बुद्ध आहेत अशी मांडणी करण्यापर्यंत मजल गाठली. यात सेमिटिक नाळ तोडण्याचे प्रयत्न सुरु होतेच. भारत हीच आर्यांची मुळभुमी आहे असे मानण्याकडे या काळात कल होता. त्यासाठी व्होल्तेयरसारख्या तत्ववेत्त्याने तर चक्क भारतीय ब्रह्म आणि अब्राहमात साधर्म्य शोधत बाप्पा अब्राहम हा भारतीय होता अशी मांडणी केली. रेनान या फ्रेंच विद्वानाने येशु ख्रिस्त हा सेमिटिक नव्हे तर "आर्य" होता असे प्रतिपादित केले. थोडक्यात एनकेनप्रकारेन युरोपातील धर्म-संस्कृतीचे मुळ सेमिटिक नाही हे त्यांना सिद्ध करायचे होते. आर्य सिद्धांत त्यासाठी आणला गेला आणि जगभर सांस्कृतिक-वांशिक संघर्षाने कळस गाठला.

 

“आर्य” सिद्धांताने हिटलरसारख्या क्रूरकर्म्याला जन्म दिल्याने आता ‘आर्य हा वंश आहे.” हा सिद्धांत मागे पडला असला तरी हेच वांशिक तत्वज्ञान सध्या "इंडो-युरोपियन भाषागट" या भाषिक सिद्धांतातून मांडले जात असते. त्यासाठी अगदी जनुकीय शास्त्रही वेठीला धरून त्यातून सोयीस्कर अर्थ काढले जात असतात. शेवटी आपलीच संस्कृती पुरातन व वर्चस्वशाली होती असेच अशा सिद्धांतनांतून ठसवायचे असते. या सिद्धांताने युरोपचा इतिहास बराच मागे जात असल्याने तेथील विद्वानांनी यावर उड्या मारणे स्वाभाविक होते. भारतीय हिंदुत्ववादीही स्वत:ला “वैदिक आर्यांचे वंशज” समजत वैदिक संस्कृतीचा काळ जितका मागे नेता येईल तितका मागे नेत आर्य सिद्धांताला कोणत्या ना कोणत्या प्रकारे चिकटुन राहतात. १९२० साली भारतात सिंधू संस्कृतीचे अवशेष सापडल्यावर कथित आर्यांपेक्षाही प्रगत लोक आधीपासूनच भारतात राहत होते हे सिद्ध झाल्यावर या संस्कृतीचे विध्वंसक ते निर्माते असे उलट-सुलट दावे आर्य सिद्धांत समर्थकांनी सुरु केले हा तर श्रेष्ठतावादाचा गंड कोणत्या स्तरावर जाऊ शकतो याचे विस्मयकारी उदाहरण. आता शास्त्राच्याच पायावर समस्त वंश सिद्धांत बाद झाला असला तरी त्याची अभिव्यक्ती कोणत्या ना कोणत्या लेबलखाली जगभर सुरूच आहे. म्हणजे सांस्कृतिक श्रेष्ठतावादाचा विस्तार हा जागतीक पातळीवर कसा पसरू शकतो आणि विध्वंसक होतो याचे हे डोळ्यात अंजन घालणारे उदाहरण आहे आणि तरीही अजून लोकांचा श्रेष्ठतागंडाचा हव्यास सुटत नाही हे मानवजातीचे दुर्दैव आहे.


संस्कृती म्हणजे नेमके काय? मानवी अभिव्यक्तीची सुरुवात जेथून झाली तेथुन संस्कृतीचा जन्म झाला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. भाषा, धर्म, तत्वज्ञान, कायदे, शिल्पकला, चित्रे, काव्ये-महाकाव्ये, मिथ्थकथा, वास्तूकला, खाद्यकला, संगीत, नृत्य-नाटके, समाजरचना इत्यादिंतून संस्कृतीचे प्रकटन होत असते. किंबहूना सर्व प्रकारच्या मानवी कृत्रीम अभिव्यक्तींतून जे काही निर्माण होते त्याला संस्कृती म्हणतात. किंबहुना मनुष्य स्वत:च्या सुखासाठी, सोयीसाठी जेही काही कृत्रीमपणे निर्माण करतो ती संस्कृती. आणि संस्कृती ही स्थिर असते काय? त्याचे उत्तर स्पष्टपणे "नाही" असेच द्यावे लागेल. संस्कृती ही प्रवाही असते. कालसापेक्ष चौकटींतुन तिचा प्रवाह पुढे पुढे जात राहतो. परस्पर संपर्काने संस्कृतीही एकमेकावर प्रभाव टाकत असतात. अमुक  शोध अमुकच भागात लागला होता कारण तेथील लोकच बुद्धीमान होते असा काही समज असला तरी मग जगातील प्रत्येक भागात वेगवेगळे शोध लागलेले आहेत आणि त्या दृष्टीने समस्त मानव समाजच बुद्धीमान आहे असा अर्थ मात्र कोणी घेत नाही. भाषाही पुरातन काळापासून अशाच देवान-घेवाणीच्या पद्धतीने विकसित झाल्या आहेत. जगात प्राचीन काळीही कोणतीही भाषा पूर्णतया स्वतंत्र आणि पहिलीच म्हणता येईल अशी नव्हती हे इतिहासातूनच आपण पाहू शकतो.

परिवर्तन हा जसा निसर्गाचा नियम तसाच तो संस्कृतीचाही नियम आहे. प्रत्येक संस्कृतीत आहे ती अथवा होती तीच संस्कृती श्रेष्ठ होती असे दावे करत आजही तीच राबवायचा वा थोपवण्याचा प्रयत्न होत असतो. असे प्रयत्न धर्मनेत्यांकडून जसे होतात तसेच राजसत्तांकडूनही होत असतात. पण जगण्याच्या, वस्त्र-प्रावरणाच्या, धार्मिक प्रथा-परंपरांच्या, उत्सवांच्या, राजकीय-आर्थिक व्यवस्थेच्या पद्धतींत इतिहासात इतकी परिवर्तने झालेली आहेत कि कोणत्या काळाची संस्कृती श्रेष्ठ होती आणि ती नेमकी कशी होते हे सांगता येणे अशक्य व्हावे, भारतात केवळ दोन हजार वर्षांपूर्वी पुजल्या जाणा-या अनेक देवता जशा धर्मजीवनातून बाद झाल्या आहेत तसेच अनेक उत्सवही संपूर्ण विस्मरणात गेलेले आहेत. त्याचाही खेद न करता संस्कृतींचे प्रवाहीपण स्वीकारत ती वर्धिष्णू कशी राहील हे पाहणे जागतिक नागरिकांचे कर्तव्य आहे, श्रेष्ठत्वतावाद नेहमीच विनाशाला जन्म देतो हे लक्षात ठेवले पाहिजे.

-संजय सोनवणी

 

No comments:

Post a Comment

वंचितांचे अर्थशास्त्र आणि आपली मानसिकता

  वंचितांची व्याख्या बव्हंशी आर्थिक आधारावर केली जाते. सरकारला आपली धोरणे ठरवण्यासाठी ही व्याख्या पुरेशी ठरत असली तरी वंचिततेचे सामाजिक नि...