Wednesday, September 17, 2025

ऐसे केले या गोपाळे....




शेख महमद यांच्या उदात्त पार्श्वभूमीवर लिहिलेली ही पटकथा.

कथासूत्र


 आंबेडकर जयंतीला निर्माण झालेला तणाव अजूनही त्या ३०-४० हजार लोकवस्तीच्या विखुरलेल्या गावात आहे. एकता परिषद नावाच्या संघटनेची हिंदुत्ववादी मंडळी अजून काही दंगा घडवण्याच्या विचारात आहेत. गुप्त बैठका होत आहेत.

त्यात आता मोहरम जवळ आला आहे. होणा-या विरोधामुळे मुस्लीम समाजही तणावात आहे कारण हिंदुत्ववादी संघटनांनी मोहरम मिरवनुकीच्या मार्गाबद्दल आक्षेप घ्यायला सुरुवात केली आहे. आंबेडकरी समाजाचा मुस्लिमांना पाठिंबा आहे.

तणावाचे असे वातावरण असतानाच गावातील पुरोगामी हिंदू आणि मुस्लीम वातावरण शांत करण्यासाठी एका पुरोगामी कीर्तनकाराचे कीर्तन ठरवतात.

·          * 

श्याम म्हात्रे हा एक तिशीचा तरुण. सामान्य स्थिती. इलेक्ट्रिशियनची कामे करतो.. त्याची मुलगी गंभीर आजारी आहे. त्याला पैशांची नितांत आवश्यकता आहे. तो एकता परिषदेच्या नेत्याकडेही मदत मागतो, पण दिली जात नाही. त्यामुळे तो धीच अपसेट आहे. पण पोटाचा प्रश्न असल्याने तो गावातील कोणत्याही धर्म-जातीचे घर असो, आपले काम इमानदारीत करतो.

मंडप उभारला जातो. लाईट आणि लाउडस्पीकरची व्यवस्था लोकल कंत्राटदाराकडे सोपवली जाते. श्याम म्हात्रे हा तेथे वायरमन म्हणून येतो. लौडस्पीकर ते बाकी वायरीची सर्व कनेक्शन्स जोडतो. कंत्राटदाराकडून पैसे घेऊन निघून जातो.   

·          * 

कार्यक्रमाची वेळ होते. हिंदुत्ववादीही विखरून मंडपात येतात. ते काहीतरी गोंधळ घाण्याच्या विचाराने आले आहेत असा आभास निर्माण होतो.

कीर्तन सुरु होते. कीर्तनकार रसाळ वाणीत मुस्लीम आणि हिंदू संतात कसे ऐक्य होते आणि भेदाभेद सर्वांनीच कसा अमान्य केला याबाबत बोलायला सुरुवात करतात. लोक दाद देऊ लागतात तसे हिंदुत्ववादी अस्वस्थ होऊ लागतात.

त्यात कीर्तनकार बुवा शेख महंमद यांचा अभंग निरूपणासाठी घेतात.

ऐसे केले या गोपाळे | नाही सोवळे ओवळे ||
काटे केतकीच्या झाडा | आंत जन्मला केवडा ||
फणसाअंगी काटे | आंत अमृताचे साठे ||
नारळ वरूता कठिण | परी अंतरी जीवन ||
शेख मंहमंद अविंध | त्याचे ह्रदय गोविंद ||

यावर निरुपण सुरु होताच हिंदुत्ववादी आरडाओरडा सुरु करतात. अन्य गावकरी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करतात. पोलीसही मंडपात शिरतात. ‘

दुरून एक जन मंडपावर पेटता बोळा फेकताना दिसतो. शोर्ट सर्किटच्या ठिणग्याही उसळतात. मंडप धडाडून पेटू लागतो.

मंडपाला आग लागू लागते. पळापळ माजते,.

मंडप भस्मसात होतो. चेंगराचेंगरीत दोन माणसे मरतात तर काही लोक भाजून जखमी होतात.

·          * 

पोलीस कीर्तनाचे संयोजक, मंडपाचा कंत्राटदार व अन्य काही व्यक्तींवर गुन्हे दाखल करतात.

क्रॉस कम्प्लेंट होतात.

गावातले वातावरण गढूळ होते. मुस्लीम नागरिक संतापून जातात. आंबेडकरवादी म्हणतात कि विठ्ठल तर बुद्धाचेच रूप आहे, मग आम्हाला त्याची आराधना करणा-या संताशी आंम्ही आपलेपणा का दाखवू नये? असा प्रतिप्रश्न करतात.

हिंदुत्ववादी पुरोगाम्यांविरुद्ध आणि मुस्लिमांवर आगपाखड करू लागतात.

शेख महम्मद प्रकरणाला धार्मिक आणि राजकीय रंग दिला जाऊ लागतो. गावातील राजकीय व धार्मिक हित्स्म्बंध उघड होऊ लागतात.

·          * 

श्याम म्हात्रे आपल्या आजारी मुलीला हॉस्पिटलमध्ये एडमिट करतो.

मृतांचे नातेवाईक शोकात आहेत.

पोलीस तपास सुरु होतो तो खालील मुद्द्यांवर केंद्रित होतो.

अ.     आग कशी लागली आणि लावली कोणी?

आ.   लोकांच्या भावना भडकवायला कीर्तनकाराचा अभंग तर कारणीभूत झाला नाही ना?

इ.      मंडपात दंगा सुरु करण्याचा प्रयत्न कोणी केला?- हिंदुत्ववाद्यांनी, आंबेडकरवाद्यांनी कि पुरोगाम्यांनीच?

 * 

हा तपास कोणाकडे द्यायचा याचा खल वरिष्ठ पोलीस अधिका-यांत होतो. पक्षपाताचा आक्षेप येणार नाही  असे नाव शोधत ते शेवटी इन्स्पेक्टर माधवी भांडारेवर हा तपास सोपवतात. मोहन शिंदे हा पीएसआय तिच्या मदतीस देण्यात येतो.

 * 

चौकशी सुरु होते. माधवी गावातच पोलीस स्टेशन शेजारी मुक्काम ठोकून चौकशी सुरु करते.

खोडसाळ लोक तिची पार्श्वभूमी शोधायच्या मागे लागतात.

माधवी आधी शेख महमद यांचा इतिहास वाचायला सुरुवात करते आणि चौकशीही सुरु करते.

·          * 

 

चौकशीत साक्षीदारांचे वेगवेगळे दृष्टीकोन क्रमाक्रमाने समोर येत जातात.

१.     हिंदुत्ववादी शेख महम्मद हा विठ्ठल भक्त होता हेच नाकारतात आणि तो दिल्लीच्या पात्शहाचा हेर होता असा दावा करतात. त्याचे अभंग म्हणणे किंवा त्याला वारकरी संत म्हणणे अवघ्या वारकरी चळवळीचा अपमान आहे असा दावाही ते करतात. रामदासांनी इस्लाम आणि पैगंबरांवर मुसलमानी अष्टके लिहिली हेही ते नाकारतात.

२.     मुस्लीम समाजातील साक्षीदार श्रीगोन्द्याच्या या महान संताला मालोजी राजांनी कसे इनाम दिले होते याची व त्यांच्या चमत्कारांची माहिती देतात.

३.     पुरोगामी वर्ग म्हणतो, सामाजिक ऐक्याचा ते उद्गार होते. योगावरही त्यांचे प्रभुत्व होते. त्यांचा अभंग आजच्या स्थितीला योग्य होता.

४.     कीर्तनकार म्हणतो, मी विठ्ठलाचा सेवक. त्याच्यावर कोणीही भक्तीभावाने लिहिले असेल तर मी त्याचे गायन निरुपण करणार. भेदाभेद आम्हा अमंगळ. कीर्तन रंगात आले असतानाच असे व्हावे हे दुर्दैवी आहे.

त्याच वेळेस समांतर रीत्या आग कोणी लावली? कशी लागली? याचाः तपास सुरु आहे.

*

फोरेन्सिकचा अहवाल अजून आलेला नाही. माधवी घटना स्थळाचे पाहणी करते. तिला काही शंकास्पद बाबी दिसतात.

अ.     पेटता बोळा कनातीवर फेकला होता. (जळक्या बोळ्याचे अवशेष मिळतात.)

आ.   SHORTसर्किटही झाले असण्याची चिन्हे दिसताहेत.

इ.      पण या दोन्ही गोष्टी एकाच वेळेस कशा केल्या गेल्या असतील?

ई.      पेटता बोळा फेकणारा कोण होता?

उ.      कि हा निव्वळ अपघात आहे आणि जळके बोळ्याचे वाटणारे अवशेष कनातीच्या कापडाचे आहेत?

ती त्याबाबत कोणी नेमके काय पाहिले याची चौकशी करू लागते.

·          * 

वायरमन म्हात्रेचीही चौकशी केली जाते, पण तो कानावर हात ठेवतो. हे शोर्ट सर्किट असून तो अपघातच होता असे निक्षून सांगतो. माधवी त्याच्या बोलण्याच्या पद्धतीवरून संतुष्ट होत नाही. ते उलट सुलट प्रश्न विचारत राहते.

तोवर माध्यमे त्या घटनेवर भडक वार्ता प्रसृत करू लागतात. वातावरण अजून चिघळते. हिंदुत्ववाद्यांना शंका येऊ लागते कि माधवी आगीचे कारण त्यांच्यावरच ढकलणार आहे.  

आणि माधवीने त्याची कसून चौकशी केलेली आहे व गाव सोडून न जाण्याची वार्निंग दिली आहे.

मग तिच्या व मोहन शिंदेच्या बदनामीची मोहीम सुरु केली जाते. तिच्या वरिष्ठांना निनावी पत्र लिहिली जातात. हिंदुत्ववादी नेते शहरात पत्रकार परिषदा घेऊन निष्पक्ष चौकशीसाठी तपास सीआयडीकडे द्यावा अशा मागण्या करू लागतात.

·          * 

त्यात एके रात्री चौकशीवरून परतत असताना माधवीवर खुनी हल्ला होतो. मोहन शिंदे तिच्या मदतीला ऐन वेळेस येऊन तिला वाचवतो पण हल्लेखोर पळून जातात.

हल्ला कोणी केला? तो विशिष्ट पद्धतीने हसण्याचा आवाज कोणाचा होता?

ती शिंदेबरोबर चर्चा करते. पण तोही क्ल्यू लेस आहे.

शेख महमद यांच्याबद्दल जे वाचले त्याने ती प्रभावित झालेली आहे. अशा संताच्या नावावर येथे दंगा व्हावा याचा तिला खेद आहे.

ती आठवण्याचा प्रयत्न करते आणि हसण्याच्या लकबीवरून आपल्यावर झालेल्या हल्ल्यामागे वायरमन म्हात्रेचा तर हात नव्हता ना याच शंका तिला येउ लागते. अगदी सुरुवातीला चौकशीला आत बोलावण्याआधी तो असेच विशिष्ट लकबीने हसला होता हे आठवते. ती शिंदेबरोबर त्याचीही चर्चा करते. शिन्देचाही संशय बळावतो.

ती चार पोलीस व शिंदेला घेऊन त्याचे घर गाठते. पण तो घरी सापडत नाही. त्याची बायको भेदरून गेलेली असते आणि काही माहित नसल्याचे सांगते. माधवीला त्याचे मुलगी आजारी आहे आणि एका ऑपरेशनसाठी खाजगी हॉस्पिटलमध्ये एडमिट आहे हेही समजते.

·          * 

श्यामचा शोध सुरु होतो. तो शेवटी सरपंचाच्या मळ्यातील झोपडीत सापडतो. तो पळून जायचा प्रयत्न करतो. पण त्याला पकडून पोलीस स्टेशनला आणले जाते. शिंदे तेवढ्यात काहीतरी सुचते म्हणून तेथून निघून जातो.

काही वेळाने हिंदू एकता परिषदेचा मोर्चा स्टेशनवर येतो. तणाव वाढतो. नेत्याला आत बोलावून घेतले जाते. पण तो ऐकायला तयार नाही. पोलिसांवर दडपण आणायचा प्रयत्न करतो.

आत चौकशी चालूच आहे. म्हात्रे सारे आरोप नाकारतो. तो अपघात होता यावरच ठाम राहतो. पण तेवढ्यात शिंदे येतो. त्याच्या सोबत अजून माधवीवरील हल्ल्यातील सापडलेले दोन आरोपी आहेत.

एकाच्या मोबाईलवर त्या रात्री जे घडले याचे चित्रण आहे.

त्यात बोळा फेकणारा म्हात्रेच होता हे दिसतेय.

म्हात्रेला गुन्हा कबुल करण्याशिवाय गत्यंतर राहत नाही. तो आर्थिक अडचणीत होता म्हणून हिंदू एकता परिषदेने दिलेले हे निंद्य काम स्वीकारले असे सांगतो. आपल्याला कोणत्याही धर्माशी घेणेदेणे नसल्याचे आणि हे काम केल्याचे पैसे मिळणार होते आणि मुलीच्या आजारपणासाठी पैशांची गरज असल्याने हे काम घेतले हेही तो सांगतो. एकाच वेळेस शोर्ट सर्किट होईल असे manage करून लगेच बाहेर पडून पेटता बोळा फेकून आपण कसा पळ काढला याचे वर्णन करतो.

त्याचा कबुलीजबाब ऐकून हिंदू एकता परिषदेचा नेता मान खाली घालून निघून जाऊ लागतो पण वाट चुकलेल्या असहाय माणसाच्या परिस्थितीचा गैरफायदा घेतला व दंगल भडकावण्यासाठी त्याच्याकडून दुष्कृत्य करून घेतले यासाठी त्यालाही बेड्या ठोकल्या जातात.

पार्श्वभूमीवर शेख महमद यांचा अभंग.

स्वप्निचि भावना । तैसे जीवीत्व जाणा ।
जना नको सो दंभ अहंकारा ।
यम जेव्हां जीवा करिल यातना ।
तेव्हां काकुळति येसि गव्हारा ॥३॥
विजवट गहन । तैसे जन्म मरण ।
देहि या पाट जिवनि नितनोवरा ।
सदगुरु वचने मरण मारुनी उरा ।
शेख महमद विनवितो योगेश्वरा ॥४॥

समाप्त

 

-संजय सोनवणी 

No comments:

Post a Comment

Linguistic Theories

The entire world's conceptions and myths about the creation of language show that humans are curious about their language skills and str...