छत्रपती
शिवाजी महाराजांचा ६ जून १६७४ रोजी झालेला राज्याभिषेक ही सतराव्या शतकातील भारताच्या
इतिहासातील अलौकिक घटना होती. आपण कोणाचेही मांडलिक नसून स्वतंत्र, सार्वभौम
राज्यकर्ते आहोत याची ग्वाही या राज्याभिषेकाने दिली. तत्पूर्वी त्यांना औरंगजेबही
“जहागीरदार” म्हणत असे. या राज्याभिषेकाने शिवाजी महाराज छत्रपती तर बनलेच पण शककर्तेही
बनले.
खरे तयार
शिवाजी महाराजांचे जीवनच स्वकीय व परकियांशी संघर्ष करून स्वराज्य स्थापनेत गेले.
जीवावरची संकटे झेलत त्यांनी विजयश्री प्राप्त केली. त्यांची रणनीती ही आजही
जगभराच्या युद्धशास्त्रातील विचारकांच्या अभ्यासाचा विषय राहिलेली आहे. राजनीतीत
ते किती धुरंधर होते याची उदाहरणे त्यांच्या दैदीप्यमान दीपस्तंभाप्रमाणे जगाला आजही
मार्गदर्शन करत आहेत. सर्वात महत्वाची बाब म्हणजे त्यांचे रयतेवर असलेले प्रेम.
मध्ययुगात रयत म्हणजे फक्त चिरडली जाण्यासाठी असते असा उद्दाम समज राज्यकर्त्यांचा
होता. त्याला मुस्लीम अथवा हिंदू राजे अपवाद नव्हते. मोगलांनी आपली सत्ता कायम
टिकवण्यासाठी वतनदा-या – जहागीरदा-यांच्या रुपात भारंभार सरंजामदार निर्माण केले
खरे पण शेतकरी, अलुते-बलुतेदार, मजूर अशा शोषित समाजाकडे फक्त एक कर भरणारे अथवा वेठबिगारीवर
फुकट राबणारे अशा दृष्टीने पाहिले गेले. शिवाजी
महाराज मात्र एकमेव अपवाद होते. रयत हाच राज्याचा केंद्रबिंदू आहे हे जाणून
रयतेच्या हिताचे अगणित निर्णय घेणारे राज्यकर्ते म्हणजे शिवाजी महाराज. त्यांनी
वतनदारी प्रथा बंद करून प्रस्थापित सरंजामशाहीला हादरा दिला.
शिवाजी
महाराजांनी राज्याभिषेक का करून घेतला? राज्याभिषेकाला विरोध झाला कि नाही झाला? यावर
अनेक वाद उत्पन्न झालेले आहेत. शिवाजी महाराजांचा संघर्ष हा केवळ मुस्लीम
सत्ताधा-यांशी नव्हता. इंग्रज, फ्रेंच, पोर्तुगीज आणि अनेक हिंदू सरदार-जहागीरदारही
त्यांच्या विरोधात होते. मोगलांतर्फे जसा शाईस्तेखान त्यांच्यावर चालून आला होता
तसाच मिर्झाराजे जयसिंगही चालून आले होते. शिवाजी महाराजांनी शक्ती-युक्तीने
त्यांच्यावर मात केली असली तरी शत्रूच्या लेखी त्यांचे महत्व एक बंडखोर म्हणूनच
होते. या प्रतिमेतून बाहेर पडून आपण सार्वाभाम राजे आहोत अशी द्वाही फिरवण्याची
आवश्यकता होती. राज्याभिषेकामुळे त्यांच्या राजकीय निर्णयांना, आदेशांना व प्रशासन
यंत्रणेला अधिष्ठान प्राप्त होणार होते. एक न्यायाचे राज्य अस्तित्वात आलेले आहे
याची ग्वाही देता येणार होती.
तत्पूर्वी
राज्याभिषेक झालेले नव्हते असे नाही. यादव, राष्ट्रकुट, सातवाहन इत्यादी राजांनी
आपापल्या घराण्यात प्रचलित असलेल्या प्रथेप्रमाणे राज्याभिषेक करून घेतलेले होतेच.
पण देवगिरीच्या यादवांच्या अस्ताबरोबरच ती प्रथा बव्हंशी लोप पावलेली होती.
गागाभट्टाने पहिला वैदिक राज्याभिषेक केला खरा पण त्याच्यासाठी त्यालाही “राज्याभिषेक
प्रकरणं” हा ग्रंथ आधी सिद्ध करावा लागला कारण वैदिक राज्याभिषेक तर कधीच नामशेष
झालेले होते. त्यामुळे तशा राज्याभिषेकाच्या संहिताही उपलब्ध नव्हत्या. त्यानंतर काही
दिवसातच शिवाजी महाराजांनी निश्चल पुरीकडून तांत्रिक हिंदू पद्धतीनेही राज्याभिषेक
करून घेतला व एतद्देशीय प्रथेची नव्याने रुजुवात केली. त्यात वैदिकांनी वैदिक
राज्याभिषेक करण्याचा निर्णय शिवाजी महाराजांनी घेतल्यावर विरोधाचा सूर उमटला असे
दिसते. वैदिक प्रथा संकुचित असली तरी समाजात (अगदी औरंगजेबाच्या दरबारातही) वैदिक
ब्राह्मणांचे वर्चस्व असल्याने वैदिक राज्याभिषेक करून घेतल्याशिवाय शिवाजी
महाराजांना अपेक्षित परिणाम साधता येणे शक्य नव्हते. त्यामुळे त्यांनी वैदिकांच्या
संकुचित धर्मतत्वांमुळे होत असलेल्या विरोधावर मात करत वैदिक राज्याभिषेक करवून
घेतला. तांत्रिक राज्याभिषेक करून हिंदू प्रथाही कायम ठेवली. त्यामुळे हिंदू व
वैदिक समाजाचेही एक प्रकारे धार्मिक समाधान झाले. अभिषिक्त छत्रपती म्हणून ते
सिंहासनारूढ झाले आणि भारतात एका एतद्देशीय क्रांतीची मुहूर्तमेढ रोवली गेली. रयतेला
धर्माचे अधिष्ठान असलेला राजा मिळाला. परसत्तांना ख-या अर्थाने जरब बसेल अशी
सार्वभौम शक्ती निर्माण झाली. तेराव्या शतकानंतर भारतात ख-या अर्थाने एतद्देशीय
सार्वभौम राजाचा उदय झाला.
शिवाजी
महाराजांचा राज्याभिषेक ही यच्चयावत देशासाठी अलौकिक घटना आहे ती यामुळेच. शिवाजी
महाराज इतिहास जाणून भविष्य बदलवणारे या देशातील एकमेव शासक. रयतेला आश्वस्त करत
त्यांना न्यायाचे राज्य देणारा एकमेव महामानव म्हणजे शिवाजी महाराज. त्यांना कोटी
कोटी प्रणाम! मानाचा मुजरा!
-संजय
सोनवणी
No comments:
Post a Comment