Friday, November 25, 2022

घोडे: व्यापार व युद्धाचे महत्वाचे साधन!

 घोडे: व्यापार व युद्धाचे महत्वाचे साधन!

 


व्यापारी मार्गावरून बहुमूल्य आणि जीवनोपयोगी वस्तूंचा जसा व्यापार केला जात असे तसाच प्राण्यांचाही व्यापार मोठ्या प्रमाणावर होई. प्राचीन काळात सर्वप्रथम ज्या प्राण्याचा व्यापार सुरु झाला तो प्राणी म्हणजे घोडा. खरे तर या प्राण्याच्या उत्पत्तीचा इतिहास किमान पाच कोटी वर्ष मागे जातो. त्याच्यात विविध भागात क्रमविकास झाला तशाच अनेक जातींचे घोडेही नामशेष झाले. मानवाच्या रानटी अवस्थेत घोडे भक्ष्य म्हणून मारले जात असत. अजूनही दुष्काळात काही देशांत ते खाण्यात येतात. घोड्याच्या कातड्यापासून तंबू, पेहेरावाचे कपडे, सरंजाम इ. करीत असत. पण पुढे घोड्याचे अन्यही उपयोग लक्षात आले. वेगवान सवारी, मालवाहतुक, रथासारख्या वाहनांना वेगाने ओढून नेणे आणि त्याचा युद्धातील उपयोग यामुळे हा प्राणी सर्वत्र लोकप्रिय झाला असला तरी त्याला माणसाळवले गेले ते मात्र खूप उशीरा. तेही मध्य आशियात. कुत्रा, उंट व गाय मात्र त्याच्या खूप पूर्वीच मानवी जीवनाचा एक अविभाज्य भाग बनली होती.

मध्य आशियात स्टेपेसारख्या विशाल गवताळ प्रदेशामुळे तेथे जंगली घोड्यांचे अस्तीत्व पुरातन काळापासून होते. मध्य आशियातील भटक्या पशुपालक टोळ्यांनी त्याला  प्रथम माणसाळवले असे उपलब्ध पुरातत्वीय पुराव्यांवरून सिद्ध झाले आहे. घोडा हा लवकरच भटक्या पशुपालकांच्या जीवनाचा एक महत्वाचा भाग बनला. इतका कि अश्वांसहितची अनेक मानवी दफने मध्य आशियात मिळून आलेली आहेत. त्याला धर्म व खाद्य जीवनातही तितकेच महत्वाचे स्थान मिळाले. मध्य आशियातील अनुकूल हवामानामुळे व चा-याच्या उपलब्धतेमुळे घोड्यांची संख्याही अवाढव्य होती. मध्य आशियातून व्यापारी मार्गावरून व्यापार करणा-या अन्य प्रदेशातील व्यापा-यांच्याही लक्षात त्यांचे महत्व आले आणि त्यांनी घोड्यांचा वाहतुकीसाठी जसा वापर सुरु केला रसा मोठ्या प्रमाणावर त्यांचा व्यापारही सुरु केला. विविध भागात घोड्यांच्या पैदाशीही सुरु झाल्या. मानवाच्या उन्नतीशी त्याने लवकरच नाते जुळवले. इसवी सनपूर्व १५०० पर्यंत घोडे पार सुमेरपर्यंत पोचल्याचे उल्लेख मिळतात. इतकेच काय सनपूर्व १४०० मध्ये किक्कुली नावाच्या मित्तानी येथील एका प्रशिक्षकाने घोड्यांच्या प्रशिक्षणासाठी एक पुस्तिकाच लिहिली.   

भारतात मोठ्या प्रमाणावर घोड्यांची पैदास करण्यासाठी उपयुक्त हवामान नसल्याने घोडे नेहमी आयात केले जात. स्थानिक प्रजातीही पुढे विकसित झाल्या असल्या तरी खोरासान, मर्व व बुखारा येथून अफगाण व्यापा-यांकरवी आयात केलेले घोडे हाच भारतीय सैन्य दळांचा मुख्य स्त्रोत राहिला.

भारतात घोड्यांचा प्रवेश मध्य आशियातून अफगाणिस्तान मार्गे आलेल्या आर्य म्हणवून घेणा-या लोकांमुळे झाला असे साधारणपणे मानण्यात येते. ही घटना इसपू बाराशे ते इसपू एक हजारच्या दरम्यानची आहे. भारतीयांना अश्वाचा परिचय झाला तो असा. तत्पूर्वीच्या सिंधू संस्कृती काळात भारतात घोड्याचे अस्तित्व सापडून येत नाही. सिंधू संस्कृतीचे लोक जरी मध्य आशिया ते सुदूर मेसोपोटेमिया पर्यंत व्यापार करत असले व त्यांना अश्व माहित असला तरी भारतात तत्कालीन स्थितीत घोड्यांची पैदास करण्यात सिंधू संस्कृतीच्या लोकांनी रस घेतला नाही. पण वैदिक लोक हे मुळचे मध्य आशियातील असल्याने त्यांचे जीवन घोड्याभोवती फिरताना दिसते. अश्वांना उद्देशून ऋग्वेदात अनेक सूक्ते आहेत. एवढेच काय “अश्वमेध” यद्न्याच्या रूपाने त्यांनी त्याला आपल्या धार्मिक व खाद्य जीवनातही सामाविष्ट करून घेतले. वैदिक आर्य युद्ध प्रसंगी घोडे जुंपलेला रथ वापरीत.  अश्वारोही व घोडदौडीला ऋग्वेदात ‘आजी’ हा शब्द वापरला आहे. वैदिक लोक वायव्य भारतात प्रथम स्थायिक झाल्याने त्या भागातील  भारताच्या वायव्य सरहद्दीवरील कांभोज, केकय, गांधार, आरह सिंधुदेश, पारसीक या भागात घोड्यांची पैदास सुरु झाली व तेथील घोडे उत्तम प्रतीचे मानले जात असत. कौटिल्यानेही आपल्या अर्थशास्त्रात या प्रदेशातील घोड्यांच्या गुणवत्तेचे कौतुक केले आहे. स्वात खो-यातील दफनांच्या जनुकीय विश्लेषणातून त्या लोकांचे मध्य आशियाशी असलेले मुळचे जैविक नाते स्पष्ट झालेले आहे.

पुढील काळात हत्तीदलाएवढेच महत्व अश्वदलाला आले. तरीही भारतातील घोड्याची गरज आयातीद्वारेच भागवावी लागे. किंबहुना युरोपात व आफ्रीकेतही घोड्यांचा प्रसार झाला तो पुरातन मार्गांवरील व्यापारामुळेच. मध्य आशिया हा भारताचा प्रमुख अश्व-पुरवठादार बनला. व्यापा-यांचा त्यात लाभच होता. ते अश्वांच्या मोबदल्यात येथून विविध प्रकारची वस्त्रे पुढील व्यापारासाठी घेऊन जात असत. अफगाणिस्तानातील अश्व-व्यापारी बुखारा येथून घोडे घेऊन येत असत. बुखारा हे रेशीम मार्गावरील अत्यंत महत्वाचे व्यापारी शहर तर होतेच पण घोड्यांच्या उत्पत्तीस्थानाला लागुनच असल्याने घोड्यांचा मोठ्या प्रमाणावर पुरवठा करणे सोपे जात असे. येथे चीन ते युरोपपर्यंतचे व्यापारी घोडे खरेदी करत असत. या सर्व काळात सातत्याने युद्धे होत असल्याने घोड्यांची गरजही सर्वत्र मोठ्या प्रमाणात भासत असल्याने घोड्यांचा व्यापारही तेजीत असे. घोड्यांबरोबरच उंट, खेचरे, अशा ओझेवाहू प्राण्यांचाही व्यापार केला जात असे.

तेराव्या शतकात घोड्यांच्या व्यापारात पूर्व इराणमधील खोरासान प्रांतातील भटके लोकही सहभागी झाले. या भागातही घोड्यांची पैदास मोठ्या प्रमाणावर होत असे. चेंगीझखानाच्या हल्ल्यांमुळे व्यापारावर अवकळा आली असली तरी इराणमधील इल्खानीद घराण्याने रेशीम मार्गांचे पुनरुज्जीवन करण्याचा चंग बांधला. खोरासानमधून काश्गरपासून येणारा व पुढे थेट इस्तंबूलपर्यंत जाणारा थेट रेशीम मार्ग होता. येथूनच बुखारा, हेरात, काबुल, कंदाहार मार्गे थेट दिल्लीपर्यंत जाणारा प्राचीन व्यापारी मार्ग होताच. हेरात हेही घोड्यांच्या पैदासीचे केंद्र म्हणून तोवर उदयाला आलेले होते. किंबहुना घोडे-बाजार हा बरकत देणारा महत्वाचा व्यापार बनला होता. वायव्य व उत्तर भारतात अफगाणी घोडेव्यापारी घोड्यांचे मोठे बाजार भरवत असत अशा नोंदी मिळतात. अरबी घोड्यांचे महत्वही याच काळात वाढत गेले. गझनी व खिलजी घराण्यांनी या व्यापारावर पूर्ण नियंत्रण आणून आपला आर्थिक स्त्रोत वाढवण्याचा प्रयत्न केला. इस्लामी सत्ता भारतात कायम झाल्यानंतर खोरासान हेच घोड्यांचे मुख्य पुरवठादार बनले. अल्लाउद्दिन खिलजीने तर घोडे व्यापा-यांसाठी विशेष हुकुमनामा जारी केला होता. त्याच्या आदेशानुसार सर्व स्थानिक व बाहेरून येणा-या व्यापा-यांचे नाव-पत्ते नोंदवणे सक्तीचे तर केलेच पण घोड्याचा दर्जा व किमती ठरवण्याचा अधिकारही शाही चाकरांकडे गेला. यात जोही कोणी नियमभंग करेल त्याला शिक्षांचीही तरतूद केली. यावरून घोड्यांचा व्यापार किती मोठ्या प्रमाणावर होत असेल आणि त्यात लबाडीही कशी घुसली असेल याची कल्पना येते. सैन्यदले, खाजगी रक्षक आणि सामान्य नागरिकांची मागणीही किती मोठ्या प्रमाणात वाढली असेल हेही लक्षात येते.

घोडे हे मोगल सैन्याचे बलस्थान होते. घोड्यांमुळेच मोगल सत्ता विस्तारली असे काही इतिहासकार मानतात. त्यामुळे मुघलांनी अश्वबाजाराला प्राथमिकता तर दिलीच पण घोड्यांच्या पैदाशीकडेही लक्ष पुरवले. खुश्कीच्या मार्गासोबतच सुरत, खंबायतसारख्या बंदरावरूनही घोडे भरलेली जहाजे येत असत. घोड्यांचे महत्व एवढे वाढले कि भारतातील परंपरागत हत्तीदल पार मागे फेकले गेले.

युद्ध ही व्यापारासाठी एक महत्वाची संधी असते हे विधान घोड्यांचा जो व्यापार होत राहिला त्यावरून खरे वाटते. भारतात आधी घोडा आला तोच “वैदिक” आर्यांमुळे. व्यापारी मार्गांवरून जी मानवी स्थलांतरेही झाली त्यातील नोंदले गेलेले हे पहिले स्थलांतर. पुढेही मध्य आशियातून शक, हूण, कुशाण व मोगलांची आक्रमणे झाली. या आक्रमणामध्ये घोड्यानी मोठी भूमिका अदा केल्याचे आपल्याला दिसते. अठराव्या शतकाच्या मध्यापर्यंत तरी घोडे हे व्यापाराचे आणि युद्धांचेही महत्वाचे साधन राहिलेले आहे.

 

-संजय सोनवणी

No comments:

Post a Comment

सिंधू संस्कृतीची मालकी!

  सिंधू संस्कृतीची लिपी वाचता आलेली नसल्याने कोणीही उठतो आणि सिंधू संस्कृतीवर मालकी सांगतो. द्रविडांनी हे काम आधी सुरु केले पण त्याला आर्य आ...