Friday, November 25, 2022

वर्चस्ववादाचे साधन... भाषा!


 


सांस्कृतिक दहशतवादाची परंपरा आपल्या जगाला नवीन नाही. भाषाही वर्चस्ववादाचे जगभरचे नेहमीच एक साधन राहिलेले आहे. विशिष्ट भाषा श्रेष्ठ, अतिप्राचीन आणि शास्त्रीय असे दावे जगातील अनेक भाषा करत आल्या आहेत. प्रसंगी असे वाद विकोपालाही जात असल्याचे आपण पाहतो. भारतात संस्कृत भाषेने असे वर्चस्ववादाचे कार्य निरलसपणे केल्याचे आपल्याला दिसते. खरे तर संस्कृत ही अर्वाचीन भाषा असून ती ग्रांथिक कारणांसाठी कृत्रीम रित्या बनवली गेली. पण तिला साक्षात "देववाणी" चा अनादि दर्जा दिला गेला. वेद तर ईश्वराचे नि:श्वास बनले. खरे तर वेदांची भाषा आणि संस्कृत ही एकच भाषा नव्हे. वैदिक भाषेत पाचशेच्या वर द्राविडी, मुंडा व आस्ट्रिक शब्द व काही व्याकरणाची रुपे आलेली आहेत. प्राकृत शब्दसंग्रह आणि व्याकरण याचा तर फार मोठा प्रभाव आहे आणि त्याच वेळेस अवेस्त्याची भाषा, म्हणजे प्राचीन पर्शियनचाही एवढा प्रभाव आढळतो कि वेदातील ऋचा थोडा ध्वनीबदल जरी केला तरी त्यांचे पर्शियन भाषेत रुपांतर होऊ शकते. थोडक्यात वैदिक संस्कृत ही एक मिश्र अथवा संकरीत भाषा आहे. भाषातज्ञ मायकेल विट्झेलसारखी विद्वान मंडली तर वेदांची भाषा प्राकृताचीच एक शाखा असल्याचे मत हिरीरीने मांडत आहेत.

 

बरे ही जिवंत भाषा नव्हे. वैदिक भाषा जुन्या काळातच संस्कत येणा-यांनाच अनाकलनीय झाल्याने ती समजावून सांगण्यासाठी निरुक्त-निघंटुची निर्मिती झाली. संस्कृत व वैदिक या दोन्ही भाषांत प्रचंड फरक आहे. अगदी वेदांतील काही वर्णही संस्कृतात नाहीत. संस्कृतचा पुरावा इस. १५० पेक्षा मागे जात नाही. ही भाषा पुरातन नव्हे. तरीही हिरीरीने याबाबत प्रचार प्रसार करत संस्कृतला "भारतीय संस्कृतीचा चेहरा" म्हणण्याच्या प्रथा चालु झाल्या...त्या आजतागायत चालु आहेत.

 

वर्चस्वतावादासाठी जे जे संस्कृतात पारंगत तेच काय ते विद्वान व प्राकृतात पुरातन काळापासून जनव्यवहार व साहित्यव्यवहार करणारे ते हलके, दुय्यम अशी विभागणी केली गेली. स्त्री-पुरुष भेदाचाही जन्म संस्कृत साहित्याने घातला. उदा. सर्व संस्कृत म्हणवणा-या नाटकांतील स्त्रीपात्रे प्राकृतातुनच बोलतात...मग ती स्वर्गीची उर्वशी असो कि एखादी महाराणी का असेना! संस्कृत संवाद फक्त कथित उच्चभ्रु पुरुषांना! म्हणजे संस्कृत भाषेचा वापर समाज विभागण्यासाठी निरलसपणे केला गेला. स्त्री-पुरुष भेदभावासाठीही तिचा वापर केला गेला.

 

संस्कृत भाषेने प्राकृत भाषकांच्या मनात अखंडित न्युनगंड निर्माण करायचे अखंड कार्य केले. "संस्कृत देवांनी केली मग प्राकृत काय चोरांपासून झाली?" असे एकनाथांनी दरडावून विचारले असले तरी त्याचा फारसा उपयोग झालेला दिसत नाही. वैदिक मंडळीने  संस्कृतचाही उपयोग एका हत्याराप्रमाणे केला. प्राकृत भाषा संस्कृतोद्भवच आहेत असे एवढे बिंबवले गेले आहे कि त्या भ्रमातून बाहेर निघणे आजही अनेकांना अवघड जाते. वास्तव हे आहे कि संस्कृत ही प्राकृतोद्भव भाषा असून सनपुर्व ३०० ते सन १५० या काळातील तिच्या प्राकृताची एक शाखा म्हणून विकसन झाल्याचे असंख्य शिलालेखीय व नाणकीय पुरावे उपलब्ध आहेत. तिचा विकास अनेक स्थळी झाला व शेवटी पाणिनीने सन २५० मद्ध्ये तिला व्याकरणात बांधले. अशी ही अर्वाचीन भाषा ग्रांथिक कारणासाठी निर्माण झाल्याने ती जनभाषा कधीच नव्हती. संस्कृत मद्ध्ये साहित्य निर्मिती होत असतांना त्यावेळचे पुरातन प्रेमी प्राकृतात साहित्यनिर्मिती करतच होते...महाकाव्ये लिहितच होते...इतकी कि प्राकृत साहित्यसंपदा हजारोंच्या घरात भरते. ही परंपरा नवनवे बदल स्विकारत अव्याहतपणे चालू राहिली आहे ती प्राकृतच्या प्रवाही व कालसुसंगत बदल स्विकारत गेल्याने.

 

पण कालौघात शिस्तबद्ध प्रचार करत संस्कृतला देववाणी म्हणवत-बिंबवत तिचे माहात्म्य वाढवले...भाषिक वर्चस्वतावादासाठी (ती इतरांना शिकू न देता) तिचा निरलस वापर केला. प्राकृतवाद्यांच्या मनात शिस्तबद्ध न्यूनगंड निर्माण केला गेला. जनसामान्याच्या प्राकृत भाषा या संस्कृतोद्भवच आहेत असे धादांत असत्य समाजमनावर बिंबवले गेले. पण एवढी श्रेष्ठ भाषा वापरातून नाहीशी कशी झाली याबाबत संगतवार अभ्यास कोणी केल्याचे दिसत नाही. संस्कृतचा उपयोग फक्त भाषिक/ सांस्कृतिक संशोधकांपुरताच उरलेला आहे हे एक वास्तव आहे. लोक जेवढा ल्यटीन, सुमेरियन, ग्रीक, इजिप्शियन, पाली या प्राचीन पण मृत भाषांचा अभ्यास याच कारणांसाठी करतात तेवढाच संस्कृतचाही करतात. त्यापलीकडॆ संस्कृतचे स्थान नाही. खरे तर विविध भाषांच्या संकराने संस्कृत निर्माण केली गेली. तिचा उद्देश ग्रांथिक अचूकता साधने हा होता आणि त्या दृष्टीने ती नक्कीच श्रेष्ठ भाषा होती हे खरे असले तरी ती भाषा सर्व भाषांची जननी आहे असा जो अशास्त्रीय आव निर्माण केला गेला तो मात्र निश्चितच निन्दनीय आहे.

 

खरे तर भाषा हे अभिव्यक्तीचे साधन आहे व मानवाच्या त्याच आदिम प्रेरणांतून जगभरच्या भाषा निर्माण झालेल्या आहेत. कोणतीही भाषा कोणत्या विशिष्ट स्थानावर निर्माण झाली आणि मग ती जगभर पसरली या मताला फारसे महत्व देता येत नाही. पण भाषा देवांनी निर्माण केली व मानवाला शिकवली असे धर्मवादी पुरातन काळापासून सांगत आलेले आहेत. पृथ्वीतलावर पहिले संभाषण आदम व इव्हने केले व नोहाच्या नौकेच्या प्रवासाच्या अंतिम थांब्यानंतर टॉवर ओफ बाबेल येथे नौकेतुन उतरतांना सर्व मानवांची भाषा एकच होती असे बायबल (जेनेसिस ११.१-९) मानते. पुढे लोकसंख्या वाढली तरी माणसाने सर्व पृथ्वी व्यापण्याचा देवाचा आदेश मानला नाही. त्यामुळे देवानेच हस्तक्षेप करुन भाषागट निर्माण केले व त्यानंतरच माणसाने पृथ्वी व्यापायला सुरुवात केली. (इसाया ४५.१८) थोडक्यात या मानवी गटांनी मुळच्याच भाषेला जगभर विविध रुपात नेले असा हा बायबलचा दावा. हे येथे विस्ताराने सांगायचे कारण म्हणजे याच "एकस्थाननिर्मिती"च्या बायबली मिथ्थकथेचा पगडा आजही पाश्चात्य भाषाशास्त्र ते भौतिकी शास्त्रावर आहे. पाश्चात्य भाषाविदांनी इंडो-युरोपियन भाषागट सिद्धांत जन्माला घातला त्यामागेही हीच वर्चस्वतावादी वृत्ती होती. या सिद्धांतानुसार मध्य आशियातील स्वत:ला आर्य म्हणवणा-या लोकांनी आदिम संस्कृत जन्माला घातली आणि हे लोक जसे भारतासह मध्य आशिया ते युरोपपर्यंत पसरले ही भाषाही त्यांनी त्या त्या भागात प्रचलित केली. प्रत्येक भाषेच्या उत्पात्तेच्या अनेक मिथक कथा जगभर आहेत. आपली भाषा देवाने निर्माण केली या मताचा पगडा जगभर आहे. पण जगातील कोणतीही भाषा स्वतंत्र मात्र नाही, ती परस्पर विनिमयातूनच वर्धिष्णू राहिली आहे या तथ्याकडे मात्र दुर्लक्ष केले जाते.  

 

खरे म्हणजे भाषेचा जन्मच मुळात कसा होतो याविषयी आजही मानवी समाज अज्ञ आहे. त्या संदर्भात अनेक सिद्धांत मांडले गेले असले तरी त्यात अजून एकमत नाही. जीवनव्यवहारातील गुंतागुंत आणि भाषेचे विकास हातात हात घालून चालतात याबाबत मात्र एकवाक्यता आहे. जगातील सर्वच भाषा प्राचीन काळापासून परस्पर भाषांशी देवाण-घेवाण करतच विकसनशील राहिल्या आहेत. जिवंत भाषा कालसापेक्ष बदलत राहतात. कोणताही बदल न स्वीकारणा-या बंदिस्त भाषा मात्र कालौघात मृत होतात. संस्कृतचेही तेच झाले आहे.  प्राकृत भाषा मात्र सातत्याने बदल रिचवत आजही वापरात आहेत कारण त्या प्रवाही राहिलेल्या आहेत. दैनंदिन व मानसिक व्यवहारांना अभिव्यक्त करण्यासाठी भाषा असते. तिची उपयोगीता एवढीच आहे. तिचा वापर वर्चस्वता  वा श्रेष्ठतावाद निर्माण करण्यासाठी करणे हा सांस्कृतिक दहशतवादाचा भाग आहे हे आपल्याला समजावून घ्यावे लागेल.

 

-संजय सोनवणी

 

 

 

 

No comments:

Post a Comment

वंचितांचे अर्थशास्त्र आणि आपली मानसिकता

  वंचितांची व्याख्या बव्हंशी आर्थिक आधारावर केली जाते. सरकारला आपली धोरणे ठरवण्यासाठी ही व्याख्या पुरेशी ठरत असली तरी वंचिततेचे सामाजिक नि...