Friday, June 23, 2023

सारे काही गरजांपोटीच?

  


 मनुष्याची प्रगती ही आजवर त्याच्या मानसिक व भौतिक गरजांशी जोडली गेलेली आहे. आपण म्हणतो, एकविसाव्या शतकात माणूस प्रगत अवस्थेत पोहोचला आहे, ज्ञान- विज्ञानाने आजवरचा कळस गाठला आहे आणि याहीपुढच्या क्षितीजापार त्याला धाव घ्यायची आहे. पुरातन मानव मात्र अविकसित होता असा दावा बिनदिक्कतपणे केला जातो. मनुष्याचा मेंदू उत्क्रांतीच्या नियमाने विकसित होत जात आज सर्वोच्च पातळीवर पोहोचला आहे असे मानून आदिमानवाच्या अविकसिततेशी त्याचे पुरेसे उत्क्रांत नसण्याशी संबंध लावला जातो. असे करत असताना आपण अनेक मुलभूत बाबींचा विचार केलेला नसतो हे उघड आहे. आजची वैद्न्यानिक प्रगती ही माणसाचा मेंदू उत्क्रांत झाला म्हणून झाली कि त्याच्या बदलत्या सामाजिक परिप्रेक्षात कालनिहाय निर्माण झालेल्या गरजांची पूर्ती करण्यासाठी झाली हा खरा प्रश्न आहे.

जेंव्हा या धरतीवर मानव अस्तित्वात आला तेंव्हा त्याच्यापुढचे प्रश्न वेगळे होते. प्रकृती आणि अन्य प्राणी प्रजातीशी संघर्ष करत स्वत:चे अस्तित्व टिकवणे ही त्याची मुलभूत गरज होती. त्या गरजांच्या पूर्ततेसाठी त्याने जे शोध लावले त्यांचा विचार केला तर आजचा मानव उलट अडाणी वाटू लागेल. आदिमानवाने निसर्गाने न दिलेली शस्त्रे आपल्या भवतालातील उपलब्ध साधनसामग्रीचा अभ्यास करून पाषाण, हाडे, लाकूड यापासून निर्माण केली. थंडी-उन-वा-यापासून रक्षण करण्यासाठी जनावराची कातडी ते लोकर/सुत यांना विणून वस्त्रांचा शोध लावला. अग्नीचा उपयोग संयतपणे करून जीवन सुधरवण्यासाठी कसा करायचा याचा मार्ग शोधला. सर्वात महत्वाचा शोध म्हणजे भाषेचा शोध! निसर्गाने दिलेल्या स्वरयंत्राचा उपयोग करून आपण निरनिराळे ध्वनी निर्माण करू शकतो आणि त्या ध्वनींचे क्रम ठरवू, त्यातून आपण अर्थपूर्ण ध्वनी (शब्द) निर्माण करू शकतो हा त्याचा शोध क्रांत्रीकारी नव्हता असे कोण म्हणेल? आज भाषा ही सर्वांना सहजसुलभ उपलब्धी वाटते कारण त्यात असलेले आदिमानवाचे योगदान पूर्ण विस्मरणात टाकले गेले आहे. पण भाषा ही त्याची गरज होती. धोक्याचे इशारे देणे, शिकार कोठे आहे हे सांगून त्यासाठी शिकार कशी करता येईल याबाबत निर्णय घेऊन सामुहिक हालचाल करणे, अन्य सामुहिक व व्यक्तिगत सुचना/आदेश देणे/घेणे यासाठी भाषेची त्याला नितांत गरज होती आणि ती त्याने प्रयत्नपूर्वक बनवली. जेंव्हा पहिल्यांदा एखादा शब्द कोणी बनवला असेल तर त्याचा अर्थ काय घ्यायचा हे टोळीतील लोकांना शिकवणेही तेवढेच महत्वाचे होते. आद्य भाषा ही अर्थात गरजेपुरतीच मर्यादित असणार हेही उघड आहे. जसजसे मानवाने अधिक क्षेत्र व्यापले. बाह्य जगच नव्हे तर आंतरिक मानसिक जगातील कल्पना, भाव-भावनांनाही अर्थपूर्ण शब्द देण्याची गरज निर्माण झाली आणि त्यापोटी भाषाही प्रगत होत राहिली.

तेंव्हा मानवाची लोकसंख्या मुळात कमी होती. अन्य प्राणीविश्व मात्र धरतीवर राज्य करत होते. या विश्वापेक्षा आपले मानवी विश्व श्रेष्ठ आहे याची त्याला जसजशी कल्पना येऊ लागली तसतशी त्याने व्यवस्था बनवायला सुरुवात केली. आदिम धर्मही त्यातूनच तयार झाले. सामाजिक नीतीनियम असले पाहिजेत याची जाणीव त्याला झाली आणि आद्य नितीतत्वे व धर्म-नीती-तत्वे त्याने शोधली. नुसती शोधली नाहीत तर त्यांचा कटाक्षाने वापर करायला सुरुवात केली. जशी लोकसंख्या वाढली त्याने राज्य, गणराज्य या संकल्पना शोधून सामाजिक व्यवस्थेला राजसत्तेचेही अधिष्ठान दिले.

सामाजिक मानसिकतेची जी गरज तीच पूर्ण करण्यासाठी शोध लावले जातात. मृत्युनंतर काय हा प्रश्न भेडसावत असल्याने त्याने सुव्यवस्थित दफन पद्धती शोधल्या. इजिप्तमधील गगनचुंबी पि-यामिड्स, जे बांधणे आजच्या आधुनिक तंत्रज्ञानालाही शक्य नाही ,ते बांधण्याची नुसती कला नव्हे तर शास्त्रही त्याने विकसित केले. ममीफिकेशनच्या तंत्राचा शोध लावला. पि-यामिड्स म्हणजे दफनस्थाने  ही तत्कालीन समाजाची मानसिक गरज होती आणि तिच्या पूर्ततेसाठी तो आवश्यक शोध लावत राहिला. आज ती गरज उरली नाही म्हणून तसे किंवा त्यापेक्षा अधिक वरचढ तंत्रज्ञान अस्तित्वात आले नाही, विकसित झाले नाही,. याचा अर्थ आजचा मानव अविकसित आहे असाही होत नाही. खरे तर आजचे बरेचसे तंत्रज्ञान हे प्राचीन तंत्रद्न्यानाचे सुधारित प्रारूप आहे असे म्हणावे लागते.

शेतीचा शोध हा तर मानवी इतिहासातील अजून एक महत्वाचा क्रांतीकारी टप्पा. या शोधाने मानवी जीवन समग्र बदलले. भटका मानव स्थिर झाला. शेतीच्या शोधामुळे शेतीउपयोगी साधनांचेही त्याने शोध लावले. उपयुक्त उत्पादने करण्यासाठी मुळात ती कशी आणि कशापासून तयार करायची यासाठी आवश्यक कल्पकता आणि बुद्धी त्याच्यात नसती तर हे झाले नसते. शेतीमुळे मानवी भाषा अधिक प्रगत झाल्या. हजारो नवे शब्द बनवावे लागले. त्याना अर्थ द्यावा लागला. वाक्याचा अर्थ थेट पोचवण्यासाठी आणि त्यात अर्थबदल होऊ नये यासाठी त्याने प्राथमिक का होईना व्याकरणाचा शोध लावला. शेतीमुळे जंगले क्रमश: नष्ट होत गेली आणि मानवी लोकसंख्या वाढत गेली हे एक वास्तव आहे. अन्य प्राणीविश्व या संघर्षात टिकू न शकल्याने त्यांचीही संख्या रोडावत गेली. असंख्य प्राणीप्रजाती कालौघात नष्ट झाल्या. ही मानवी प्रज्ञेची मोठी हार आहे असेही म्हणता येईल. पण मानवाने जेही काही केले ते तगून राहण्याच्या अनावर गरजेपोटी केले हे विसरता येत नाही.

औद्योगिक क्रांतीही गरजेपोटीच झाली. सारे शोध तत्कालीन युरोपियन मानसिक गरजाधारित झाले. अधिकाधिक उत्पादन, सर्वत्र विक्री, त्यातही मक्तेदारी ही भांडवलदारच नव्हे तर श्रमिकांचीही गरज बनली. या गरजेपोटी नवनव्या सामाजिक तत्वज्ञानांचाही जन्म होऊ लागला. सामाजिक संघर्षाची परिमाणे बदलली. आपापले वर्चस्व टिकवण्यासाठी नवे सामाजिक सिद्धांत जन्माला घातले जाऊ लागले कारण नव्या भांडवली आणि साम्राज्यशाही मनोवृत्तीची तीही गरज होती. आज नवे तंत्रज्ञान म्हणून जेही काही आपल्या माथ्यावर मारले जात आहे, तेही भांडवलशाही प्रवृत्तीतून. किंबहुना आमच्या प्रगल्भतेच्या व्याख्याच बदलून गेलेल्या आहेत. आता सामुहिक गरजांपेक्षा व्यक्तीकेंद्रित गरजांनाच प्राधान्य दिले जाते, किंबहुना व्यक्तिवादी असणे हीच एक गरज बनवली गेलेली आहे.

इतिहासात आदीमानवाने जे सर्वोपयोगी शोध लावले तसे शोध आज लावले जाण्याची शक्यता नाही. कारण आजच्या मानवाच्या गरजाच मुळात बदललेल्या आहेत. शोधही त्या गरजांच्या पूर्तीसाठी लावले जात आहेत. आज कोणाला कैलास लेणे बनवायची गरज वाटत नाही, मग त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान कशाला शोधले जाईल? हो, गरजा निर्माण करण्यासाठी मात्र नवनवे शोध लावले जातील. तसे शोधही मानवी जगाची अपरिहार्य गरज बनून जाईल. त्यासाठीच आपल्याला नेमके काय हवे हे समजण्यासाठी आजच्या मानवाने मुळात आपल्याच गरजा निश्चित केल्या पाहिजेत!

-संजय सोनवणी 

No comments:

Post a Comment

सिंधू संस्कृतीची मालकी!

  सिंधू संस्कृतीची लिपी वाचता आलेली नसल्याने कोणीही उठतो आणि सिंधू संस्कृतीवर मालकी सांगतो. द्रविडांनी हे काम आधी सुरु केले पण त्याला आर्य आ...