Thursday, March 6, 2025

माणूस जिवंत करण्यासाठी!

 आमचे डोळे फुटलेले आहेत

कानात लाव्हा भरला आहे

कोणत्या ज्वालामुखीवर आम्ही बसलो आहोत

हे कळेना व्हावे एवढे बौद्धिक बधीर आम्ही झालो आहोत

पिशाच्चे नंगानाच करत आहेत चारी बाजूंनी

राज्यकर्ते आणि राज्यकर्ते होऊ पाहणाऱ्या

हैवानांचा हैवानांशी संघर्ष

आम्हाला मनोरंजक वाटतो आहे

त्यातच आम्ही आमच्या वांझ मनोरंजनांची

आणि झगड्याची सोय लावत

एकमेकांचा जीव घेण्यासाठी

आतुर झालो आहोत....

वेदनांमध्ये क्रूर आनंद घेण्यात आम्हाला तृप्तता वाटू लागलीय

आणि

स्मशानांतली धग आम्हाला अपार शांती देऊ लागलीय...

ही कोणती अभद्र शांती उपभोगतोय आम्ही?

हा कोणता नृशंस आनंद प्रिय वाटतोय आम्हाला?

अरे, जिवंत करा तुमचे फुटलेले डोळे

आणि करा साफ

लाव्हा भरलेले कान

आणि जरा बघा कोणता विनाश चालून येतोय

आणि जरा ऐका

विझत चाललेल्या आत्म्यांचे अखेरचे आक्रोश...

अरे उठून सज्ज व्हा या हैवानांचा

नाश करण्यासाठी

माणूस जिवंत करण्यासाठी!


-संजय सोनवणी

No comments:

Post a Comment

माणूस जिवंत करण्यासाठी!

  आमचे डोळे फुटलेले आहेत कानात लाव्हा भरला आहे कोणत्या ज्वालामुखीवर आम्ही बसलो आहोत हे कळेना व्हावे एवढे बौद्धिक बधीर आम्ही झालो आहोत पिशाच्...