Saturday, November 25, 2023

लीलेचा दुष्ट शक्तींशी लढा!

 

 

      लीला, लीला...” त्या गहन शांततेत लीलेच्या कानावर एका अभद्र आवाजात हाक आली तशी लीला दचकली.

      कोणी आपली तंद्री भंग केली? तिने रागानेच आजूबाजूला पाहिले, पण तिला कोणीच दिसले नाही.

      “कोण आवाज देतेय?” तिने मोठ्ठ्या आवाजात विचारले आणि शेजारी ठेवलेली तलवार हाती घेतली.

      “मी खवीस आहे लीला...मी डोळ्यांनी दिसणारा नाही. मला तुझ्या बापाने गुन्हेगार ठरवून ठार मारले होते. खवीस झालो मी मेल्यानंतर. आत्मा तडपत राहिला सूड घेण्यासाठी! आता येथे बदला घ्यायला आलेलो आहे मी...” तो अभद्र आवाज जसा आता जवळ आला होता.

      लीलाने समोरच्या अथांग सरोवराकडे आणि नंतर सर्वत्र पसरलेल्या अरण्याकडे पाहिले आणि म्हणाली,

      “खवीस असलास तरी काही नाव असेलच ना तुझे? सूड घ्यायचाय तुला तर खुशाल घे, पण आधी तुझे नाव तरी सांग!”

      “जिवंत होतो तेंव्हा मला सारे कालमुख म्हणायचे. भला माणूस होतो मी. पण तुझा बाप..स्वत:ला न्यायी राजा समजतो तो..त्याच्या सैनिकांनी मला पकडले आणि...हत्तीच्या पायी दिले मला..” आता खविसाचा आवाज संतापल्यासारखा येत होता.

      “आठवले मला आता...कालमुख...म्हणजे तो तूच होतास ना...काळ्या जादूने लहान लहान पोरे गायब करायचा तो? ती मुलं पुन्हा कधी कोणाला दिसलीच नाहीत! ठार मारलेस त्यांना कि कोठे कोंडून ठेवलेस? एवढे बडवून काढले तुला तरी पण तू सांगितले नाहीस. तू आधीच पुरता बदनाम होतास! पोरांवर तुझी नजर पडू नये म्हणून आया खबरदारी घ्यायच्या. घाबरायचे तुला सारे लोक. दिसला तरी दूर पळायचे..लपायचे लोक. दुष्ट होतास तू! माझ्या पित्याने तुला ठार मारले म्हणजे न्यायच केला कि तुझ्याशी!” लीला शांत आवाजात म्हणाली.

      “तुझ्या बापाने मला तर ठार मारलेच...पण त्याच्या राज्यात काळ्या जादुवरही बंदी घातली...का असे करावे त्याने? काळ्या जादूमुळे त्याचे राज्य वाढू शकले असते...केवढे शक्तीशाली झाले असते...” खवीस कालमुख आता रागावून बोलत होता.

      लीला स्वत:शीच हसली आणि विचारले,

      “तू त्या मुलांचे काय केलेस हे कधीच सांगितले नाहीस...काय केले तू त्यांचे? कोठे गायब केली ती मुलं?”

      “ते मी तुला का सांगू?” खविसाचा तोच अभद्र आवाज आला.

      “नको सांगूस!” लीला बेफिकीरीने म्हणाली. “पांढ-या जादूने शोधू आम्ही त्यांना...असतील तेथून परत आणू एक दिवस!”

      “पांढरी जादू? इतके दिवस झाले...सापडली ती मुलं तुम्हाला? कुचकामी आहे पांढरी जादू! सिद्ध केलेय ते अनेकांनी. आणि काळ्या जादूवर तुम्ही बंदी घातली असली तरी अनेक लोक गुप्तपणे ती शिकताहेत...एक दिवस या ग्रहावर काळी जादूच सत्ता गाजवणार आहे, लक्षात ठेव!” कालमुख गुर्मीत म्हणाला.

      “असं? बरे बरे...खविसांनाही स्वप्ने पडतात हे ऐकून बरं वाटलं!” ती आतल्या आत हादरली असली तरीही वरकरणी उपहासाने म्हणाली.

      “हसू नकोस...या क्षणी तुझा जीव माझ्या हातात आहे...”

      “तुझा हात तर दिसू दे आधी...न दिसणा-या गोष्टींवर मी कसा विश्वास ठेवीन?” ती त्याच उपहासाच्या स्वरात म्हणाली.

      “तुला काय वाटते? तुला पांढ-या जादूच्या कवचाचे संरक्षण आहे म्हणून तुला कोणीच काही करू शकणार नाही? पण थांब...दाखवतोच तुला...” खवीस ओरडला आणि काय झाले कोणासठाऊक, बसल्या जागेवरून लीलेला वर उचलून दूर फेकण्यात आले.

      लीला दूरवर जाऊन आदळली. तिचे सारे अंग ठेचकाळले. ती विव्हळली. कळवळली. आपल्यावर पांढ-या जादुचे बळकट रक्षक कवच असताना असे होऊ शकेल याची तिने कल्पनाच केली नव्हती!

      “मी आत्ताच ठार मारून सूड पूर्ण करू शकतो माझा....पण मी तसे करणार नाही. मी तुला एकच निरोप द्यायला आलो आहे..” कालमुख हिंस्त्र स्वरात म्हणाला.

      “निरोप? कसला निरोप?” लीला उठून बसत म्हणाली.

      “मी सूड घेणार. या जगातील काळ्या विश्वाचा सम्राट आहे मी आता. माझे या राज्यात एवढे अनुयायी आहेत कि तुम्ही गणतीही करू शकणार नाहीत! या राज्यावर तुम्ही कल्पनाही केली नसतील अशी आता भयंकर संकटे कोसळणार आहेत. लोकांचे जीव जाणार आहेत. आणि सर्वात शेवटी तुझा दुष्ट बाप सत्यसेन आणि तू मारले जाणार आहात. तुमची पांढरी जादू किंवा सैनिकी सामर्थ्य कुचकामी ठरणार आहे. एवढेच सांगायला मी आलो होतो.” तो क्रूर आवाजात म्हणाला.

      “एवढेच सांगायचे होते? आणि हे सांगायला स्वत: कालमुखाला यावे लागले?” लीलेच्या आवाजात अजूनही उपहास खच्चून भरलेला होता. “आणि मी अदृश्य लोकांनी दिलेल्या धमक्या ऐकून घेत नाही...हिम्मत असेल तर दिस मला. खवीस कसे दिसतात हे तरी कळेल मला..”

      “ठार तर तुला मी आत्ताच मारू शकतो, पण तसे करणार नाही मी..सारे नागरिक मरत असल्याचे तुला आणि तुझ्या म्हाता-या बापाला पहायचे आहेत. मग दिसेल मी एक दिवस तुला लीला...जेंव्हा तू मरत असशील...!”

      कालमुखाचा शेवटचा आवाज आला.

      लीला कशीबशी तोल सावरत उठून उभी राहिली.

      तिचे सर्वांग दुखत होते.

      मोठ्या कष्टाने पावले टाकत ती तिच्या तलवारीजवळ आली. तलवारीचे रत्नजडित मुठ उन्हात झळाळत होती. तिने तलवार उचलली आणि समोरच्या अथांग जलाशयाकडे पहात ती मागे वळाली.

      तिचा श्यामकर्ण घोडा एका झाडाला बांधून ठेवला होता.

      ती मात्र गहन विचारात पडली होती.

      कालमुख किती दुष्ट होता हे तिला माहीतच होते. तो मेल्यानंतरही केवळ सूड घेण्यासाठी खवीस बनला आहे आणि काळ्या जादूने आपल्या राज्यावर काही संकटे आणणार आहे या विचारानेच तिच्या मनाचा थरकाप उडाला होता.

      असे नेमके काय करणार आहे तो हे तिला माहित नव्हते. त्यानेही सांगितले नव्हते.

      पण ती विचारात पडली होती.

      ती श्यामकर्णजवळ आली तसा श्यामकर्ण खिंकाळला आणि म्हणाला,

      “चांगलेच अंग शेकून निघाले तुझे लीला! महान पराक्रमी लीला, संरक्षक कवच असताना अशी कशी तू अचानक उंच उचलली आणि भिरकावली गेलीस?”

      “आता भलते प्रश्न विचारून माझ्या जखमेवर मीठ चोळू नकोस...” लीला वैतागल्या सुरात म्हणाली. “चल, आपल्याला लगेच राजधानीला पोहोचायचे आहे...” असे म्हणून तिने श्यामकर्णला सोडले आणि लगाम हाती घेत त्याच्यावर झेप घेतली.

      “काही संकट होते का?” शामकर्णने धाव घेता घेता विचारलेच.

      “हो..संकट...सर्व राज्यावर संकट...ते रोखावे लागणार आपल्याला...” लीला म्हणाली आणि डोळे बंद करून वेदना गिळायचा प्रयत्न करू लागली.

      श्यामकर्णही मग काही न विचारता झेपावत राजधानी जवळ करू लागला.

     

·             

      वाटेत वस्त्या लागल्या. शेतात काम करणारी माणसे दिसली. गावात-शेतात जे लोक दिसताहेत ते काळ्या जादूचे भक्त तर नाहीत?

      तिला संशय येत होता.

      आज ती नेहमीप्रमाणे सहज फिरायला अरण्यात आली होती. अरण्याच्या मधोमध असलेले सरोवर ही तिची लाडकी जागा होती. किना-यावर एका खडकावर बसून पाण्याच्या इवल्या लाटा पाहत बसने आणि चिंतन करणे हा छंद होता तिचा.

      आजही ती अशीच आली होती...

      आणि या अनपेक्षित प्रसंगाला तोंड द्यावे लागले होते.

      आपल्याला लवकरच कोणत्यातरी अभद्र संकटाला तोंड द्यावे लागणार आहे या विचाराने ती आपली वेदनाही विसरली होती.

      भद्र देशाची राजधानी होती कुसुमपूर.

      एखादे भूईकमळ उगवले असावे असे वाटावे अशीच देखणी रचना होती त्या नगराची.

      ते एका पाकळीच्या आकाराच्या बुरुजातील दारातून नगरात प्रवेशले.

      नागरिक थबकून आपल्या लाडक्या राजकन्येला नमस्कार करत होते.

      नगराच्या मधोमध तुर्रेदार पराग असावा तशी राजप्रासादाची इमारत पार उंच आकाशाला भिडली होती.

      ती घोड्यावरून उतरली आणि आत धाव घेतली.

      तळमजल्याच्या अति-विशाल दालनाच्या मधोमध असलेल्या उंच उंच जाणा-या घेरावदार जिन्यावरून ती अक्षरशा: धावतच वर चढत गेली.

      राजा सत्यसेन आपल्या दालनात एका उच्चासनावर बसून त्यांच्या काही मंत्र्यांसोबत चर्चा करत बसले होते.      

      आपली कन्या आलेली पाहताच त्यांनी आपली चर्चा आटोपती घेतली आणि काळजीने तिला विचारले,

      “बेटा लीला, आज अशी गंभीर का तू? आणि जखमी का तू?”

      “बाबा, कालमुख खवीस झाला आहे. अजूनही त्याची दुष्ट महत्वाकांक्षा जिवंत आहे. तो आपल्या राज्यावर संकटे आणणार आहे.”

      “दुष्ट माणसे मेल्यानंतर खवीसच होतात...पण काही करू शकत नाहीत ते... एखाद-दुस-याला किरकोळ त्रास देतील फार तर...” सत्यसेन म्हणाले.

      “एवढे सोपे नाही बाबा ते. तो काळ्या जादूचा सम्राट होता. मेल्यानंतर त्याच्या शक्ती अचाट वाढलेल्या आहेत. त्याने आज मला इशारा दिलाय फक्त. त्याला सूड घ्यायचा आहे आपला...आपल्या सर्व नागरिकांचा! आणि तो तसे करू शकतो हे सिद्ध केलेय त्याने!”

      आता मात्र सत्यसेन काळजीत पडले.

      “मी आपल्या मुख्य पुरोहीताशी चर्चा करतो. संकट गंभीर असले तर ते रोखलेच पाहिजे आधीच! तू थकलेली दिसतेस...ओरखडले आहे तुला...उपचार करून घे आणि आराम कर.”

      लीला तेथून निघाली खरी पण अजून तिच्या कानात कालमुखाचे शब्द घुमत होते.

      आणि काही दिवसात जशा चारी बाजूनी भयभीत करणा-या वार्ता येऊ लागल्या.

      रात्री महाभयंकर अवाढव्य हिंस्त्र पक्षी अचानक अवतरू लागले आणि शेळ्या-मेंढ्या, गायी-म्हशी आणि अंगणात झोपलेली माणसे पळवून नेली जाऊ लागली. पक्ष्यांची शक्ती एवढी कि घरेही कोसळून पडत.

      असे भयंकर पक्षी कोणी कधी पाहिलेले नव्हते.

      सर्वत्र हाहा:कार माजला होता.

      लोक रात्र तर सोडाच, दिवसाही घराबाहेर यायला घाबरू लागले होते.

      एकाएकी राज्य भयंकर भीतीच्या सावटाखाली गेले होते.

      हे ऐकून लीला संतापली.

      हेच ते कालमुखाने आणलेले जीवघेणे संकट हे तिच्या लक्षात आले.

      काहीही करून याचा बंदोबस्त करावाच लागणार होता.

      सत्यसेन महाराज म्हणाले, “सर्वत्र सैन्याचा बंदोबस्त वाढवा...ठार मारा त्या पक्षाना..”

      “पण ते पक्षी नेमके येतात कोठून आणि जातात कोठे हेच कळत नाही. रात्री अचानक कोठेही अवतरतात ते. आणि आकार त्यांचा तर एवढा अवाढव्य कि चार पक्षी मिळूनच सारे आकाश झाकून टाकतात...आपल्या सैनिकांनी सोडलेले बाणही त्यांच्यावर परिणाम करू शकत नाहीत!” सेनापती वज्रसेन म्हणाले.

      “मग आपले पांढ-या जादुतील तद्न्य कामाला लावा. हे संकट तत्काळ दूर केले पाहिजे...” सत्यसेन म्हणाले.

      “तेही प्रयत्न करून पाहिले महाराज...पण तेही व्यर्थ ठरलेत! समजत नाही पांढरी जादू या वेळेस कशी अयशस्वी ठरली कोणास ठाऊक! काळ्या जादुवाल्यांकडे एवढी शक्ती कशी आली हे समजत नाही. कसे हे लोक एवढे वाढले अचानक हेही समजत नाही. करावे काय हेच समजेना झाले आहे!” मुख्य प्रधान हताश आवाजात म्हणाले.

      सत्यसेन हे ऐकून अजून चिंतीत झाले.

      “काळ्या जादुवाले अनेक लोक आपल्या राज्यात गुप्तपणे राहताहेत...त्यांना शोधायला हवे...” लीला म्हणाली.

      “पण त्यांना ओळखायचे कसे? कोण व्यक्ती गुप्तपणे काळ्या जादूचा वापर करतेय हे कसे कळेल आपल्याला?” सेनापतीने विचारले.

      “पुरोहित प्रियव्रत यांना आज्ञा द्या. आपल्याला आधी त्या कालमुख खविसाचा बंदोबस्त करावा लागेल. मारूनही हा नीच त्रासदायक ठरलाय. त्याने पळवलेल्या पोरांचे काय झाले तेही समजायलाच हवे. प्रियवतांना सांगा, सर्व शक्ती पणाला लावा पण कालमुखाला कायमचा गाडून टाका. ती पोरं कोठे आहेत हे युद्ध पातळीवर शोधा.”

      झाले, राजाचीच आज्ञा ती. पुरोहित प्रियवत त्याच्या महालात सूर्यदेवाचे मंत्र म्हणत काळ्या जादूला नष्ट करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करू लागला. पण त्यालाही हे सारे कोठून होतेय हे समजेना.

      मग लीलाही धनुष्य घेऊन पक्षांचा नाश करायला बाहेर निघाली.  ती आता घनदाट अरण्यात आली होती. दिवस्चा उजेड असल्याने अजून तरी सारे शांत दिसत होते. तेवढ्यात तिला झाडाला टेकून रडत बसलेला मेंढपाळ दिसला. त्याला तिने कारण विचारले तर तो म्हातारा मेंढपाळ म्हणाला,

      “राजकन्ये, मला ते सैतानी पक्षी विकराल दरीतून वर येतांना दिसले. आधी छोटे दिसत होते आणि जसे वर उडाले तसे पाहता पाहता आभाळाएवढे मोठे झाले....डोळ्यांतून आग ओकतात ते. भस्म करतात त्यांची नजर पडेल ते! त्या दरीतच त्यांची पैदास होते असे वाटतेय मला. माझी मेंढरे त्यांनी काल रात्रीच फस्त केली गं पोरी. मी कसाबसा वाचलो त्यांच्या तडाख्यातून.”

      लीला त्याचे डोळे पुसत म्हणाली,

      “नष्ट करू आम्ही त्यांना. नष्ट करू ही पाशवी काळी जादू. जगात असा अभद्र मृत्यू कोणालाही येणार नाही.” आणि तिने सोबतच्या एका सैनिकाला त्या म्हाता-याला त्याच्या घरी सोडायला सांगून विकराल दरीकडे निघाली.

      ही दरी नावाप्रमाणेच भयंकर असल्याने तिकडे सहसा कोणी फिरकट नसे. त्या अरुंद आणि खूप खोल असलेल्या दरीत दिवसाही अंधार असायचा. खडक अणुकुचीदार आणि झाडांच्या फांद्यांप्रमाणे लांब असल्याने त्या दरीत उतरण्याची कल्पनाही कोणी केली नव्हती. दरीच्या तळाशी काय आहे हे कोणालाही माहित नव्हते. कोणे म्हणे ती भूतांची दरी आहे तर कोणी म्हणे तेथे सैतान राहतात. त्यांना उजेड सहन होत नाही म्हणून अशी दरी त्यांनीच निर्माण केली. म्हणून तेथे एवढा अंधार असतो!

      पण मेंढपाळाने माहिती दिल्याने तिला त्या दरीकडे जाऊन खरेच काय आहे हे पाहण्याची इच्छा होती.

      पण आपण या अजस्त्र पक्ष्यांशी कसे लढणार हे काही तिला समजत नव्हते.

      तिने सोबतच्या बाकी सैनिकांना परत पाठवले. त्यांच्या जीवाला उगाचच धोका नको असे तिला वाटले होते.

      आता ती एकटीच होती. मनात अपार कुतूहल होते तसेच भयही होते.

      अरण्य संपले. विकराल दरी जवळ आली. दरीतून खोलवरून अगणित पक्ष्यांचे चित्कार तिला ऐकू येऊ लागले. पण दिसत मात्र एकही पक्षी नव्हता. ते दरीतच खोल दडून बसलेले असणार होते. जोवर कालमुख आज्ञा देत नाही तोवर ते बाहेर पडणार नाहीत असा तिने अंदाज बांधला.      

      कालमुखाने त्या पळवून नेलेल्या मुलांना या नरभक्षक पक्ष्यांना तर खायला घातले नसेल?

      नुसत्या कल्पनेनेच तिच्या अंगावर काटा आला.

      नाही...कालमुख त्या मुलांचा काहीतरी वेगळा उपयोग करणार असेल! या पक्ष्यांना खायला तर त्याने अवघे राज्यच दिलेय.

      पण काय करायला हवे?

      या दरीत अंधार आहे.

      हे पक्षी सध्या तेथे ठेवलेत कालमुखाने.

      म्हणजे हे पक्षी अंधाराला घाबरत असतील तर?

      तिचे डोळे चमकले.

      पण आता सूर्यास्त होत आला होता. काही वेळातच अंधार पडणार होता. ते सैतानी पक्षी बाहेर पडणार होते...संहारासाठी. शेकडो जीव आज धोक्यात होते. परत जाऊन उद्या येऊ म्हणण्यात अर्थ नव्हता.

      आणि अंधार पडल्यानंतर तर ते शक्तीशाली होणार होते.

      “काय करावे?” ती हताश स्वरात पुटपुटली.

      श्यामकर्ण खिंकाळला. मग खो खो हसला.

      “आता काय झाले तुला दात विचकायला?” लीला चिडून म्हणाली.

      “तुला पांढरी जादू येते हे कसे विसरलीस तू? अंधार म्हणजे काळी जादू. प्रकाश म्हणजे पांढरी जादू. तुझा हातात धनुष्य आहे. बाण आहेत भात्यात. आणि पांढरी जादू येते तुला. जरा बुद्धी वापरलीस तर समजेल तुला मी काय म्हणतोय ते!”

      लीला स्वत:वरच नाराज झाली.

      हे या घोड्याने आपल्याला सांगावे?

      “बरं बरं...अक्कल पाजळू नकोस तुझी. मला माहित आहे काय करायचेय ते...” लीला म्हणाली.

      समोर विकाराल दरीची सरळ गेलेली भेग दिसत होती. मावळत्या सूर्याचा नारिंगी प्रकाश सर्वत्र पसरला होता. या भागात एखादे चिटपाखरूही दिसत नव्हते. जसे बाकीचे जीव भयाने या भागातून पसार झालेले होते. दरीतून पक्ष्यांचा भयकारक आवाज तेवढा घुमत होता.

      लीलेने श्यामकर्णला थांबवले. ती खाली उतरली आणि दरीच्या भेगेच्या दिशेने काही पावले चालत गेली. पक्ष्यांचा कर्कश्य आवाज आता कानाचे पडदे फाडील कि काय एवढा मोठा झाला होता. तिने वाकून पाहिले पण तिला त्या गडद अंधाराखेरीज काहीच दिसले नाही. तिने एक दगड उचलून खाली टाकला...पण तळ किती खोल होता हेही समजले नाही कारण दगडाचा कसलाही आवाज वरपर्यंत आला नाही.

      बापरे!

      कालमुख खवीसही येथेच राहतो कि काय?

      ती मागे वळाली. शाय्मकर्ण तिच्याकडे मिश्कीलपणे पाहत होता.

      “तू मागे अरण्यात जाऊन आडोशाला थांब. नाहीतर हे पक्षी तुझाच चट्टामट्टा करायचे...” ते म्हणाली तशी श्यामकर्ण “बापरे!” म्हणत घाबरून वळाला आणि अरण्याच्या दिशेने चाखुर धावत सुटला.

      लीलेला हसू फुटले.

      ती एका उंच खडकावर आली आणि हातात धनुष्य घेऊन गुढग्यावर बसली. एक बाण जोडला आणि ती अंधार होण्याचे वाट पाहू लागली.

      सूर्य क्षितीजाआडे गेला. सावळा प्रकाश पसरला आणि पक्ष्यांच्या फडफडाटांचा आवाज येऊ लागला.

      हीच संधी आहे.

      दिवस नाही कि रात्र. अंधार नाही बाहेर जगात कि उजेड. तिने धनुष्याची दोरी कानापर्यंत ओढली आणि एकाग्रपणे बाणाच्या टोकाकडे पाहत अग्नीमंत्र म्हणायला सुरुवात केली.

      आणि त्या भेगेच्या नेम धरून बाण सोडला.

      सनसन करत बाण भेगेत गेला आणि सारी दरी अग्नीज्वालांच्या लालभडक प्रकाशाने भरून गेली. दरीतून चित्कार उसळले. असहाय फडफड कानी येऊ लागली. पाठोपाठ एक चित्कार उसळला,

      “लीले, आता तुझा अंत निश्चीत आहे...” कालमुखाचा अभद्र आवाज आभाळव्यापी झाला.

      लीलेने त्याला उत्तर देण्यात वेळ घालवला नाही. दुसरा बाण तोच मंत्र म्हणून सोडला. आता अवघी दरी अग्नीज्वालांनी भरून गेली. जसा ज्वालामुखी फुटला होता. कालमुख त्याची काळी शक्ती वापरत काही उपाय शोधणार याचा तिला अंदाज होताच. आणि तसेच झाले. ती बसली होती तो खडक अचानक दुभंगला. ती खाली कोसळली. दरीच्या दिशेने घरंगळत जाऊ लागली. आता  दरीत पडलो कि आपले काम झाले तमाम...तिच्या मनात विचार आला. तिने भात्यातून एक बाण काढला आणि वेगाने जमिनीत घुसवून त्याच्या आधाराने आपली घरंगळ थांबवली.

      तोवर दरीतून काही पक्षी वर सरसावले होते.

      अंधार पडत होता.

      एक पक्षी संतप्त चित्कार करत तिच्या दिशेने झेपावला. पाहता पाहता तो एवढा अजस्त्र झाला कि तिला आभाळही दिसेना. ती घाईने सावरून बसली. धनुष्य सज्ज केले. मंत्रभारीत बाण त्या पक्षाच्या अवाढव्य डोळ्यावरच सोडला. आणि बाजूला पळाली.

      त्या बानातून निघालेल्या अग्नीच्या लोळांनी पक्षी सरभैर झाला. त्याला काही दिसेनासे झाले. तो चित्कारू लागला. असहाय झाला. आणि जसा बाण डोळ्यात घुसला तसा तो विद्ध होऊन खाली कोसळू लागला. जमिनीवर कोसळला. खडकांचा भुगा सर्वत्र उसळला.

      तोवर लीला दूर पळाली होती म्हणून वाचली नाहीतर चिरडली गेली असती. ती आता एकामागून एक बाण सोडत सारे आकाश प्रकाशमय करू लागली होती. वर उडत येऊ लागलेले पक्षी पुन्हा मागे वळत दरीच्या अंधारात आसरा शोधायचा प्रयत्न करू लागले. तिते दरीतही बाणांचा वर्षाव सुरु केला. संपूर्ण दरी आगीने भाजून पोळून निघाली. पक्षांचे चित्कार आता आर्त झाले होते. पंखांची फडफड निस्तेज होत चालली होती.

      “लीले, आता तुझा मृत्यू अटळ आहे...” कालमुखाचा संतप्त आवाज दरीत घुमला.

      “अरे, खविसा, मेलेला तर तू आहेस. तू काय मला मारणार? कोठे आहेत तू पळवून नेलेली मुले?” अजून एक बाण सोडत, आगडोंब निर्माण करत तिने विचारले. पण आता दरीत पाषाण-खडक कोसळल्याचे आवाज सोडले तर काहीही नव्हते.

      तिने आगीची धग कमी होण्याची वाट न पाहता त्या अरुंद दरीत उतरायला सुरुवात केली, हात-पाय भाजत होते पण तिने पर्वा केली नाही. काहीही झाले तरी कालमुखाचा नाश करणे तिचे एकमेव ध्येय होते. ती खडकांना धरून, दरीच्या दोन्ही बाजूंना पाय ठेवत झपाझप खाली उतरत होता. कालमुख कोठे दडून बसलाय हे माहित नव्हते. खवीस होतात ती मेल्यानंतर. मृतात्मे काय...कोणेही सटकू शकतात. पण त्याला गाडून टाकावे लागणार होते. ती जशी अजून खाली आली, तिच्या लक्षात आले कि दरी रुंद होते आहे. तिने एकाच बाजूने उतरण्याचा निर्णय घेतला. वर अरुंद असली तरी जसजसे खाली जावे तशी भेग रुंदावत गेली होती,,,इतकी कि पल्याडचा भाग दिसूही नये.

      ती खाली जात राहिली. जात राहिली...आहे तरी किती खोल ही दरी? चार-पाच घटका गेल्यावर कोठे तिचे पाय जमिनीला टेकले. तिने पाठीचे धनुष्य बाहेर काढले. आता प्रकाशमंत्र म्हणून बाण सोडला. हजार सूर्य उगवले असावेत असा दिव्य प्रकाश निर्माण झाला. दरीचे आतले दृश्य पाहून ती विस्मित झाली. दरीच्या दोन्ही बाजूपर्यंत मैदान होते. काही अंतर सोडून एक विचाल जलाशय होता. त्यावर असंख्य पक्षांची प्रेते तरंगत होती. दरीत बाकी झाड-गवताचा मागमूसही नव्हता. अंधारात असलेल्या या दरीत कोठून आलेय वनस्पती आणि प्राणीजेवण? हे असले अभद्रच काय ते येथे आश्रय घेणार!  

      तिने आता क्षीण होत आलेल्या प्रकाशात सर्वत्र पाहिले. या पाषाणी भिंतीत कोठेतरी गुहा असलीच पाहिजे. अशाच एखाद्या अंधारी गुहेत प्रकाशाला घाबरणारा कालमुख दडून बसलेला असेल...

      आणि तिला एक गुहा दिसली...पल्याडच्या बाजूला.

      ती खडकाळ मैदानावरून धावत सुटली. गुहा जवळ येईपर्यंत घनघोर अंधार पुन्हा पसरला होता.

      अंधारात खाविसांच्या ...आणि त्यात काळ्या जादूगारांच्या शक्ती अचाट वाढत असल्याने तिला सावध राहणे भाग होते.

      आणि आता तिच्याकडे तीनच बाण उरलेले होते.

      ती धनुष्याला एक बाण जोडून सावधपणे त्या गुहेत शिरली. कानोसा घेतला तर पाणी वाहत असल्याचा आवाज आला. म्हणजे या गुहेत प्रवाह होता तर! ती जपून पावले टाकू लागली. काही पावले टाकल्यानंतर गुहा बंद होतेय असे जाणवले. पाण्याचा आवाज तर येत होता पण कोठून? तिला समजत नव्हते. आता इलाज नव्हता. तिने बाण सोडला. गुहा प्रकाशाने भरून गेली. वटवाघळे बावरून झुंडीने उडत तिच्या अंगावरच आली. ती हबकली. पण लगेच सावरली. तिला पल्याड जाणारी एक पोकळी दिसली. पाण्याचा आवाज तिकडूनच येत होता. ती त्या पोकळीत घुसली पण त्याआधी गुहेच्या छतावर आदळून खाली पडलेल्या बाणाला उचलून घेतले. त्या पोकळीतून तिला रांगत जावे लागले. वेड्या-वाकड्या वळणांच्या त्या मार्गातून जातांना तिची दमछाक होत होती. दुर्गंधीने जीव नकोसा केला होता. जीव नुसता घुसमटत होता.

      संपली एकदाची ती पोकळी. आत भूमिगत ओढा आहे हे तिच्या लक्षात आले. ती आवाजाचा अंदाज घेत कडेकडेने चालू लागली. एकाएकी कालमुखाच्या गडगडाटी हसण्याचा आवाज आला.

      “अखेर सापडलीस तू माझ्या कचाट्यात...” तो म्हणाला.

      “कोठे दडला आहेस नीचां?” तिने संतापल्या सुरात विचारले.

      तेवढ्यात पाण्यातून कोणीतरी तिला खेचून घेतले. तोल जाऊन ती प्रवाहात कोसळली. तिचे नाक-तोंड अदृश्य शक्तीने दाबल्याने जीव घुसमटू लागला. हातात फक्त काही क्षण होते, नाहीतर मृत्यू अटळ होता. पण पाण्यात धनुष्य कसे चालवायचे? तिने धडपड करत खाली सुळकांडी घेतली आणि धनुष्याला बाण जोडला.  तो हातातून हिसकावला जाणार तोच तिने मंत्र म्हणून बाण सोडला. पाणी प्रकाशाच्या चकचकाटाने भरून गेले. तिच्याभोवती पडू लागलेल्या अदृश्य शक्तीचा विळखा सुटला. ती झपाट्याने पाण्यावर आली. काठाला लागली आणि चिंब भिजलेल्या स्थितीत त्या प्रकाशमान पाण्याकडे पाहू लागली. कालमुख या प्रकाशाच्या झोतात कोठेतरी विरघळून गेला होता.

      तरीही ती सावधगिरीने चालू लागली. ही गुहा कोठेतरी उघडत असणारच होती. पण कोठे आणि किती दूर?

      ती काही अंतर चालली तोवर प्रकाश पुन्हा गायब झाला होता. पाण्याच्या आवाजाचा ध्वनी निनादत होता. दिसत मात्र काहीच नव्हते. तेवढ्यात तिच्या कानावर अस्पष्ट आवाज पडू लागला...मानवी आवाज...दीनवाणे आवाज.

      कालमुखाने जिवंतपणी पळवून आणलेली ती मुले तर नाहीत ना ही?

      तिला आशा वाटली. ती वेगाने त्या आवाजाच्या दिशेने चालू लागली.

      तेवढ्यात पाण्यातून कालमुखाच्या भुताळ प्रतिमेने झेप घेतली. पाण्याच्या उसळत्या आवाजावरून ते तिच्या लक्षात आले.

      “कालमुख...नीचां...” असे म्हणून तिने त्या उसळत्या पाण्याच्या स्तंभाच्या दिशेने बाण सोडला.

      अग्नीतांडव सुरु झाले. तो स्तंभ शतश: विदीर्ण झाला. थेंब विखरून उधळू लागले.  कोसळू लागले. आणि तो स्तंभ संपला...विरला.

      पाणी पुन्हा शांत वाहू लागले.

      प्रकाश मात्र अजून तीव्र होता...

      आणि त्यात तिने पाहिले...

      शे-दीडशे लहान मुलांचा थवा त्या प्रकाशाच्या दिशेने धावत येत होता.

      त्यांनी अनेक वर्षांत प्रकाश पाहिलाच नव्हता ना!

      तिने त्यांच्याकडे पाहत हात उभारले आणि आनंदातिरेकाने म्हणाली...

      “मुलांनो, आता तुम्ही स्वतंत्र असाल! तुमच्या जीवनातील दुष्ट काळोख नष्ट झालाय आणि प्रकाशाचे राज्य आलेय!”

      ती मुले तिला पाहून क्षणभर स्तंभित झाली आणि मग एकाच जल्लोषाने ती गुहा भरून गेली!

      लीला अश्रुपूर्ण डोळ्यांनी त्यांना कवटाळू लागली.

      तिचा लढा अखेर यशस्वी झाला होता!

 

-संजय सोनवणी.  

 

No comments:

Post a Comment

सिंधू संस्कृतीची मालकी!

  सिंधू संस्कृतीची लिपी वाचता आलेली नसल्याने कोणीही उठतो आणि सिंधू संस्कृतीवर मालकी सांगतो. द्रविडांनी हे काम आधी सुरु केले पण त्याला आर्य आ...