Wednesday, May 1, 2024

महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी

  

महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी

-संजय सोनवणी

 

आम्ही मराठी माणसे इतिहासात फार रमतो. बरे, ज्याही इतिहासात आम्ही रमतो तेवढ्या इतिहासाचेही आम्हाला सत्य माहिती नसते. आमच्या हातात असतात ती मिथके आणि आम्ही त्यावरच बेभान होऊन प्रेम करतो. आम्हाला इतिहास आहे. आम्हाला आमचा स्वतंत्र दैवत इतिहास आहे. आम्हाला आमचा आगळा-वेगळा वैशिष्ट्यपूर्ण भूगोल आहे. तापी-गोदावरी ते कृष्णा-कोयनेसारख्या महाराष्ट्राला समृद्ध करणा-या नद्याही महाराष्ट्राला लाभलेल्या आहेत. मानवजातीच्या या भूमीतील अस्तित्वाचे पुरावे लाखो वर्ष मागे जातात. पण आम्हाला आमचा इतिहास मध्ययुगाचाच माहित असतो आणि तोही मिथकांनी भरलेल्या तुकड्या तुकड्यात. आमच्या अस्मिताच मुळात मिथकांवर वालान्बून असल्याने इतिहासावरून महाराष्ट्रात जेवढे वाद झालेत तेवढे कोठेही झाले नसतील. आमचे इतिहासाबाबतचे आकलन हाच आमच्या प्रगतीतील अडथळा बनून बसला आहे कि काय असे वाटावे अशी स्थिती आहे. जोवर इतिहासकडे पाहण्याची डोळस दृष्टी आमच्याकडे येत नाही तोवर आमचा वर्तमान आणि भविष्यही “मिथक”मय असणार यात शंका नाही. इतिहासाचे मिथकमय भान घातक असते हे आमच्या लक्षात येत नाही. ते आता तरी यायला हवे. त्याशिवाय आज आमच्यात असलेल्या इतिहासविषयकच्या भ्रामक संघर्षांची धूळवड उडणे थांबणार नाही.

 

आमचा इतिहास सुरु होतो तो सातवाहनकालापासून. त्यापूर्वीचा इतिहास पुरातत्वीय अवशेषांतून मिळतो. सातवाहन ते पेशवाईकाळ हा इतिहास असंख्य चढउतारांनी भरलेला आहे. त्याचे नि:पक्ष अवगाहन आणि विश्लेषण अद्याप झालेले नाही. डाव्यांनी लिहिलेला इतिहास नाकारत असताना उजव्यांचा इतिहासही केवळ वैदिकश्रेष्ठत्वाने आणि सर्व काळ स्मृतींचा अंमल समाजावर होता हे कसलाही पुरावा न देता ठासून सांगत समाजरचनेचे आणि म्हणून संस्कृतीचेही यथातथ्य विश्लेषण करत नाही. महाराष्ट्र सरकारने प्रकाशित केलेल्या डॉ. अरुणचंद्र पाठक संपादित महाराष्ट्र ग्यझेटियर: इतिहास: प्राचीन काळ (खंड १) वाचले तरी हाही इतिहास कसा एकांगी आणि आपले धर्मश्रेष्ठत्व स्थापित करण्याच्या दृष्टीकोनातून लिहिला गेला आहे हे कोणाच्याही सहज लक्षात येईल. थोडक्यात आमचा इतिहास मिथ्याभिमानाने भरलेला आहे म्हणून तो त्याज्ज्य आहे. जातीसंस्थेच्या निर्मितीच्या इतिहासाबाबाबतही इतकी भ्रामक प्रमेये आहेत आणि ती बव्हंशी कोणाचा ना कोणाचा द्वेष निर्माण करण्यासाठीच निर्माण केली गेली आहेत. त्यामुळे सामाजिक संघर्ष कमी होण्याऐवजी वाढलेच असल्याचे आपल्याला दिसून येईल. इतिहास हीच आमची मुख्य समस्या बनून गेल्याचे चित्र आहे.

 

इतिहास हा कोणाच्या तुष्टीकारणासाठी अथवा अवमूल्यन करण्यासाठी नसतो. इतिहास लेखन हे भ्रमनिर्मितीचे कारखाने नाहीत याचे भान आमच्या मराठी इतिहासकारांना अद्याप आलेले नाही. आम्हाला जर निकोप वर्तमान आणि उज्ज्वल भविष्य हवे असेल तर आम्हाला इतिहासलेखनाचा नव्याने विचार करावा लागेल. इतिहास चांगला नसतो कि वाईट...तो बस असतो आणि त्याचे असलेपण समजावून घेत आपल्या मनावर पडलेली भ्रामक पटले हटवायला त्याचा चांगला उपयोग होईल. त्या दिशेने महाराष्ट्राने कोणत्याही सरकारी अनुदानाची अपेक्षा न करता नि:पक्ष इतिहास लेखकांकडून इतिहास लिहून घेतला तर यात काही सकारात्मक बदल घडू शकेल.

 

आमचा वर्तमान काय आहे हे आम्हाला माहीतच आहे कारण तो आम्ही जगतो आहोत. आमच्यासमोरील समस्या सांस्कृतीक जशा आहेत तशाच आर्थिकही आहेत. आर्थिक प्रबळ असलेल्या लोकांच्याच संस्कृतीही प्रबळ व अनुकरणीय होतात. एके काळी महाराष्ट्र कल्पक व उद्योगी लोकांचे राज्य होते. महाराष्ट्राचा व्यापार सुदूर रोमपर्यंत होत असे. महाराष्ट्रातून व्यापार आजही होतो. उत्पादनात तर महाराष्ट्र आघाडीचे राज्य आहे. असे असले तरी त्यात मराठी माणसाचा टक्का किती हा प्रश्न विचारला तर उत्तर समाधानकारक मिळणार नाही. मराठी माणसाची मानसिकताच नोकरीनुकुल बनलेली आहे. त्यात श्रमाला प्रतिष्ठा दिली न गेल्याने शारीरिक कष्ट जेथे आवश्यक भाग बनून जातात ते व्यवसाय अथवा अशा व्यवसायात शिकलेले तरुण नोकरी करण्यात उत्सुक नसतात. त्यांची जागा घ्यायला पारप्रांतीय येतात तर हे पुन्हा मराठीपणाचा फणा काढून परप्रांतीयांचा तिरस्कार करण्यात आघाडीवर असतात. त्याधारित राजकारणही महाराष्ट्रात गेली अनेक दशके होत आलेले आहे. अनेकदा दंगे उसळलेत आणि हिंसाही झालेली आहे.

 

खरे तर महाराष्ट्राला व्यावसायिक दिशा देणारे नेतृत्व अभावानेच मिळाले. असे नेतृत्व निर्माण व्हावे यासाठी जे प्रयत्न करावे लागतात त्यांचाही अभाव दिसून येतो. महाराष्ट्रात व्यापार आणि नव्या उद्योगांच्या संधी आहेत, त्यासाठी आवश्यक कच्चा माल ते खनिजे उपलब्ध आहेत. नाहीत फक्त संधी शोधणारे आणि औद्योगिक साम्राज्य उभे करू इच्छिणारे मराठी लोक. किर्लोस्कर, गरवारे यासारखे उद्योजक महाराष्ट्रातच उभे राहिले होते पण दुर्दैवाने काही पिढ्यातच ते विखुरले आणि नाममात्र उरले. डीएसकेसारखे धडाडीचे बिल्डर व व्यावसायिक अडचणीत सापडताच त्यांना लांडग्यासारखे घेरून पुरते बुडवणारे (आणि स्वत:लाही बुडवून घेणारे) मराठी लोकच. खरे तर व्यावसायिक व्यक्ती अडचणीत आली आहे हे दिसल्यावर त्याला मदत करण्याची प्रवृत्ती जोपासावी लागते तरच उद्योजक पुन्हा उभारी धरू शकतो,पण त्याचे भान मराठी माणसाला नाही. खरे तर प्रवृत्तीच अशी बनलेली आहे कि कोणी व्यवसाय –उद्योग सुरु करतो म्हटले तरी त्याला नाउमेद करणारे घरातूनच येतात. सुरक्षित नोकरी बरी ही मानसिकता एवढ्या टोकाला गेलेली आहे कि त्यामुळे समाज-मानसशास्त्रीय समस्यांचा उद्रेक झालेला आहे. महाराष्ट्राचे (आणि देशाचेही) मानसिक आरोग्य ढासळले असेल तर केवळ याच नोकरीप्रधान मानसिकतेमुळे. महाराष्ट्राला मराठी लोकांचे औद्योगिक साम्राज्य असलेले राज्य बनवायचे असेल तर व्यावसायिक वृत्ती कशी निर्माण करता येईल आणि सर्वच समाज या ध्येयाने झपाटून कसा कार्य करेल यासाठी दीर्घकालीन योजना राबवण्याची आवश्यकता आहे.

 

अर्थसत्तेचा मार्ग ज्ञानसत्तेतून जातो. युरोपने जी औद्योगिक क्रांती केली त्यामागे विविध ज्ञानशाखांचा झपाट्याने होत गेलेला विस्तार होता. आजही पाश्चात्य जग हे ज्ञान-विज्ञानाच्या क्षेत्रात अग्रेसर आहे. दोन अणुबॉम्ब पडून उध्वस्त झालेल्या जपाननेही झपाट्याने सावरत ज्ञानाच्या क्षेत्रात अचाट झेप घेतली. भारताला दुर्दैवाने हे कधी जमलेले नाही. ज्ञानाचा विकास अनावर जिज्ञासा आणि इहवादी विचारसरनीतून होतो. आपण बव्हंशी अध्यात्मवादी (परलोकवादी) असल्याने आणि ऐहिक सौख्य व श्रीमंतीला सहसा तिरस्करणीयच समजत असल्याने आपल्या जिज्ञासा मेलेल्या आहेत. तरीही आम्हाला सुख तर हवे आहे पण ते प्राप्त करण्यासाठी सुरक्षित मार्ग वापरण्याकडे आपला भर असतो. धोके पत्करण्यातील, धोक्यांवर स्वार होत यश मिळवण्याची जिजीविषा आमच्यात अभावानेच आढळते. ज्यांच्यात आहे त्यांचे पंख कापायला आमची समाजव्यवस्था व शासनव्यवस्था अत्यंत तत्पर असते. व्यवसाय म्हटले कि हॉटेल, ढाबे, सरकारी कंत्राटेसारख्या त्यातल्या त्यात कमी धोकेदायक आणि तंत्रद्न्यानाची  फारशी आवश्यकता नसलेली क्षेत्रे आम्हाला लागतात. याचे कारण म्हणजे आमची वृत्ती घाबरत बनलेली आहे, मग भलेही आम्ही कितीही स्वत:ला “शूर आम्ही सरदार” म्हणवत असू. पूर्वजांच्या पराक्रमाच्या गमजा येथे कामाला येत नाहीत. व्यवसायकौशल्याचे प्रशिक्षण आम्हाला शिकवणे आवश्यक झाले आहे. फक्त भांडवल आहे म्हणून व्यवसाय करता येत नाही याचेही भान चार पैसे गाठीला असलेल्या नव-व्यावसायिकाला समजत नाही. त्याचे अयशस्वी होणे स्वाभाविक होऊन जाते. आणि त्याच्या अपयशाने दहा अजून मनात व्यवसायाची इच्छा असलेले मागे सरकतात हे वेगळेच. ही रांगच लागते आणि समाजातील होकरू उद्योजान्कान्ना समाज मुकतो हेही आपण अनेकदा अनुभवत. आम्ही यशोगाथा वाचतो पण अपयशाचे विश्लेषण कधी करत नाही हा आमच्या सामुहिक स्वभावाचा मोठा दोष आहे. संयम म्हणजे काय हे शिकायचे असेल तर योगी होऊन उपयोग नाही, व्यवसायात पडावे लागते. संयम नसलेली व्यक्ती कधीही उत्तम व्यावसायिक बनू शकत नाही हे यशस्वी व्यवसायाचे मुलतत्व मराठी माणसाला अंगी बाणवावे लागेल.

 

महाराष्ट्रात उद्योगाच्या अनेक संधी आहेत. कृषिमाल प्रक्रिया हा महाराष्ट्राचा सर्वात मोठा उद्योग होऊ शकतो. लघु ते मध्यम प्रक्रिया उद्योगांची निर्मिती आणि वितरण साखळी निर्माण होऊ शकते. यातून प्रचंड प्रमाणात वाया जाणारा नाशवंत शेतमाल वाचू तर शकतोच पण रोजगार व उद्योगनिर्मितीही होऊ शकते. जागतिक बाजारपेठेत स्थान निर्माण करायला प्रक्रिया केलेला शेतमाल अधिक उपयुक्त होत असल्याने त्यावर भर देणे आवश्यक आहे. पण भारतात फक्त २% शेतमालावर प्रक्रिया होते आणि सरासरी ३०% शेतमाल साठवणूक, बाजारपेठ, वाहतूक व्यवस्था इ. पायाभूत सुविधाच नसल्याने वाया जातो. पण याकडे मराठी होतकरू उद्योजकांचे मुलीच लक्ष नाही असे म्हटले तरी चालेल.

 

याशिवाय विदर्भासारख्या खनिजसंपत्तीने श्रीमंत भागात स्थानिक प्रक्रिया उद्योग उभारण्यापेक्षा कच्ची खनिजे निर्यात करण्यावर भर आहे. लोहखनिजापासून लोहभुकटी ते स्पोंज आयर्नसारखे अर्ध-प्रक्रियाकृत उत्पादन घेऊन ते निर्यात करण्यावर भर असायला होता पण दुर्दैवाने तो नाही. देऊळगाव येथील लोहखानीतले खनिज तर रेल्वेच्या पटरीवर पसरवण्यात येणा-या खडीसाठी आजही वापरले जात असेल तर आम्ही राज्याच्या संपत्तीचा कसा विनाश करत आहोत हे आपल्या लक्षात येणार नाही. कोकण, खानदेशसारख्या भागातही खनिज संपत्ती आहे पण तिचे व्यावसायिक वापर केले जात नाहीत. बांधकामासाठी नदी-ओढ्यातील वाळूचा उपसा करण्यात मात्र आमचे मराठी लोक आघाडीवर आहेत. त्यातून “वाळूमाफिया” ही सद्न्या निर्माण व्हावी याची खरे तर मराठी माणसाला शरम वाटली पाहिजे. खरे तर कल्पकता हा उद्योजकासाठी अत्यावश्यक गुण. पण आज आम्ही कल्पनाशून्य झालो आहोत कि काय हा प्रश्न पडतो असेच वास्तव चित्र आहे.

 

आजही मराठी माणसाला (खरे तर सर्व भारतीय) कॉर्पोरेट संस्कृती म्हणजे नेमके काय असते हे समजलेले नाही, तसे शिक्षणही दिले जात नाही. आमच्या सर्व छोट्या-मोठ्या कंपन्याही एखाद-दुसरा अपवाद वगळता कौटुंबिक कॉर्पोरेटस आहेत. त्यात अदानी-अंबानीही आले. किर्लोस्कर-गरवारे ही मराठी उदाहरणे. संचालक पदावर त्यात्या क्षेत्रातले तद्न्य अनुभवी लोक बसवायचे कि आपली लायकी असो कि नसो, बायको, मुले-नातवंडे आणि नंतर पतवंडे हा घोळ आम्हाला आजही निस्तरता आलेला नाही त्यामुळे दोन-तीन पिढ्यातच उद्योग वाढत जाण्याऐवजी संकुचित होत जात नंतर संपतात हा अनुभव आहे. तरीही मराठी माणसाने त्यापासून धडा घेतलेला आहे असे नाही. कामाचे योग्य वितरण आणि त्यावर कुशल हेड (मग तो कोणीही असो) नियुक्त करण्यातच उद्योग-व्यवसायाचे हित असते हे आम्हाला आता तरी समजायला हवे. राजकीय घराणेशाहीबद्दल बोलतांना आम्ही थकत नाही, पण या औद्योगिक घराणेशाहीबद्दल आम्ही कधी तोंडही उघडत नाही. आम्हाला कॉर्पोरेट संस्कृती नीट अभ्यासून अंगी मुरवावी लागेल.

 

शेतीही कॉर्पोरेट पद्धतीने करता येणे सहज शक्य आहे. तुकडीकारणामुळे अनुत्पादक झालेली शेतीही नफ्यात आणता येणे कॉर्पोरेट पद्धतीने शक्य आहे. यासाठी सलग क्षेत्रातील शेतक-यांनी एकत्र येत कंपनी स्थापन करून, आपापल्या शेताला कसण्याच्या मोबदल्यात भाग-भांडवल घेऊन अनुभवी व ज्या-त्या कार्यात कुशल असलेल्या आपल्यातीलच लोकांना संचालक नेमून शेतीलाही किफायतशीर उद्योग बनवता येणे शक्य आहे. पण जातीयवाद, धर्म वाद, भाऊबंदकी आणि राजकीय पक्षांवरील अचाट प्रेम या विकृतीमुळे शेतकरी एकत्र येऊ शकत नाहीत आणि मग आत्महत्याग्रस्त शेतक-यांचे राज्य म्हणून या राज्याची ख्याती झाल्यास त्यात नवल कसले?

 

पर्यटन उद्योग हा महाराष्ट्राला आघाडीचे राज्य बनवू शकतो. महाराष्ट्रात ऐतिहासिक स्थळे, लेण्यांची व पुरातत्वीय अवशेषस्थळे, अभयारण्ये व विशाल समुद्रकिना-याचा अनमोल वारसा लाभला आहे. मॉरिशससारखा इवला देश आणि दोन-पाचशे मीटर लांबीचे बीचेस असलेला देश केवळ मार्केटिंगच्या बळावर जगात पर्यटनात आघाडीचा देश बनला आहे. येथे आम्हाला कैक किलोमीटर लांबीचे अनेक अद्भुत बीचेस आहेत, सागरी किल्ले आहेत आणि बेफाम सौंदर्याने नटलेला किनारा आहे. काहे पायाभूत सुविधा वाढल्या आणि मराठी माणसाला अगत्यशील वागण्याची जोड मिळाली व सुविधा पुरवण्यात तत्परता दाखवता आली आणि जरा स्वच्छता पाळता आली तर आजच आहे या स्थितीत कोकण पर्यटनाचा राजा होऊ शकेल. सह्याद्री, सातपुडा आणि विदर्भातील सौंदर्य दृष्टीसुख हवे असणा-यांना आकर्षित करू शकते, पण त्यासाठी हवे ते मार्केटिंग. सुविधांची उपलब्धता. आज समुद्र किनारे घाणेरडे झालेले आहेत. जेवण्या-खाण्याची धड व्यवस्था नाही., पर्याताकाशी धड वागणारा कोणी सहसा भेटत नाही. अरेरावी आणि उर्मटपणा आमचा घात करतो हे आमच्या लक्षात येत नाही. मग कशाला कोण तिकडे फिरकेल? शिवाय सर्वच गोष्टी सरकारने कराव्या अशी अपेक्षा आम्ही बाळगतो आणि हातावर हात धरून बेक्कार भटकत बसतो. आम्हालाही काही करावे लागते याचे भान मराठी माणसाला येणे आवश्यक आहे.

 

सरकारने एक गोष्ट करायला हवी होती आणि आजही करू शकेल अशी गोष्ट म्हणजे विकेंद्रीकरण. कोकण, खानदेश, मराठवाडा, विदर्भ आणि पश्चीम महाराश्र याचा समतोल विकास मनंही. पश्चिम महाराष्ट्र अतिविकासाने बकाल तर उर्वरीत महाराष्ट्र लोकांच्या रोजगाराच्या शोधात होब्ना-या विस्थापनामुळे बकाल अशी आमची आज दुहेरी बकालीची अवस्था झालेली आहे. जे उच्चशिक्षित होतात ते तर युरोप-अमेरिका-जपान गाठण्यासाठी एका पायावर तयार असतात याचेही कारण आमच्या असंतुलित विकासात आहे. पर्यावरणाची नासाडी व्हायला पुणे-मुंबईची अनैसर्गिक आणि अनियंत्रित वाढ कारण ठरलेली आहे. आम्हाला महाराष्ट्राच्या एकूण भूगोलाचा अभ्यास करून कोठे आणि किती उद्योग असले पाहिजेत याचे नियोजन करून तशा पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्यायला हव्यात. हे काम सरकारचे (केंद्र आणि राज्य) होते आणि आहेही पण त्याकडे सरकारचे लक्ष आहे असे कधीच दिसले नाही आणि लोकांची तशी सहसा मागणीही नसल्याने कोणी लक्षही देत नाही. मुंबई-पुण्यातील गुन्हेगारीचा स्फोटही याच अनैसर्गिक वाढीमुळे आहे हे आमच्या लक्षात आलेले नाही. आणि आम्हीही स्थानिक संधी शोधून उद्योगउभारणीचे कधी प्रयत्न केलेले नाहीत. मग महाराष्ट्राचा विकास आहे पण मराठी माणसाचा नाहे असे चित्र निर्माण झाले असेल तर जबाबदार कोण?

 

१९९१ मध्ये जागतिकीकरण आले. त्याचे फायदेही मराठी मानासांबे घेतले असे असले तरी जागतिकीकरण म्हणजे नेमके काय याचा अंदाज मराठी माणसाला आलेला नाही. जागतिकीकरणात मनुष्याने वैश्विक व्हावे असे अभिप्रेत असते. आम्ही वैश्विक होण्याऐवजी जाती-पातीत एवढे गुरफटत गेलो कि जागतिकीकरण हे वरदान ठरण्याऐवजी मराठी माणसासाठी ते शाप बनून गेले आहे. आधुनिक साधने आमच्या हातात आली खरे पण त्यांचा उपयोग आम्ही सृजनात्मक पद्धतीने, ज्ञानात्मक कार्यासाठी करायला शिकलो नाही. आम्हाला तसे शिकवणारे भेटले नाही असे म्हणणे वेडगळपणाचे लक्षण आहे कारण आम्हाला निसर्गाने दिलेली बुद्धी स्वतंत्रपणे वापरायची असते हेच शोधता आले नसेल तर व्यवस्थेला दोष देण्यात काय अर्थ? प्रत्येक गोष्ट सरकारने करावी अशी आमची अपेक्षा असते पण नेतेच आमच्यापेक्षा जास्त अडाणी असतील तर ते तरी काय करणार? सरकारावलंबी मानसिकता आम्हाला सोडावी लागेल व स्वत:च्या प्रेरणा निर्माण कराव्या लागटेल, मग आपोआप नेतेही शहाणे होतील हे लक्षात घेतले गेले पाहिजे.

 

आज आपण एकविसाव्या शतकात आलो आहोत. अनेक क्षेत्रांत माणसाने अद्भुत अशी प्रगती केलेली आहे. असे असले तरी माणसासमोर हजारो वर्षांपुर्वी जे प्रश्न होते ते आजही नीटसे सुटले आहेत असे नाही. चुका सुधारत नव्या दुरुस्त्या तो अवश्य करत आला आहे, पण त्या दुरुस्त्यांनी प्रश्न सोडवले आहेत कि जटील केले आहेत हाही एक प्रश्नच आहे. खरे तर सामाजिक व म्हणुनच आर्थिक व राजकीय प्रश्न तर अधिकच जटिल बनलेले आपल्याला दिसतात. उदा. राज्यव्यवस्था नेमकी कशी असावी, अर्थव्यवस्थेचे नेमके प्रारूप कसे असावे, धर्माचे जीवनातील नेमके स्थान व आवश्यकता काय, राष्ट्रवादाची आवश्यकता आहे कि नाही, दहशतवादी प्रेरणा कोठून येतात, युद्धविहिन जागतिक व्यवस्था येऊ शकते काय, जातीसंस्थेचे अखेर काय होणार, गरीबीचे निर्मुलन शक्य आहे कि अशक्य, मानवी आरोग्याचे नेमके पुढे काय होणार, भविष्यात विविध क्षेत्रात कोणते नवे शोध लागून मानवी जीवन आमुलाग्र बदलू शकतील,  कला माध्यमांत अजुन कोणती नवी प्रारुपे येतील वगैरे असंख्य प्रश्न आज आपल्यासमोर आहेतच. यात मराठी माणूस म्हणून आपण समस्या सोडवण्यासाठी काही ज्ञानात्मक, संशोधनात्मक भर घालण्यासाठी झटतो की या समस्या अजुन वाढवत नेत त्या जटिल व गुंतागुंतीच्या करत नेतो हा महत्वाचा प्रश्न आहे. मुळात आम्ही आमचे सामाजिक मानसशास्त्र सुदृढ करण्यासाठी नेमके काय प्रयत्न करणार आहोत यावरच आपली पुढची दिशा ठरणार आहे व याची सुरुवात केवळ आणि केवळ बौद्धिकतेच्या संरचनेपासून सुरु होते. आणि आपली नेमकी हीच सुरुवात अद्यापही झालेली नाही हे नाईलाजाने म्हणावे लागते. काही भारतियांनी जी बौद्धिक उंची गाठली ती स्वप्रेरणेने, क्वचितच तिला आपली शिक्षण अथवा सामाजिक व्यवस्थेने हातभार लावल्याचे चित्र आहे. 

 

बदलता समाज आणि शिक्षण जाणीवा!

 

कोणताही समाज कोणत्या दिशेने जाणार आहे, तो भविष्यात कोठे आणि कसा असेल हे समजावून घ्यायचे असेल तर आजची पिढी नव्या पिढीला कशी घडवते हे आधी पहावे लागेल! सरकार आणेल ती शिक्षणपद्धती आणेल, पण मुळात काय शिकायचे हे आम्ही पाल्याला जोवर ठरवू देत नाही आणि त्याला मुक्त उड्डाण घेण्यासाठी प्रवृत्त करत नाही तोवर सर्व प्रकारचे शिक्षण हे निरर्थक असते. आणि यासाठी आपल्या पाल्याचे (आणि स्वत:चेही काही वाचन असले पाहिजे, विचार व्यापक होण्यासाठी ते जीवनावश्यक आहे हे मात्र आमच्या गावीही नसते. बारा कोटीच्या महाराष्ट्रात एखाद्या पुस्तकाच्या हजार प्रतीही वर्ष-पाच वर्षात विकल्या जाणार नसतील तर ही अनास्था केवढी समाजविघातक असेल? वाचनाने स्वप्नांचे पंख विस्तारत असतात, बुद्धीची प्रगल्भता वाढत असते, तर्कबुद्धी-विश्लेषणक्षमता वाढत असते हे आम्ही कधी लक्षात घेणार? साधे वृत्तपत्र वाचायची सवय ९५% मराठी माणसांना नाही ते कोणत्या जगाच्या आणि विकासाच्या गप्पा हाकत असतात हे “राम” जाने.

 

खरे तर पिढीमागून पिढी असा शृंखलाबद्ध प्रवास मानवी समाज करत असतो. आई-वडिल, शिक्षक, पुस्तके आणि समाज हे नव्या पिढीवर काहीना काही संस्कार करणारे घटक असतात. समाजाची वर्तमान स्थिती नवागत नागरिकाच्या समग्र व्यक्तिमत्वावर परिणाम करत असते. समाजाच्या निराशा, स्वप्ने व जगण्याच्या प्रेरणा नकळतपणे या नवांगत नागरिकाच्याही प्रेरणा बनतात व तो त्याच परिप्रेक्षात व परिघात स्वप्न पहायला लागतो. आहे त्या समाजव्यवस्थेत अडथळ्यांवर मात करत ती स्वप्ने पुर्ण करण्याचे प्रयत्न करू लागतो. अमेरिकेतील मुलगा जी स्वप्ने पाहिल ती स्वप्ने भारतातील मध्यमवर्गातील मुलगा पाहीलच असे नाही. किंबहुना अशीही स्वप्ने असू शकतात याची तो कल्पनाही करू शकणार नाही. शेवटी व्यवस्था स्वप्नांना वावही देते आणि ती बंदिस्तही करते.

 

याकडे आपल्याला अत्यंत व्यापकपणे व अनेक अंगांनी पहावे लागेल. नवीन पिढी घडवणारा महत्वाचा घटक असतो व तो म्हणजे शिक्षण! विद्यार्थ्याला साक्षर बनवत विविध ज्ञानशाखांशी परिचय करून देत भविष्यात त्याला कोणत्यातरी एक आवडीच्या ज्ञानशाखेत नवी भर घालण्यासाठी अथवा एखादी नवीच ज्ञानशाखा स्वप्रतिभेने निर्माण करण्यासाठी त्याला तयार करणे म्हणजे शिक्षण!  शिक्षण म्हणजे जुलमाचा रामराम नसते. प्रत्येक विद्यार्थी स्वत:तच एक स्वतंत्र विश्व असते, व्यक्तिमत्व असते. बाह्य प्रभाव जेवढे व्यक्तिमत्व घडवायला कारण घडतात त्याहीपेक्षा त्याच्या आंतरिक प्रेरणा महत्वाच्या ठरतात. या आंतरिक प्रेरणा लहानपणी सुप्तावस्थेत असल्या तरी व्यवस्था अशी असावी लागते कि वाढत्या वयाबरोबर त्या प्रेरणांचे सुयोग्य प्रस्फुटन होत सामाजिक संरचनेत महत्वाची भर घालणारा नागरिक तयार व्हावा. 

 

पण आपण आजच्या आपल्या व्यवस्थेकडे पाहिले तर जे चित्र दिसते ते अत्यंत निराशाजनक आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. म्हणजे, आम्ही पालक मुळात मुलांना शिक्षणच देत नाही तर विद्यार्थ्याला केवळ साक्षर बनवण्यापलीकडे व एक बौद्धिक श्रमिक बनवण्यापलीकडे काहीही विशेष साध्य करत नाही हे आपल्या लक्षात येईल. आमच्या द्रुष्टीने सब घोडे बारा टक्केया पद्धतीने ठराविक विषय लादत, सर्वात पास होणे बंधनकारक करत, ज्याला अधिक मार्क तो हुशार अशी धारणा बनवून बसलो आहोत.  थोडक्यात मार्क हाच आमचा गुणवत्तेचा एकमेव निकष आहे. मेरिट अथवा गुणवत्ताही आम्ही त्यावरच मोजतो. "९७% मिळूनही प्रवेश नाही आणि त्यांना५०% ला प्रवेश..." अशा प्रकारच्या सामाजिक रडगाण्यात तो अडकतो. ही एक वंचना आहे हे मात्र आपण मुळात समजावून घेतलेलेच नाही. मुळात ९७% मिळाले म्हणून त्याचे गुणवत्ता जास्त आणि ४०% मिळाले म्हणुन गुणवत्ताच कमी असे ठरवण्याचे साधनच अस्तित्वात नाही. ही पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी करुन घेतलेली फसगत आहे. आणि आमची आजची संपुर्ण व्यवस्थाच या फसगतीवर उभी आहे. सामाजिक न्यूनगंड या चुकीच्या धारानेमुळे निर्माण झालेला आहे.

 

मुळात आपली शिक्षणव्यवस्था हीच मानवी प्रेरणांना विसंगत आहे. नैसर्गिक कलआणि त्यातच प्राविण्य मिळू देण्याच्या संध्या आम्ही नाकारलेल्या आहेत. थोडक्यात प्रगल्भ व्यक्तिमत्वाच्या भावी पिढ्या कशा घडणार नाहीत याचीच पुरेपूर काळजी आम्ही घेतली आहे. सर्वच प्रज्ञावंत होऊ शकत नाहीत हे सत्य मान्य केले तरी अशा बहुसंख्यांक विद्यार्थ्यांना जगण्याची कौशल्येसुद्धा शिकवण्यात आम्ही अजून खूप मागेच आहोत. पुन्हा वर आम्ही भावी विकासाच्या गप्पा मारतो ही तर मोठी विसंगती आहे. खरे म्हणजे आम्ही आमच्या शिक्षण पद्धतीतून मुलांना खुरटवणारी, संकुचित करणारी, त्यांचे कुतुहल व स्वप्ने छाटणारी, कौशल्याचा अभाव असणारी पिढी घडवत आहोत हे आमच्या लक्षात कधी आले नाही. या नव्या पिढ्याही मग तशाच पुढच्या साचेबंद पिढ्या घडवत जाणार यात शंका बाळगण्याचे कारण नाही.

 

आज आपण पाहिले तर कोणत्याही ज्ञानशाखेत नवी भर घालणारे विद्वान व शास्त्रज्ञ आम्ही घडवले नाहीत. विदेशात जाऊन जे भारतीय अगदी नोबेलप्राप्तही होऊ शकले त्यांची गणना यात करण्याचे कारण नाही. ते येथेच असते तर ते तसे घडू शकले नसते कारण आपली व्यवस्थाच मुळात प्रतिभेला फुलारू देणारी नाही हे कटू वास्तव त्यातुनच अधोरेखित होते. आमची सामाजिक मानसिकता यातील मोठा अडसर आहे. आमचा नव्या जगात ज्ञान-विज्ञानक्षेत्रात नेमका वाटा काय हे पहायला गेले तर निराशाजनक चित्र सामोरे येते ते यामुळेच!

 

मग आम्ही आमची नवीन पिढी सबल, सक्षम व प्रज्ञावंत बनवू शकलो नाही तर आमचे भविष्यही तेवढेच मरगळलेले राहणार यात शंका नाही. आम्ही सर्व प्रश्नांवर आंदोलने करत आलेलो आहे. पण आमच्याच भवितव्याचा कळीचा प्रश्न जो आहे त्याबाबत मात्र आम्ही थंडगार आहोत. इंग्रजी माध्यमांच्या इंटरन्यशनल म्हणवणा-या शाळांत भरमसाठ पैसे भरून मुलाला प्रवेश मिळवला कि आपण कृतकृत्य झालो असेच सर्व पालकांना वाटते. मुलांनी कोणत्या शाखेत प्रवेश घ्यावा, कशात करियर करावे हेही एकुणातला "बाजार-ट्रेंड" पाहून ठरवले जाते. पण ज्याला हे सारे करायचंय त्यालाच मात्र नेमके विचारात घेतले जात नाही. मतामतांच्या गलबल्यात तो दुर्लक्षितच राहतो व शेवटी मिळेल ती वाट चालू लागतो. एका अर्थाने आम्ही परिस्थितीशरण पिढी बनवत आहोत हे आपल्या लक्षात येत नाही.

 

आपल्या व्यवस्थेतच दोष आहेत हे मान्य करू. हा दोष आमच्या विचार करण्याच्या पद्धतीतील भरकटलेल्या दिशेमुळे निर्माण झाला आहे हेही आपण स्विकारू. पण चुका कधी ना कधी दुरुस्त कराव्याच लागतात. एका रात्रीत व्यवस्था बदलत नाही हे मान्य केले तरी व्यवस्था बदलासाठी मानसिकता बनवणे व पुढाकार घेणारे काहीजण तरी पुढे येणे महत्वाचे असते. आणि येथे तर पुढाकार पालकांना घ्यावा लागणार आहे. पण त्यासाठी पालकांनाच शिक्षण म्हणजे नेमके काय याची जाण व भान देणे आवश्यक आहे. वर्तमानाचेच ते आव्हान आहे. 

 

जागतिकीकरणाची प्रक्रिया आणि आमचा सहभाग

 

आज आपण जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत आहोत. पण आम्ही जागतिक होण्याचा प्रयत्न तरी करतो आहोत काय हा खरा प्रश्न आहे. परदेशाचे आकर्षण आम्हाला वाटते ते उच्च पगाराच्या नोक-या मिळतील म्हणून. आमचे जागतिकीकरण संकुचित वृत्तीचे बनून गेले आहे आणि तेही जागतिकीकरणाच्या काळात हे एक दुर्दैवच आहे. आम्हाला आमची ही प्रवृत्ती बदलावे लागेल. जागतिकीकरण म्हणजे वैश्विक मानव होण्याकडे सुरु होणारा प्रवास. आम्ही अजूनही जगात कोठेही गेलो तरी परिवार व जातीच्या सीमांना ओलांडू शकत नाही. आमची स्वप्ने गेला बाजार इंग्लंड-अमेरिकेचे नागरिकत्व मिळण्याचा बाहेर जात नाहीत. आम्हाला जगावर राज्य करण्याची आकांक्षा ठेवणारे, तसे अथक प्रयत्न करणारे कल्पक मराठी तरुण हवे आहेत आणि ते तसे निर्माण होतील यासाठी तशी स्वप्ने पेरणारे नागरिक हवे आहेत. आणि ज्ञान हाच जीवनातील सर्व क्षेत्रातील प्रगतीचा पाया असतो हे बिंबवावे लागणार आहे.

 

समाज कसा असणार हे समाजात बुद्धीवंत, प्रज्ञावंत किती आहेत व ते कोणत्या दिशेने विचार करतात यावर जेवढे अवलंबुन असते तेवढेच ते अन्य राष्ट्रे कोणत्या दिशेने प्रगती करत जातात यावरही अवलंबुन असते. परकीय प्रभावाने समाजाची दिशा ठरणे अनेकदा अडचणीचे असते कारण मुळात त्यांच्या प्रगतीचा मुलगाभा न समजताच अनुकरणातुन ही दिशा नाइलाजाने स्विकारावी लागत असते. आपल्याला तसे होणे परवडणारे नाही हे आपण लक्षात घेतले पाहिजे.

 

कृत्रीम बुद्धिमत्ता, यंत्रमानवीकरणची आव्हाने

 

कृत्रिम बुद्धिमत्तेने जाच अनेकांच्या उरात धडकी भारावलेली आहे. असंख्य रोजगार जाऊही लागले आहेत. भविष्यात अजून कोणते “तंत्रज्ञानात्मक” संकट दडलेले आहे याचे भाकीत वर्तवता येणे शक्य नाही. जगातील सर्व प्रगत देश अधिकाधिक प्रगतीसाठी संशोधने करत आहे. आणि आम्ही काय करतोय? आमचा या नव्या तंत्रज्ञानाच्या विकासात काय हातभार आहे? आम्ही कृत्रिम बुद्धीमत्तेचा रोजच्या जीवनात वापरत करतोय. अनेक बाबी तर एवढ्या अंगवळणी पडल्यात की आपण वापरतोय ती कृत्रिम बुद्धीमत्ता आहे याचेही आम्हाला “ज्ञान” नसते. पण आजतागायत एका मराठी (आणि भारतीयही) कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित लोकांच्या गरजांची आपुरती करण्यासाठी एकही टूल बनवलेले नाही. दुसरीकडे हाच वर्ग उद्या सर्वच उद्योगांनी यंत्रमानव वापरायला सुरुवात केली व पगारी नोकरांची गरजच संपवली तर काय हाहा:कार उडु शकेल याची धास्ती घेऊन झोपा उडवून बसले आहेत. आणि तसा हाहा:कार उडणार नाही असेही नाही पण मग पर्यायी व्यवस्था कशी आणता येईल यावर तरी आम्ही विचार सुरु तरी केला आहे काय याही प्रश्नाचे उत्तर नकारार्थी आहे. साधी गोष्ट घ्या. शेतात काम करायला मजूर मिळत नाही ही समस्या मराठी शेतकरी गेली अनेक वर्ष सोसतो आहे. मग आमच्या वीरांनी या क्षेत्रात रोबोटिक्स कसे आणता येईल यावर प्रयोग तरी सुरु केले आहेत काय? घरकामासाठी नोकर मिळणेही आज दुरापास्त आहे. मग त्यांची जागा घेणारे रोबोज बनवता येतील, भारतीय स्थितीत ते उपयुक्त ठरतील आणि तुलनेने स्वस्तही असतील अशी कल्पना घेऊन या निर्मितीच्या मागे लागता येणार नाही काय? लागता येईल, पण त्यासाठी ज्ञानाचा पाया भक्कम असावा लागेल आणि कल्पकतेची विलक्षण जोड लागेल. अशी एनेक क्षेत्रे आजही आहेत जेथे मराठी माणसाने पाय ठेवायचाही विचार केलेला नाही. ती क्षेत्रे शोधावी लागतील आणि त्यात अदम्य साहसाने उडी घ्यावी लागेल. मराठी माणसानेही जात-धर्माचा कसलाही विचार न करता अशा तरुणांना पूर्ण शक्तीनिशी मदत करणेही अभिप्रेत आहे. लग्नसमारंभात कोटीच्या कोटी खर्चाची उड्डाणे भरणारा हा मराठी माणूस मात्र ज्ञानात्मक, सर्जनात्मक कार्यापासून एवढा फटकून असतो, कि खर्च करणे सोडा, बरे म्हणायचीही दांत गमावून बसलेला आहे. आपल्याला ही प्रवृत्ती बदलावी लागेल.

 

 

आधुनिक तंत्रज्ञानाने एकीकडे काही क्षेत्रातील रोजगार कमी होतील हे जेवढे सत्य आहे तसेच दुसरीकडे या नव्या क्षेत्रांत मानवी रोजगारही वाढतील. पण त्या क्षेत्रांचा पाया हे त्या त्या क्षेत्रातील ज्ञान हाच असणार आहे. हमाली किंवा कारकुनी कामे करायलाच योग्य असणारे या नव्या जगात किंचितही टिकू शकणार नाहीत. त्यामुळे आपल्या व्यक्तुइत्वाचा आणि जगण्याच्या कौशल्याचा पाया काय असणार आहे हे आत्ताच समजाऊन घेत त्या दिशेने सर्व शक्तीनिशी धाव घेतली पाहिजे तरच काहीतरी सकारात्मक चित्र दिसण्याची आशा आहे.

 

काही लोक वरील बाबतीत नैतिकतेचा सिद्धांत चर्चेला आणतात. माणसाची जागा कृत्रिम रोबोटिक श्रमकौशल्ये व कृत्रीम बुद्धीमत्तेला घेऊ देणे हे नैतिक होणार नाही कारण त्यामुळे माणसांचीच गरज संपेल  व हे नैतिक व मानवीय होणार नाही असा त्यांचा युक्तिवाद. या युक्तिवादात काही तथ्य असले तरी  नैतिकतेचाच एकूण इतिहास पाहिला तर माणसाने आपल्या नीतितत्वांतही सोयीनुसार फरक केल्याचे आपल्या लक्षात येइल. काळाची अनीती आज सर्वमान्य नीती ठरू शकते. त्यामुळे नैतिकतेचा घोष काही कामाला येणार नाही. संगणक क्रांती येण्याआधी भारतात तिला नैतिकतेच्याच पातळीवर विरोध करणारे, अगदी विद्यमान सरकारात असलेल्या पक्षासहित, अनेक होते हे आपल्याला माहितच आहे. पण नीतिमुल्ये बदलतात. कायदेही बदलतात. त्यामुळे भविष्यात कायद्यांचे अथवा नैतिक मुल्यांचे संरक्षण राहीलच असे नाही. ते वेळ येताच जाऊ शकते याचे भान आम्हाला असले पाहिजे. कोणतीही नीतिमुल्ये ही स्थिर नसतात. भविष्यातील मुल्ये काय असतील याबाबतही आपल्याला विचार करावा लागणार आहे. प्रवाहाबरोबर नुसते दैवगती समजत वहात रहायचे कि प्रवाहालाच दिशा देणारे व्हायचे हे आमच्याच हाती आहे.

 

 

पुढारलेले विज्ञान व तंत्रज्ञान

 

अनेकदा असे म्हटले जाते कि आजकाल तंत्रज्ञानाचा वेग अचाट वाढला आहे. एक व्हर्जन येते न येते तोच त्याहीपेक्षा प्रगत व्हर्जन बाजारात हजरच असते. हे खरे आहे कि मानवी जीवनाला सुखद व्हावे यासाठी तंत्रज्ञाने नवनवीन संशोधन करत प्रगत होतात व त्यामुळे नवनवीन उत्पादने आपल्यासाठी आणत असतात. तंत्रज्ञानाचा वेग अधिक नसून ते शिकण्याचा आपला वेग कमी आहे हेही एक वास्तव आहे हे मात्र आम्ही विसरत असतो. शिवाय तंत्रज्ञानांची गरज कितपत आहे याचाही अंदाज आम्हाला कधीच येत नाही. कारण ते ठरवणारी साधने नेहमीच बाह्य असतात. आम्ही तंत्रज्ञान वापरू अथवा न वापरू, ती शिकण्यात आम्हाला रस असतो काय, तेवढी जिज्ञासा असते काय हा प्रश्न मात्र अवश्य असतो. कल्पक, जिज्ञासू , अभ्यासू व बौद्धिक मेहनत घेऊ शकणा-यांचीच फक्त भविष्यात गरज असेल काय हा प्रश्न आपल्यासमोर आजच उभा ठाकला आहे व तशी स्थिती निर्माण झालीच तर तिला कसे तोंड द्यायचे याचीही खबरबात आपल्याला नाही हे वास्तव आहे.

 

खरे म्हणजे मानवी गरजांचा वेग भागवायला तंत्रज्ञान मागुन पळत असते. किंवा अनेक गरजा कृत्रीमरित्याच अशा उत्पन्न केल्या जातात कि सगळ्यांना ती जणू आपली नैसर्गिक गरजच आहे असे वाटून ते गरजापूर्ती करण्यासाठी नव्या साधनांमागे पळू लागतात. या भविष्यातील आपल्या गरजा काय असतील याचा अंदाज घेणे, गरजा निर्माण करणे ही कौशल्येही मराठी माणसाला अंगवळणी पाडून घ्यावे लागणार आहे. कृतीत उतरवावे लागणार आहे तरच आजच्या गतिमान जगाशी जरा तरी स्पर्धा करण्यास आम्ही लायक होऊ. अन्यथा आमचे स्थान आहे तेही राहणार नाही, उलट भुकेकंगालाची अवस्था प्राप्त होईल. आपल्याला मुळात अंदाजच नाही. आपल्याला मोबाईलची एवढी गरज असेल असे जर कोणी २५ वर्षांपुर्वी सांगितले असते तर आपण त्याला वेड्यात काढले असते. पण आज भिका-याचेही मोबाईलशिवाय चालत नाही हे वास्तव आहे. म्हणजे कोनत्या गरजा आपल्यात निर्माण केल्या जातील हे आपल्याला माहित नसते किंवा आपण त्यावर विचारही करत नाही. प्रवाहात येईल त्या लाटेवर स्वार व्हायचे तेवढे आपल्याला माहित असते, पण लाट निर्माण करण्याची क्षमता विकसित करण्यासाठी जे वातावरण व बौद्धिक सामर्थ्य लागते ते आमच्यात निर्माण करण्यासाय्ठी आम्ही किती कष्ट घेणार हे मात्र आमच्या हातात आहे. ते नसेल तर आपल्या महान संस्कृती आणि परंपरांच्या वायफळ गप्पा हाकण्यात काही अर्थ नाही हे ओघाने आलेच. 

 

 

आर्थिक व सामाजिक प्रश्नांचा ताळमेळ

 

आर्थिक प्रश्न आणि सामाजिक प्रश्न यांचा निकटचा संबंध आहे हे समजावून घ्यायला हवे. दरीद्री लोक आपली जात हेच जगण्याचे शस्त्र बनवत इतरांचा द्वेष करू लागतात. किंबहुना वंचितता हे सामाजिक लढ्यांचे मुख्य भांदवल असते. हेच भांडवल साम्यवादी, नक्षलवादी वापरत आहेत व नव्या उद्रेकाच्या दिशेने देशाला नेत आहेत आणि हे पहात असुनही त्यावर  निरंतर सामाजिक चर्चेची आम्हाला गरजच भासत नाही यातच आमचा बौद्धिक सवंगपणा दिसून येतो. 

 

एकीकडे जग अत्याधुकतेकडून अतिअत्याधुनिकतेकडे वाटचाल करू पहात आहे. आमची वाटचाल भविष्याकडे कमी व गतकालीन आणि त्याही बव्हंशी काल्पनिक संघर्षांकडेच अधिक होत आहे. अर्थप्रेरणा विकसित करत त्यांना वाव देणारी व्यवस्था निर्माण करायची असेल तर आम्हाला आधी आमच्या ज्ञानप्रेरणा बदलाव्या लागतील हे आम्हाला समजाऊन घ्यावे लागेल. जगाच्या नुसत्या ज्ञानात भर घालण्याची कामगिरी आम्हाला करून चालणार नाही तर नव्या जगाला सुसंगत अर्थतत्वज्ञानही तयार करावे लागेल. ते उधार-उसणवारीने नव्हे तर स्वयंप्रेरणांनी. 

 

महाराष्ट्राचा जयजयकार म्हणजे मराठी माणसाचा जयजयकार. पण आम्ही अशा जयजयकारासाठी योग्य तेव्हाच होऊ जेव्हा आम्ही आमच्या सर्व प्रेरणा आधुनिक जगाशी सुसंगत करत त्यात आघाडी घेऊ. प्रत्येक मराठी माणसाने त्यावर आत्ताच चिंतन करत भविष्य घडवण्याच्या अनावर आकांक्षेने प्रेरित व्हायला हवे या भावनेसह महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा!

 -संजय सोनवणी

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

No comments:

Post a Comment

गझनीचा मोहम्मद आणि मोहम्मद घोरी

    ललितादित्य मुक्तापिडाने अरबांना भारत व अफगाणिस्तानातून हुसकावून लावल्यानंतर जवळपास तीनशे वर्ष भारतावर कोणतेही नवे आक्रमण झाले नाही. अरब ...