Thursday, August 21, 2025

तत्वज्ञानातील अनुत्तरीत प्रश्न आणि मानवी भविष्य

 


ईश्वर आहे की नाही, चेतना म्हणजे काय, विश्वाला काही अर्थ आहे की नाही, मुक्त इच्छा अस्तित्वात असते की नाही, वास्तवाचे खरे स्वरूप काय, नैतिकतेचा पाया कोणता, वेळ आणि अवकाशाचे मुळ काय, ज्ञान म्हणजे काय आणि त्याची मर्यादा काय, मृत्यू म्हणजे काय आणि सर्वात महत्वाचे म्हणजे मानवाचे अन्तिम ध्येय/साध्य काय असे काही प्रश्न आहेत ज्यावर जगातील असंख्य तत्वचिंतकांनी प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक काळात कधी बीज रुपात तर कधी सविस्तर चर्चा केलेली आहे. परंतु हे प्रश्न आजही समाधानकारक रीतीने सुटले आहेत असे नाही. किंबहुना त्यामुळे तत्वज्ञान हा विषयच अप्रस्तुत आहे की काय असे अनेकांना वाटू लागते. पण हे विषय अखिल मानवजातीसाठी अनावर कुतूहलाचा विषय असल्याने त्यावर चर्चा अथवा चिंतन करत राहणे मानवजातीच्या दृष्टीने महत्वाचे आहे. एवढेच नव्हे तर जागतिक मानव आज ज्या भयकारी मानसिकतेतून जात आहे ती अवस्था दूर करायला प्रश्नांची निर्विवाद उत्तरे शोधणे आवश्यक आहे.
खरे तर हेच मानवाला प्राचीन काळापासून भेडसावणारे मुख्य प्रश्न आहेत. असे असले तरी तत्वज्ञही त्या त्या काळाची आणि समाजव्यवस्थेची अपत्ये असल्याने त्यांच्या चिंतनाला आणि शोधलेल्या उत्तरांना अपरिहार्यपणे त्या कालमर्यादा आणि समाजविचार चौकटीचा प्रादुर्भाव होणे सहज शक्य आहे. त्यामुळे काही मते किंवा विचार आणि निष्कर्षही दुषित होणे स्वाभाविक आहे. खरा प्रश्न हा आहे की कालचौकट आणि समाजनिरपेक्ष तत्वज्ञान मांडता येईल की नाही हा. यावर विचार केला तरच आपण वरील उपस्थित झालेल्या प्रश्नांवर उत्तरे शोधु शकू.
पूर्वीचे जीवन तुलनेने खूप संथ होते. त्यांना त्यांच्या आकलन मर्यादेत येतील अशी तात्कालिक उत्तरे तत्वज्ञांनी शोधली व ती त्या त्या स्थितीत लोकांना पटलीही. किंवा त्या उत्तरांच्या विरोधात नवी तत्वद्न्याने निर्मानही केली. पण आजच्या जगाचा वेग भयावह झाला आहे आणि त्यावर नवे तत्वज्ञान मांडले न गेल्याने मानसिक कुंठाही तेवढ्याच जटील झाल्या आहेत.
आधुनिक काळात सापेक्षतावादाचा सिद्धांत विश्वोत्पत्तीशास्त्रात लोकप्रिय असला तरी लघुत्तम पातळीवरील (क्वांटम) पातळीवर हा सिद्धांत लागू पडत नाही अये आधुनिक भौतिकी विज्ञानातील शास्त्रज्ञांच्या लक्षात आलेले आहे. मी माझ्या नितीशास्त्र या पुस्तकात यावर उहापोह केलेला आहे. सापेक्षवादाआला उत्तर निरपेक्षतावाद हे आहे हे मी त्यात दाखवून दिलेले आहे. मानवी जगच सापेक्ष दृष्टीने भोवतालच्या आणि आकाशात दूरवर पाहत असलेल्या भूतकालीन विश्वाकडे पाहत असतो त्यामुळे वर्तमानकालीन विश्व कोणत्या अवस्थेत आहे हे त्याला समजू शकण्याची सुतराम शक्यता नाही हेही एक वास्तव आहे. भविष्य तर माणसाच्या आकलनात आलेले नाही. माणसाला भविष्य वर्तवता आले तरी ते भौतिक भविष्य असते, मानवी जगाचे नाही ही सुद्धा एक मानवी मर्यादा आहे. भौतिक घटना गणिती नियमाने होतात तशा मानवी जगातील नाही. त्याचेही गणित असू शकेल पण ते गणित आपल्याला अजून गवसलेले नाही. त्यामुळे मानवी भवितव्य हे सध्या तरी अनिश्चितता आणि संभाव्यतेच्या तत्वावर सांगता येते. थोडक्यात ते अंदाज असतात. ते कधी उत्स्फूर्ततावादातून येतात तर कधी ठोकताळ्यांवर आधारित असतात. अनिश्चितता मात्र कायम राहते. आणि अनिश्चितता हीच अशी गोष्ट आहे जी माणसाला आजन्म छळत राहते. अगदी पुराकथा जरी पाहिल्या तरी देव घ्या की तपस्वी घ्या, अनिश्चिततेला आव्हान देऊ न शकल्याने त्यांच्याही जीवनात अनपेक्षित उलथापालथी झालेल्या आहेत हे आपल्या लक्षात येईल. पण आता हा वेग प्रचंड वाढला आहे आणि त्यातूनच सामाजिक राजकीय आणि आर्थिक प्रश्नांनी वर डोके काढले आहे आणि मानवी मानसिकतेवर त्याचा विपरीत परिणाम होतो आहे.
नियती किंवा दैव हे या अनिश्चिततेवरील उत्तर मानून एक सोपी पळवाट काढण्याची एक मानवी प्रवृत्ती आहे. जगभरच्या पुराकथा शेवटी हेच उत्तर देतात. हीच त्याची/तीची नियती होती आणि ही नियती किंवा दैव कोणी ठरवले तर आकाशस्थ देवतांनी किंवा अदृश्य शक्तींनी. माणसाने शोधलेले हे सोपे आणि सहज पटणारे आणि माणसाला श्रद्धाशील करणारे तत्व होते यात शंका नाही. पण आजही आधुनिक मानव म्हणा किंवा तत्वज्ञ म्हणा याविषयी निर्विवाद भाष्य करू शकलेला नाही. थोडक्यात अनिश्चिततेचे तत्व आजही तत्वज्ञानाला आणि म्हणून सर्व मानवजातीला आव्हान देत आहे हे आपल्या लक्षात येईल.
खरे तर जोवर अनिश्चिततेच्या प्रश्नाला समाधानकारक आणि सार्वकालिक उत्तर मिळत नाही तोवर सुरुवातीला उपस्थित केलेल्या प्रश्नांना समाधनकारक उत्तर मिळू शकणार नाही हेही उघड आहे. किंवा असेही असू शकेल की जोवर वर उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर मिळत नाही तोवर अनिश्चिततेचे तत्वही अनुत्तरीत राहील हेही निश्चित. म्हणजेच दोन्ही बाजू सुटत नाहीत तोवर माणसाला समाधानकारक उत्तर मिळणार नाही आणि त्याचे नैतिक प्रश्नही सुटणार नाहीत हे उघड आहे. ते प्रश्न सुटणार नाहीत तोवर तुकड्या-तुकड्याने संलग्न प्रश्नाची उत्तरे ही असमाधानकारक आणि अनुपयुक्त असतील हेही उघड आहे. कारण येथे समग्र दृष्टीची गरज आहे, तुकड्या तुकड्यातील नाही.
कारण मुळात देव किंवा नियती अशी काही गोष्ट अस्तित्वात असते काय या प्रश्नापासून सुरुवात करावी लागेल. यालाच आनुषंगिक प्रश्न म्हणजे ईश्वर आहे की नाही हा. मग इतर प्रश्न येतात. आज जगात नास्तिक लोकांची संख्या वाढत असली तरी त्यामागील प्रेरणा निश्चियपणे सांगता येईल असेही नाही. थोडक्यात आजचे मानवी जग हे अजूनही अनुत्तरीत प्रश्नांवर हेलकावे खात आहे. म्हणून ते दिवसेंदिवस अधिक अस्थिर, पलायनवादी आणि असंयमी झाले आहे व हा वेग वाढत जाणार हेही निश्चित आहे. जसे विज्ञान वेगाने पुढे जात आहे तेवढेच मानवी मूल्यांचे प्रश्न जटील होताहेत हे आपल्या लक्षात येईल.
या जागतिक अगतिकतेतून माणसाला कसे बाहेर काढायचे हा आजच्या तत्वद्न्यांसमोर आहे. देव धर्म हे या मानसिक कुचंबनेला प्रभावी उत्तरे उरलेली नाहीत आणि नव्या जगासाठी नवे सक्षम आणि सर्वोपयोगी तत्वज्ञान जन्माला घालता येत नाही. त्यामुळेच मी वर उपस्थित केलेले प्रश्न आजही सोडवता आलेले नाहीत. भविष्यात यावर उत्तरे शोधता आली नाहीत तर माणूस अधिकधिक असंयमी, अविचारी आणि अविवेकी होत जाण्याचा धोका आहे. विज्ञान हे मानवाला सहाय्यकारी बनले असले तरी त्याची मानसिक प्रश्नांत भरच घालत आल्याचे आपल्याला दिसून येईल. यावर आजच्या मानवाला गंभीर विचार करावा लागणार आहे.
-संजय सोनवणी

No comments:

Post a Comment

तत्वज्ञानातील अनुत्तरीत प्रश्न आणि मानवी भविष्य

  ईश्वर आहे की नाही, चेतना म्हणजे काय, विश्वाला काही अर्थ आहे की नाही, मुक्त इच्छा अस्तित्वात असते की नाही, वास्तवाचे खरे स्वरूप का...