Tuesday, June 6, 2023

' कल्की '

 


९मार्च, २०१४
श्री संजय सोनवणी ,
नमस्कार ,
काल मी आपली कादंबरी , ' कल्की ' वाचली . कादंबरी इतकी आवडत गेली की एका बैठकीतच संपवली आहे , आणि मी परत एकदा ही कादंबरी वाचणार आहे . ही कादंबरी वाचल्यावर हे समजले की खरंच आपण फार थोर मोठे साहित्यकार आहात .' सव्यसाची ' ही आपली कादंबरी वाचल्या नंतर ही दुसरी कादंबरी . आता मला आपले सर्वच साहित्य वाचावे लागणार आहे . गेल्या वर्षी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या वेळेस आपला संपर्क आला . तेव्हा आपल्या अफाट साहित्याची कल्पना नव्हती . बृहनमहाराष्ट्रातल्या लोकांची ही कमतरता आहेच हे मान्य करायला काहीच हरकत नाही . तरी इतकी सुंदर कादंबरी लिहिण्यासाठी आपले मनापासून अभिनंदन .
साहित्यकार हा विचारवंत असल्याने भरकटत जाणे स्वाभाविकच आहे .आपले मतमतांतरही इतरांवर बळजबरीने थोपणे राजकारणात , समाजात , धर्मात , साहित्यात आपण रोजच पाहतो . फेसबुकवर नेहमी आपण जे विचार मांडता त्या विचारांशी मी बहुधा सहमत असतो . जातीविहीन समाजाची रचना व्हायलाच हवी , पण त्यासाठी रोज नवे आरक्षण देवून नव्या जातीजमातींची निर्मिती करून नाही . ब्राह्मणवादाचा विरोध करून , राजकारणात , समाजात , नवीन ब्राह्मण बनविण्या सारखेच हे काही तरी आहे . वैदिक / अवैदिक हा वाद आता जुना , पण इतिहासाचे मुल्य मापन आता निष्पक्षतेने व्हायला हवे . कालचे शोध , अविष्कार , परंपरा , संस्कार , आस्था , अनास्था , श्रद्धा , भक्ती आता कालबाह्य असले तरी कोणे एकाकाळी ते जगण्याचे , उन्नतीचे आधार होते हे विसरून चालणार नाही . त्या मुळे आपण इथ पर्यंत आलो, ते नेहमीच चुकीचे होते आणि आज आपण जे विचार मांडतो आहे , वागतो आहे , करतो आहे , तेच बरोबर आहे , हे समजणे योग्य नाही. कारण आजचे हे सगळे बरोबर असले तरी याचे परिणाम यायला अनेक शतके वाया जातील आणि शेवटी त्यांच्याच चुकांचा आधार घेवून आपण नवे शोध , नवे विचार मांडत आहोत. तेव्हा आपले विचार परखडपणे मांडताना ज्या चुका झाल्या त्यात चांगले काय होते हे शोधण्याचा प्रयत्न व्हायला हवा . मला वाटतं आपण प्रत्येक वेळेस आपल्या पूर्वजांना शिव्या देवून मोकळे होतो आणि त्यांना शिव्या देवून आपल्या चुकांना झाकण्याचा प्रयत्न करतो . आपल्या बरोबर चुकून काही चूक घडल्यास , नक्कीच त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात . पण समाजाच्या हितांसाठी पुर्वाग्रही होऊन चालत नाही . विचारांची पूर्वग्रहीता फारच भयानक असते . आपण आपली निष्पक्षता हरवून बसतो . जातीविहीन समाजाच्या माझ्या कल्पनेत रमताना , कालचा पक्षपात विसरून आजची निष्पक्षता गरजेची वाटते .
सुरवातीला फक्त 10 वर्षासाठी आरक्षण ठेवले गेले होते पण गेल्या 75 वर्षातही आपण जातींचे हे विष संपवू शकलो नाही व आज ही शिवाजीच्या सर्व सम्पन वंशजांना आरक्षणाची गरज भासते याला काय अर्थ ? अशाने जातीविहीन समाजची रचना कशी होऊ शकते ? देणारे हातचं सर्व ओरबाडून घेऊ लागले तर समाजात स्वारस्य कसे उत्पन्न होणार ? आणि याचा विचार कोण करणार ? आज आम्ही जे जाती वाढविण्यासाठी प्रयत्न जोमाने करत आहो , तसले स्वार्थी राजकारण आणि स्वार्थी कृत्य वैदिक काळात ही झाले नव्हते . म्हणून विरोधाला विरोध न करता , आजच्या एकूण परिस्थितीत , कोणा एका वर्गासाठी नाही तर , राष्ट्रासाठी , समाजासाठी , काय योग्य आणि काय चांगले आहे ते व्हायला हवे .
जन्माने कर्मकांडी देशस्थ ब्राह्मण असूनही मी देखील जातीविहीन समाजाच्या संकल्पने बरोबरच धर्मविहीन समाजाची नेहमी स्वप्न बघतो . धर्माचा इतिहास ६००० वर्ष जुना आहे , आणि विज्ञानाचा इतिहास फार तर फार ३००-४०० वर्ष जुना आहे . पण विज्ञानाने धर्माला मागे सोडलेले आहे . पण घराघरांमध्ये सडलेली आस्था जाम चिकटली असल्याने , कोणते ही तर्क , कोणतेही मुद्दे भावनांपुढे उपयोगी ठरत नाही . जिथं जास्त गरिबी , उपासमार , तिथंच वंचित/ विप्पन देवाकडे बघतात आणि समर्थ व सम्पन यांच्याकडे देव सतत बघत असतो . अशाच गरिबी व श्रीमंतीच्या दरी मुळे धर्माचे फोफावते . म्हणून धर्मविहीन समाजाच्या कल्पनेसाठी आर्थिक दरी संपविणे गरजेचे आहे .
आता ही आर्थिक दरी संपवायची असेल तर , सर्व मुद्दे बाजूला ठेवून , सर्व स्वार्थी राजकारण बाजूला ठेवून , समाजात गोरगरिबांची विपन्नता संपविणे गरजेचे आहे . वर्णभेद , नस्लभेद , लिंगभेद न करता , कोणी अण्णा , कोणी बाबा , कोणी मोदी , कोणी राहुल , कोणी अरविंद , आणि इतर कोणीही ठामपणे पुढे येत असेल तर त्याचे स्वागत व्हायला हवे . धर्मविहीन समाजाच्या संकल्पनेसाठी शिक्षा , आणि आरोग्य हे ही तितकेच महत्वाचे . आर्थिक विषमता दूर करण्याची ही पाऊल वाट आहे .
शुभेच्छा
विश्वनाथ . शिरढोणकर

No comments:

Post a Comment

ऐतिहासिक तथ्यांची तोडमोड

  ऐतिहासिक तथ्यांची तोडमोड करणे आणि लोकांची दिशाभूल करणे हा भाजपाचा पूर्वीपासून उद्योग राहिलेला आहे. परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी नुकतेच नेह...