Thursday, May 9, 2024

अलेक्झांडर द ग्रेटचे भारतावरील आक्रमण!

 


अलेक्झांडरला जगज्जेता मानण्याची प्रथा आहे. “जी जिता वही सिकंदर” ही म्हण त्याने मिळवलेल्या विजयातूनच निर्माण झालेली आहे. अनेकदा इतिहास काही व्यक्तीवर खूप मेहरबान होतो. लोकही दंतकथात्मक भर घालत अशा नशीबवान व्यक्तींना भव्यदिव्य करून सोडतात. ही नेत्रदिपकता अनेकदा आभासात्मक असते. त्यात सर्वस्वी सत्याच्या भाग असतो असे नाही. उदाहणार्थ अलेक्झांडर हा जगज्जेता तर सोडा पण अर्धे जगही त्याला जिंकता आले नाही. ग्रीसपासून इजिप्तचा काही अकेमेनिड साम्राज्यात असलेला प्रदेश ते पंजाब एवढ्याच पट्ट्यात त्याचे साम्राज्य पसरले आणि त्याच्या मृत्यनंतर अल्पावधीत संपुष्टातही आले. बरे, त्याने जे विजय मिळवले ते सहजासहजी मिळालेले नाहीत. काही वेळा तर त्याच्यावर प्राण गमवायची वेळ आलेली होती. त्याने साम्राज्य टिकण्यासाठी पूर्वीच्या अकेमेनिड साम्राज्याची जी प्रशासकीय व्यवस्था होती तशी पर्यायी व्यवस्थाही देऊ शकला नाही. तरी तो सातत्याने तेरा वर्ष ग्रीसबाहेर सातत्याने युद्ध करत राहिला. जग जिंकण्याऐवजी अकेमेनिड साम्राज्याच्या अंतर्गत आणि त्याभोवती जेवढा प्रदेश होता तो सारा ताब्यात आणायची त्याची आकांक्षा होती असे दिसते.

त्याने पराभव केला त्या अकेमेनिड साम्राज्यात पंजाबपर्यंतचा प्रदेशही मोडत होता. त्यामुळे त्याचे आक्रमणही पंजाब पर्यंतच थांबले आणि तो परत फिरला आणि वाटेतच त्याचा मृत्यू झाला. अलेक्झांडरच्या या स्वा-यांचा इतिहास त्याने सोबत घेतलेल्या काही इतिहासकारांनी लिहून काढला असला तरी मूळ लेखन आज अप्राप्य आहे. पण त्यातील उद्घ्रुते मात्र एरियन, डायोडोरस व प्लूटार्कसारख्या लेखकांनी वापरत इतिहास लिहिलेला आहे. जगभरच्या दरबारी इतिहासकारांची प्रवृत्ती असते कि आपल्या बाजूचे यश हे भव्य-दिव्य करून दाखवायचे व अपयश आलेले असते तेथे मूक राहायचे किंवा कल्पोपकल्पित कथा ठोकून द्यायच्या ही प्रवृत्ती ग्रीक, रोमन, अरबी, भारतीय आणि चीनी इतिहासकर ते विशेषता: भारतातील शिलालेखात दिलेल्या माहितीत प्रकर्षाने दिसून येते. जेथे समकालीन अन्य माहिती देणारे सोर्स असतात तेथे किमान माहितीतील सत्यासत्यता पडताळून तरी पाहता येते, पण जेथे हे शक्य नाही तेथे मात्र तर्काने व लेखन शैलीत झालेल्या किंचित बदलातून तर्काने शोधावे लागते. अलेक्झांडरचा लिखित इतिहासही या दोषांपासून अलिप्त नाही. खरे तर कोणताही प्राचीन इतिहास तारताम्यानेच घ्यावा लागतो. अलेक्झांडरचा इतिहासही निकोपपणे पाहिला पाहिजे.

दुसरी बाब म्हणजे तेव्हा राष्ट्र या संकल्पनेचाच उदय झाला नसल्याने अशा युद्धांना कोण्या राष्ट्राचे दुस-या राष्ट्रावरील आक्रमण या अर्थानेही घेणे चुकीचे असते. राष्ट्र ही संकल्पना अवघ्या दोन-तीनशे वर्षांपूर्वी जन्माला आली. त्याआधी एकाच प्रदेशातील राजेही आपापसात धमासान युद्धे करत असत. लोकांना गुलाम बनवत असत. स्त्रियांवर अत्याचार करत असत. एकच धर्म असला तरी शत्रू राज्यातील प्रार्थनास्थळे तोडत असत. शत्रूला नामोहरम करणे हाच मुख्य उद्देश्य असल्याने हे सारे क्षम्यही मानले जाई. परंतु आजच्या राष्ट्रवादी विचारप्रवाहात आजचे राष्ट्र लक्षात घेऊन कोणते आक्रमण झाले आणि कोणते आक्रमण बाहेर केले यावरच राष्ट्रवादी इतिहासकाराचा जोर असतो. यात इतिहासाचेही नीट विश्लेषण होऊ शकत नाही हेही एक वास्तव आहे.

अलेक्झांडरचा जन्म इसपू जुलै २५६ मध्ये मेसेडोनियाची (ग्रीस) राजधानी पेल्ला येथे झाला. मेसेडोनियाचा राजा फिलीप आणि ऑलिम्पियाचा तो मुलगा. त्याच्या जन्माबाबत प्लूटार्कसारख्या इतिहासकारानेही अद्भुतरम्य कथा लिहिलेल्या आहेत. अगदी अलेक्झांडर हा साक्षात ग्रीक देवसम्राट झियसचा पुत्र आहे असेही त्याने म्हटले आहे. प्रसिद्ध व्यक्तींचे माहात्म्य वाढवण्यासाठी अशा अद्भुतरम्य दैवी कथा बनवणे ही प्रवृत्ती फक्त भारतीयांची नाही. ती सार्वत्रिक आहे. अनेक इतिहासकारांच्या मते या स्वत:बद्दलच्या या दैवी कथा राजा बनल्यावर स्वत: अलेक्झांडरनेच जन्माला घातल्या.

अलेक्झांडरचे शिक्षण ग्रीसचा थोर तत्वद्न्य अरिस्टोटलच्या अखत्यारीत पार पडले. याच काळात त्याचा परिचय पर्शियन साम्राज्यातून निर्वासित झालेल्या लोकांशी आला आणि त्याला पर्शियन साम्राज्याबद्दल आतील माहिती मिळाली. कदाचित या परिचयातूनच त्याला तत्कालीन बलाढ्य अकेमेनिड साम्राज्यासारखे साम्राज्य उभारण्याची प्रेरणा मिळालेली असू शकेल. सोळाव्या वर्षी शिक्षण संपल्यावर तो दरबारी व काही युद्धांचे नेतृत्व करण्याच्या जबाबदा-या घेऊन यशस्वीरीत्या पारही पाडू लागला. फिलीप त्यावेळीस थ्रेस आणि थिब्जशी संघर्षात व्यस्त होता. त्याला अलेक्झांडरही सामील झाल्यामुळे मेसेडोनियाला थिब्ज व अथेन्सवर मोठा विजय प्राप्त करता आला. पण त्यानंतर फिलीप क्लिओपात्रा युरीडीसी या तरुण स्त्रीच्या प्रेमात पडला आणि विवाहही केला. यामुळे आपला वारसाहक्क हिरावला जाईल म्हणून नाराज झालेल्या अलेक्झांडरने देश सोडला आणि जवळपास सहा महिने बाहेरच आश्रय घेऊन राहिला. पुढे बाप-लेकात दिलजमाईही झाली.

इसपू ३३६ मध्ये एका विवाहसमारंभात फिलिपची हत्या त्याच्या अंगरक्षकदलाच्या प्रमुखाने केली. याच वेळेस अलेक्झांडरची नियुक्ती राजपदावर केली गेली. त्याची सत्ताच मुळात आधी त्याच्या सिंहासनाला धोका पोचवू शकतील अशा विरोधकांचा काटा काढण्यातून झाली. त्याची आई ऑलिम्पियाने तिची सवत क्लिओपात्रा युरीडीसी आणि स्वत:ची फिलीपपासून झालेली मुलगी युरोपाला जिवंत जाळून ठार मारले. त्यानंतर अलेक्झांडरने आपल्या सीमा सुरक्षित करायला सुरुवात केली. थीब्ज तर त्याने पुरते उध्वस्त करून टाकले. त्याला प्रतिस्पर्धी नको होता.

मेसेडोनिया सुरक्षित केल्यानंतर त्याने आपले लक्ष तत्कालीन बलाढ्य महासत्ता अकेमेनिड साम्राज्याकडे वळवले. जवळपास पन्नास हजार पायदळ आणि सात हजार घोडदळ तसेच १२० जहाजांचा काफिला घेऊन तो आशिया खंडात प्रवेशला आणि पर्शियन साम्राज्याशी त्याने युद्धे सुरु केली. त्याला त्यात यशही मिळत गेले. इजिप्त, सिरीया, असिरिया इत्यादी अकेमेनिड साम्राज्यात असलेले प्रदेश झपाट्याने जिंकत तो पुढे सरकला. आणि शेवटी अकेमेनिड साम्राज्याच्या झाग्रोस पर्वतराजीत असलेल्या राजधानीवर, पर्सेपोलिसवर हल्ला करून ते जिंकून घेतले. अलेक्झांडरने आपल्या सैनिकांना राजधानी लुटायची खुली सूट  दिली. कैक दिवस ही लुट सुरु राहिली. शहराला आगही लावण्यात आली. सम्राट दारियस पळून गेलेला होता. त्याचा पाठलाग सुरु झाला. दारियसच्या प्रांतिक अधिका-यांनी अलेक्झांडरविरुद्ध उठावही सुरु केले तेही शमवायचे होते. शेवटी पार्थियात दारियसला जिवंत पकडले गेले, पण त्याचा बेस्सस नावाच्या त्याच्याच एका क्षत्रपाने खून केला. दारियसच्या खुनानंतर मृत्युनंतर त्याचे क्षत्रप स्वतंत्र होऊ पाहताहेत हे लक्षात येताच त्याने सारे उठाव चिरडत ते सारे प्रांत आपल्या ताब्यात घ्यायला सुरुवात केली. अकेमेनिड साम्राज्य पंजाबपर्यंत पसरले असल्याने आणि तेथीलही स्थानिक सत्ता स्वतंत्र होऊ लागल्या असल्याने त्यांना पुन्हा स्वत:च्या साम्राज्याशी जोडणे आवश्यक होते. त्याच्या भारतावरील आक्रमणाची ही पार्श्वभूमी आहे.

 

-संजय सोनवणी 

No comments:

Post a Comment

सस्सानिद साम्राज्याचा अस्त आणि हुणांचे आक्रमण

  भारतीय उपखंडावर आजवर झालेल्या ज्ञात आक्रमणांचा आणि सत्ताविस्ताराचा वेध घेत असताना आपण त्याचा भारतीय संस्कृतीवर झालेल्या ब-या वाईट परिणामां...