Monday, June 19, 2023

तख्त


 शाहजादा अकबराला आलमगिर औरंगजेबापासून तोडण्याच्या संभाजी महाराजांच्या  प्रयत्नांना अखेर यश मिळते. अकबर दुर्गादास राठोड आणि असंतुष्ट राजपुतांच्या पाठींब्यावर औरंगजेबाविरुद्ध बंड करून स्वत:ला सार्वभौम पातशहा घोषित करतो. संभाजी महाराजांच्या पाठींब्याने राजपूत आणि अकबर आपल्याविरुद्ध एकत्र येणे म्हणजे आपल्या सत्तेला धोका हे ओळखून औरंगजेबाच्या राजकीय चाली सुरु होतात. त्यामुळे अकबराला अनेक आघाड्यावर अपयश येवू लागते.

इकडे संभाजी महाराजही आपले सिंहासन सुरक्षित ठेवण्यासाठी घरचे आणि बाहेरचे याविरुद्ध संघर्षात व्यस्त होतात. त्यांना महाराष्ट्रातच अनेक आघाड्यांवर अडकून पडावे लागतेत्यामुळे ते अकबराच्या सहाय्याला उत्तरेत जाऊ शकत नाही. अकबराला अपयश येतेय हे पाहून आणि आपल्याला थोडी उसंत हवी म्हणून ते शेवटी अकबरालाच महाराष्ट्रात यायचे निमंत्रण देतात. औरंगजेबाचे तख्त अकबराच्या ताब्यात आले तर सत्तेचे समीकरणे बदलतील आणि अप्रत्यक्ष का होईना हिंदुस्तानची सत्ता आपल्या हाती येईल असा त्यांचा होरा असतो. अपयशी अकबर शेवटी महाराष्ट्रात येतो. संभाजी महाराजांचा आश्रय घेतो.

आपल्याच पुत्राला फितवले म्हणून चवताळलेला औरंगजेब संभाजीमहाराजांच्या नाशासाठी महाराष्ट्राची वाट धरतो. त्यावेळेस औरंगजेबाच्या छावणीवर हल्ला करून त्याला कैद करून ठार मारण्याचाही बेत संभाजी महाराज आखतात, पण इकडे रायगडावर संभाजी महाराजांच्याच हत्येचा कट  शिजलेला असतो. अकबरामुळे तो कट उघडकीला येतो आणि दोषी मंत्री आणि त्यांच्या साथीदारांना हत्तीच्या पायी तुडवून मारले जाते.  

सत्ताभिलाषात्यासाठी केली आणि घडवली जाणारी क्रूर नाट्ये एकीकडे तर मानवी स्नेहबंध टिकवण्यासाठी किंवा स्वप्नांच्या पूर्तीसाठी निर्माण केलेली किंवा होणारी भावनाट्ये दुसरीकडे यांच्या संमिश्र खेळातून मानवी प्रेरणा नेमक्या कशा वर्तन करतात याचा शोध घेत हे नाटक साकार होते.

तख्त! मी जवळपास वीस वर्षांनी रंगमंचासाठी लिहिलेले हे नाटक!

 

No comments:

Post a Comment

सिंधू संस्कृतीची मालकी!

  सिंधू संस्कृतीची लिपी वाचता आलेली नसल्याने कोणीही उठतो आणि सिंधू संस्कृतीवर मालकी सांगतो. द्रविडांनी हे काम आधी सुरु केले पण त्याला आर्य आ...