Saturday, January 14, 2023

सावरकर

 सावरकर ही एक स्वत:च स्वत:त गोंधळलेली व्यक्ती होती. त्यांना शत्रू कोण आणि मित्र कोण हे कधीही समजले नाही. सुटका करून घेण्यासाठी माफीनामें लिहिले हे एक वेळ समजता येते पण सुटका झाल्यानंतरचे त्यांचे जीवन आदर्श होते असे त्यांचे भक्तही म्हणणार नाहीत. त्यांनी उलट होता त्या गोंधळात भर घालण्याचेच कार्य केले.

गांधीजींनी त्यांच्या अनुपस्थितीत जी राष्ट्रानिर्माण करणारा नेता म्हणून झेप घेतली त्याबद्दल त्यांनी आजीवन असूया बाळगली. ते गांधीद्वेष करत राहणार हे अटळ होते आणि तो तसा त्यांनी केलाही.
त्यांनी अखंड राष्ट्राचे गुणगान गाताना राष्ट्र विभाजित कसे होईल याचेच प्रयत्न केले. त्यांना हिंदू कधीच अभिप्रेत नव्हते तर त्यांना गोळवलकरांप्रमाणे एक वैदिक राष्ट्र हवे होते. मग ते राष्ट्र तुकड्यांतील का असेना!
त्यांनी एक कवी म्हणून मातृभूमीचे गुणगान हृद्य काव्यात केले खरे पण त्यांच्या गद्य लेखनात नेहमीच पितृसत्त्ताकतेचे महिमान गाणारी पितृभूमीच डोकावत राहिली. कवी आणि कविह्रुदयाचा विचारवंत त्यांच्या गद्य लेखनात आढळत नाही तो त्यामुळेच.
त्यांनी ओजस्वी ज्वलंत लेखन केले पण त्यांचे प्रत्यक्ष आचरण मात्र एखाद्या दिवाभीतासारखे राहिले आणि तेही बहुदा त्यांनी तत्कालीन ब्रिटीश सरकारशी केलेल्या समझौत्यामुळे असे म्हणता येते.
त्यांनी अंदमान सुटकेनंतर मुस्लीम द्वेष केला पण मुस्लीम लीगशी युत्या करताना त्यांना कसलाही संकोच वाटला नाही. त्यांचे सहा सोनेरी पाने ही सहा विखारी पाने आहेत हे त्यांच्या भक्तांनीही कधी लक्षात घेतले नाही. लेखनात ते नेहमीच विरोधाभासी राहिले. प्रसंगी खोट्याचाही निरलसपणे आधार घेतला. आपल्या वैचारिक आणि नैतिक मर्यादा त्यांनी कधीही लक्षात घेतल्या नाहीत.
खरे तर सावरकर हे भारतीय इतिहासातील एक तत्वशुन्य व्यक्तित्व आहे. त्यांनी भारतीयांना प्रेरणा दिली असेल तर ती “तुम्ही हत्या करा...मी पडद्यामागे लपलेला आहे” अशी.
इतिहासात अनेक असे पुरुष गाजवले गेलेले आहेत. पण गाजवले गेले म्हणून ते महान होत नाहीत आणि त्याला कसलाही तात्विक आधार नाही.
-संजय सोनवणी

No comments:

Post a Comment

गझनीचा मोहम्मद आणि मोहम्मद घोरी

    ललितादित्य मुक्तापिडाने अरबांना भारत व अफगाणिस्तानातून हुसकावून लावल्यानंतर जवळपास तीनशे वर्ष भारतावर कोणतेही नवे आक्रमण झाले नाही. अरब ...