शेरशहा सुरीने हुमायूनचा पराभव केला आणि त्याला भारताबाहेर हाकलले. दिल्लीत आता कोणी शासक उरला नसल्याने शेरशहाने स्वत:ला दिल्लीचा सम्राट घोषित केले.
शेरशहा हा मुळचा अफगाणिस्तानातील. त्याचे मुळचे नाव फरीदखान. शेरशहा ही त्याची पदवी होती. त्याचे वडील हसन हे रोहवरून नोकरीच्या शोधात भारतात आले. बिहार प्रांतात त्यांनी ससराम आणि खावासपूर तांडा हे परगणे मिळवले. पण फरीदला सावत्र आईचा जाच सहन करावा लागला. शेवटी तो आग्र्याला गेला आणि लोदी घराण्याचा आश्रय घेतला. दौलतखान लोदीने सुलतानाचे मन वळवल्यामुळे त्याला वडिलांचे परगणे देण्याचे फर्मान सुलतानाने काढले. पण सावत्र भावाने त्याला विरोध केल्याने त्याने बिहारच्या सुलतान मुहम्मदाची चाकरी पत्करली. पुढे १५२७ मध्ये शेरशहा बाबराकडे गेला. बाबराला त्याने अनेक युद्धांत मदत केली व विजय मिळवले. पण पुढे अफगाण मुस्लीम आणि बाबर (तुर्की मुस्लीम) यांच्यात संघर्ष सुरु झाल्याने त्याने पुन्हा अफगानांची बाजू घेतली. पुढे त्याने अनेक अमीर विधवा आणि निपुत्रिक स्त्रियांशी विवाह करून संपत्ती वाढवली. हुमायूनने लोदी घराण्याला सत्ता सोडण्याचे आवाहन केले. मुहम्मद लोदीने ते नाकारले व युद्धाची तयारी केली. शेरशहाला युद्धात सहभागी होण्याचे निमंत्रणही पाठवले. पण शेरशहा पोचण्याआधीच हुमायूनने गोमती नदीकाठी झालेल्या युद्धात लोदिचा भीषण पराभव केला आणि शेरशहाला त्याच्या ताब्यातील गंगाकाठचा चुनार किल्ला मोगलांहाती सोपवण्याची मागणी केली. शेरशहा बधत नाही हे पाहून हुमायूनने त्याच्यावर स्वारी केली खरी पण त्याच वेळीस गुजरातमध्ये उठाव झाल्यामुळे हुमायूनला वेढा उठवून तिकडे कूच करणे भाग पडले. त्यामुळे शेरशहाचे बिहार व बंगालच्या काही भागावर वर्चस्व निर्माण झाले. नैसर्गिक साधनसंपत्तीने संपन्न असलेले बिहार आणि बंगाल मोगाल्क साम्राज्याला जोडून घ्यायचे हुमायूनचे स्वप्न होते. त्याने त्यासाठी खूप प्रयत्न केले. शेरशहा आणि हुमायून यांच्यातील संघर्ष तीव्र झाला आणि शेवटी शेरशहाने हुमायुनशी केलेल्या दोन मोठ्या युद्धात त्याचा पराभव केला आणि त्याला भारत सोडायला भाग पाडले.
शेरशहा १५४० ते १५४५ एवढ्या अल्पकाळापुरता दिल्लीचा बादशाहा बनला असला तरी त्याने ज्या प्रशासकीय, महसुली आणि आर्थ्यिक सुधारणा घडवून आणल्या त्यामुळे त्याचे नाव भारतीय इतिहासात अजरामर आहे. तो धडाडीचा योद्धा तर होताच पण त्याने सैन्यातही मोठे फेरबदल घडवून आणले. पुढे त्याने केलेल्या सुधारणा ब्रिटीशकाळापर्यंत टिकून राहिल्या हे त्याचे मोठेच कौशल्य आहे.
शेरशहा पातशहा बनला त्याआधी त्याला बिहार व बंगालमधील शासक या नात्याने राज्यकारभाराचा चांगलाच अनुभव होता. त्याने सुधारणांची सुरुवात केली होती तीच मुळात बंगालमधून. बादशहा बनल्यानंतर त्याने त्या सुधारणा व्यापक भागावर लागू केल्या. १५४१ मध्ये बंगाल ताब्यात घेतल्यानंतर शेरशहाने बंगालचे वाटणी ४७ प्रांतात केली व प्रत्येक प्रांतावर एक प्रशासकीय अधिकारी (शिकदार) नेमला तसेच गावाचे आधिपत्य मुख्तार या केंद्रीय शासनाने नेमलेल्या प्रमुखाकडे देण्यात आले. यासाठी शेरशहाने अफगाणिस्तानातून असंख्य लोकांना निमंत्रित केले आणि अनेकांना सैन्यात सामील करून घेतले तर प्रशासनिक पदेही त्यांनाच वाटली. त्यामुळे भारतातील अफगाणी मुस्लिमांचे प्रमाणही वाढले कारण हीच पद्धत साम्राज्यात सर्वत्र राबवली गेली. अर्थात पदांची व परगण्याची नावे व त्यावरील अधिकार्यांची पदनामे पुढे बदलली.
आज आपण ज्या अर्थी रुपया हा शब्द वापरतो या चलनाचे जनकत्व शेरशहाकडे जाते. त्याच्या आधी केवळ चांदीच्या नाण्याला रुपया म्हणण्याची प्रथा होती. तांब्याची नाणी पैसा या मूल्याशी निगडीत होती. सोन्याच्या नाण्यांना मोहरा हा शब्दही त्यानेच प्रचलित केला. त्रिधातूंच्या सहाय्याने पाडलेल्या व विशिष्ट मुल्य असलेल्या नाण्यांना रुपया म्हणण्याची प्रथा त्यानेच सुरु केली. आज र्प्या हे चलन भारत तसेच नेपाल, श्रीलंका आदि देशांतही वापरले जाते.
सैन्यातही त्याने शिस्त आणली. सैनिकी गुणांना प्राधान्य दिले. सामाजिक न्यायाबद्दलही तो प्रसिद्ध आहे. न्यायालये काझी चाल्वर तर दिवाणी दावे स्वत: शेरशहा चालवत असे. हिंदू आपले विवाद पंचायतीत सोडवत असत. पण गुन्हेगारी खटल्यांतून कोणालाही जात-धर्म किंवा प्रशासकीय अथवा सैनिकी पद या आधारावर सुटका मिळत नसे. स्वत: शेरशहाणे वरिष्ठ अधिकार्यांना कठोर शिक्षा फर्मावल्यामुळे एक न्यायी बादशाहा म्हणून त्याची कीर्ती त्याच्या हयातीतच निर्माण झाली होती.
व्यापारात वृद्धी व्हावी म्हणून बंगाल ते काबुल येथवर जाणार्या उत्तरापथ या महामार्गाची मध्ययुगात पुरती दुर्दशा उडालेली होती. शेरशहाने या महामार्गाची पूर्ण दुरुस्ती केली. झाडे लावली तसेच व्यापार्यांच्या मुक्कामासाठी सराया निर्माण केल्या. वाटेत ठराविक अंतराने विहिरी खोदल्या तसेच जुन्या होत्या त्या वापरात आणल्या. त्यामुळे व्यापाराला गती येऊ लागली. टपाल व्यवस्था सुरळीत व सुरक्षित करण्याचे कामही त्याने जोमाने पुढे नेले. व्यापार वाढवण्यासाठी त्याने कररचनाही सौम्य केली. देशात येणार्या मालावर व विकल्या जाणाऱ्या मालावर तेवढे कर ठेवले, बाकी कर रद्द करण्यात आले. त्यामुळे देशांतर्गत आणि आयात-निर्यात व्यापार सुलभ होऊ लागला.
ग्रीक, पर्शियन, शक, तुर्की आणि अफगाण शासकांचे हे पर्व अनेक शतके राहिले असले तरी बव्हंशी युद्धे मुस्लीम विरुद्ध मुस्लीम अशीच राहिलेली असल्याचे आपल्याला दिसते. इस्लाम शासनकाळात खुश्रुखान हा अल्पकाळासाठी दिल्लीचा बादशाहा बनला होता. (सन १३२०). हा मुळचा गुजराती व दलित समाजातून वर आलेला. अकबराच्या सुरुवातीच्या काळात हेमू या हिंदू वीरानेही काही काळासाठी का होईना दिल्लीहून राज्य केले. पण सर्वच सम्राट हे मुळात सत्ता हेच आपले ध्येय मानत राहिले. ग्रीक, पर्शियन आक्रमक परत गेले पण शक ते मोगल या देशातच राहिले. अपवाद तैमुरलंग, नादिरशहा आणि अब्दालीचा. या तिघांनी भारताची अमाप लुट केली. भारतात निर्मितीचा कोणताही वारसा त्यांनी सोडला नाही. बाकी मात्र या देशातच राहिले आणि या देशाच्या समाजजीवनात बऱ्यापैकी मिसळून गेले.
या सर्व आक्रमकांनी जरी भारताला समाज-सांस्कृतिक क्षती पोचवली असली, काही सम्राट अन्यायी वागले असतील, काही धर्मांधही असले तरी त्यांना काही ना काही प्रमाणात या देशातील सांस्कृतिक घटक स्वीकारावेच लागले. कारण सत्ताचालन त्याशिवाय शक्य होत नाही. त्यांनी या देशात अजरामर वास्तूही निर्माण केल्या. समाज जीवनावर अमिट ठसा सोडणारी बरी वाईट कृत्येही केली. त्यातूनच आजचा भारतीय समाज आकाराला आला आहे. या देशाची एक विशिष्ट मानसिकता बनायला प्राचीन कालापासून भारतात झालेले हे सांस्कृतिक अभिसरणही जबाबदार आहे हे लक्षात घेतले पाहिजे.
-संजय सोनवणी
great post djpunjab official
ReplyDelete