Wednesday, December 4, 2024

सिंधू संस्कृतीची मालकी!

 सिंधू संस्कृतीची लिपी वाचता आलेली नसल्याने कोणीही उठतो आणि सिंधू संस्कृतीवर मालकी सांगतो. द्रविडांनी हे काम आधी सुरु केले पण त्याला आर्य आक्रमण सिद्धांताची पार्श्वभूमी होती. नंतर ऋग्वेदात मुंड भाषेतीळही काही शब्द आहेत याचा आधार घेऊन ही मुंडाची संस्कृती असावी असा अंदाज बांधणारी अनेक पुस्तके आदिवासी संशोधकांनी लिहिली. गेल्या काही वर्षात बौद्धही अधिकार सांगू लागले आहेत. तत्पूर्वी जैनांनीही आपला अधिकार सांगणे सुरु केले होते. वैदिकांचा तर हा उद्योग विशेषता: १९७० नंतर सुरु झाला आणि आता तर त्याचा वेग जास्तच वाढला आहे. पण सिंधू संस्कृतीतील एकही वैशिष्ट्य ऋग्वेदाने नोंदलेले नसल्याने हे दावे अंतरराष्ट्रीय पातळीवर फेटाळले गेले आहेत.

पण वास्तवे वेगळीच आहेत. priest king चा अंगावर जे वस्त्र आहे ते बेलबुट्टीदार आहे. अशी वस्त्रे घालण्याची परंपरा बौद्ध अथवा जैन धर्मात कधीही नव्हती. योगी स्वरूपातील मुद्रा आदीशिवाच्या आहेत असे मत जगातील बहुतेक (देशी आणि पाश्चात्य) संशोधकांनी मांडले आहे कारण अन्य मुद्रांवर वृषभ, त्रिशूल, शिकारी (किरात) ही आदिम शिवरूपे तर आहेतच पण काही मुद्रांवर देवीस्वरूपातील चित्रण आहे. कालीबंगन येथे आपण आज पुजतो तसेच शिवलिंग सापडले आहे. थोडक्यात आदिम लोकधर्म (ज्याला आपण आज हिंदू म्हणतो) त्यातीलच प्रतिमा मिळतात. गणेशाचेही आद्य रूप मुखवटा स्वरूपात मिळालेले आहे. या सन्स्क्रुती४च्या समांतर समन विचारही त्या काळात जन्माला आलेले असू शकतात. सिंधू संस्कृतीच्या वैभवशाली स्थितीत वैभवाचा लोभ ठेवल्याने निर्माण होणाऱ्या दुष्परिणामांची दखल घेत विरक्ती आलेले विचारवंत आपापला विचारव्यूह जन्माला घालू शाल्क्तात. पण सिंधू संस्कृती ही प्राधान्याने उत्पादक व व्यापारी तसेच शेतकऱ्याची संस्कृती होती, विरक्त साधूपुरुषांची नव्हे हे लक्षात घेतले पाहिजे.

बौद्ध धर्म अस्तित्वात आला तो सनपूर्व सहाशे मध्ये. जैन धर्म त्यापेक्षा प्राचीन आहे पण त्याची निर्मिती झाली ती मगध प्रांतात. सिंधू संस्कृतीची स्थळे आणि मगध यात शेकडो मैलांचे अंतर आहे. शिवाय या प्रांतात झालेल्या उत्खननांत सिंधू शैलीतील मुद्रा अथवा प्रतिमा मिळालेल्या नाहीत हेसुद्धा येथे लक्षणीय आहे.

योग हा निसंशय वेदपूर्व आहे, पण त्याची निर्मिती लोकधर्म आणि त्यातूनच निर्माण झालेल्या समन संस्कृतीने केलेली आहे. जैन धर्मीय आद्य तीर्थंकर ऋषभनाथांना योगाच्या निर्मितीचे श्रेय देतात तर हिंदू शिवाला. पुरातन बाबीबद्दल हवे ते इष्ट वाटणारे दावे करता येतात हे एक वास्तव आहे. पण समन संस्कृती ही विविध तात्विक विचारधारांची संस्कृती होती व सर्व जीवांना समान मानने हा त्यांच्यातील समानतेचा एक धागा होता. पण प्रत्येकाचे ईश्वर, मोक्ष, साधनामार्ग, सामाजिक जीवन, सन्यास याविषयीचे विचार स्वतंत्र होते. बौद्ध, जैन व आजीवक धर्म त्यामुळेच पृथक आहेत. पुढे आजीवक धर्म नष्ट झाला तर जैन व बौद्धांत अनेक शाखा निर्माण झाल्या कारण त्यांचीही आपल्या धर्ममतांबद्दल एकवाक्यता राहिली नाही. आजचे नवबौद्ध नेमक्या कोणत्या शाखेचे आहेत, म्हणजे हीनयान, महायान, वज्रयान, की अन्य हे त्यांनाही सांगता येईल असे वाटत नाही.

शिवाबद्दल म्हणाल तर जैनांचे आद्य तीर्थंकर ऋषभनाथ यांच्या निर्वाणानंतर तेथे शिव आपल्या पत्नीसह उपस्थित झाले असा स्पष्ट उल्लेख जंबूदद्दीवपन्नती या प्राचीन जैन ग्रंथात येतो. म्हणजे शिव संकल्पनेचे पुर्वास्तीत्व जैनान्नाही मान्य होते.  पुरातत्वीय पुराव्यानुसार बाघोर येथे सनपूर्व ९००० मधील पूजनात असलेली योनी प्रतिमा मिळाली आहे तर त्याच काळातील लिंग महाराष्ट्रात मिळाले आहे. जननक्रियेला दैवी रूप देत ही पूजा स्वतंत्र रुपाने होत होती आणि नंतर सनपूर्व २९०० मध्ये स्त्री आणि पुरुष लिंगाचे एकत्रीकरण करण्यात आले. शिव-उमा यांना मनुष्यच नव्हे तर अखिल विश्वाचे जन्मदाते मानले जाऊ लागले. प्राचीन मानवाच्या दृष्टीने हे स्वाभाविक होते.

समन विचारधारा ही कोणा एकाचीच मालकी नाही. जैनांनी आपले तत्वज्ञान स्वतंत्र रूपाने विकसित करत नेले. त्यात कालौघात अनेक भर पडत गेली व तत्वज्ञानाचा विकासही होत राहिला. त्यातही वैचारिक भेद निर्माण झाल्याने दोन मुख्य पंथ निर्माण झाले हा इतिहास आहे. बौद्धांनी पूर्वबौद्ध ही संकल्पना विकसित केली ती इसवी सनाच्या पहिल्या शतकाच्या आसपास. पण ऐतिहासिक दृष्ट्या या संकल्पनेला पाठबळ देणारा एकही पुरावा नाही. बौद्ध धर्म्नाने समन संस्कृतीतील काही विचार स्वीकारले तर काही नाकारत स्वतंत्र विचार दिले या दृष्टीने गौतम बुद्धाचे महत्व निर्विवाद आहे. पण सरळ सिंधू संस्कृतीचे जन्मदाते म्हणवणे हा सत्याचा अपलाप आहे एवढेच.

-संजय सोनवणी 

No comments:

Post a Comment

सिंधू संस्कृतीची मालकी!

  सिंधू संस्कृतीची लिपी वाचता आलेली नसल्याने कोणीही उठतो आणि सिंधू संस्कृतीवर मालकी सांगतो. द्रविडांनी हे काम आधी सुरु केले पण त्याला आर्य आ...