Wednesday, November 2, 2022

लिहावे तरी कशावर?

 छे...आता काही लिहायचाच कंटाळा आला आहे. म्हणजे असे की आपण लिहावे तरी कशावर? कशावरही लिहिले तरी प्रत्युत्तरे काय मिळणार याचा एक ढाचा निश्चित झाला आहे. मग तो पुरोगाम्यांचा असो कि प्रतिगामी भक्तांचा. आता हेच बघा ना, मी "प्रतिगामी भक्त" हा केवळ शब्द वापरला म्हणून मला लगेच "फुर्रोगामी" ठरवत फुरफुरत की गुरगुरत टायपलं जाईल अणि फुर्र करत चहाचा घोट फुरकवला जाईल. पुरोगामी म्हणून एरवी अभिमानाने आपली ३२ इंची छाती ५६ इंचाची कशी आहे हे दाखवू पाहणारे या फुर्रोगामी संज्ञेमुळे एवढे हबकून गेले आहेत की आपण त्यातले कसे नाही हे सिद्ध करण्याच्या नादात खरेच फुर्रोगामी बनून गेले आहेत. तर असो. मग लिहायचे तरी कसे आणि काय?

प्रश्न मोठा गहन आहे. मी अलीकडे वृत्तपत्रांतही लेख लिहिणे बंद केले आहे. हाही लेख जन्माला आलाय तो काय लिहायचे या विवंचनेतून. घन:श्याम पाटील (आपले तेच हो या भव्य दिवाळी अंकाचे संपादक) असे काही माझा गळा आवळून बसले की लेख लिहा नाहीतर दिवाळी अंकच प्रसिद्ध करत नाही! मी कळवळून म्हटलो कि अहो, पण लिहायचे काय? समस्या गहन आहे. ते म्हणाले, अहो एवढ्या समस्या आहेत, एवढे विषय आहेत आणि लिहायचे म्हणून काय विचारता? (दाताड वेंगाडुनी हे शब्द ते मनातल्या मनात म्हटलेही असतील...पण ते तसे लिहिले कि ते माझ्यावर साप्ताहिक चपराकमध्ये लेख लिहून लक्तरे का्ढायचे. म्हणून वाचकांनी ते शब्द मनातल्या मनात वाचावे व माझे व त्यांचे काय करायचे ते मनातल्या मनातच! हा मी न दिलेला इशारा समजायला हरकत नाही.) तसेही एकदा मी एका सभेत अत्यंत तांत्रिक आणि रुक्ष बोललो तर पेपरात छापून आले..."अन्यथा सरकार पाडु- सोनवणींचा इशारा!" आता या वार्ताहराने कोणाच्या मनात प्रवेश करुन वृत्तांकन केले ते त्यालाच माहित. मला काय xxx समजला काय तो काहीही बोलायला?
तर काय विषय असू शकत होते? पहिला म्हणजे काश्मीर, ३७० आणि तेथली संचारबंदी. मानवतावाद्यांना कळवळा येऊ शकेल अशा शैलीत किती सुंदर लेख लिहिता येऊ शकला असता. नागरिकांचे हलाखी, घरातच बंद होऊन पडणे, व्यवसायांची वाट लागणे वगैरे वगैरे. तसा विषय छान आहे. सेलेबल आहे. पण कोठाय संचारबंदी? अहो...नीट माहित करुन घ्या...दुपारी बारा ते चार एवढीच संचारबंदी. ती तर काय आमच्या सदाशिव पेठेतही असते आणि तीही स्वयंघोषित! हा..तेथे मिल्ट्री लागते ती देशद्रोह्यांना धडा शिकवण्यासाठी! हे अमान्य आहे म्हणता? मग तुमच्याएवढे देशद्रोही कोणी असू शकत नाही. चालते व्हा पाकिस्तानात! देशद्रोही कोठले? इम्रानखानकडून पाकीट येतं की काय?
आता नकाशातही जम्मु कोठे संपते आणि खोरे सुरु होते हे सांगू न शकणारे हे दिव्य देशप्रेमी. लाल चौकात ऐन संचारबंदीच्या आरंभीच्या काळात सारे काही बंद असतांना तेथे गणपती बसवून आलेल मी. तेथल्या लोकांचे होत असणारे अमानवी हाल प्रत्यक्ष पाहून आलेलो मी. याही स्थितीत तेथल्या लोकांचे, या सर्वांनी एकमताने देशद्रोही ठरवल्या गेलेल्या मुस्लिमांचे गणपती बसवण्यासाठी सहकार्य मिळालेले अनुभवलेला मी. मला क्षणभर वाटले की ते सारे स्वप्नच होते. हेच खरे बोलताहेत. ते काश्मीरचेच रहिवासी आहेत. मस्त तेथील संचारबंदी एन्जोय करत आहेत. सारं काही बंद असल्याने मत हुंदडायला मिळतंय याचा आनंद लुटत आहेत. आर्मीमनच्या गन्सबरोबर ढिंशूं ढिंशू खेळत आहेत आणि आर्मीमन्स त्यांना गुदगुल्या करुन हसवून हसवून बेजार करत आहेत!
मघ कशाला लिहायचे काश्मीरवर? सुखात आणि आनंदात आहेत बिचारे. ३७० गेल्याचा खरा आनंद त्यांनच झाला आहे. उर्वरीत भारतातून गायब झालेला विकास आता काश्मीरमध्ये अवतरणार आहे. अहो, त्यासाठीच तर गायब झाला होता ना तो? मोदी काय उगाच जगभर फिरताहेत का, काश्मीरमध्ये गुंतवणूक करा म्हणून? ते आधी उर्वरीत भारतात गुंतवणूक आणन्यासाठी किती फिरले माहित नाही की काय? नाही आली गुंतवणूक म्हणून काय झाले? पाकिस्तानपेक्षा आमचा देश पुढे तर आहे ना? जीडीपीची वाढ ८ टक्क्यावरुन ६ टक्क्यावर आ्ली असली तरी तो अमेरिकेच्या २ टक्क्याहून जास्तच. म्हणजे आम्हीच महासत्ता की! ते बेरोजगारीचं बोलायची हिंमतच कशी करता तुम्ही? लोकांनाच कामधंदा नकोय. आळशी लेकाचे. फुकट बसुन खायला पाहिजे. सोडतात नोक-या आणि बेरोजगारी वाढल्याची बोंब मारताय मोदीजींच्या नावाने! हलकट साले. बिचारे मोदीजी दिवसाचे चोविस तास आणि तेही ० तासही न झोपता देशविदेश हिंडतात आणि देशाची मान उंचावतात याचे काहीच नाही या लेकाच्यांना! आणि अर्थव्यवस्था का घसरली माहिताय काय? गेल्या सत्तर वर्ष कोंग्रेसने केलेलं पाप आहे ते. त्यांनीच बोगस कर्ज वाटली. त्यांनीच भष्टाचारी उद्योगांना पाठीशी घातलं, आता पहा मल्ल्या कसा पळून गेला? मोदीजीच त्याला परत भारतात आणणार आहेत. २०२४ उजाडले तरी चालेल पण मोदींचा वादा म्हणजे इस्त्रोचं चांद्रयान...माफ करा रामबाण असतो. आहात कोठे? चालले तोंड वर करुन बोलायला!
एका दमात पानौता-याचे एवढे दिव्य ज्ञान होताच मी हबकणार नाही तर काय. तरीही बिचकत म्हटलो, अहो, पण विषय काश्मीरचा होता...त्याबद्दल बोला...तर मला खात्री आहे, दरडावून सांगितले जाईल, अहो तुम्हा फुर्रोगम्यांची थेरं माहितायत आम्हाला. तुम्हाला काश्मीरच्या आडुन मोदीजींवरच टीका करायची होती. ३७० रद्द करणे काय सामान्य बाब समजता? गेल्या सत्तर अर्षात त्याला धक्का लावायची कोणात हिंमत झाली नाही. मोदीजी आणि त्यांचे हनुमंत शहा जी यांनी बघा, एका झटक्यात ते रद्द केलं! आता हे देशद्रोही काश्मिरी त्रास सहन करत असतील तर ती त्यांच्या कर्माची फळं आहेत. भोगुद्यात ना भोगत असतील तर! सडत असतील त्यांची फळं शेतांत तर सडू द्यात. आम्ही हिंदू कमी नाहीत हे कळू द्या. सातशे वर्ष हिंदुंवर अन्याय केला, अत्याचार केले, मंदिरे तोडली त्याची काही शिक्षा असते की नाही? ते संजय नहार...सरहद नावाची संस्था चालवतात म्हणे. सफरचंदे आणतात तेथुन शेतक-आंना मदत म्हणून! त्यांना काय पंडितांच्या शेतातून आनता आली नसती? पंडितांना मदत करता आली नसती? बोर्ड लावला असता की "काश्मीरी पंडितांच्या शेतातील सफरचंदे..." तर आम्ही घरपोच अर्धा किलो सफरचंदे मागवली असती! एका दिवसात ट्रक संपवला असता. पण नाहीच. पंडितांना कोणी वालीच नाही.
आता शेतकरी हा शेतकरीच असतो...पंडितांसाठी यांनी तरी खास काय दिवे लावले, किती खो-यात परत पाठवले असले फालतु प्रश्न विचारण्यात काही अर्थ नसतो. ३७० कलम काय होते आणि रद्द केले त्याच्वेळीस त्या कलमातील काय उरले होते हे सांगायचा प्रयत्नही व्यर्थच असतो कारण ३७० माहित करुन घ्यायची तसदी कोण घेतो? म्हटलं आपल्या डोक्याचा फालुदा करुन घेण्यात अर्थ नाही. काश्मीर विषय म्हणजे बाद!
अर्थव्यवस्था तर इतकी सुरळीत चाललीय की कोणाला दिसत नसली तरी सर्वत्र तेजीच् तेजी असल्याचे बजावले जाते. संघप्रमुखच म्हणतात ५% जीडीपीतील वाढ म्हणजे मंदी नव्हे. हे ऐकुन मंदीच्या कुशीत जाऊन मला टाहो फोडावासा वाटला होता. पण तोही मोह दूर सारला. नाहीतर "रामाचे चारित्र्य पहा...आणि हे चारित्र्यहीन फुर्रोगामी" असंही ऐकायला मिळण्यचा धोका होता.
आणि मलाही पटलंय की अर्थव्यवस्था, रोजगारी, प्रगती, विकास हे काय विषय झाले? ते जाहिरनम्यात शोभतात. देशासमोरचे गहन प्रश्न वेगळेच आहेत आणि आपलेच त्याकडे लक्ष नाही. अहो, लोक उघड्यावर हगतात हा खरा प्रश्न. इस्त्रोचे बजेट कमी का करावे लागले? उघड्यावर कोणी हगू नये म्हणूनच ना! गाय-गोबर-गोमुत्र हा खरा विषय. त्यावर संशोधन होणार. अहो, भविष्यातली इस्त्रोची याने गोमुत्र-गोबरच्या इंधनातून हायड्रोजन मिळवून त्यावर उडवणार. क्यन्सर-एडस अक्सीर बरा करायचे "गोबाण" औवसद म्हणजे गोमुत्र. हे गोमुत्र विपुल प्रमाणात गोळा करायचे हा खरा देशासमोरचा प्रश्न असतांना मुर्खासारखे आपण काय जुनाट, कालबाह्य झालेल्या प्रगती-विकासाच्या गोष्टी बोलत आहोत? मुसलमानांना धडा शिकवणे हे सर्वोच्च प्राधान्य आहे. त्यासाठी प्रत्येक हिंदुने दहा पोरांना जन्म दिला पाहिजे. जर कोणी विचारलेच की दहाच काय एके काळी हिंदू पंधरा-वीस पोरांना जन्माला घालत होते, मग कसे आले मुसलमानांचे राज्य ?तर त्या साल्याला ठेचून काढलं पाहिजे! धर्मद्रोही कोठला!
मलाही आता पटलंय...राम मंदिर हाही एक देशासमोरचा गहन प्रश्न आहे. न पटून सांगताय कोणाला? सर्वोच्च न्यायालयाने आमच्या बाजुने निकाल नाही दिला तर आम्ही विशेष कायदा करु असं नाही का ते उद्धवजी म्हणाले? पाठिंबा द्यायलाच हवा. कायदा बनायलाच हवा. मंदिर झाले की झाले पहा आम्ही कसे एकपत्नीव्रती, सत्यवचनी, एकबाणी होतो ते! माझ्या विझत आलेल्या फुर्रोगामीपणाचा गोबर झालेला प्रश्न की मग कायदा बनवायला गेली सहा वर्ष कोणी अडवले होते हाही निरर्थकच ठरतो. अहो, मोदीजी संसदेचा किती मान ठेवतात हे नाही पाहिले का ते संसदेत पहिल्यांदा गेले त्यावेळीस? ते सर्वोच्च न्यायालयाचाही तेवढाच मान ठेवतात. आता सर्वोच्च न्यायालयाने आम्हाला हवा तसा निकाल नाहीच दिला तर मग बनवू कायदा तुम्हा फुर्रोगाम्यांना घाईच फार. लोकशाही समजायची मुळी अक्कलच नाही! खरे लोकशाहीवादी, गांधीवादी आम्हीच आहोत. अहो गांधीही "हे राम" म्हणूनच मेला ना? न म्हणून करतो काय लेकाचा? समोरच नथुरामाच्या रुपात रामच तर होता ना! हो? तेही पिस्तुल रोखून!
तर ठरवले की काश्मीर विषय बाद! घनश्यामराव आपला हट्ट सोडायला काही तयार नव्हते. मग मी ठरवले...राफेल आणायला जातांना राफेलच्या चाकांखाली लिंबे चिरडून दस-याचे शस्त्रपूजन केले गेले त्यावर लिहावे. अगदी निरुपद्रवी विषय हो. असा की कोणी अंगावर येणार नाही. ्घेतले लिहायला. आणि म्हणता म्हणता कर्णपिशाच्च कर्कशले, मुर्खा, लिंबू-मिरच्या बिब्बा हे आपली महान संस्कृती. कशातही बिब्बा घालणा-या तुझ्यासारख्या नतद्रष्टाला मिरच्या लागाव्यात म्हणून प्राचीन ऋषीमुनींनी मिर्ची-बिब्बा आणि प्रदुशन दुर करण्यासाठी निंबुशास्त्रं लिहिलं हे माहित नाही तुला? मारे इतिहास संशोधक असल्याचा आव आणतो? मी म्हणायचा प्रयत्न करत होतो की बाबा, मिर्ची-बिब्बाचे तर्कशास्त्र मान्य पण हे निंबाचं काय? ते कशाला चिरडावे लागते? तर उत्तर आले, वत्सा, तशीही तुझी अक्कलच कमी. हे बघ लिंबात सायट्रिक एसीड असते हे आमच्या प्राचीन ऋषीमुनींना दिव्य ज्ञानामुळे ठाऊक होते. ही लिंबं रस्त्यावर वाहन अथवा उडान भरु शकण-या विमानांच्या चकाखाली चिरडली की जो रस बाहेर येतो तो रस चमत्कारी असतो. त्याच्या वाफा वातावरणातील अमंगल म्हणजेच प्रदुषन एका झटक्यात नष्ट करतात. त्यातून ज्या सुक्ष्म लहरी प्रस्फुटित होतात त्यातील कंपने लोकांच्या मनात सद्भावना जन्माला घालतात. ते भक्त होतात. राजनाथ सिंगांनी जे केले ते या महान शास्त्र आणि परंपरेला साजेसे केले. आता उद्याचे भविष्य म्हणजे हिंदू जगावर राज्य करणार. गोबर-गोमुत्राच्या जीवावर अर्थव्यवस्था पाचच काय दहा ट्रिलियनची बनवणार. आता त्या नतद्रष्ट फुर्रोगाम्यांसारखा "ट्रिलियन म्हणजे एकावर किती शून्य" हे विचारत बसू नकोस. नमो नमो म्हण...तुझे कल्याण होईल!"
झालं...हाही विषय बारगळला. दाही दिशा ढुंढाळल्या...पण विषय मिळेना. शेवटी का लिहित नाही हे लिहून घनश्यामरावांची बोळवण कशी केली याचा हा साद्यंत वृत्तांत!
-संजय सोनवणी
(Published in Sahitya Chaprak Dipavali issue 2019))

No comments:

Post a Comment

सिंधू संस्कृतीची मालकी!

  सिंधू संस्कृतीची लिपी वाचता आलेली नसल्याने कोणीही उठतो आणि सिंधू संस्कृतीवर मालकी सांगतो. द्रविडांनी हे काम आधी सुरु केले पण त्याला आर्य आ...